आज्जीची, पिठाच्या डब्यात पैसे लपवून ठेवण्याची कला आत्मसात करण्याची वेळ आली आहे.


‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

======================

लेखक : श्रीकांत आव्हाड
======================

कोरोनाने जवळजवळ प्रत्येकालाच मागच्या सहा महिन्यात अद्दल घडवली आहे असं आता आपण म्हणू शकतो. ते आवश्यकच होतं. पुढचं पुढ बघू या वृत्तीमुळे २००८ साली अमेरिकेची जी अवस्था झाली होती ती आपल्याकडे होण्याआधीच कोरोनाने आपल्याला आपण काय चुका करत आहोत प्रॅक्टिकलीच दाखवून दिल.

चार महिने तग धरून ठेऊ शकतो एवढीही शिल्लक कुणाकडे उपलब्ध नाही. दुसऱ्या-तिसऱ्या महिन्यापासूनच नोकरदारांची, व्यावसायिकांची मार्केट पुन्हा सुरु करण्यासाठी ओरड सुरु झाली. निम्न आणि मध्यम स्तरावरील मध्यमवर्गीयांची अवस्था सर्वात जास्त बिकट झाली आहे. पैसा संपत चालला, उत्पन्नाचे स्रोत हाती नाहीत, जे आहेत ते फक्त आजची गरज भागवण्यापुरतं मर्यादित आहेत. अशा परिस्थितीत आपण काम करतो म्हणजे नक्की काय करतोय असं प्रश्न कितीतरी जणांना पडला असेल. मागच्या काही वर्षांपासून आपण जंगलातल्या प्राण्यांप्रमाणे वागायला लागलो आहोत. भूक लागेल तेव्हा भक्ष्य शोधायला सुरुवात करायची. तोपर्यंत निवांत राहायचं. पण जंगलातल्या प्राण्यांसारखं आपल्यासाठी ते भक्ष्य फुकट उपलब्ध नाहीये. पण ते कोणत्याही परिस्थितीमधे विना अडचण उपलब्ध व्हावं यासाठी आपल्याकडे नियोजन शून्य आहे.

पैसा उधळणं म्हणजे चांगली जीवनशैली जगणं या मागच्या काही वर्षात वाढत चाललेल्या वृत्तीमुळे आपली मागच्या सहा महिन्यात चांगलीच वाट लागली आहे. कोणताही मनस्ताप नसलेली, टेन्शन नसलेली, समाधानी जीवनशैली हि सर्वोत्तम जीवनशैली असते हे आपण विसरत चाललो आहोत.

आपण मागच्या दहा वीस वर्षांपासून कर्जाच्या विळख्यात मोठ्या प्रमाणावर अडकत चाललो आहोत. मोबाईल घेण्यासाठी कर्ज, फ्रिज घेण्यासाठी कर्ज, TV घेण्यासाठी कर्ज कशासाठीही कर्ज घेतले जात आहेत. व्यवसायातील किंवा नोकरीतील, थोडं उत्पन्न वाढलं कि लगेच मोठं कर्ज घेऊन मोठं घर, फ्लॅट घ्यायचा. बहुतेक जण तर आता फक्त कर्ज कोण देतंय याचाच शोध घेताना दिसतात. जो व्यवसाय ठरवला तर दहा वीस हजारातही सुरु करता येऊ शकतो, तोच व्यवसाय लोकांना दाखवण्यासाठी मोठाच असला पाहिजे या हट्टापायी, दहा-वीस लाखाचं कर्ज व्यवसायाचा कोणताही अनुभव नसताना कोणत्या कॉन्फिडन्स वर काढलं जातं ? बर, जो काय कॉन्फिडन्स असेल, ९५% व्यावसायिकांचा तो कॉन्फिडन्स पुढच्या वर्षभरातच खकान होऊन जातो…

मागच्या सहा महिन्यात व्यवसाय ठप्प झाल्यांनतर जवळजवळ प्रत्येकासमोर दोनच मोठ्या अडचणी होत्या… पहिली, घरखर्च चालवण्यासाठी लागणार पैसा, आणि दुसरी, कर्जाचे फेडायचे हफ्ते… हातात येत काहीच नसताना ज्यावेळी द्यायची वेळ येते त्यावेळी डोक्याचा भुगा होतो. बचत नाही, गुंतवणूक नाही, इमर्जन्सी फंड नाही, घरखर्चासाठी घरातही काही रक्कम नाही… प्लॅनिंग करण्यात मी खूप भारी आहे म्हणणारे भलेभले इथे फेल झालेत.

हातात येणाऱ्या पैशाच्या बाबतीत आपण नेहमी आधी खर्चाचं नियोजन करतो, बचतीचं किंवा गुंतवणुकीच नाही. आपले कारभारच उरफाटे झाले आहेत.

आपली आज्जी, पणजी जे पिठाच्या धान्याच्या डब्यात पैसे ठेवायची तो काय मूर्खपणा नव्हता. कोणतही आर्थिक शिक्षण नसणाऱ्या त्या वर्गासाठी तो बचतीचा सर्वोत्तम मार्ग होता. त्या पिठाच्या डब्यातले पैसे वर्ष-वर्ष बाहेर निघत नसायचे. ती त्यांच्यासाठी एक बँक असायची, बचतीची बँक. इमर्जन्सी फंड असायचा तो. नेहमीची आर्थिक अडचण कशीही असली तरी ती नेहमीच्या मार्गाने भागयाची. पण पाच दहा वर्षातून कधीतरी मोठ्या प्रमाणात पैशाची गरज पडायची, आणि ती बचत ती गरज भागवायची. पण गरज भागवून ते शांत बसत नसायचे, तर ती बँक परत रिफील केली जायची. त्या पिठाच्या, धान्याच्या डब्यात पुन्हा दुसऱ्या दिवसापासून पैसे जमा व्हायला सुरुवात व्हायची. कदाचित त्यांना आपल्याएवढी मजा नाही करता आली, पण आयुष्यभर टेन्शनमधे जगण्याची त्यांच्यावर वेळ कधी आली नाही.

आपला आर्थिक नियोजनाचा क्रमच बिघडलेला आहे. फायनान्स कंपन्यांनी, आणि कन्ज्युमर गुड्स कंपन्यांनी आपली जीवनशैलीच बदलवून टाकलेली आहे.

पैसा हातात आला कि आधी आपण खर्चाचं नियोजन करतो. हफ्ते फेडायचे आहेत, नवीन शॉपिंग करायची आहे, नवीन कर्ज काढायचं आहे, मग घरखर्चासाठी पैसे हवे आहेत, मग मुलाबाळांच्या शिक्षणासाठी पैसे बाजूला काढायचे आहेत, इतर मौजमजेसाठी पैसे हवे आहवेत, आणि यातून काही शिल्लक राहिलं तर मग गुंतवणुकीच बघू… त्या गुंतवणुकीकडे “बघू” या विचारामुळे आपली आज बँक अकाउंटकडे बघायची हिम्मत होत नाहीये अशी अवस्था झाली आहे.

हातात आलेल्या प्रत्येक पैशाचं नियोजन आधी बचत आणि गुंतवणुकीपासून सुरु झालं पाहिजे. गुंतवणुकीचं टार्गेट पूर्ण झाल्यानंतर मग घरखर्चासाठी मुलांच्या शिक्षणासाठी पैसा बाजूला पडला पाहजे, यानंतर आरोग्यासाठी पैसा बाजूला पडला पाहिजे, यानंतर इतर खर्चाचा पैसा बाजूला पडला पाहिजे, यानंतर स्वतःच्या मौजमजेसाठी पैसा बाजूला पडला पाहिजे, आणि यांनतर काही शिल्लक राहत असेल तर त्यातून कर्जाचे नियोजन करता येऊ शकते. आपला क्रम पूर्णपणे उलटा झालेला आहे. आणि याचाच परिणाम आपण आर्थिकदृष्ट्या प्रचंड मोठ्या धोक्याच्या पातळीवर आहोत हे मागच्या सहा महिन्यात बहुतेकांच्या लक्षात आले आहे.

चक्र कधीनाकधी पूर्ण होतंच असत. ते आता पूर्ण होण्याच्या लेव्हलवर आलंय. आपल्या आजी आजोबांची पिठाच्या, धान्याच्या डब्यात पैसे लपवून ठेवायची पद्धत पुन्हा एकदा आत्मसात करणे आवश्यक झाले आहे. म्हणजेच गुंतवणूकीचे स्किल आत्मसात करणे आवश्यक झाले आहे. आधी नियोजन बचतीचे मग खर्चाचे याच प्रकारे आपले आर्थिक नियोजन असले पाहिजे. कर्ज काढून श्रीमंतीचा फील घेण्यापेक्षा खरेखुरे श्रीमंत होणे महत्वाचे आहे. कर्ज काढून श्रीमंती दाखवणारे प्रत्यक्षात प्रचंड भिकारी असतात. फक्त इकडून तिकडे फिरवाफिरवी करण्यात यांचं आयुष्य जात. यापेक्षा थोडा कमी, पण विना टेन्शन आपल्या पैशाचा उपभोग घेता येईल असे नियोजन करणे कधीही फायद्याचेच आहे.

अर्थसाक्षर व्हा…
व्यवसाय साक्षर व्हा…

_

© श्रीकांत आव्हाड
७७४४०३४४९० (WhatsApp Only)

Business Consultant

www.ShrikantAvhad.com

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील


Shrikant Avhad

संस्थापक - उद्योजक मित्र Entrepreneur, Consultant, Writer, Speaker...

View all posts by Shrikant Avhad →

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!