२०२१ मधे कमी गुंतवणुकीत सुरु करू शकता हे १० व्यवसाय


‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

======================

लेखक : श्रीकांत आव्हाड
======================

२०२० वर्ष सरले. हे वर्ष सर्वांसाठीच न भूतो न भविष्यती असे ठरले. कोरोनाच्या आक्रमणाने बऱ्याच गोष्टी बदलल्या. आपल्या जीवनशैलीपासून कामाच्या पद्धतीपर्यंत सर्वच गोष्टींवर परिणाम झाला. पण यातूनच कितीतरी व्यवसायाच्या संधी उभ्या सुद्धा राहिल्या. नोकरी गेल्यामुळे कित्येकांनी लहान मोठे व्यवसाय सुरु केले. यातील काहींनी सर्व काही सुरळीत झाल्यानंतर पुन्हा नोकरीकडे मोर्चा वळवला पण बहुतेकांनी हे नवे क्षेत्र कायम ठेवण्याचे ठरवले.

२०२१ वर्ष या बिघडलेल्या गोष्टी बऱ्यापैकी सुरळीत करणारे ठरेल अशी अपेक्षा करूया.

या वर्षात काही नव्या आणि काही जुन्याच असलेल्या परंतु नव्या रूपात समोर आलेल्या काही व्यवसाय संधी आहेत ज्या आपण कमी गुंतवणुकीत सुरु करू शकतो. यावर सविस्तर माहिती पाहूया.

१. आरोग्य संवर्धन (आयुर्वेदिक प्रोडक्टस)
कोरोनाच्या निमित्ताने लोकांना निरोगी शरीराचे महत्व कळायला लागले आहे. शारीरिक सुदृढतेचे महत्व लोकांच्या लक्षात यायला लागले आहे. प्रतिकारशक्ती वाढवणे किती महत्वाचे आहे हे आता लोकांना जाणवायला लागले आहे. निसर्गाने आपल्याला जे भरभरून दान दिले आहे त्यातच आपल्या निरोगी आयुष्याचे गुपित आहे. लोक आता या नैसर्गिक गोष्टींकडे वळताना दिसत आहेत. प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आयुर्वेदिक औषधांचा वापर वाढला आहे. घराघरात हळदीचा काढा पिणे नित्याचे झाले आहे. प्राणायाम, योगासने यांचे प्रमाण वाढले आहे. सतत औषधे खाऊन आपण आजार दाबत असतो, पण शरीर निरोगी होत नसते. आता लोक शरीर निरोगी ठेवण्याकडे लक्ष द्यायला लागले आहेत. यामुळेच या क्षेत्राकडे व्यावसायिक संधी म्हणून पाहता येईल.
प्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या आयुर्वेदिक औषधांच्या विक्रीसंबंधी व्यवसाय अगदी थोडक्यात सुरु करता येऊ शकतो. उदा. मागच्या काही महिन्यात हळदीच्या काढ्याची पावडर पॅक करून विकणे हा चांगला व्यवसाय सुरु झाला आहे. पण एकूणच सर्वच प्रकारच्या आयुर्वेदिक औषधांची विक्री हा एक चांगला व्यवसाय होऊ शकतो. यासोबतच योगासने, प्राणायाम यांचे ऑनलाईन किंवा ऑफलाईन क्लासेस हाही चांगला व्यवसाय आहे.

२. फिटनेस ट्रेनिंग व साहित्य विक्री
लोकांना फिटनेस ची आवश्यकता जाणवायला लागली आहे. घरी बसून बऱ्याच जणांना शारीरिक विकार जडले आहेत. शरीर वाढले आहे. यामुळे आजार वाढतात. यावर फिटनेस हा चांगला उपाय आहे. निरोगी शरीरासोबतच फिटनेस सुद्धा महत्वाचा आहे. यासाठी प्रत्यक्ष किंवा ऑनलाईन माध्यमातून ट्रेनिंग देणे हे दोनीही मार्ग सोयीचे आहेत. तुम्ही जर फिटनेस क्षेत्रात काम करत असाल तर या क्षेत्राकडे चांगली व्यवसाय संधी म्हणून पाहू शकता. फिटनेस संबंधी साहित्य विक्रीसाठी सुद्धा चांगलीच संधी आहे.

३. स्वच्छ शेतमाल
आरोग्याकडे काळजीने बघतानाच स्वच्छ आणि केमिकलमुक्त भाजीपाला फळे यांची मागणी वाढली आहे. लोकांना आता बळजबरी पिकवलेली फळे आवडत नाहीत. ते नैसर्गिक गोष्टींना जास्त प्राधान्य द्यायला लागले आहेत. शेतकऱ्यांकडून भाजीपाला फळे घेऊन त्यावर कोणतीही केमिकल प्रक्रिया न करता ग्राहकांपर्यंत पोचवण्याच्या कमला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मागील काह इमहीन्यात भाजीपाला विक्री करणारे बरेच व्यवसाय सुरु झाले आहेत. पण यातले किमान ७०% व्यवसाय येत्या काळात बंद होणार आहेत. कारण बऱ्याच जणांनी नोकरी नाही म्हणून काही व्यवसाय सुरु केलेले आहेत. नोकरी पूर्वअट झाली कि ते पुन्हा नोकरीकडे वळणार आहेत. त्यामुळे आनखिया क्षेत्रात पुढेही चांगल्या संधी उपलब्ध असतील.

४. ऑनलाईन क्लासेस
ऑनलाईन क्लासेस ला या काळात चांगलीच मागणी वाढल्याचे दिसून आले आहे. येत्या काळात हा ट्रेंड चालूच राहील. ऑनलाईन क्लासेस लोकांना जास्त सोयीचे वाटत आहेत. तुम्हालाही मोठे मार्केट उपलब्ध होऊन जाते. कुणीही कुठल्याही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करू शकतो. यामुळे क्लासेस क्षेत्रात व्यवसायाच्या चांगल्या संधी उपलब्ध होत आहेत.

५. व्यवसायासंबंधी सेवा पुरविणे
नवीन व्यवसायांचे प्रमाण वाढत आहे. व्यवसायांसाठी आवश्यक असणाऱ्या प्राथमिक सेवा सर्वानाच आवश्यक आहेत. हा एक चांगला व्यवसाय होऊ शकतो. व्यवसाय रजिस्ट्रेशन, लायसन्सिंग, डॉक्युमेंटेशन, बँकिंग, डिझायनिंग, ब्रॅण्डिंग, जाहिरात अशा सेवांसाठी चांगले मार्केट उपलब्ध आहे. पण यात सध्या खूप स्पर्धा निर्माण झाली आहे, त्यामुळे रेट पाडून सेवा देण्याचे प्रकार वाढले आहेत. तुमचा व्यावसायिक क्लायंट बेस चांगला असेल तर मात्र इथे चांगली संधी उपलब्ध आहे.

६. स्वच्छता आणि सुरक्षेसंबंधी सेवा
पुढील काही काळ सॅनिटायझेशन सर्व्हिस ला चांगले मार्केट राहील. घर, वाहने सॅनिटाईज करण्यासाठी चांगली मागणी आहे. पुढेही हा ट्रेंड चालूच राहील. तसेच शारीरिक सुरक्षेसंबंधी प्रोडक्टस च्या विक्रीसाठी सुद्धा कायम मार्केट उपलब्ध असेल. मास्क, ग्लोव्ह्ज, गाऊन, सॅनिटारझर, साबण यासारख्या प्रोडक्टस ला आजही मागणी चांगली आहे. सध्या या क्षेत्रात खूप जण उतरले आहेत. पण लवकरच यातले बरेच जण पुन्हा आपल्या जुन्या कामांकडे वळणार आहेत. त्यावेळी उरलेल्या व्यवसायांना पुन्हा मोठे मार्केट उपलब्ध होईल. पण यांचे उत्पादन करण्यापेक्षा ट्रेडिंग करणे फायद्याचे राहील. उत्पादनासाठी मोठी गुंतवणूक लागेल. आणि या प्रोडक्टस ची मागणी एका मर्यादेपार्यंत खाली येणार आहे. त्यामुळे मार्केटमधे स्टॉक चा फुगवटा निर्माण होऊ शकतो आणि उद्योगांना समस्या निर्माण होऊ शकतात. ट्रेडिंग ला प्रॉब्लेम नाही. स्थानिक मार्केटपुरता माल कसाही विकला जातो. आणि कायमस्वरूपी याला एका मर्यादेपर्यंत मागणी राहणार आहेच.जसे वर म्हटले आहे कि येत्या काळात यात मागच्या काही काळात तयार झालेले व्यावसायिक काही प्रमाणात कमी होतील तशा संधी वाढत जातील.

जंतुनाशकांसंबंधी बरेच प्रोडक्टस मार्केटमधे आलेले आहेत. त्यांचीही माहिती घ्या. एअर फिल्टर्स, एअर क्लिनर्स सारखे काही प्रोडक्टस आहेत जे येत्या काळात चांगले मार्केट मिळवू शकतील. कॉर्पोरेट सेक्टरमधे या प्रोडक्टस ला चांगली मागणी राहील.

७. व्हर्च्युअल ऑफिस, शेअर्ड ऑफिस
नवीन व्यवसायांना ऑफिस हवे असतेच. पण बहुतेकांना आर्थिक अडचणींमुळे चांगले शॉप किंवा ऑफिसे सेटअप करणे शक्य होत नाही. अशावेळी घरातूनच व्यवसाय केला जातो. पण अशा व्यावसायिकांना ऑफिस ची गरज असते. अशांसाठी तुम्ही व्हर्च्युअल किंवा शेअर्ड ऑफिस ची सेवा उपलब्ध करून देऊ शकता. व्यवसायांची वाढती संख्या पाहता या व्यवसायाला चांगली संधी येत्या काळात निर्माण होईल.

८. खाद्यपदार्थ घरपोच सेवा
स्वतः बनवलेले खाद्यपदार्थ घरपोच पुरविणे हि एक चांगली व्यवसाय संधी आहे. हॉटेल फूड्स व्यतिरिक्त घरगुती स्तरावर बनवलेल्या खाद्यपदार्थांना आता मागणी वाढत आहे. स्थानिक शहरापुरता किंवा परिसरापुरता विचार केल्यास अतिशय कमी खर्च व्यवसाय सुरु करता येऊ शकतो.

९. मुलांच्या कौशल्य विकासासाठी मार्गदर्शन
शैक्षणिक पद्धतीमधे या काळात बरेच बदल झाले आहेत. मुलांच्या शिक्षणासोबतच त्यांचं स्किल विकसित करणे सुद्धा येत्या काळात महत्वाचे ठरणार आहे. फक्त पाठांतरावर आता जास्त संधी मिळणार नाहीत. त्यामुळेच मुलांचे कौशल्य विकसित करण्यासाठी त्यांना योग्य मार्गदर्शन करणाऱ्या व्यवसायाला येत्या काळात चांगली मागणी राहू शकते. मुलांचा स्वभाव पाहून त्यांची आवड निवड पाहून त्यांना एखाद्या क्षेत्रात कौशल्य आत्मसात करण्यासाठी पालकांना कशा प्रकारे काम करावे लागेल यासंबंधी मार्गदर्शन करायचे काम चांगला प्रभाव पाडू शकते.

१०. प्रोजेक्ट अॅडव्हायजर
प्रोजेक्ट अॅडव्हायजरी म्हणजे कोणताही व्यवसाय उभारण्यासाठी मार्गदर्शन करणे. व्यवसाय मार्गदर्शन हा अनुभवाने उभा राहणार व्यवसाय आहे, परंतु प्रोजेक्ट अॅडव्हायजर होण्यासाठी अनुभवापेक्षा सर्व टेक्निकल बाबींचे ज्ञान महत्वाचे असते. यामुळेच इथे पाच सहा महिन्यात संपूर्ण माहिती शिकून घेऊन स्वतःचा प्रोजेक्ट अॅडव्हायजर म्हणून व्यवसाय सुरु करता येऊ शकतो. या व्यवसायात यश चांगले मिळते, पण सेट व्हायला थोडा वेळ लागतो. पण एकदा चांगले प्रोजेक्ट हाती यायला लागले कि मग आपोआपच क्लायंट मिळायला लागतात. या व्यवसायासाठी सुरुवातीला मार्गदर्शन आवश्यक आहे.

हे दहा व्यवसाय कोरोनाच्या आपत्तीनंतर आपल्यासमोर निर्माण झालेल्या परिस्थितीमधून व्यवसाययाच्या संधी कशा प्रकारे निर्माण झाल्या आहेत या अनुषंगाने आहेत. मागील ८-९ महिन्यात बरेच चांगले स्टार्टअप्स मार्केटमधे आले आहेत. बरेच नवीन व्यवसाय सुरु झाले आहेत. काही स्थानिक परिस्थितीनुसार याव्यतिरिक्त आणखीही कित्येक व्यवसाय सापडू शकतील. पण त्यासाठी आपल्याकडे व्यावसायिक दृष्टिकोन आवश्यक आहे. मार्केटचा चांगला अभ्यास आणि निरीक्षण केले तारे नक्कीच चांगल्या संधी समोर दिसतील…

व्यवसाय साक्षर व्हा…
उद्योजक व्हा…
समृद्ध व्हा…

_

© श्रीकांत आव्हाड
७७४४०३४४९० (WhatsApp Only)

Business Consultant

www.ShrikantAvhad.com

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील


Shrikant Avhad

संस्थापक - उद्योजक मित्र Entrepreneur, Consultant, Writer, Speaker...

View all posts by Shrikant Avhad →

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!