फावल्या वेळेत तुम्ही काय करता? मोबाईलवर गेम खेळत बसता का?


लेखक : श्रीकांत आव्हाड
======================

फावल्या वेळेत म्हणजे दुपारी किंवा रात्री जेवण झाल्यानंतरची काही मिनिटांची वेळ, दुपारी चहाची वेळ, कधी निवांत बसावसं वाटणारी वेळ ज्यावेळी आपण काम बाजूला ठेऊन काही काळ निवांत असतो अशी वेळ. या वेळेत मेंदूला आणि शरीराला थोडासा अराम देण्याचा उद्देश असतो. पण या वेळेत बरेच जण आता मोबाईल वर गेम खेळताना दिसतात. लहान मोठे म्हातारे सगळ्यांनाच या मोबाईल गेम्सचं व्यसन लागलेलं आहे. जेवण झालं कि निवांत बसण्याऐवजी लगेच मोबाईल सुरु करून त्यावर एखादा गेम खेळत बसतात, दिवसभर थोडंसं रिलॅक्स वाटलं कि लगेच मोबाईलवर गेम सुरु होतात. अगदी कुणाशी गप्पागोष्टी चालू असतील, कुणी पाहुणे मित्र मंडळींच्या घोळक्यात बसलेले असतील तरी लगेच गेम खेळणं सुरु होत. सोशल मीडिया हे कामाच्या वेळेत वापरायच्या गोष्टी आहेत तर गेम्स फावल्या वेळेत खेळायच्या गोष्टी आहेत, अशी विभागणी आता बहुतेकांनी केली आहे.

आठ दहा वर्षांपूर्वी मला मोबाईलवर गेम खेळण्याची सवय लागली होती. कँडीक्रश चा चांगलाच नाद लागला होता. सकाळचा चहा झाला कि लगेच मोबाईलवर गेम खेळायला सुरुवात व्हायची. दुपारच्या जेवणानंतर तेच, संध्याकाळी तेच, रात्री सुद्धा तेच. या गेम खेळण्याच्या नादात दिवसभरातले २-३ तास कसे वाया जायचे कळतही नसायचं.

काही महिने हा कारभार चालल्यांनंतर माझ्या लक्षात आलं कि मी ज्यावेळी निवांत बसने आवश्यक असते, माझ्या मेंदूला अराम देणे आवश्यक असते तोच वेळ मी गेम खेळण्यात खर्च करतोय. या निवांत वेळेत मला बऱ्याच महत्वाच्या गोष्टी आठवायच्या, नवनवीन संकल्पना सुचायच्या, माझ्या व्यवसायाच्या बाबतीत स्वतःशीच काही चर्चा व्हायची, काही अडचणीच्या प्रश्नांवर विचार करता करता त्यावर उत्तरेही सापडायची. पण महत्वाच्या वेळेत गेमच्या नादाला लागल्यामुळे हि महत्वाची कामेच थांबून गेली होती. मेंदूला आरामच मिळत नव्हता. मला नवीन मलाही सुचणं बंद झालं, व्यवसायाबद्दल सुचणारे विचार बंद झाले, नवनवीन प्रोजेक्ट वर जे प्लॅनिंग करणे आवश्यक होते ते कमी झाले, आणि शेवटी या कामासाठी मला आणखी दोन तीन तासांची आवश्यकता भासायला लागली. पण तो वेळ दिवसभरात मिळणे शक्य राहिले नव्हते. याचा परिणाम कार्यक्षमतेवर व्हायला लागला आणि व्यवसायावरही.

एक दिवस गेम बाजूला ठेऊन निवांत विचार करताना लक्षात आलं कि त्या गेम मुळे माझे दिवसातला दोन तास वाया जात आहेत, आणि ते असे दोन तास आहेत ज्यावेळी मला सगळ्या अवांतर गोष्टी सुचायच्या. त्याच दिवशी तो गेम मोबाईल मधून डिलीट केला. मला आठ दिवसातच एखाद्या आजारी माणसाला औषधोपचारांचा फरक जाणवावा असा फरक माझ्या कार्यक्षमतेमधे आणि कार्यशैलीमधे जाणवायला लागला. मागच्या चार वर्षात सुडोकू सोडला तर माझ्या मोबाईलमधे कोणताही गेम नाही. सुडोकूसुद्धा ठरवून अर्धा तास सोडवतो. कधी गेम खेळावेसे वाटले तर कॉम्प्युटरवर NFS, AOE किंवा क्रिकेट सारखे गेम्स अर्धा तास खेळतो. महिनाभरातुन जास्तीत जास्त दोन ते तीन तास तेही खूपच कंटाळवाणे वाटत असेल तरच.

फावला वेळ हा फावला कधीच नसतो, तो टाईमपास करण्यासाठी सुद्धा नसतो. आपला मेंदू नेहमीच काम करत असतो. तो शांत कधीच नसतो. पण या फावल्या वेळेत आपण दिवसभराची कामे, ज्यामुळे आपल्याला इतर काही विचार करायला संधी मिळत नसते अशी कामे, बाजूला ठेऊन आपल्या विचारांना मोकळा वेळ देत असतो. याच वेळेत आपल्याला बऱ्याच गोष्टी सुचत असतात. याच वेळेत आपल्याला नवनवीन संकल्पना सुचतात, काही समस्यांवर उत्तरे सापडतात, अडलेल्या काही गोष्टी अचानक सुटतात, दिवसभरत राहून गेलेली कामे आठवतात. पण आपण हाच महत्वाचा वेळ गेम सारख्या अनावश्यक गोष्टींमधे अडकवून आपलेच नुकसान करून घेत असतो.

मोबाईलवरच गेम हे एखाद्या व्यसनापेक्षा कमी नाहीत. एकदा त्याची चटक लागली कि ते सुटत नाही. आत्ताही बहुतेकांच्या मोबाइलमध्ये गेम्स असतील, दिवसभरातील दोन तीन तास त्यावर खर्च होत असतील, आणि अगदी हा लेख वाचून तो गेम डिलीट करावासा वाटेल, पण क्षणभरच…. काही क्षणातच, गेम डिलीट करण्याची गरज नाही, माझं माझ्यावर नियंत्रण आहे, मी दिवसभरत फक्त अर्धा तासच गेम खेळेल असा विचार करून बहुतेक जण तो डिलीट किंवा अनइन्स्टॉल करणार नाही. काहींचं म्हणणं असत कि मी जास्त गेम खेळतच नाही. पण माझं म्हणणं असेल कि चेस किंवा सुडोकू सारखे गेम्स सोडले तर बाकीचे गेम्स तात्काळ अनइन्स्टॉल करा.

अनावश्यक गोष्टींमधे महत्वाचा वेळ वाया कधीच घालवू नका. फावला वेळ आपल्या विकासासाठी फार महत्वाचा आहे, त्याचा चुकीचा वापर झाला तर त्यात आपलंच नुकसान आहे. दिवसाला ३ तास अनावश्यक गोष्टींमधे वाया जात असतील तर ते वर्षाला १०९५ तासांचं नुकसान होत. आणि दिवसांमधे हिशोब करता ४५ दिवस होतात. माझ्या मोबाईलमधे तेव्हा डिलीट केलेला कँडीक्रश आजही असता किंवा त्यासारखाच आणखी एखादा गेम असता आणि दिवसाचे ३-४ तास त्यात गेले असते तर मागच्या ५ वर्षात मी जवळजवळ पाऊण वर्ष गेम खेळण्यातच वाया घालवलेले असते…

एक दिवसासाठी लहान वाटणारे आकडे वर्षभराच्या हिशोबाने मोठे वाटतात, पाच वर्षांच्या हिशोबात फार मोठे वाटतात आणि दहा पंधरा वर्षाच्या हिशोबाने प्रचंड मोठे होतात.
वेळेचा सुयोग्य वापर करा…
व्यवसाय साक्षरतेसोबतच वेळेच्या बाबतीत साक्षर असणेसुद्धा फार महत्वाचे आहे…

व्यवसाय साक्षर व्हा…

_

© श्रीकांत आव्हाड
७७४४०३४४९० (WhatsApp Only)

Business Consultant

www.ShrikantAvhad.com

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील


Shrikant Avhad

संस्थापक - उद्योजक मित्र Entrepreneur, Consultant, Writer, Speaker...

View all posts by Shrikant Avhad →

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!