उद्योजकांचे सीमोल्लंघन‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

======================

लेखक : श्रीकांत आव्हाड
======================

खरं तर आपण जव्हा व्यवसाय सुरु करण्याचा विचार करतो आणि व्यवसाय सुरु करतो तेव्हाच आपण आपल्या आयुष्यातील एक मोठी सीमा ओलांडलेली असते. एक मोठे बंधन आपण झिडकारून आपल्या प्रवासाला सुरुवात केलेली असते.

प्रत्येक प्रांताची आपली एक मानसिकता असते. उत्तर भारतात मोलमजुरी आणि कष्टकरी मानसिकता जास्त दिसून यते. तिथले लोक कष्टाची कामे सहजरित्या करतात. दक्षिण भारतात बुद्धिकौशल्यावर जास्त भर दिसून येतो. बहुतेक शास्त्रज्ञ दक्षिण भारतीयच असल्याचे दिसून येते. गुजरातमधे व्यवसाय हाच सर्वोत्तम समाजाला जातो, नोकरी कनिष्ठ समजली जाते. राजस्थानमधील जनतेमधे कलेवर भर दिसून येतो. तर आपल्या महाराष्ट्रात आणि आसपासच्या परिसरात नोकरीची आणि सेल्फ एम्प्लॉईड (प्रोफेशनल) कामांची मानसिकता दिसून येते. प्रोफेशन म्हणजे व्यवसाय हाच अर्थ, पण बिजनेस आणि प्रोफेशन यात आपण फरक केलेला आहे. नोकरीसोबत, वकिली, डॉक्टरी, असे व्यवसाय आपण मान्य केलेले आहेत. तरीही आपला मराठी समाज हा बहुतांशी नोकरीच्या मानसिकतेचा आहे. गुजरातसारख्या राज्यात जिथे व्यवसाय श्रेष्ठ समजला जातो तोच व्यवसाय आपल्याकडे कनिष्ठ समजला जातो. नोकरी चाकरी हेच आपल्यासाठी सर्वोत्तम क्षेत्र आहे हेच आपल्या डोक्यात घट्ट बसलेले आहे. हे जे मी मानसिकतेबद्दल बोलतोय ते बहुतांशी जनतेबाबत समजावे. मराठी उद्योजक आहेत, गुजराती नोकरदार आहेत, उत्तर भारतीय उद्योजक आहेत, दाक्षिणात्य नोकरदार आहेत, पण एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात नगण्य आहेत. म्हणून मी बहुतांशी लोकांची मानसिकता हि प्रदेशाची मानसिकता म्हणून म्हटले आहे. त्यानुसार आपल्या प्रदेशाची एक मानसिकता आहे ज्यात व्यवसायाचे स्थान कनिष्ठ आहे.

म्हणूनच जेव्हा आपण व्यवसाय सुरु कारण्याचच विचार करतो आणि तो सुरु करतो तेव्हा आपण आपल्यासाठी आखून ठेवलेली एक सीमा पार करत असतो. हे सीमोल्लंघन हे आपल्या आयुष्यातील एक महत्वाचे सीमोल्लंघन असते.

पण यासोबतच आणखीही काही (वैचारिक, सामाजिक) मर्यादा आपण स्वतःसाठी आखून ठेवलेल्या असतात ज्या व्यवसायात असतानासुद्धा आपण पाळत असतो, या सीमांचे उल्लंघनाही आपल्या व्यावसायिक आयुष्यासाठी महत्वाचे आहे.

आपण व्यवसायात उतरलो तरी आपल्याला मारवाडी गुजरात्यांसारखे किंवा इथल्या मोठ्या उद्योजकांसारखे मोठे व्यवसाय करणे आपल्याला शक्य नाही हि आपली मानसिकता ठरलेली असते. जे सुरु केलंय तेच खूप आहे, होऊन होऊन कीती मोठा व्यवसाय होणार असाच नेहमी विचार केला जातो. आपण सुद्धा जगातील सर्वात मोठे उद्योजक होऊ शकतो असा आपण विचार करण्याचा प्रयत्न केला तरी आपण स्वतःवरच हसतो. यामुळे नकळतपणे आपल्या मानसिकतेमधे आपली मर्यादा निश्चित केली जाते. आणि आपण त्यापुढे कधीही जाऊ शकत नाही. आपण स्वतःबद्दल एक न्यूनगंड बाळगून आहोत कि मी त्यांच्याएवढा मोठा होऊ शकत नाही. आपण स्वतःसाठी प्रगतीची सीमा आखून ठेवलेली असते. हि सीमा आपल्याला एका मर्यादेपुढे जाऊ देत नाही. हि सीमा ओलांडणे आपल्याला महत्वाचे आहे

समाजाचा अति विचार सुद्धा आपल्यासाठी घातक असतो. लोक काय म्हणतील, नातेवाईक काय म्हणतील या विचाराने आपण खूप सारे निर्णय घेण्यात कचरतो. यामुळे बऱ्याचदा व्यवसायावर विपरीत परिणाम होतो. व्यवसाय करत असताना लोक, नातेवाईक, मला ओळखणारे चार लोक काय म्हणतील या विचाराचे बंधन झुगारून देणे आवश्यक आहे. इतर लोक आपल्याबद्दल काय मत बनवतील या विचाराने आपल्याच प्रगतीला आडकाठी आणणारी सीमा ओलांडणे आपल्यासाठी महत्वाचे आहे.

नोकरीच्या मानसिकतेमागे मोठे कारण आहे ते जोखीम पत्करण्याची मानसिकता नसणे. उद्योगात जोखीम घ्यावी लागेलच हि अप्रत्यक्ष अट असते. या अटीला बाजूला सारून आपण व्यवसायात मोठे यश मिळवू शकत नाही. यशापयश जरी बाजूला ठेवले तरी आपण मनमोकळेपणाने व्यवसाय करू शकत नाही हे निश्चित. जोखीम पत्करण्याची मानसिकता महत्वाची आहे. जोखीम पत्करताना त्याचा रिस्क रेशो पडताळून पाहावा यात वाद नाही पण एकदम जोखीम नकोच म्हणण्याला अर्थ नाही. काहीतरी चुकीचेच घडेल हि भीती यामागे असते. या भीतीची मर्यादा आपल्याला झुगारून देणे महत्वाचे आहे.

इतरांवर कामाचा भर सोपवण्यात आपल्याला नेहमीच भीती वाटते. आपल्याला प्रत्येक काम स्वतःच्या हातानेच पूर्ण करायचे असते. सहकाऱ्यांच्या,कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर आपल्याला विश्वास नसतो. इतरांना काम जमणारच नाही या विचाराने आपण सगळी कामे स्वतः करतो आणि कामाचा व्याप लहानश्या व्यवसायातच मोठ्या प्रमाणात वाढवून ठेवतो. यामुळे नकळतपणे आपल्या व्यवसायाला मर्यादा पडते. इतरांच्या कार्यक्षमतेविषयी अविश्वास वाटणे बंद करणे आवश्यक आहे. या अविश्वासातून आपला व्यवसाय एका सीमेतच सीमित राहतो. हि सीमा ओलांडायची असेल तर आपल्याला आपल्या सहकाऱ्यांवर विश्वास ठेवावा लागेल. आपल्या कर्मचाऱ्यांच्या क्षमतेविषयी असणारी हि सीमा आपल्याला ओलांडावी लागेल.

अनोळखी प्रदेशात आपल्याला व्यवसायाची नेहमीच भीती वाटते. आपल्यातील बहुतेक व्यावसायिक स्थानिक मार्केटपुरते स्वतःला मर्यादित ठेवतात. जास्त लांब जायला नको, जास्त मोठ्या मार्केटचा विचार करायला नको, खूप मोठा पसारा नको अशा विचारामुळे व्यवसायाची वाढ एका मर्यादेपलीकडे जाऊ शकत नाही. आपण नेहमीच आपल्या कार्यक्षेत्राची सीमा ओलांडून आणखी मोठे मार्केट ताब्यात घेण्यासाठी तत्पर असले पाहिजे .

आपण स्वतःला जातींच्या, प्रांतांच्या, गटांच्या सीमांमध्ये अडकावून घेतलेलं आहे. जात, प्रांत किंवा समूहांच्या पलीकडे आपली पोहोच जातच नाहीये. यामुळे आपल्या आसपासच्या लोकांपर्यंत आपल्याकडून कोणताही सकारात्मक संदेश जात नाही. आपण कोणत्यातरी एका समूहाला पकडून बसलेलो आहोत हे पाहून इतर लोक आपल्यापासून लांब जातात. आणि हि आपल्या व्यवसायासाठी अतिशय धोकादायक परिस्थिती बनू शकते. आपल्या व्यवसायाला यामुळे अशी मर्यादा येऊ शकते ज्यामुळे आपल्या व्यवसायाला त्याबाहेर पडणे हे एक मोठे टास्क होऊन बसते. स्वतःला कोणत्याही समूहाच्या सीमांमधे अडकवू नका. मुक्त व्हा. या सिमेंट अडकले असाल हे सीमोल्लंघन लवकरात लवकर करा.

अशा आणखीही काही सीमा आहेत ज्या आपण काहीहीक कारण नसताना आपल्यासाठी आखून घेतल्या आहेत आणि त्यामुळे आपला व्यवसाय एका मर्यादेपलीकडे जाऊ शकत नाहीये. या सीमा ओलांडणे आवश्यक आहे. आपल्याला व्यवसायात पुढे जायचे असेल तर हे सीमोल्लंघन महत्वाचे आहे.

यासोबतच आपल्या प्रत्येकाने आपल्यासाठी आणखीही काही मर्यादा आखून घेतलेल्या असतील ज्यामुळे आपला फायदा न होता फक्त नुकसानच होत असेल. पण काहीनाकाही कारणांमुळे आपण त्या सीमा ओलांडण्यास धजावत नाही आहोत. अशा बंधनांचाही विचार करा. आपण कोणत्या गोष्टींमुळे अडकून पडलेलो आहोत याचा विचार करा आणि ती बंधने आपल्या मानगुटीवरून दूर करण्याचा प्रयत्न करा.

व्यवसाय साक्षर व्हा…
उद्योजक व्हा…
समृद्ध व्हा…

_

© श्रीकांत आव्हाड
७७४४०३४४९० (WhatsApp Only)

Business Consultant

www.ShrikantAvhad.com

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!