दिवाळी चार दिवसांवरआलीअसतानाही मार्केटमधे व्यावसायिकांचा उत्साह दिसत नाहीये. कोरोनाच्या सावटातसुद्धा ग्राहकांचा उत्साह दिसतोय पण दुकानदारांचा उत्साह काही दिसायला तयार नाही. यावर्षी कोरोनामुळे व्यावसायिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे हे मान्य, पण म्हणून त्या दुःखात बुडून राहायचे नसते. आकाशकंदिलांचे आणि लाइटिंगचे सामान विकणारे दुकान सोडले तर शहरात कुठेही लाइटिंग दिसत नाहीये. आमच्या नगर शहरात तरी अशी परिस्थिती आहे. इतर ठिकाणीही अशीच असेल तर अवघड आहे. मार्केट थंडावलेलं असेल, विक्री कमी होत असेल, धंदा मंदावलेला असेल, पण आपण मानसिकतेने का थंडावलेलो आहोत ? घरातलं कुणीतरी गेल्यावर जसं काही दिवस घरातलं वाटेवर शांत असतं तशी अवस्था बऱ्याच दुकानदारांनी करून ठेवलेली दिसत आहे.
मार्केट मंदावलंय हे मान्य आहे, मार्केटला मरगळ आलेली आहे हे मान्य आहे पण आपण आपल्या व्यवसायाला का मरगळ आणलेली आहे के काही कळायला मार्ग नाही.
लॉकडाऊन सुरु झाल्यांनतर चार महिन्यांनी, ऑगस्ट महिन्यात मी माझ्या एका प्लायवूड आणि हार्डवेर विकणाऱ्या व्यावसायिक मित्राला भेटलो होतो. तीन महिने दुकान पूर्ण बंद होते. बांधकामाशी निगडित कामे पूर्ण बंद होती. प्रशासनाने लॉकडाऊन कमी करायला सुरुवात केली होती. महिनाभरापासून हळूहळू मार्केट सुरळीत व्हायला लागले होते. पण त्यांचा प्लायवूडचा धंदा पूर्णपणे ठप्प होता. किरकोळ ग्राहक येत होते तेवढेच. त्यांना भेटल्यावर बोलताना सहज म्हटलं, धंद्याला चांगलाच फटका बसला असेल ना? ते क्षणात म्हणाले, असं काही नाही, धंदा छान चालू आहे, विशेष काही प्रॉब्लेम नाही. धंद्यात कमीजास्त होतंच असतं, त्याचं टेन्शन घेतलं तर धंद्याकडे लक्ष कधी द्यायचं? तीन महिने मार्केट बंद होतं, मागच्या एक महिन्यापासून दुकान चालू होतं, पण धंदा काही नव्हता, तरी तो माणूस त्याच्या व्यवसायाबद्दल एक शब्दही नकारात्मक बोलत नव्हता.
जुने व्यापारी, दुकानदार आजही दुकान संध्याकाळी बंद करताना “दुकान वाढवलंय” म्हणतात. दुकान बंद केलंय असा शब्दही उच्चारायचा नाही इतके ते त्यांच्या व्यवसायाबद्दल भावनिक असतात. मार्केटची परिस्थिती कशीही असो व्यवसायाच्या ठिकाणी, आणि इतर ठिकाणी सुद्धा व्यवसायाबद्दल नकारात्मक शब्दसुद्धा उच्चारायचा नाही असा त्यांचा दंडक असतो. आणि ते तो नियम कटाक्षाने पाळतात.
व्यवसायाबद्दल चांगलं बोललं किंवा वाईट बोललं, काय फरक पडतो? तसा प्रत्यक्षपणे काहीच नाही. पण आपण आपल्या व्यवसायाबद्दल जो विचार करतो तो विचार आपल्या देहबोलीमधे दिसत असतो. तो विचार आपल्या व्यवसायात करावयाच्या कामांत दिसत असतो. तो विचार आपला आपल्या ग्राहकांशी वागताना दिसत असतो. आपल्या व्यवसायावर आपल्या विचारांचा सर्वात जास्त परिणाम होत असतो.
साधं सोपं एक प्रॅक्टिकल करून पहा. आसपासच्या एखाद्या मरगळ आलेल्या दुकानात जाऊन मालकाशी मार्केटबद्दल बोला, तो प्रचंड नकारात्मक बोलताना दिसून येईल, आणि त्याचवेळी एखाद्या प्रसन्न, स्वच्छता असलेल्या, भरून लाइटिंग डेकोरेशन केलेल्या दुकानाच्या मालकाशी बोलून पहा, तो व्यवसायाबद्दल एकदम सकारात्मक बोलताना दिसून येईल. पहिल्या दुकानात ग्राहक अभावानेच दिसेल, दुसऱ्या दुकानात ग्राहकांची गर्दी दिसेल. याच सगळं चांगलं-वाईट क्रेडिट जात त्या दुकानाच्या मालकाच्या त्याच्या व्यवसायाकडे बघण्याच्या दृष्टिकोनाला.
सध्या अमेझॉन फ्लिपकार्ट च्या वेबसाईट बघा. इतक्या सजवून ठेवलेल्या आहेत कि त्याकडे पाहूनच दिवाळीचा फील येतोय. त्या आपल्याला दिवाळीच्या खरेदीसाठी आमंत्रण देत आहेत असं वाटतं. या वेबसाईट इतक्या प्रसन्न डिझाईन केलेल्या आहेत कि नकळतपणे दिवाळीला खरेदी झालीच पाहिजे असा विचार मनात येतो आणि आपण खरेदी सुरु करतो. आपल्या दुकानात याच्या एक टक्का तरी काही डेकोरेशन केलेले आहे का? ९८% दुकानांमधे काहीच डेकोरेशन दिसत नाहीये. डेकोरेशन म्हणजे खूप खर्च करा असं मी म्हणत नाहीये पण किमान एक लाईटिंगची माळ सुद्धा आपल्याला लावावीशी वाटत नाही? अशाने ग्राहकांना खरेदीचं आमंत्रण मिळणार कसं?
हातावर हात धरून बसल्याने धंदा वाढणार नाही, आणि त्या ईकॉमर्स कंपन्यांना शिव्या घातल्यानेसुद्धा ग्राहक तुमच्याकडे येणार नाहीये. तो तुमच्याकडे त्याचवेळी येईल ज्यावेळी तुम्ही त्याला तुमच्याकडे येण्यासाठी प्रवृत्त कराल, त्याला खरेदीचं आमंत्रण द्याल, त्याला दुकानाकडे आकर्षित कराल. किमान तुमच्याकडून त्याच्याकडे सकारात्मक ऊर्जा तरी गेली पाहिजे ज्यामुळे तो तुमच्याकडे आकर्षित होईल. सध्या तर अशी परिस्थिती आहे कि कोरोनाच्या वातावरणही लोक मार्केटमधे गर्दी करत आहेत, पण त्यांना आकर्षित करतील असं कोणतही वातावरण दुकानदार निर्माण करायला तयार नाहीत.
शहरातील व्यावसायिकांना व्यवसायात मोठे बदल करणे आवश्यक आहे. ऑफलाईन मार्केट जोपर्यंत स्पर्धेमधे आक्रमकपणे उतरत नाही तोपर्यंत परिस्थिती अवघड राहणार आहे.
लांबचा विचार सध्या सोडून देऊ. सध्याच्या परिस्थिती किमान आपण दिवाळीनिमित्ताने तरी पुन्हा प्रसन्न सुरुवात करू शकतो कि नाही? सगळ्या व्यवायिकांना विनंती आहे कि, ज्यांनी ज्यांनी आपल्या दुकानाला साधी लाइटिंग सुद्धा केलेली नाही त्यांनी उद्या सकाळी पहिले मार्केटमधून एक लाइटिंग ची माळ घेऊन यावी आणि २५-३० वॅट चे दोन-चार LED बल्ब घेऊन यावेत. दुकानाबाहेर माळ लावावी, दोन बल्ब दुकानात लावावेत, किमान एक बल्ब दुकानाबाहेर चांगला प्रकाश पडेल अशा प्रकारे लावावा. अशाने आम्ही या दिवाळीच्या सणात तुम्हाला नवीन काहीतरी देण्यासाठी तयार आहोत हा संदेश आपण आपल्या ग्राहकांना देऊ शकतो. आणि अगदी ग्राहक नंतर, आधी तुम्हाला तुमच्या दुकानात जाताना प्रसन्न वाटले पाहिजे अशी व्यवस्था तयार होईल.
ग्राहक मोबाईलवर तेव्हा खरेदी करतो जेव्हा त्याला काहीखरेदी करायचं असतं,
आणि तोच ग्राहक स्थानिक मार्केटमधे फिरून तेव्हाच खरेदी करतो, जेव्हा त्याला मार्केटमधे फिरायची इच्छा होते.
दोन्ही बाबतीतला फरक लक्षात घ्या. ग्राहकाला मार्केटमधे फिरायला चांगलं वाटेल असं वातावरण निर्माण करा.
व्यवसाय साक्षर व्हा…
उद्योजक व्हा…
समृद्ध व्हा…
_
© श्रीकांत आव्हाड
७७४४०३४४९० (WhatsApp Only)
Business Consultant
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम
All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील