व्यवसायाला अपयशाकडे नेणारा नातेवाईक, मित्रमंडळींचा रॉंग नंबर


‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

======================

लेखक : श्रीकांत आव्हाड
======================

PK चित्रपट बहुतेकांनी पहिला असेल. त्यात हिरो रॉंग नंबर ची संकल्पना मांडतो. काय असतो रॉंग नंबर? त्याच म्हणणं असतं कि एखादी गोष्ट कशी आहे हे आधीच आपल्या डोक्यात भरलं जातं. त्याच म्हणणं असत कि एखाद्या गोष्टीबद्दल नकारत्मक बाबी आपल्या डोक्यात इतक्या घट्ट बसवलेल्या असतात कि ती गोष्ट कितीही चांगली असली तरी एखाद्या लहानश्या घटनेने आपण त्याकडे लागेच नाकारात्मक दृष्टिकोनातून पाहायला लागतो. एखाद्या गोष्टीबद्दलचा दृष्टिकोन आधीच आपल्या डोक्यात घट्ट बसवून त्यातून त्याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन तयार करण्याला तो रॉंग नंबर म्हणतो.

आपल्या व्यवसायातही असा रॉंग नंबर असतो. हा रॉंग नंबर आपल्या डोक्यात आपल्या कुटुंबियांकडून, नातेवाईक मित्रमंडळींकडून घट्ट बसवलेला असतो. हा रॉंग नंबर असतो “आपल्याला व्यवसायात यश मिळत नाही” या वाक्याचा. आपण आपल्या जवळच्या लोकांकडे फक्त विषय काढावा व्यवसाय सुरु करण्याचा, या सगळ्यांची अख्खी फौजच आपल्यावर या रॉंग नंबरचा हल्ला करते. आपलं काम व्यवसाय करण्याचं नाही, आपल्या लोकांना व्यवसाय जमत नाही, माझा मित्र व्यवसायात अपयशी झाला, अमुक एक व्यक्ती व्यवसायामुळे भिकेला लागला, त्याच व्यवसायामुळे वाटोळंच झालं, घरदार विकावं लागलं, असल्या नाही नाही त्या गोष्टी आपल्या डोक्यावर अक्षरशः हॅमर केल्या जातात. काही लोक तर यासाठी इतके उत्साही असतात कि वेळ काढून आपल्या घरी येतात आणि आपण व्यवसाय करू नये यासाठी आपली मनधरणी करतात, आपल्या कुटुंबियांना अपयशाची भीती दाखवतात, आपल्याला व्यवसाय जमणार नाही हे ते ठासून सांगतात. हा हल्ला इतका भयंकर असतो कि त्यासमोर आपला आवाज पार दबून जातो.

बहुतेक जण या हल्ल्यासमोर माघार घेतात, काहीजण हट्टाने पुढे जातात. पण इथेसुद्धा, मी लोकांच्या म्हणण्याला गांभीर्याने घेत नाही असं म्हटलं तरी, ते हॅमरिंग आपल्या डोक्यात कुठेतरी घर करून बसलेले असतेच.

व्यवसायात चढ उत्तर येतच असतात. सुरुवातीचा काळ तर प्रचंड त्रासदायक असतो. डेअरिंग तर केलंय, पण मला खरंच जमणार आहे का असा प्रश्न आपल्याला सारखा पडतो. अपेक्षेप्रमाणे काहीच होत नसत. होकारांपेक्षा नकारच जास्त ऐकावे लागत असतात. यात बऱ्याचदा नैराश्याची परिस्थिती ओढवते. डोक्यामधे त्या लोकांच्या नाकारात्मक गोष्टी गलका करायला लागतात. तो रॉंग नंबर, रॉंग नसून राईटच असावा असा विचार डोक्यात घर करायला लागतो. (हा एक महत्वाचा टप्पा आहे या रॉंग नंबरचा ज्यावर मी पुढे लिहित आहे)

या परिस्थितीतून सावरलात तर पुढे व्यवसाय सेट होतोच. पण व्यवसायात सतत काहीतरी अडचणी येतच असतात. तो व्यवसायाचा भागच आहे, पण ते लक्षात घेतलं नाही तर मात्र इथे आपल्याला सतत त्या लोकांचं हॅमरिंग आठवत असतं. काहीवेळेस संकटे इतकी मोठी असतात कि सगळा व्यवसाय कोलमडून पडण्याची परिस्थिती उद्भवू शकते. आपण इतकं कष्टाने सगळं उभं करतोय पण त्यावर सतत काहीनाकाही आघात होतंच आहेत, आपण त्यांना आवर घालायला कमी पडतोय… आणि इथं प्रश्न पडतो, मला खरंच व्यवसाय जमत नाही का? हे माझ्याच्याने शक्यच नव्हतं का? मी उगाचच हट्टाने या क्षेत्रात आलोय का?

यावरचा पहिला ठप्प आणि हा टप्पा याठिकाणी तो रॉंग नंबर आपल्या डोक्यात घुमायला लागतो. माझ्या घरच्यांनी, मित्रांनी, नातेवाईकांनी सांगितलं होतं आपल्या लोकांना व्यवसाय जमत नाही. ते म्हणाले होते त्यांचा मित्र, ओळखीचा, नातेवाईक व्यवसायामुळे भिकेला लागला ते… खरंच व्यवसाय आपल्याला जमूच शकत नाही… हे आपलं क्षेत्रच नाही… तो रॉंग नंबर आपल्याला सारखं सांगण्याचा प्रयत्न करतो कि व्यवसाय आपलं क्षेत्र नाही, आपली करिअरची निवड चुकली आहे. आणि नकळतपणे आपल्या डोक्यातही तेच चक्र सुरु होत. या रॉंग नंबरवर आपला विश्वास बसत जातो.

हा रॉंग नंबर राईट वाटायला लागला कि आपण आपल्या व्यवसायापासून दूर जायला लागतो. आपण आपल्याच व्यवसायाकडे नकारात्मक दृष्टीने बघायला लागतो. अगदी व्यवसाय अपेक्षेप्रमाणे होत नाही म्हणून दुकानच न उघडणारे, व्यवसायाकडे दोनदोन दिवस न फिरकणारे काही व्यावसायिक मी पहिले आहेत. हे आपलं क्षेत्र नव्हतं, आपण यासाठी बनलेलोच नाही या गोष्टींवर आपला विश्वास जेवढा घट्ट होत जातो तेवढे आपण व्यवसायापासून दूर व्हायला लागतो. आणि शेवटी व्यवसाय बंद करायची वेळ येते. तो बंद झाल्यावर तर आपला विश्वास आणखी घट्ट होतो. “बघा, व्यवसाय बंदच झाला, ते लोक बरोबर म्हणत होते”.

या रॉंग नंबर पासून आपल्याला लांब राहायचं असत. यश अपयश, चढउतार, संकटे, अडचणी, आर्थिक अडचणी हे व्यवसायाचा भाग असतात हेच आपल्या डोक्यात असले पाहिजे. कोणत्याही परिस्थिती स्वतःवर अविश्वास निर्माण नाही झाला पाहिजे. कितीही मोठं संकट आलं तरी ‘हे मला अपेक्षित होतं’ असाच आपला दृष्टिकोन असला पाहिजे. पण या रॉंग नंबरमधे जर आपण अडकलो तर मात्र काही खरं नाही… जर असा काही विचार डोक्यात आला तर लगेच सावरा आणि स्वतःलाच सांगा – भावा, रॉंग नंबर लागतोय, आवर स्वतःला…

(सध्या बऱ्याच जणांच्या डोक्यात या रॉंग नंबरचा सुळसुळाट झाला आहे म्हणून हा लेखनप्रपंच)

व्यवसाय साक्षर व्हा…

_

© श्रीकांत आव्हाड
७७४४०३४४९०

Business Consultant

www.ShrikantAvhad.com

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!