लेखक : श्रीकांत आव्हाड
======================
बहुतेक नवउद्योजक व्यवसाय सुरु केला कि महिन्याला किती उत्पन्न मिळणार याचे आकडे कागदावर मांडायला सुरुवात करतात. यात मुख्यत्वे कमी गुंतवणुकीतले किंवा पाच-दहा-पंधरा लाख रुपये पर्यंत गुंतवणुकीचे व्यवसाय करणारे नवउद्योजक जास्त असतात. हे आकडे मांडताना बहुतेकांनी किमान महिन्याला लाख-दोन रुपये कमवण्याची आकडेवारी मांडलेली असते. ती कागदावर इतकी परफेक्ट असते कि प्रत्यक्षात सुद्धा यशस्वी होईल असेच वाटते. ती आकडेवारी मांडताना समोर दहा वीस वर्षे जुना असणाऱ्या एखाद्या व्यवसायाचा आदर्श ठेवलेला असतो, पण इथे मात्र तेच उत्पन्न पहिल्या वर्षात सुरु होण्याची अपेक्षा असते.
(इथे मी मध्यमवर्गीय नवउद्योजकांचा संदर्भ घेतला आहे. कारण बहुतेक नवीन व्यावसायिक हे मध्यमवर्गीय आहेत. दोन-पाच-दहा लाखापर्यंत गुंतवणूक क्षमता असते. काहींची तीसुद्धा नसते. या वर्गासाठी लाख रुपये महिना हा आकडा मोठा असतो, म्हणून त्याकडे लक्ष दिले जाते.)
कोणत्याही व्यवसायाचा एक कालावधी असतो. सुरुवातीला काही महिने व्यवसाय मोठ्या प्रमाणात होत नसतो. समजा एखादे प्रोडक्ट आपल्याला १००० रुपये नफा देत असेल तर महिन्याला लाख रुपये निव्वळ उत्पन्नासाठी किमान १०० प्रोडक्ट विकले जाणे आवश्यक असते. १०० प्रोडक्ट विकले जाण्यासाठी किमान १००० ग्राकांसोबत व्यवहाराची चर्चा होणे आवश्यक असते, महिन्याला हजार ग्राहकांसोबत चर्चा म्हणजे दिवसाला तीस ग्राहक झाले. आता कोणत्याही नवीन व्यवसायाकडे दिवसाला तीस-चाळीस ग्राहक भेट देऊ शकत नाही, पण हे लक्षातच घेतले जात नाही.
सुरुवातीचा बराच काळ दहा-वीस-तीस हजारच्या पुढे उत्पन्न जात नाही, पण आकडेवारी लाखाच्या पुढेच मांडण्याचे काम सुरु असते. खरं तर व्यवसाय चांगला चाललेला असतो, सुरुवातीचे उत्पन्न बऱ्यापैकी मिळत असते, पण त्याची तुलना सतत न मिळालेल्या लाख रुपये उत्पन्नाशी केली जात असते. वर्षभराच्या आतच एक वेळ अशी येते कि या व्यवसायातून मला हवे तेवढे उत्पन्न मिळूच शकत नाही असा विचार सुरु होतो. आपला व्यवसायच चुकला आहे आणि पैसा कमवायचा असेल तर दुसरा एखादा व्यवसाय करावा लागेल असा विचार केला जातो. जिथे आपला व्यवसाय चुकलाय असं वाटत तिथे व्यवसायाकडे दुर्लक्ष व्हायला सुरुवात होते. हे दुर्लक्ष बऱ्याचदा इतके टोकाला जाते कि कुणी व्यवसायाकडे लक्ष दे म्हटलं तरी, त्याचा सल्ला धुडकावून काही दिवस थांब, मग बघ कसा धमाका करतो ते असा डायलॉग मारला वाजतो. हा डायलॉग मारताना दुसऱ्या एखाद्या व्यवसायाचे स्वप्नरंजन सुरु झालेले असते.
मग सुरु होतो आणखी एखाद्या व्यवसायच शोध. इथेही पुन्हा ते अपेक्षित उत्पन्न मिळवणारे व्यवसाय शोधले जातात आणि तेच सुरु केले जातात. स्वतःचा अभ्यास न करता कोण किती कमवतंय एवढं पाहून व्यवसाय सुरु करायचा हाच अजेंडा असतो. मागचा व्यवसाय फक्त वर्ष दोन वर्षांचा झालेला असतो, स्थिरस्थावर नसतो, त्याची गुंतवणूक अजून वसूल झालेली नसते, त्यात आणखी एक व्यवसाय पुन्हा लाखो रुपये गुंतवून सुरु केला जातो. हे करताना पहिल्या व्यवसायाकडे तिरस्काराचा दृष्टिकोनातून पाहण्याचे उद्योग सुरु होतात. लाखो रुपये गुंतवून व्यवसाय सुरु केलाय म्हणून बंद केला जात नाही इतकेच….
आता पहिला व्यवसाय सेट व्हायला आलेला असतो, पण दुर्लक्षामुळे तो पुन्हा मागे जातो, दुसरा व्यवसाय नवीन असतो म्हणून त्याकडे भलतं लक्ष दिल जातं… पण दुसरा व्यवसाय सुद्धा अपेक्षेवर पाणीच फिरवतो… कारण त्यालाही अपेक्षित उत्पन्न द्यायला किमान दोन-तीन वर्षे लागणारच असतात. इथं हि मुलं आपल्याच जाळ्यात अडकतात… दोन्ही व्यवसाय आर्थिकदृष्ट्या कमकुवत असतात, पण खर्च वाढलेले असतात. यातच अजूनही त्या कागदावरच्या आकड्यांशी तुलना सुरु असेल तर नैराश्याला सुरुवात होते. यातून मग दोन्ही व्यवसायाकडे सुर्लक्ष होते.
जर दोन्ही व्यवसायातील गुंतवणूक घरातली असेल तर चालून जातं, पण बँकेचे कर्ज असेल तर व्याज फेडणे अवघड होऊन बसते. मग काहीजण हे हफ्ते फेडण्यासाठी सावकारी व्याजाने पैसे उचलतात. हे व्याज इतकं प्रचंड असतं कि काही काळाने त्याचे व्याज फेडण्यासाठी पुन्हा कर्ज घेण्याची धडपड सुरु करावी लागते. बहुतेकदा दुसरा व्यवसाय सुरु करण्यासाठी व्याजाने पैसे घेतलेले असतात. अशावेळी तर आणखी अवघड परिस्थिती होऊन बसते.
खरं तर पहिल्या व्यवसायाने तीन, चार किंवा पाच वर्षांनंतर कागदावरचे आकडे प्रत्यक्षात दाखवायला सुरुवात केली असती, पण त्याची घाईच इतकी झालेली असते कि तेवढा वेळ थांबण्याची सुद्धा तयारी नसते. उत्पन्न वाढवण्यासाठी वेगवेगळे व्यवसाय असावेत हे मान्य असले तरी पहिला स्थिरस्थावर झालेला नसताना दुसरा सुरु करण्यात काहीच लॉजिक नसतं हेही लक्षात घेतले जात नाही. उत्पन्न फक्त गुंतवणूक वसुलीच्या हिशोबाने बघायचे असते, त्याव्यतिरिक्त व्यवसाय वाढला कि पैसे येणारच हाच नियम डोक्यात ठेऊन काम करायचे असते. स्वतःला एखादे लक्ष्य देणे, ते पूर्ण करणे यात चूक नाही, पण ते लक्ष्य देताना प्रॅक्टिकली विचार करणे सुद्धा आवश्यक असते, किमान लक्ष्य साध्य झाले नाही तरी नैराश्य येणार नाही याची मानसिक तयारी असावी लागते.
मी असे बरेच व्यावसायिक पाहिलेत ज्यांनी पहिल्याच वर्षात माझा व्यवसाय चुकलाय असं म्हणायला सुरुवात केली होती… माझ्या जवळचे काहीजण आहेत यात. यांना काहीही सांगून फायदा होत नाही. ती कागदावरची आकडेवारी इतकी डोक्यात भिनलेली असते कि त्यासमोर प्रॅक्टिकल माहितीला सरळ सरळ धुडकावून लावले जाते. उलट आपल्याला इतकं दुर्लक्षित केलं जात कि काही सांगण्याची इच्छाच राहत नाही. ते अडकेपर्यंत वाट पाहायची एवढंच आपल्या हातात रहातं… तरीही मी प्रयत्न करतच राहतो…
_
व्यवसाय साक्षर व्हा…
उद्योजक व्हा…
समृद्ध व्हा…
_
© श्रीकांत आव्हाड
७७४४०३४४९०
Business Consultant
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम
All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील
One thought on “उत्पन्नाची आकडेवारी मांडताना बहुतेक नवउद्योजक स्वतःच्याच जाळ्यात अडकतात….”
उद्योजकाने उद्योगामध्ये स्वतः चा पगार कसा काढावा?
माझा फर्निचर manufacturing चा व्यवसाय आहे. आलेला सगळा पैसा दुसऱ्या कामात च जातो. प्रॉफिट मोजता येत नाही. या वर काही उपाय?