विक्री करताना लक्षात घ्याव्यात अशा, व्यावसायिक व विक्रेत्यांसाठी, उपयुक्त टिप्स


लेखक : श्रीकांत आव्हाड
======================

विक्री करताना लक्षात घ्याव्यात अशा, व्यावसायिक व विक्रेत्यांसाठी, उपयुक्त टिप्स

1. पोशाख
विक्रेत्याचा पोशाख नेहमी चांगला असावा. ग्राहकांशी थेट संबंध येणाऱ्या लोकांचा (स्वतः व्यावसायिक, सेल्समन, सर्व्हिस टीम इ.) पोशाख योग्य प्रकारे असणे आवश्यक आहे. व्यवसायाशी सुसंगत, ग्राहकांना प्रसन्न वाटेल असा पोशाख विक्रेत्याने नेहमीच परिधान केलेला असावा. व्यावसायिकांनी आपले घड्याळ, शूज, पेन, गॉगल, चष्मा या गोष्टींकडे पुरेसे लक्ष द्यावे. कर्मचारी असेल तर त्याने ड्रेसकोड नुसार योग्य पोशाख परिधान केलेला असावा.

2. पूर्वतयारी आणि सराव
विक्रेत्याने ग्राहकांशी कोणत्याही प्रकारची चर्चा करण्याआधी पुरेशी पूर्वतयारी केलेली असावी. गाहकांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देता आले पाहिजे. नवीन व्यावसायिकांनी ग्राहकांशी बोलण्याचा सराव करायला हवा. ग्राहकांशी बोलताना ततपप होणार नाही याही काळजी घ्या. एखादी गोष्ट माहित नसेल तर मान्य करा. बळजबरी काही सांगण्याचा प्रयत्न करू नका. विक्रेत्यांना शक्यतो जागेवर उत्तर द्यावे लागते, त्यामुळे कोणत्या प्रश्नासाठी काय उत्तर द्यायचे, कोणत्या परिस्थितीसाठी काय नियोजन असायला हवे याचा आधीच विचार करून ठेवा.

3. वेळ
ग्राहकाला दिलेली वेळ कटाक्षाने पाळा. ग्राहकांना विनाकारण वाट पाहायला लावू नका. काही कारणाने उशीर होत असेल तर ग्राहकांच्या संपर्क राहा. वेळ पाळणारे ग्राहकांच्या नेहमीच मनात भरतात. वेळ पाळणे हे शिस्तप्रिय लोकांचे लक्षण असते.

4. इगो
ग्राहकांचा इगो दुखावण्यात, त्यांना चारचौघात अपमानित करण्यात गम्मत वाटू शकते, पण ती गम्मत फार महागात पडते. ग्राहकांचा इगो दुखावू नका. परस्परातील चर्चेमध्ये त्यांना कुठेही चुकीचे ठरवण्याचा प्रयत्न करू नका. एखादी चूक दाखवून देतानाही तुम्ही तुम्ही त्यांना चुकीचे ठरवत आहात असे जाणवणार नाही अशा प्रकारे शब्दप्रयोग करा.

5. अनावश्यक बडबड
ग्राहकांसमोर अनावश्यक, बाष्कळ बडबड करू नका. अनावश्यक बोलण्याच्या ओघात बऱ्याचदा न बोलायच्या गोष्टी बोलून जातात. ग्राहकालाही कंटाळवाणे होऊन जाते. स्पर्धकांबद्दल बोलताना बऱ्याचदा तोंडून अपशब्द निघण्याची शक्यता असते, परंतु यामुळे आपले इम्प्रेशन खराब होते. विक्रेत्याची अनावश्यक बडबड ऐकून कधी इथून दुसरीकडे जातोय असं ग्राहकाला वाटणार नाही याची काळजी घ्या.

6. ग्राहकाच्या हावभावांवर लक्ष द्या
ग्राहकांच्या हावभावांचे, त्यांच्या चेहऱ्याचे सतत नकळतपणे निरीक्षण करत राहा. ग्राहकाच्या मनात काय चाललं आहे याचा वेध घेण्याचा प्रयत्न करा. ग्राहकाला जे सांगायचंय ते बऱ्याचदा तो त्याच्या हावभावांवरूनच सांगत असतो. एखादी वस्तू त्यांना आवडली आहे किंवा नाही हे त्यांच्या डोळ्यात दिसू शकते. त्यांना आपल्याशी चर्चा करण्यात इंटरेस्ट आहे कि नाही हे त्यांच्या हालचालीवरून, आपल्याला चर्चेत ते देत असलेल्या प्रतिसादावरून कळू शकते. अशा प्रकारे वेगवेगळ्या भावभावनांचा नेहमी अभ्यास करा. तुम्हाला पुढे काय कृती करणे आवश्यक आहे याचा अंदाज बांधण्यास मदत होईल.

7. टिमकी वाजवू नका. फेकाफेकी करू नका.
आपलीच टिमकी वाजवणारा, अनावश्यक बढाया मारणारा, आपण किती भारी आहोत हे सांगण्यासाठी एखादी काल्पनिक, घडलेली, न घडलेली गोष्ट फुगवून सांगणारा कुणालाच आवडत नाही. ग्राहकांसमोर आपली टिमकी वाजवू नका. टिमकी वाजवणे, बढाया मारणे आणि स्वतःचे गुण सांगणे यात फरक आहे हे लक्षात घ्या. समोरच्यांवर इम्प्रेशन मारण्यासाठी, मी तुमच्यापेक्षा जास्त भारी आहे हे दाखवण्यासाठी बढाया मारणारे, उगाच फेकाफेकी करणारे अशांपासून लोक नेहमीच दूर जातात. ग्राहकांसमोर मी तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे असे काही सांगण्याच्या किंवा त्यांना तसे दाखवण्याच्या भानगडीत पडू नका, ग्राहक हाच सर्वश्रेष्ठ असतो हे लक्षात असू द्या. चर्चा करताना अप्रामाणिक असणारे व्यवहारातही अप्रामाणिक असतील असाच अर्थ घेतला जातो. टिमकी कामातून वाजली पाहिजे बोलण्यातून नाही…

8. स्पष्टवक्तेपणा असावा, पण कुणाला दुखावू नका.
ग्राहकांना स्पष्ट चर्चा करणारे, योग्य सल्ले देणारे आवडतात. पण या स्पष्टवक्तेपणाच्या नादात कुणाला दुखावू नका. काय बोलायचं हे कळणे महत्वाचे आहे आणि ते बोलायचे कि नाही हे कळणे तर जास्त महत्वाचे आहे. ग्राहकांना त्यांच्या प्रश्नांची योग्य उत्तरे मिळतील आणि ते कुठेही दुखावणार नाहीत याची काळजी घ्या.

व्यवसाय साक्षर व्हा…
उद्योजक व्हा…
समृद्ध व्हा…

_

© श्रीकांत आव्हाड
७७४४०३४४९० (WhatsApp Only)

Business Consultant

www.ShrikantAvhad.com

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील


Shrikant Avhad

संस्थापक - उद्योजक मित्र Entrepreneur, Consultant, Writer, Speaker...

View all posts by Shrikant Avhad →

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!