लेखक : श्रीकांत आव्हाड
======================
व्यवसायात कामांचे वाटप महत्वाचे असते. वेळचे योग्य नियोजन करण्यासाठी काही कामे आऊटसोर्स करणे कधीही फायद्याचे ठरते.
जुन्या बहुतेक व्यावसायिकांची हि पद्धत असायची. लहान लहान कामे बाहेरून करून घेतली जात असत… पण काही व्यवायिकांनी या पद्धतीला फाटा देऊन सगळी कामे स्वतः करायला सुरुवात केली असल्याचे दिसून येत आहे. बाहेरच्यांना कामे देऊन कशाला नफ्यात हिस्सेदार वाढवायचे असा विचार असतो. नफ्याच्या आकडेवारीत बोलायला गेलं तर हा युक्तिवाद योग्य वाटेल, पण प्रत्यक्षात हि पद्धत व्यवसायाला हानिकारक ठरू शकते हे लक्षात घ्यायला हवे. या पद्धतीमुळे वेळेचे नियोजन करण्यात खूप अडचणी येऊ शकतात आणि त्याचा फटका व्यवसायालाच बसू शकतो.
उदाहरणादाखल फोटोग्राफी व्यवसायाकडे पाहूया. काही वर्षांपूर्वी एक जण फोटो काढायचे काम करत असे, एक जण शूटिंग हे काम पाहत असे, एक जण व्हिडीओ एडिटिंग चे काम पाहत असे, असे वेगवेगळ्या व्यावसायिकांकडे कामे वाटून दिलेली असत. एक फोटोग्राफर काम घ्यायचा, पण ती कामे वाटून द्यायचा. स्वतः फक्त फोटोग्राफीकडे लक्ष द्यायचा. यामुळे कुणावरही लोड येत नसे. प्रत्येकजण आपल्या ठरलेल्या वेळेत काम पूर्ण करून ग्राहकांना फायनल प्रोडक्ट वेळेस सुपूर्द करत असत. पण आता बरेच फोटोग्राफर हि सगळीच कामे स्वतः करण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहेत. इतरांना कशाला नफा वाटत बसायचं, त्यापेक्षा आपणच हि सगळी कामे स्वतः करू आणि नफ्यात वाढ करू अशा विचाराने सगळा लोड अंगावर घेण्याची पद्धत सुरु झालेली दिसून येत आहे. पण यामुळे एकाच कामात कितीतरी वेळ अडकून पडावे लागते आणि ग्राहकांची कामे वेळेवर पूर्ण होत नाहीत. हि परिस्थिती सगळीकडेच दिसून येईल. कोणत्याही कार्यक्रमानंतर त्याचे फोटो, व्हिडीओ मिळायला ३-४ महिने लागतात. काही वेळा त्यापेक्षाही जास्त वेळ लागत आहे. याचे कारण हेच आहे…
हे एका व्यवसायाचे उदाहरण झाले. सगळी कामे स्वतः करण्याची हि पद्धत बहुतेक क्षेत्रात आता दिसून येते. पण याचा घातक परिणाम व्यवसायावर होत आहे हे लक्षात घेतले जात नाहीये.
नफा वाढवण्यासाठी सगळी कामे स्वतःच केली जातात पण त्यासाठी पुरेसे मनुष्यबळ हाती नसते, कारण मनुष्यबळ वाढवायचे तर नफा कमी होईल, मग पूर्वीप्रमाणेच बाहेर काम दिलेल काय वाईट होतं. यामुळे कामाच्या प्रमाणात मनुष्यबळ कमी पडते. कमी मनुष्यबळाला जास्त काम करावे लागत असल्यामुळे कामाचा उरक कमी होतो. लोड वाढल्यामुळे तणाव वाढतो. ग्राहकांकडून पाठपुरवठा सुरु झाल्यावर त्यांना खोटे बोलावे लागते. कामाचा लोड वाढल्यामुळे ते जमेल तसे उरकण्याकडे कल वाढतो. प्रसंगी कामात तडजोड केली जाते. लोड वाढल्यामुळे प्रत्येक कामाच्या गुणवत्तेकडे लक्ष देणे शक्य होत नाही म्हणजेच गुणवत्ताही कमी होते. इतकं करूनही ग्राहकाला वेळेवर प्रोडक्ट मिळत नाही. शेवटी ग्राहक नाराज होतोच… त्यात जर गुणवत्तेत कमी राहिली तर मग ग्राहकाच्या मनातून व्यावसायिक कायमचा उतरतो.
बहुतेक व्यावसायिकांची हि परिस्थिती आहे. पण यामुळे ग्राहकांचा ओढा कमी होत जातो. म्हणजे नफा वाढला पण ग्राहक कमी झाले. एका प्रोडक्ट मधे नफा पहिला आणि एकूण उलाढालीकडे दुर्लक्ष केले कि अशी परिस्थिती होते.
यात गंमत अशीआहे कि सगळ्यांनीच सगळी कामे स्वतः करायला सुरुवात केल्यामुळे कुणाच्याही व्यवसाय वाढ होत नाही पण सर्वांच्याच धंद्यावर परिणाम होतो, ब्रँड खराब होतो, आणि तणावही वाढतो…
याचा एक सर्वात मोठा परिणाम होतो तो म्हणजे त्या कामाची पूर्ण सिस्टीमच डिस्टर्ब होऊन जाते. कुणाचाच कुणाला ताळमेळ राहत नाही, प्रत्येकजण एकदुसऱ्याचा ग्राहक पळवायचा प्रयत्न करायला लागतो, वाद वाढायला लागतात, विश्वासार्हता कमी होते, यातून एकूणच त्या क्षेत्रावरच परिणाम व्हायला लागतो.
सगळी कामे स्वतः कधीच करू नका. कामांची विभागणी करा. जेवढं मनुष्यबळ उपलब्ध आहे तेवढेच काम स्वतःकडे ठेवा, कामे आऊटसोर्स करण्यात काहीच गैर नाही, उलट यामुळे कामे वेळेत होतात आणि गुणवत्तेकडे लक्ष देणे सोपे होऊन जाते. ग्राहकाचे काम वेळेत पूर्ण होणे महत्वाचे असते. सगळी कामे स्वतः केल्याने नफा वाढताना दिसेल, पण प्रत्यक्षात धंदा कमी होईल.
व्यवसाय साक्षर व्हा…
उद्योजक व्हा…
समृद्ध व्हा…
_
© श्रीकांत आव्हाड
७७४४०३४४९०
Business Consultant
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम
All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील