‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम
======================
लेखक : श्रीकांत आव्हाड
======================
वर्षभरात चित्रपट पाहण्यासाठी, पर्यटनासाठी, कपडे खरेदी करण्यासाठी आपण जेवढा खर्च करतो त्याच्या २०% किमतीत मेडिक्लेम मिळतो.
हेल्थ इंश्युरन्स, मेडिक्लेम, ऍक्सिडेंटल इंश्युरन्स यांची ची काय गरज असं वाटू शकेल… पण आजारपणात, अपघातात एकाचवेळी जो झटका बसतो ना, तो तुम्हाला पाच दहा वर्षे पिछाडीवर नेऊ शकतो.
माझ्या एका मित्राचे वडील तीन महिने ICU मधे होते. दोन कंपन्या आहेत त्यांच्या. लाखो रुपये खर्च झाले. काही कारणाने त्यांचा मेडिक्लेम मंजूर झाला नाही. दुर्दैवाने त्यांचं निधन झालं. तीन महिन्यात झालेल्या खर्चामुळे तो मित्र प्रचंड आर्थिक अडचणीत सापडला होता. खूप प्रयत्न करून आत्ताशी कसाबसा त्यातून बाहेर येतोय परत. मेडिक्लेम ची गरज सर्वांना माहित आहे, पण त्याचे गांभीर्य या घटनेनंतर आम्हा सर्वानाच जाणवले.
आपण औषधोपचारांवर किती खर्च करतो याचा हिशोब काढला तर डोळे पांढरे होतील. मागच्या दहा वर्षांचा हिशोब काढला तर तो आकडा काही लाखात जाईल. हे लाखो रुपये जर कुठे गुंतवणुकीसाठी वापरले गेले असते तर आज काही पटींनी वाढले असते हे लक्षात येईल.
शारीरीक सुरक्षिततेच्या नावाखाली आपण स्वतःला आणि आपल्या पुढच्या पिढीलाही नाजूक करत चाललो आहोत. आपली प्रतिकारशक्ती कमी होत चालली आहे. याचाच परिणाम आपल्याला लहान लहान गोष्टींमुळेही खूप मोठे आजार व्हायला लागले आहेत. साधं घोटभर पाणी दुसरीकडचे पिलो तरी आपल्याला हॉस्पिटलमधे ऍडमिट करावं लागतंय. हे आजार थांबवण्यासाठी मग आपल्याला औषधोपचारांवर हजारो लाखोंचा खर्च करण्याची वेळ येत आहे… मेडिक्लेम नसेल तर मग सगळीच बोंब. उधाऱ्या पाधाऱ्या करून पैसा गोळा करावा लागतो. अपघातांच्या वेळेतही अशीच परिस्थिती होते. लाखो रुपये अचानक काही दिवसात खर्च होतात. काहीच आर्थिक नियोजन केलेलं नसतं. पेशंट नीट झाला तर थोडंफार समाधान, पण तेही काही दिवसांसाठी. त्यानंतर झालेला खर्च भरून काढताना तोंडातून फेस यायची वेळ येते. औषधोपचारांच्या माध्यमातून आपल्या हातातील खूप सारा पैसा अशा ठिकाणी चालला आहे जेथून रिटर्न काहीच मिळणार नाहीये.
आपल्या देशात आणि जगातील बहुतांश प्रगतिशील आणि गरीब देशांत सामान्यांचा प्रचंड पैसा औषधोपचारांवर खर्च होत आहे. आणि हेच कारण आहे कि या देशातील गरिबी आजही आहे तशीच आहे. मध्यमवर्ग सुद्धा सतत आर्थिक संकटांचा सामना करताना दिसून येत आहे.
प्रतिकारशक्ती वाढवणे, शरीराला नाजूक बनवणाऱ्या गोष्टींपासून दूर होणे हे आपल्या सर्वांसाठी खूप महत्वाचे आहे. किमान आपल्या शरीरासाठी नसेल काही करायचं पण आर्थिक बाबीकडे पाहून तरी आपण याचा विचार केला पाहिजे. आपला पैसा कुठे कुठे जातो, आणि त्याची करणे काय काय आहेत, ती योग्य आहेत कि चुकीची याचा विचार करून निर्णय घेणे आवश्यक आहे.
श्रीमंतीचे फक्त कोट्स वाचून फायदा नाही, त्याचा नीट विचार करून योग्य मार्गाने पैशाचे नियोजन करणे आवश्यक आहे. पैसा वाचवण्याची आणि तो योग्य ठिकाणी गुंतवण्याची एकही संधी आपल्याला सोडायची नाहीये. जिथेजिथे शक्य असेल तिथे पैसा वाचवणे आणि वाचलेला पैसा गुंतवणे खूप महत्वाचे आहे
हा लेख मेडिक्लेम संदर्भात आहे, सध्याच्या परिस्थितीमधे तर औषधोपचारांवर होणाऱ्या खर्चाचीच चर्चा चालू आहे. पण याव्यतिरिक्तही आपला खूप सारा पैसा अनावश्यक गोष्टींवर खर्च होत असतो. त्यापैकी किमान ३०% जरी आपण गुंतवणुकीवर खर्च केला तर पुढच्या दहा वर्षात आपल्या आर्थिक परिस्थितीमधे खूप मोठा बदल झालेला दिसू शकतो.
अर्थसाक्षर व्हा…
_
© श्रीकांत आव्हाड
७७४४०३४४९०
Business Consultant
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम
All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील