निशाताई सोनावणे यांचा कॉम्प्युटर रिपेअरिंग व्यवसायातील विलक्षण प्रवास


‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

======================

लेखक : निलेश अभंग
======================

कॉम्प्युटर रिपेअरिंग, लॅपटॉप दुरुस्ती, Installation, Chip Level Work करतांना आजवर तुम्ही अनेकांना पाहिले असेल. त्यात बहुसंख्येने पुरुषच असतील, याबाबत माझ्या मनात बिलकूलच शंका नाही. कारण बरेचसे मुलगे, पुरुषच अशा प्रकारची नोकरी किंवा व्यवसाय करताना मी पाहिलेले आहेत.

मात्र मी इथे तुम्हाला अशा व्यक्तीची ओळख करून देणार आहे जी व्यक्ती वरील कामे तसेच ह्या विषयाशी निगडित असलेली सारी कामे अतिशय चोख पद्धतीने अन दिलेल्या वेळेत करून देते अन त्या महिला असून त्यांचे नाव श्रीमती निशा सोनावणे असे आहे. त्या ह्या व्यवसायात साल 2014 पासून कार्यरत आहेत.

निशाताई ठाण्याला राहतात, शिक्षण 12 वी, वय चाळीस वर्षे, त्यांना दोन मुलगे असून पती खाजगी कंपनीत Hardware Support चे काम पाहतात. त्यांचे माहेर धुळे येथील असून लग्नानंतर त्या ठाण्याला आल्या.

त्यांचे पती नोकरीच्या ठिकाणी Hardware Support चे काम पाहत होते-आताही पाहत असतात. त्यानुषंगाने ते काही Pending कामे करण्यासाठी कॉम्प्युटरचा Cabinet Box घरी घेऊन येत असत. घरी ते दुरुस्त करत असताना निशाताई त्यांचे काम पाहत असत, त्यांना दुरुस्तीसंबंधी प्रश्न विचारत असत, त्यांची जिज्ञासा श्री. शेखर सोनावणे यांना लक्षात आली अन त्यांनी निशाताईंना कॉम्प्युटरसंबंधीची माहिती द्यायला, समजून सांगायला सुरुवात केली. हळूहळू निशाताईंना कामाची गोडी लागत गेली. त्यांना कामात रस वाटू लागल्याने त्यातल्या अडचणी समजून घेता येऊ लागल्या, त्यावरचे उपाय श्री. सोनावणे यांच्या सल्ल्याने कळायला लागले. काही महिन्यांच्या सरावाने त्यांना बऱ्याच गोष्टींचा अंदाज आला.

श्री. सोनावणे यांनी निशाताईंचा इंटरेस्ट ओळखून त्यांना रितसर कॉम्प्युटर दुरुस्तीचे प्रशिक्षण देण्याची व्यवस्था करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांचे ‘कोरा खादी केंद्र’ ह्या शासकीय प्रशिक्षण संस्थेत कॉम्प्युटर दुरुस्तीचे शिक्षण घेण्यासाठी ऍडमिशन करवून घेतले. तिथे निशाताईंना अनेक गोष्टी समजल्या. विषयाच्या अधिक खोलात जाता आले, Laptop रिपेअरिंग, Chip Level Work समजले. Ram रिपेअरिंगचा पुरेसा अंदाज आला. तिथून प्रशिक्षणाचे रितसर प्रमाणपत्र घेऊन त्या बाहेर पडल्या. त्यांना आता ह्या कामाचा पुरेसा आत्मविश्वास आला होता. घरी सराव चालूच होता, त्यामुळे कामावर छान हात बसला. निरनिराळे प्रॉब्लेम आणि त्यावरचे सोल्युशन याचा अंदाज बांधता येऊ लागला होता.

त्या कॉम्प्युटर दुरुस्ती, लॅपटॉप दुरुस्ती, सॉफ्टवेअर installation, Motherboard repairing, Ram repairing ची कामे करतात.

वरील कामे करण्याकरता मार्केटमध्ये अनेक लोक आहेत, मात्र Motherboard Repairing ला सहसा कुणी हात घालत नाही. त्यासाठी थेट कंपनीलाच Motherboard पाठवले जातात. कारण ते काम अतिशय technical अन बारीक आहे. अगदी कलाकुसरीच्या कामासारखा त्या कामात जीव ओतावा लागतो. कलाकुसरीच्या कामाला पट्टीचा कारागिरच लागतो. तर निशाताई Motherboard च्या संबंधाने अशाच पट्टीच्या कारागीर झाल्या आहेत. बारीक सारीक faults identify करून त्याचे उपाय शोधण्याकडे त्यांचा कल असतो. त्यात आतापर्यंत झालेल्या सरावाने त्यांना यशही मिळते. त्या कामातील साऱ्या खाचाखोचा त्यांना कळू लागल्या आहेत. Motherboard Repairing चे काम त्या लीलया करतात. Out of Warranty असलेले Motherboard दुरुस्त करून देण्यात त्यांचा हातखंडा आहे.

तसेच कॉम्प्युटर दुरुस्तीसंबंधी कोणत्याही अडचणी त्या सहजी सोडवतात. Machine मधील problem अगदीच detect होत नसेल तर त्या पती श्री. शेखर सोनावणे यांची मदत घेतात.

ग्रामीण भागातून येऊन अन केवळ बारावीपर्यंत शिक्षण असूनही ह्या क्षेत्रात गेल्या काही वर्षात त्यांनी उत्तम जम बसवला आहे. मोठमोठ्या vendors ना, engineers ना न जमणारी कामे त्या करतात, यावर कदाचित कुणाचा विश्वास बसणार नाही, मात्र हे तंतोतंत खरे आहे. मोठ्या कंपनीतील प्रशिक्षित Engineers जेव्हा एखादी मशीन खूप डोकेफोड करूनही Repair होत नाही तेव्हा ते निशाताईंकडे घेऊन येतात, अन त्या अडचणीवर तोडगा काढत त्यांना मशीन दुरुस्त करून देतात.

सध्या त्यांना कळवा, ठाणे, मुलुंड, ऐरोली येथून बरेच clients मिळतात, शिवाय मुंबईतूनही Laptop दुरूस्तीसाठी त्यांचेकडे येतात. Guaranteed कामामुळे त्यांचे ग्राहक इतरांना त्यांच्या कामाबाबत माहित देत असतात, त्यामुळे Referenceनेही त्यांना अनेक ग्राहक मिळतात.

त्यांचे पती श्री. सोनावणे यांचीही त्यांना विशेष मदत होते, तसेच मुलगा वरुणही आता आईकडून बरेच काम शिकला आहे. ह्या कामातून त्या उत्तम अर्थार्जनही करत आहे.

चार वर्षांपूर्वी स्वकमाईने ऍक्टिवा बाईक घेतली तेव्हा त्यांना विशेष आनंद झाला होता. शेवटी स्वतःच्या कष्टाने विकत घेतलेल्या कोणत्याही वस्तूचे विशेष मोल असते. ह्या व्यवसायाने त्यांना आर्थिक बाबतीत बऱ्यापैकी उन्नत केले, असे त्या सांगतात.

निशाताईंनी दिड वर्षांपूर्वी नाशिकला फ्लॅट घेतला आहे. त्या फ्लॅटचे ठरलेले हप्ते ह्या व्यवसायातून मिळवलेल्या उत्पन्नातूनच भरतात. ह्या कामाने त्यांना खरंच आत्मभान दिले आहे.

एका गावातली केवळ बारावी शिकलेली महिला शहरात येऊन स्वतःच्या बळावर कुटुंबियांच्या मदतीने एका अतिशय टेक्निकल व्यवसायात प्रगती करू शकली, याचे निशाताई ह्या जिवंत उदाहरण आहेत, त्यांच्याकडून निश्चितच अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत.

निशा सोनावणे यांचा संपर्क :
98707 64638 / 88507 36124

__

निलेश अभंग
८९७६६२५६९५

लेखक कल्याण (ठाणे जिल्हा) स्थित व्यावसायिक आहेत.

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!