नोकरी पाहिजे, व्यवसाय वाढायला पाहिजे, मग स्वदेशीचा नारा देण्यात अडचण काय आहे?


‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

======================

लेखक : श्रीकांत आव्हाड
======================

नोकऱ्यांच्या संधी कधी उपलब्ध होतात? जेव्हा स्थानिक मार्केटमधे कंपन्या येतात, व्यवसाय वाढतात तेव्हा… व्यवसाय कधी वाढतो? जेव्हा लोक शॉपिंग करतात तेव्हा.. म्हणजे जर स्थानिक वस्तूंची विक्री वाढली तर व्यावसायिकांना फायदा होईल, स्थानिक मालाची मागणी वाढल्यामुळे कंपन्यांना उत्पादन वाढवावे लागेल, नवनवीन प्रोजेक्ट उभे करावे लागतील, म्हणजे नोकऱ्या वाढतील… ना नोकऱ्या आकाशातून पडतात, ना व्यवसाय आपोआप चालतात, त्यासाठी मार्केटमधे खरेदी करणारा ग्राहक लागतो… तोच जर बाहेरच्यांना प्राधान्य देत असेल तर व्यवसायही नाही आणि नोकऱ्याही नाहीत…

आपला राजकीय दृष्टिकोन काय आहे हे महत्वाचं नाहीये, तो का आहे हेही महत्वाचं नाही, आपल्या देशात उत्पादित होणाऱ्या वस्तुंना जास्तीत जास्त मागणी असावी अशी अपेक्षा करण्यात गैर काहीच नाहीये हे लक्षात घ्या.  तुम्ही नोकरी करत असो किंवा व्यवसाय, नोकरी हवी असेल तर तुम्हाला स्थानिक उत्पादनांना प्राधान्य द्यावे लागणार आहे, आणि तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असले तरी सुद्धा स्थानिक उत्पादनांच्या खरेदीसाठी लोकांना प्रवृत्त करावे लागणार आहे. आपल्या देशाची अर्थव्यवस्था वाढवायची असेल, अर्थव्यवस्था सुदृढ ठेवायची असेल, देश मोठा करायचा असेल तर स्थानिक उत्पादनांना प्राधान्य द्यावेच लागेल.

मान्य आहे आपण प्रत्येक गोष्ट स्वतः बनवू शकत नाही, पण जमेल तेवढं स्थानिक उत्पादनांना प्राधान्य देऊन स्थानिक ठिकाणीच उत्पादन घ्यायला कंपन्यांना प्रवृत्त करू शकतो ना? काही गोष्टी बाहेरून घ्याच्याच लागतात. पण प्रत्येक गोष्ट बाहेरून घेण्यात कसलं आलंय कौतुक?

ट्रोलच करायचंय तर स्थानिक उत्पादकांना बाजूला सारून बाहेरून माल देशात मागवणाऱ्यांना करा, स्वदेशीचा पुरस्कार करणाऱ्यांना काय ट्रोल करता?

राख्या, मांजा, पतंग, कपबश्या या काय बाहेरून इम्पोर्ट करायच्या वस्तू आहेत का? आपल्याकडे या वस्तू बनवणारे लाखो हात असताना बाहेरच्यांची गरज काय आहे? उलट आपण जास्तीत जास्त स्थानिक प्रोडक्ट ला प्राधान्य दिल तर आपोआपच रोजगार निर्माण होणार आहे. आपण या वस्तू बाहेरून इम्पोर्ट करून इथल्या हातांचे रोजगार कमी करत आहोत. त्यांचे रोजगार कमी होतात म्हणजे फक्त त्यांना फटका नाही बसत, आपल्या एकूण अर्थव्यवस्थेला नुकसान होत असतं, ज्यात आपणही येतो. स्थानिकांच्या हातात पैसाच खेळणार नसले तर ते मार्केटमधे शॉपिंग कसे करतील? त्यांची शॉपिंग कमी झाली तर कंपन्यांना उत्पादन कमी करावे लागेल, कंपन्यांना उत्पादन कमी करावे लागले कि आपल्या नोकऱ्या धोक्यात येतील. आपण सगळे एकमेकांवर अवलंबून आहोत, आपल्या सर्वांना एकमेकांसाठी काम करायचं आहे.

एक साधं उदाहरण घ्या… एखादा बाहेर देशातून इम्पोर्ट केलेला TV जेव्हा आपण विकत घेतो तेव्हा आपण इथल्या किमान ४ जणांचा रोजगार हिरावून घेतलेला असतो आणि किमान १० व्यासायिकांचा व्यवसाय कमी केलेला असतो. आणि या व्यवसायिकांसोबत सोबत आणखी ५० रोजगार कमी केलेले असतात.

आपली लोकं मोठी होऊ द्या, आपला देश मोठा होऊ द्या, बाहेरच्यांच ते बघून घेतील. आपल्या देशातला पैसा आपल्याच देशात राहून वाढतोय हे चांगलं आहे कि तो इतर देशांमधे जाऊन त्यांना मोठं करतोय हे चांगलं आहे?

मी काल एका लेखात म्हटलं होत कि आपल्याला आपल्या लोकांचं यश सहन होत नाही, पण बाहेरच्यांच्या यशाचं भलतं कौतुक असतं, उलट तो जास्त मोठा व्हावा आणि आपला आणखीनच अडचणीत यावा अशीच आपण प्रार्थना करत असतो.
आपल्या सभोवतालचे लोक जेवढे मोठे होतील तेवढे आपणही मोठे होत असतो. आपल्या आसपासच्या लोकांकडे पैसे आला तर तो प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे आपल्याकडेही येणार असतो. चक्र आहे हे, यासाठी कुणा तत्ववेत्याची, अर्थतज्ञाची गरज नाही.

जमेल तेवढं स्थानिक उत्पादनांना प्राधान्य द्या, स्वदेशीच्या नाऱ्याला ट्रोल करण्यापेक्षा स्वदेशीचा पुरस्कार करा. आपण प्रत्येक गोष्ट नाही बनवू शकत पण जी बनवू शकतो तिला तरी प्राधान्य द्या. एखादं प्रोडक्ट नाहीच आपल्याकडे चांगलं जमू शकत, बाहेरच्याला प्राधान्य द्या, पण आपल्या एकूण शॉपिंग कडे पाहिलं तर आपण आत्ताच्या परिस्थितीतही किमान ५०-७०% वस्तूंमधे स्थानिक उत्पादकांना प्राधान्य देऊ शकतो हे लक्षात येईल.

स्वदेशीचा पुरस्कार करा म्हणजे सोशल मीडियावर तुम्ही किती स्वदेशीप्रेमी आहात हे सांगण्याची गरज नाही. बरेच जण सोशल मीडियावर स्वदेशीचा डंका वाजवतात आणि खाजगीत मात्र त्याकडे दुर्लक्ष करतात. स्वदेशीचा पुरस्कार करा म्हणजे जेव्हा कधी काही खरेदी करणार असाल तेव्हा आधी आपल्या स्थानिक उत्पादनांना प्राधान्य द्या. ते शक्य नसतील किंवा तुमच्या अपेक्षेप्रमाणे नसतील तर मग इतरांकडे वळा…

तुम्हाला नोकरी हवी असेल, पगार वाढण्याची अपेक्षा असेल किंवा तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल, स्थानिक उत्पादनांना जमेल तेवढ प्राधान्य द्या. आपल्या लोकांना जेवढी साथ द्याल, तेवढा तुम्हाला स्वतःलाच फायदा होणार आहे…

स्वदेशीचा पुरस्कार करण्यात लाज वाटण्यासारखं काहीच नाहीये. माझ्या देशातील उत्पादनांना प्राधान्य द्या या वाक्यात माझा माझ्या देशाविषयीचा अभिमान आहे, इथल्या व्यवसायिकांचं हित आहे, इथल्या नोकरदारांचं हित आहे, इथल्या अर्थव्यवस्थेला आणखी मोठं करण्यासाठीचा प्रयत्न आहे, देशाला मोठं करण्याची करण्याची इच्छा आहे… खारीचा वाटा प्रत्येकाने उचललाच पाहिजे…

(कृपया, चिनी मोबाईलवरून स्वदेशीचा नारा देताय वगैरे असले डायलॉग मारू नका… ते मलाही माहित आहे. माझ्या घरात एक शिओमीचा आणि तीन सॅमसंग चे मोबाईल आहेत. शिओमीचा मोबाईल अडीच वर्षांपूर्वीचा आहे आणि त्यानंतर सगळे सॅमसंग घेतले आहेत.
प्राधान्यक्रम आणि बहिष्कार या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत हे लक्षात घ्या. उद्या जर एखाद्या स्थानिक कंपनीने चांगला मोबाईल बनवला तर मी त्याला प्राधान्य देईल. सध्या याबाबतीत आपण कुठेच नाही आहोत, आणि आपल्याकडील कोणतेही व्यावसायिक इलेक्ट्रॉनिक्स मधे नाविन्यपूर्ण काही करायला धजावत नाहीयेत.)

व्यवसाय साक्षर व्हा…
उद्योजक व्हा…
समृद्ध व्हा…

_

© श्रीकांत आव्हाड
७७४४०३४४९०

Business Consultant

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील


Shrikant Avhad

संस्थापक - उद्योजक मित्र Entrepreneur, Consultant, Writer, Speaker...

View all posts by Shrikant Avhad →

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!