मार्केटमधे शेकडो वेळा वापरले गेलेले स्लोगन वापरू नका


लेखक : श्रीकांत आव्हाड
======================

स्लोगन विचारपूर्वक वापरायचे असतात. स्लोगन हे आपल्या व्यवसायाची एका वाक्यात ओळख सांगण्याचे काम करत असतात. पण यासोबतच आपल्या व्यवसायाचे वेगळेपणही अधोरेखित करत असतात. स्लोगन हे इतरजण वापरतात म्हणून आपणही काहीतरी वाक्य वापरावे अशी गोष्ट नाही. उलट अशाने आपल्याच व्यवायचा ब्रँड खराब होऊ शकतो. पण बहुतेक नवीन व्यावसायिक हि बाब ध्यानात घेत नाहीत.

बरेच व्यावसायिक मागच्या पन्नास-शंभर वर्षांपासून वापरून वापरून चोथा झालेले स्लोगन वापरतात.
गुणवत्ता हीच आमची ओळख, विश्वासाची हमी, एकदा पिऊन बघा, खाऊन बघा, असे काही स्लोगन सर्रास वापरलेले दिसतात. काही जण स्लोगन म्हणजे यमक जुळवण्याची कला समजतात.

काही सुचलं नाही कि ‘गुणवत्ता हीच आमची ओळख’ हे तर ठरलेलं स्लोगन झालं आहे. पण यातून फायदा काय आहे? हजारो ठिकाणी दिसणार हे वाक्य पाहून तुमच्या व्यवसायाचं वेगळेपण कसं दिसेल? व्यवसायासाठी स्लोगन वापरलच पाहिजे असा काही नियम नसतो. उलट वापरून वापरून चोथा झालेलं वाक्य बळजबरी स्लोगन म्हणून वापरल्याने आपला ब्रँड खराब होत असतो.

राजकारणात ‘आश्वासन’ हा शब्द बदनाम का झाला आहे? राजकारण्यांनी आश्वासन देतो असं म्हटलं कि लोक त्याची आता चेष्टाच करतात. या सगळीकडे सर्रास वापरल्या जाणाऱ्या स्लोगनचं असंच झालं आहे. त्यातून काही अर्थच प्रतीत होत नसेल, किंवा जो अर्थ प्रतीत होतोय त्याला लोक गांभीर्याने घेतच नसतील तर त्या स्लोगन ची गरजच काय आहे? त्यापेक्षा नुसता ब्रँड दाखवला तरी चालतंय कि.

काहीजण स्लोगनमधे आपल्या ब्रँड ला अंतर्भूत करतात. आता एकदा स्लोगनच्या वर लोगो मधे ब्रँड दिसत असताना पुन्हा खाली स्लोगन मधे त्याची काय गरज आहे? स्लोगनच्या बाबतीत हा एक सर्रास वापरला जाणारा पॅटर्न आहे. पण अनावश्यक आहे. यातूनही काही विशेष अर्थ सापडत नाही.

आपलं स्लोगन हे आपलं असावं. कुठूनतरी उचलेलं नसावं. स्लोगन हे आपल्या व्यवसाय ओळख तयार करण्यासाठी असते इतरांची ओळख आपल्या व्यवसायाला जोडण्यासाठी नाही. इतर कुणीतरी वापरलेले स्लोगन जेव्हा आपण आपल्या ब्रॅण्डसाठी वापरतो तेव्हा आपला ब्रँड आपोआपच संपून जातो. त्यात असे चोथा झालेले स्लोगन असतील तर विषयच संपला.

स्लोगन हे आपल्या व्यवसायाकडे ग्राहकांनी काय म्हणून पाहावे, किंवा आपण ग्राहकांना काय देऊ इच्छितोय हे सांगण्याचे काम करत असतो. त्यामधून कमीत कमी शब्दांमधे आपल्या व्यवसायाचा गाभा प्रकट आला पाहिजे. ते काही सगळे वापरतात म्हणून आपणही वापरावी अशी गोष्ट नाही, किंवा काही सुचलं नाही कि पठडीतले वापरून वापरून चोथा झालेले वाक्य वापरावेत अशी गोष्ट नाही, किंवा यमक जुळवून कविता तयार करण्याची गोष्ट नाही.

स्लोगन फार विचारपूर्वक निवडावे लागतात. नसेल सापडत एखाद वाक्य तर ती जागा मोकळी सोडा, पण उगाच काहीतरी चोथा झालेल्या शब्दांचा भडीमार करून लोकांच्या नजरेत सामान्य बानू नका आणि इतरांनी वापरलेले स्लोगन वापरून दुय्यम स्थानी बसू नका.

व्यवसाय साक्षर व्हा…
उद्योजक व्हा…
समृद्ध व्हा…

_

© श्रीकांत आव्हाड
७७४४०३४४९० (WhatsApp Only)

Business Consultant

www.ShrikantAvhad.com

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील


Shrikant Avhad

संस्थापक - उद्योजक मित्र Entrepreneur, Consultant, Writer, Speaker...

View all posts by Shrikant Avhad →

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!