व्यवसायात शब्दप्रयोगांचा योग्य वापर आवश्यक असतो.


लेखक : श्रीकांत आव्हाड
======================

व्यवसायात शब्दप्रयोगांचा योग्य ठिकाणी योग्य वापर फार महत्वाचा ठरतो. कुणासासाठी काय शब्द वापरायचे, कुठे काय शब्द वापरायचे याची माहिती असणे नेहमीच फायद्याचे ठरते.

तुम्ही व्यावसायिक डीलसाठी ज्यावेळेस एखाद्या दुकानात जाऊन दुकानदाराशी काही बोलण्याचा प्रयत्न करता त्यावेळी दुकानदाराला ‘सर’ म्हणून जमत नाही. दुकानदाराला ‘शेठ” असंच म्हणावं लागतं. ‘शेठ’ या शब्दामधे दुकानदाराला वरचढ स्थान दिल्याची फिलिंग येते. आणि या शब्दामुळे आपण दुकानदाराच्या एकदम जवळ जाऊ शकतो. शेठजी लवकर खरेदी करा, शेठजी लवकर पेमेंट करा, शेठजी यावेळेस खूपच कमी ऑर्डर केली अशी वाक्ये त्यांना एकदम आपल्या जवळ घेऊन येऊ शकतात. या वाक्यात ‘सर’ असा शब्द टाकून पहा, एकदम अंतर तयार निर्माण झाल्याचं जाणवेल.

हेच जर तुम्ही एखाद्या कॉर्पोरेट लेव्हल वर काही डील करणार असाल तर समोरच्याला ‘सर’ अशी हाक मारणे ऊत्तम ठरते. किंवा समोरचा वयाने किंवा व्यावसायिक हुद्द्याने कमी असेल किंवा दोघेही समसमान पातळीवर असाल तर त्याच्या नावांनंतर शेवटी “जी” अक्षर जोडणे महत्वाचे ठरते. यामध्ये एक प्रोफेशनल फील असतो. इथे शेठ म्हणून फायदा नाही. समोरच्याला हा शब्द जुळणारच नाही.

याच पद्धतीने लोकल शॉपिंग मार्केट मधे येणाऱ्या ग्राहकांमधे महिलांना ‘ताई’ किंवा ‘काकू’ म्हणणे आणि पुरुषांना ‘सर’, ‘दादा’, ‘भैय्या’ किंवा ‘काका” म्हणणे योग्य ठरते. तर तेच एखाद्या मोठ्या शॉप मध्ये, शॉपिंग मॉल मधे ‘सर’ किंवा ‘मॅडम’ हे दोनच शब्द उपयुक्त आहेत.

ज्यावेळी आपण ग्राहकांशी बार्गेनिंग करत असतो, त्यावेळी रेट बरोबर आहेत, तुम्हाला जास्त नाही लावणार, मार्केटमधे कुठेही पहा हेच रेट चालू आहेत, परवडूच शकत नाही, अशी वाक्ये ग्राहकांना खटकत नाहीत, पण परवडत नसेल तर दुसरीकडे जा, हे रेट तुम्हाला परवडणार नाहीत अशी वाक्ये ग्राहकांचा इगो दुखावण्यासाठी कारणीभूत ठरतात. आणि इगो दुखावलेला ग्राहक परत काही येत नसतो.

ज्यावेळी एखाद्या चर्चेची परिस्थिती असेल, तर अशावेळी त्यावेळी टोकाचे शब्दप्रयोग नुकसानच करतात. ‘हे नाही तर ते’, ‘हो किंवा नाही’ अशा प्रकारामुळे हाताच्या संधी निघून जातात. याचवेळी शब्दांवर मर्यादा ठेऊन तडजोडीचे शब्दप्रयोग वापरले तर व्यवहाराची संधी शिल्लक असते, आणि व्यवहाराची शक्यताही वाढते.

एखादा ग्राहक काही तक्रार घेऊन येतो, रागारागात काही बोलतो, अशावेळी त्याला त्याच्या भाषेत प्रत्युत्तर दिल्याने आपलेच नुकसान होत असते. याचवेळी, जर ग्राहकाची माफी मागितली, समस्या समजून घेतली, त्यांच्याशी चार शब्द हसतमुख चेहऱ्याने बोललात तर त्याचा राग निवळून जातो.

एखादा ग्राहक एखाद्या खराब सर्व्हिस किंवा गुणवत्तेमुळे तुमच्याशी भांडताना विनाकारण तुमच्यावर काही आरोप करत असेल तर त्याला रागारागात काही प्रत्युत्तर देण्यापेक्षा सर तुमचा काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय अशा शब्दांनी वाक्याची सुरुवात केली तर प्रकरण निवळू शकते. पण एखादा तुमची ठरवून बदनामी करत असेल तर तुम्हाला त्याच भाषेत प्रत्युत्तर द्यावे लागते.

प्रत्येक ठिकाणी करावयाचे शब्दप्रयोग वेगवेगळे असतात. प्रत्येक ठिकाणानुसार, परिस्थितीनुसार शब्दप्रयोग वेगवेगळे वापरावे लागू शकतात. एकाच परिस्थितीमधे वेगवेगळे शब्दप्रयोग वेगवेगळा परिणाम देतात. हा परिणाम लक्षात घेऊन कुठे काय बोलायचे किंवा काय नाही बोलायचे हे ठरवावे लागते. प्रभावी संभाषण कौशल्य हे एका दिवसात आत्मसात करणे शक्य नसते, पण सरावाने त्यात सुधारणा होत असते. शब्दांवर मर्यादा जेवढी आवश्यक असते तेवढाच त्याचा प्रभावी वापर करणेही आवश्यक असते.

व्यवसाय साक्षर व्हा…
उद्योजक व्हा…
समृद्ध व्हा…

_

© श्रीकांत आव्हाड
Business Consultant

www.ShrikantAvhad.com

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील


Shrikant Avhad

संस्थापक - उद्योजक मित्र Entrepreneur, Consultant, Writer, Speaker...

View all posts by Shrikant Avhad →

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!