व्यवसायाबद्दल तुम्ही कितपत गंभीर आहात?



‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

======================

लेखक : श्रीकांत आव्हाड
======================

व्यवसायाबद्दल गंभीर म्हणजे दररोज व्यवसायाच्या ठिकाणी जाता कि नाही, ग्राहकांकडे बघता कि नाही एवढ्या पुरता हा विषय मर्यादित नाही.

एक खरी घडलेली घटना सांगतो.
एका मोठ्या शहरात २०-२५ वर्षांपासून सुरु असलेलं एक स्नॅक्स & कॅफे सेंटर आहे. २५० स्क्वे.फु. शॉप असेल. आजही चालू आहे. आता व्यवसायात आणखी वाढ झालेली आहे. हॉटेल आजही हाऊसफुल असतं, आधीही असायचं. मिसळ, आम्लेट, भुर्जी, कॉफ़ी, चहा, दाक्षिणात्य पदार्थ यासाठी चांगली गर्दी असते.

प्रचंड गर्दी असलेलं ते ठिकाण जवळच्या एका कॉलेज मधे शिकणाऱ्या तरुणासाठी सुद्धा हक्काचं ठिकाण होतं. आठवड्यातून ३-४ दिवस तिथंच पडीक असायचा. दोन तीन वर्ष गेल्यानंतर जसजसा कॉलेज संपायचा दिवस जवळ येत चालला, तसा त्याने करिअरबद्दल विचार सुरु केला. त्याचं पाहिलं लक्ष गेलं त्या हॉटेलकडे. त्याच्या असं लक्षात आलं कि हॉटेलमालकाने आपल्या हॉटेलचा ट्रेडमार्क रजिस्टरच केलेला नाहीये. त्या मुलाने तेच नाव घेतलं, तोच फॉन्ट, तेच कलर कॉम्बिनेशन घेतलं आणि नावाच्या सुरुवातीला एक लहानसा जोडशब्द लावून तो ब्रॅंडनेम ट्रेडमार्क रजिस्टर करून घेतला. आणि त्याच कॉलेजच्या जवळ त्याने आपलं स्वतःच स्नॅक & कॉफी सेंटर सुरु केलं. लोकांना सुरुवातीला त्या जुन्या हॉटेलची ब्रांच वाटली, त्यामुळे तिथे प्रचंड गर्दी व्हायला लागली. दोन महिन्यांनी मूळ हॉटेलमालकाने आपल्या स्नॅक सेंटर मधे आमची कुठेही शाखा नाही असा बोर्ड लावला, आणि मग लोकांच्या लक्षात सगळं प्रकार आला. पण तोपर्यंत त्या नव्या कॅफे सेंटरचा व्हायचा तेवढा प्रचार होऊन गेलेला होता. जुन्या हॉटेलचालकाने आपल्या ब्रँड चा ट्रेडमार्क रजिस्टर करून घेतला पण या नवीन ब्रँड ला ऑब्जेक्शन घेण्यासाठी स्कोप राहिला नव्हता. म्हणजे त्याला थांबवणं शक्य नव्हतं.

इकडे या नवख्या मुलाचं हॉटेलही चांगलच चालायला लागलं. फूड इंडस्ट्रीमधे लोकांना चव चांगली वाटली कि ते कुठेही जातात. यांच्याकडे चांगलीच गर्दी वाढली. आणि पुढच्या दोन वर्षांमधे या नवख्या मुलाने आपल्या ६०-७० फ्रॅंचाईजी सेटअप केल्या. इकडे या जुन्या हॉटेलमधे अजूनही ‘आमची कुठेही शाखा नाही’ असा बोर्ड टिकून आहे. धंदा खूप मोठा आहे त्याबद्दल काही म्हणणं नाही, दिवसाला दीड एक लाखाची उलाढाल सहज होत असेल, पण फक्त आपल्या ब्रँड कडे लक्ष न दिल्यामुळे त्याच्या ब्रँड चा वापर करून एका दुसऱ्याने दोनच वर्षात त्याच्या तोडीसतोड व्यवसाय उभा केला.

हे प्रकरण इथेच संपत नाही.

जो मूळ हॉटेलचा मालक होता त्याने स्पर्धा पाहून आपल्या प्रोडक्ट मधे बरेच बदल केले, नवनवीन प्रयोग केले, जागा रिफ्रेश केली, काही नवीन असे प्रोडक्ट शोधले कि ते इतर कुठे लवकर सापडणार नाहीत, आणि त्याचा व्यवसाय पहिल्यापेक्षा जास्त जोमाने चालायला लागला. समोर खूप गर्दी होते म्हणून शेजारी नवी जागा घेतली, तिथेही उभा राहायला जागा नसते. भले त्याची अजूनही कुठेही शाखा नाही पण म्हणून त्याचा धंदा कमी कुठेच झालेला नाही.

याचवेळी दुसऱ्याने म्हणजे त्या नवख्या मुलाने, सेटअप उभा केला, नामांकित ब्रँड चा वापर करून आपला व्यवसाय वाढवला, फ्रॅंचाईजी मॉडेल उभारले, करोडोंची उलाढाल सुरु झाली, पण फ्रॅंचाईजी मॉडेल चालवणे म्हणजे नुसते ब्रँड लावण्याची परवानगी देऊन शांत बसने नसते हे तो विसरला. फ्रॅंचाईजी चांगल्या चालाव्यात यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. तो फक्त फ्रॅंचाईजी वाटण्यात आणि त्यातून फ्रॅंचाईजी फी घेण्यात समाधानी राहिला. नवनवीन प्रोडक्ट डेव्हलप करणे, स्टॅंडर्ड मेंटेन ठेवणे, ब्रँड प्रमोशन करत राहणे, फ्रँचाइजीवर वचक ठेवणे अशा कोणत्याच गोष्टीमधे त्याला इंटरेस्ट नव्हता. पुढच्या पाच वर्षात निम्म्या फ्रॅंचाईजी बंद पडल्या, उरलेल्यापैकी ७०-८०% कशाबशा चालू आहेत.

व्यवसायाबद्दल गंभीर असणं म्हणजे काय याच हे एक उदाहरण आहे.

पहिल्या टप्प्यात त्या जुन्या हॉटेलच्या मालकाने आपल्या व्यवसायात भरपूर लक्ष दिले पण आपल्या नावाच्या सुरक्षेकडे त्याने कानाडोळा केला. त्याची मोठी किंमत चुकवावी लागली.
दुसऱ्या टप्प्यात त्या नवउद्योजकाने अतिशय आक्रमकपणे सुरुवात केली पण त्यातून जो सेटअप उभा राहिला त्याला नीटनेटकेपणाने चालवण्यात त्याने लक्ष दिले नाही, आता त्याचा व्यवसायाचा आलेख बराच खाली आलेला आहे.

बरेच व्यावसायिक आपल्या व्यवसायातील बऱ्याच लहान लहान गोष्टींकडे दुर्लक्ष करतात. ते अक्षम्य दुर्लक्ष आहे हे त्यांच्या लक्षात येत नाही.

कुणी मार्केटमधे संबंध सुरळीत ठेवण्याकडे, किंवा ग्राहकांच्या नेहमी संपर्कात राहण्याकडे लक्ष देत नाहीत.
कुणी आपल्या कर्मचाऱ्यांच्या वर्तणुकीकडे कानाडोळा करतात.
कुणाचा एखादा कस्टमर इंटरॅक्शनचा सेटअप असेल तर त्याच्या नीटनेटकपणाकडे दुर्लक्ष करतो.
कुणी आपल्या बँक अकाउंटकडे दुर्लक्ष करतो. पुरेश्या उलाढालही करत नाही. नीट व्यवहार करत नाही.
कुणी आपल्या आर्थिक रेकॉर्ड ला गांभीर्याने घेत नाही. चेक सारखे बाउंस होतात.
कुणाचं व्यवसायाचं बँक अकाउंटच नसतं.
कुणी वेळेला गांभीर्याने घेत नाही.
कुणी कागदपत्रांची नीट देखभाल करत नाही, कुणी कागदपत्र सांभाळूनच ठेवत नाही.
कुणाच्या व्यवसायाच्या नोंदणी सुद्धा नसतात.
कुणाचं व्यवहाराचं रेकॉर्ड मेंटेन नसत.
कुणी आपल्या वैयक्तिक डेव्हलपमेंटकडे कडे लक्ष देत नाही.
कुणी व्यवसायात आवश्यक असणाऱ्या नियमांना स्वतःला बांधून घेत नाही.
कुणी कामात हलगर्जीपणा करतात, आळस करतात.

या खूप लहान वाटणाऱ्या गोष्टी आहेत, यामुळेच यांच्याकडे दुर्लक्ष करण्याकडे आपला कल जास्त असतो… आणि यासाठी उत्तर ठरलेलं असतं, “काही होत नाही, बघू नंतर…”

या गोष्टी लहान जरी वाटल्या तरी या आपल्या व्यवसायावर खूप मोठा परिणाम करतात. लहान म्हणून केलेलं दुर्लक्ष किती महागात पडू शकत हे आपल्याला त्यांनतर काही वर्षांनी लक्षात येत आणि तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. व्हायचं तेवढं नुकसान झालेलं असतं आणि आपल्याकडे त्याकडे बघत बसण्याशिवाय पर्याय नसतो.

व्यवसायाबद्दल गंभीर असणं म्हणजे व्यवसायाच्या ठिकाणी दररोज जाऊन बसे, कर्मचाऱ्यांकडे गंभीरपणे बघत राहणे, आणि मार्केटमधे स्वतः उतरने एवढ्यापुरतं मर्यादित नाहीये. या गोष्टी महत्वाच्या आहेतच पण यासोबतच खूप लहान लहान गोष्टी आहे ज्याकडे आपण दुर्लक्ष करतो त्याकडेही गांभीर्याने बघणे आवश्यक असते.

आपला व्यवसाय हा समुद्रातल्या जहाजेप्रमाणे असतो. आपण महत्प्रयासाने ती जहाज बनवतो, उभी करतो, समुद्रात ढकलतो, तिच्यावर स्वार होतो, असंख्य लाटांना, वादळ वाऱ्यांना सामोरे जात आपला प्रवास सुरु करतो, ती जहाजसुद्धा शानमधे पुढे जात असते, पण जर तिच्यात चुकून जरी एखादं छिद्र राहिलं असेल ना, तर तिला बुडण्यापासून आपण वाचवू शकत नाही, आणि आपण प्रवासात इतके पुढे आलेले असतो कि ती बुडण्याआधी आपण किनाऱ्यापर्यंत पोहोचण्याच्या परिस्थितीत नसतो… म्हणून व्यवसायातील लहानातील लहान गोष्टीला गांभीर्याने घेणे आवश्यक असते. काही होत नाही, बघू नंतर, आत्ता त्रास नको असा विचार कधीही करू नका. व्यवसायातील लहानातील लहान गोष्टीला नेहमी गांभीर्याने घ्या.

व्यवसाय साक्षर व्हा…

_

© श्रीकांत आव्हाड
७७४४०३४४९०

Business Consultant

www.ShrikantAvhad.com

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील


One thought on “व्यवसायाबद्दल तुम्ही कितपत गंभीर आहात?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!