‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम
======================
लेखक : श्रीकांत आव्हाड
======================
२००८ सालाची कॉमनवेल्थ बँक क्रिकेट सिरीज आठवतेय? भारताने ऑस्ट्रेलियाला हरवले होते.
ऑस्ट्रेलिया त्यावेळी जगातील सर्वोत्तम संघ होता. त्यांची देहबोली हि नेहमीच विजेत्यांची असायची. आम्ही सर्वोत्तम आहोत हे त्यांच्या वागण्याबोलण्यातूनच ते दाखवून द्यायचे. ऑस्ट्रेलियाला एखाद्या सामन्यात हरवणं सुद्धा त्याच्या विरोधी संघांना खूप मोठी अचिव्हमेंट वाटायची. भलता जल्लोष केला जायचा. पण त्या जल्लोषातून ऑस्ट्रेलियाचंच महत्व दिसून यायचं. यामुळे ऑस्ट्रेलिया नेहमीच विश्वविजेता वाटायचं, पण याचवेळी भारतीय संघसुद्धा T-20 विश्वविजेतेपद जिंकून आपल्या एका नव्या आणि दमदार वाटचालीचा सुरुवात करत होता.
सिरीज ची फायनल तीन सामान्यांची होती. best of three. पहिली फायनल होती. आपला विजय जवळजवळ निश्चित झाला होता. २५ चेंडूंमधे १ धाव लागत होती. अशावेळी सगळे सहकारी खेळाडू नेहमीच उभे राहून विजयाची वाट पाहत असतात आणि जिंकलं कि पळत येऊन आपल्या सहकाऱ्यांच्या अंगावर उड्या मारत असतात. त्यात त्याकाळी ऑस्ट्रेलियाला हरवणं हे विशेषच होतं. पण झालं भलतंच…
आपण सामना जिंकला तरी काहीच जल्लोष केला नाही. कुणी मैदानात उड्या मारत आलं नाही. धोनीने फक्त एक स्टम्प हातात घेतला आणि सगळ्या खेळाडूंना शेकहॅण्ड करत पॅव्हिलियनकडे चालू लागला. त्याच्या सहकारी खेळाडुनेही तशीच कृती केली. हि बाब सामान्य वाटेल पण त्यामागे मोठा अर्थ दडलेला होता.
त्यावेळी धोनीची देहबोली हि विजेत्यांसारखी होती. जिंकण्याच काय अप्रूप, आम्ही नेहमीच जिंकतो, त्याचा काय जल्लोष करायचा? ऑस्ट्रेलिया काय एवढा मोठा संघ नाही कि त्यावर विजय मिळवला म्हणून आपण आनंदाने उड्या मारत मैदानाबाहेर जावं. तो विजय हा आपल्यासाठी सामान्य विजय आहे, त्यात विशेष काही नाही… असे अनेक अर्थ धोनीच्या त्या एका कृतीने दाखवले होते. धोनीने ऑस्ट्रेलियाला तुम्ही असामान्य नसून सामान्यच आहात हे सांगितलं होतं. धोनीने ऑस्ट्रेलियासोबत माईंडगेम खेळाला होता. जे ऑस्ट्रेलिया इतके वर्षे करत होती तेच धोनीने केलं होत.
(अशीच देहबोली गांगुलीने इंग्लंड मधे दाखवली होती. शर्ट काढून हवेत फिरविण्याच्या गांगुलीच्या कृतीने आपण सभ्यतेसोबतच आक्रमकसुद्धा आहोत हे दाखवून दिले होते. आपण तोडीस तोड उत्तर देतो हे सांगितले होते.)
धोनीचं ते वागणं ऑस्ट्रेलियाला चांगलच खुपलं. आम्हाला हरवून सुद्धा तुम्ही जल्लोष केला नाही, याला काय अर्थ आहे? आमचा एवढा भारी संघ आणि तुम्हाला काहीच वाटू नये? धोनीच्या एका कृतीने त्यांच्या इगोलाच दुखावलं. तिथल्या वतमानपत्रांमधे सुद्धा भारत नशिबानेच जिंकलाय अशा प्रकारे बातम्या दिल्या गेल्या. पण त्या एका कृतीने ऑस्ट्रेलिया चांगलाच खचला. पुढचा सामनाही भारतानेच जिंका आणि मालिकाही जिंकली.
आपण त्याआधीही ऑस्ट्रेलियाला कित्येक वेळा हरवलं होतं, धोबीपछाड दिला होता. कोलकाता कसोटीने तर इतिहास रचला होता, पण या कृतीमुळे ऑस्ट्रेलियाच्या वर्मावरच घाव घातला गेला होता. ऑस्ट्रेलिया संघाची उतरती कळा सुरु होण्याची ती सुरुवात होती. धोनीच्या एका कृतीने त्यांच्या मनात असलेली स्वतःविषयीची असामान्यत्वाची मानसिकता संपली. त्यांनतर ऑस्ट्रेलियाला त्यांच्या पूर्वीच्या संघासारखा दबदबा कधीच निर्माण करता आला नाही. आजही आपल्याला ऑस्ट्रेलियाला ठरवण्यात विशेष काहीच वाटत नाही.
देहबोली अशी असते. आपल्या देहबोलीतून कृतीतून खूप काही अर्थ निघत असतात. न बोलताही शेकडो, हजारो शब्द आपली देहबोली बोलत असते. ते आपल्यासोबतच इतरांच्याही मनावर परिणाम करत असतात. आपली देहबोली, आपले विचार, आपला दृष्टिकोन आपल्या व्यक्तिमत्व विकासासाठी आवश्यक असतात आणि आपल्या व्यवसायासाठी सुद्धा महत्वाचे असतात.
विजेत्यांची अशीच देहबोली आपल्याला यशस्वी उद्योजकांमधे दिसून येते. राजकीय नेतृत्वांमधेसुद्धा त्यांची देहबोली पाहूनच त्यांच्या यशापयशाचा अंदाज बांधता येतो. हि देहबोली महत्वाची आहे, आपल्या वैयक्तिक आयुष्यात आणि व्यवसायात सुद्धा…
व्यवसाय साक्षर व्हा…
उद्योजक व्हा…
समृद्ध व्हा…
_
© श्रीकांत आव्हाड
७७४४०३४४९०
Business Consultant
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम
All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील