‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम
======================
लेखक : श्रीकांत आव्हाड
======================
एका व्यवसायाचा खर्च भागवण्यासाठी दुसरा व्यवसाय. बऱ्याच नवीन व्यावसायिकांकडून हा प्रकार होताना दिसतो. एक व्यवसाय सुरु करतात, सहा महिन्यात दुसऱ्या व्यवसायाचे नियोजन करतात. दुसरा व्यवसाय कशाला विचारल्यावर म्हणतात, काहीतरी उत्पन्न मिळेल आणि पहिल्या व्यवसायाचा खर्चही भागेल त्यातून. अरे भाई जर पहिल्या व्यवसायचा खर्च तो व्यवसाय भागवू शकत नसेल तर तो चालवतोय कशाला? आणि दुसरा व्यवसाय पहिल्याचा खर्च भागवण्यासाठी सुरु करतोय, मग दुसऱ्याचा खर्च कोण भागवणार? असले उरफाटे लॉजिक का लावले जातात?
नवीन व्यावसायीक अडकतात उत्पन्नाचे आकडे मांडण्यात, आणि आपलं सोडून बाकी सगळ्यांचं सगळं चांगलं वाटणं या मानवी स्वभावात. पहिल्याच दिवसापासून भरमसाठ नफ्याची अपेक्षा केली जाते आणि ती अपेक्षा पूर्ण झाली नाही कि मग व्यवसाय बोगस आहे असा विचार केला जातो. चार पाच महिन्यातच व्यवसाय अपयशी वाटायला लागतो. याचवेळी आपला सोडला तर बाकी सगळे व्यवसाय चांगले आहेत असं वाटायला लागत. पण पाहिल्यात पैसे घातलेले असतात, मग तो बंद करून कसे चालेल? पण तो तर तोट्यात आहे. त्यातली गुंतवणूक वसूल झाली पाहिजे, ती वसूल होईपर्यंत त्याचा खर्चही निघाला पाहिजे. मग त्याची गुंतवणूक वसूल करण्यासाठी, त्याचा खर्च भागवण्यासाठी तो दुसरा एखादा चांगला व्यवसाय निवडला जातो. पण तोही सात आठ महिने काही ठिक असा चालत नाही. आणि पुढंही हे असंच चालू राहतं. पहिल्याच खर्च भागवण्यासाठी दुसरा, दुसऱ्यातुन अपेक्षित उत्पन्न मिळत नाही कि तिसरा, तोपर्यंत पहिला बंद झालेला असतो, दुसऱ्या बंद होण्याच्या मार्गावर असतो, आणि तिसरा दुसऱ्याचा खर्च भागवत असतो. हेच चक्र चालूच राहत.
हे चक्र थोडं विनोदी वाटत असेल पण बऱ्याच जणांचे पाच सात वर्षे यातच जातात. या विषयावर आधीही मी लिहिलेलंआहे. व्यवसाय सुरु केल्यानंतर वर्षभरातच तो चुकलाय असं वाटणं, आपला व्यवसाय चालूच शकत नाही असं वाटणं किंवा इतरांचे व्यवसाय जास्त चांगले आहेत असा विचार करणं अशा विषयांवर आधीही मी लिहिलेलं आहे, हा प्रकारही त्याच पठडीतला आहे.
आपण आपल्या व्यवसायाचा अंदाज एवढ्या लवकर कसा लावू शकतो? चार महिन्यात आपला बिजनेस तोट्यात आहे हे आपण कसं ठरवू शकतो? अजून अपाण पुरेश्या लोकांपर्यंतच पोचलेलो नसू तर आत्ताच त्याच भवितव्य काय आहे याचा अंदाज आपण कसा लावू शकतो? बर, समाज आपल्याला आपला व्यवाय ठीक चालू शकत नाही याचा अंदाज आला असेल तर त्याचा खर्च भागवण्यासाठी दुसरा सुरु करण्यात काय लॉजिक आहे? त्यापेक्षा पहिला बंद करून दुसरा नीट चालवला तर जास्त योग्य नाही का राहणार? व्यवसाय काय फक्त खर्च भागवण्यासाठी केला जातो का?
व्यवसाय सुरु करतानाच आपण त्यातील खर्चाचे नियोजन करून ठेवणे आवश्यक असते. पहिले काही महिने व्यवसाय अपेक्षेप्रमाणे चालणार नाही हे निश्चित असल्यामुळे काही रक्कम त्यातील खर्चासाठी हाती राखीव ठेवणे आवश्यक असते. खर्च भागवण्यासाठी दुसरा व्यवसाय सुरु करण्यात काहीच लॉजिक नाहीये. आणि दुसरा जरी सुरु केला तरी तोसुद्धा पहिले सहा सात महिने ठीक चालणार नसतो. उलट अशा कृतीमुळे आपल्याला दोन आर्थिक अडचणीत असणाऱ्या व्यवसायांना एकाच वेळी हाताळावे लागू शकते. जे कधीच चांगले लक्षण नसते.
कोणताही व्यवसाय इतर ठिकाणचे खर्च भागवण्यासाठी करू नये. कोणत्याच व्यवसायाकडे इतर खर्च भागवण्यासाठी केलेली सोय म्हणून पाहूच नये. व्यवसायाचा खर्च फक्त त्यातील गोष्टींसाठीच झाला पाहिजे, बाकीचे उत्पन्न म्हणूनच आपल्या खात्यात जमा झाले पाहिजे. आपल्या खात्यात आल्यानंतर जर आपण त्या पैशाचा वापर इतर व्यवसायांचा खर्च भागवण्यासाठी केला तर तो आपला वैयक्तिक विषय आहे. पण याही परिस्थितीत जेव्हा आपल्याला आपल्या व्यवसायाचा खर्च भागवण्यासाठी बाहेरून पैसे उभे करावे लागतात तेव्हा तो व्यवसाय तोट्यात आहे हे लक्षात घेतले पाहिजे. (हा नियम पहिल्या एक वर्षासाठी लागू होत नाही.)
व्यवसाय तोट्यात आहे हे निश्चित झाल्यानंतर
१. जर त्याला सुरु करून दोन तीनच वर्षे झाली असतील तर नियोजनात कुठेतरी गडबड आहे हे लक्षात घेऊन त्यावर योग्य ते काम करावे.
२. जर व्यवसाय जुना आहे पण खर्चासाठी बाहेरून करावी लागणारी सोय कमी कालावधीसाठी असेल तर काही हरकत नाही,
३. आणि जर खूप जास्त काळापासून व्यवसायाचे खर्च भागवण्यासाठी बाहेरून पैसे उभे करावे लागत असतील तर व्यवसाय पूर्णपणे बिघडलेला आहे हे निश्चित होते.
४. व्यवसायाची उलाढाल चांगली होत आहे, मागणी चांगली आहे पण तरीही त्यात खिशातून पैसे ओतावे लागत असतील तर व्यवसायातील आर्थिक नियोजनामध्ये गडबड असू शकते याचा विचार करून त्यानुसार नियोजन करावे. हा प्रकार माझ्या बऱ्याचश्या क्लायंट्स च्या बाबतीत घडलेला आहे.
५. पण खूप काळापासून असणारी हि आर्थिक गडबड आपल्या चुकलेल्या नियोजनामुळे आहे कि व्यवसायाचं आयुष्य संपल्याचं लक्षण आहे कि
आपल्याच्यानं तो चालवणं शक्य होत नाहीये याचा विचार करून पुढे काय करायचे ते ठरवावे.
६. जर व्यवसाय पुढे जाण्याचे काहीच लक्षण दिसत नसेल तर तो थांबवणे योग्य असते. पण ते थांबवतानाही योग्य नियोजन करणे महत्वाचे. तो कुणाला विकता येऊ शकतो का, त्यात पोटेन्शियल आहे का, याचा विचार करावा.
पण कोणत्याही परिस्थितिमध्ये एका व्यवसायाचा खर्च भागवण्यासाठी दुसरा व्यवसाय सुरु करण्याचा विचार करू नये. प्रत्येक व्यवसाय हा स्वतंत्र असतो. त्याला स्वतंत्रपणेच चालवले गेले पाहिजे. त्याचे नियोजन स्वतंत्रपणेच केले गेले पाहिजे.
व्यवसाय साक्षर व्हा…
उद्योजक व्हा…
समृद्ध व्हा…
_
© श्रीकांत आव्हाड
७७४४०३४४९० (WhatsApp Only)
Business Consultant
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम
All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील