सोशल मीडियावर व्यवसायाची जाहिरात करताना या गोष्टी लक्षात ठेवा…


लेखक : श्रीकांत आव्हाड
======================

लघुद्योगांसाठी, लहान व्यवसायीकांसाठी सोशल मीडियावर जाहिरात हा एक चांगला पर्याय आहे. कोणताही खर्च न करता जाहिराती करता येतात, कमी वेळेत हजारो-लाखो लोकांपर्यंत सहज पोहोचता येते. पण याचा योग्य वापर करता आला नाही तर मात्र रिझल्ट मिळत नाही. सोशल मीडियावर जाहिरात करणे हे काही रॉकेट सायन्स नाही, पण इथेही काही नियम पाळणे आवश्यक आहे ज्यामुळे आपण करत असलेल्या जाहिरातींना चांगला प्रतिसाद मिळू शकेल.

सगळ्या माध्यमांवर नुसत्या पोस्ट करत सुटणे म्हणजे जाहिरात करणे नसते. इथेही काही प्रमाणात स्ट्रॅटेजी वापरावी लागते. काही नियमांचे पालन करावे लागते. चुकीच्या पद्धतीने जाहिराती केल्या तर रिझल्ट मिळत नाही, आणि सगळे कष्ट वाया गेल्यासारखे वाटते. लहान लहान चुका आहेत ज्यामुळे आपल्याला सोशल मीडियावर अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. या चुका सुधारल्या तरी चांगला रिझल्ट मिळू शकतो. म्हणूनच इथे असेच काही प्राथमिक नियम देत आहे ज्यामुळे आपल्या सोशल मीडियावरील जाहिराती करण्याचे कष्ट वाया जाणार नाहीत.

  • एखाद्या फेसबुक गृप मधे तुम्ही दिवसातून १०-२० पोस्ट करता म्हणून तुम्हाला जास्त रिस्पॉन्स मिळेल असे नसते. खूप जास्त पोस्ट केल्या कि खूप लोकांपर्यंत आपण पोचतो हा गैरसमज आहे. तुम्ही अति पोस्ट करत असाल तर फेसबुक तुमच्या पोस्टला लिस्टमधे खाली ढकलतं, आणि कमी पोस्ट करणारे किंवा एखादीच पोस्ट करणाऱ्या अकाउंटच्या पोस्ट आधी दाखवण्याला प्राधान्य देतं. खूप जाहिराती करूनही प्रतिसाद न मिळण्याचं हेच कारण असतं. तुम्ही कितीही जाहिराती पोस्ट कराल पण ती किती जणांना दिसते याला महत्व आहे. आणि सतत पोस्ट करणाऱ्या अकाउंटला आपोआपच खालच्या स्तरावर ढकलले जाते. त्यापेक्षा वेळेचे नियोजन करा. सरसकट जाहिराती करण्यापेक्षा काही ठरावीक वेळेला एखादी पोस्ट करण्याने जास्त प्रतिसाद मिळेल.
  • मुलींच्या नावाने फेक अकाउंट उघडून आपल्या व्यवसायाची जाहिरात करण्यात काहीच अर्थ नाही. फेक अकाउंट लगेच लक्षात येतात. ग्राहकांच्या दृष्टीने तुमचे अकाउंटच फेक असेल तर तुमच्याकडून प्रामाणिक व्यवहाराची अपेक्षा करता येणार नाही. मुलीच्या नावाने अकाउंट आहे म्हणून लोक फसून हजारो रुपये तुम्हाला सहज देतील असे नसते. लोकांना खात्री हवी असते. अकाउंट वॉल पाहिल्यावर जर ते खरे वाटले तर लोकांच्या तुमच्या व्यवहारावर विश्वास बसण्याची शक्यता वाढते. आपल्या स्वतःच्या अकाऊंटवरून शक्यतो जाहिराती पोस्ट करा किंवा व्यवसायाचे एखादे अकाउंट उघडा व त्यावरून ग्रुप मध्ये पोस्ट करा. खरंच चांगले ग्राहक हवे असतील तर तुम्हाला पारदर्शी व्यवहारच करावा लागेल.
  • WhatsApp गृप मधे अती प्रमाणात पोस्ट केल्याने बाकीचे मेम्बर्स कंटाळतात. सततचे मेसेजेस, खूप जास्त कन्टेन्ट, एकाच वेळी ५-१०-२० इमेजेस अशा गोष्टींमुळे इतर मेम्बर्स ला ग्रुप नकोसा वाटायला लागतो, किमान तुम्ही नकोशे वाटायला लागतात हे नक्की. मेम्बर्स तुम्हाला टाळायला लागतात. त्यांना त्रास देऊन तुमचा व्यवसाय होणार नसतो. ज्या गृप मध्ये खूप मोठ्या प्रमाणात पोस्ट होतात त्या ग्रुप मधील मेम्बर्स जास्त अॅक्टिव्ह नसतात. खूप साऱ्या मेसेजमुळे कामाचे कन्टेन्ट पाहण्याचे राहून जाते यामुळेही मेम्बर्स तुमच्यावर नाराज होऊ शकतात.
  • लोकांना WhatsApp वर सतत तुमच्या व्यवसायाच्या जाहिरातींचे पर्सनल मेसेज पाठवणे याला प्रभावी जाहिरात म्हणता येत नाही. ती बळजबरी केली जाणारी जाहिरात आहे. अशावेळी तुमचा क्रमांक एक तर ब्लॉक केला जातो, किंवा तुमच्याप्रती नकारात्मक भाव निर्माण होतो. आठ पंधरा दिवसातून केली जाणारी एखादी जाहिरात लोक मान्य करतात. आणि परवानगी न घेता जाहिराती मेसेजमधे पाठवणे हा प्रकार पूर्णपणे व्यवसायासाठी घातक आहे. लोकांची इच्छा नसताना त्यांना मेसेज पाठवून त्रास दिल्याने तो तुमचा ग्राहक कसा होईल ? WhatsApp टेलिग्राम सारख्या App वर नकोशे वाटणारे मेसेज आले कि लोक संबंधित क्रमांक ब्लॉक करतात. म्हणजे तुमचा एक भविष्यात होऊ शकणारा ग्राहक कायमस्वरूपी तुमच्यापासून दुरावतो. SMS ला लोक मनावर घेत नाहीत पण सोशल चॅटिंग App वर लोकांना बळजबरीचे प्रमोशन्स आवडत नाहीत.
  • WhatsApp टेलिग्राम सारख्या मेसेजिंग App वर खूप जास्त कन्टेन्ट असणारी जाहिरात करू नका. एक तर त्यामुळे इतर मेम्बर्स ला बाकीचे मेसेज पाहण्यात अडचण येते. तुमचाच मेसेज जास्त काळ स्क्रोल करत राहिल्याने त्यांना इतर मेसेज वाढण्याची इच्छा सुद्धा संपून जाते. जाहिरातीचे मेसेज लहान असावेत. थोडक्यात कन्टेन्ट असावेत आणि त्यात तुमच्या एखाद्या पोर्टलवर पेजवर जाण्यासाठी लिंक असली तरी चालू शकते.
  • व्यवसायासाठी फेसबुक पेज वापरत असाल तर त्यावर जाहिरातीव्यतिरिक्त इतर कन्टेन्ट देत चला. तुमची जाहिरात पाहण्यासाठी कुणीही त्या पेज वर फिरकणार नसतं. तेथे काही कामाची माहिती मिळणार असेल तरच लोक तुमच्या पेज वर एंगेज राहतील. नुसतीच जाहिरात पोस्ट करत राहिलात तर कुणीही तुमच्या पेज मध्ये इंटरेस्ट दाखवणार नाही.

आपण जाहिरात कुणाला त्रास देण्यासाठी करत नाही. लोकांना त्रास देऊन तुम्ही त्यांची मने जिंकू शकत नाही. त्यामुळे लोकांना आवडेल अशा प्रकारे जाहिरात करा. तुमची जाहिरात पाहून त्यांना नाकं मुरडण्याची इच्छा होणार नाही याची काळजी घ्या. सोशल मीडियावर कुणाचे नियंत्रण नसले तर आपले स्वतःवर नियंत्रण असणे आवश्यक आहे.

  • कोणत्याही सोशल मीडिया अकाउंटवर एकदा दोनदा जाहिरात करून काहीही फायदा होत नसतो. आणि एकाच वेळी खूप पोस्ट करूनही काही फायदा नसतो. थोड्या थोड्या काळाने, वेळेचे नियोजन करून सतत जाहिरात करत राहा. लोकांची सततची एंगेजमेंट महत्वाची आहे. सतत जाहिरात म्हणजे दिवसभरात १०-२० पोस्ट नव्हे. आज १२ वाजता पोस्ट केली तर उद्या २ वाजता पोस्ट करा, परवा ५ वाजता पोस्ट करा. अशा प्रकारे वेळ ठरवून ठराविक अंतराने पोस्ट करत राहा.

सोशल मीडियावर जहिरात करताना हि पथ्ये पाळली तर आपल्याला नक्कीच चांगला प्रतिसाद मिळेल. जाहिरात बळजबरी नसावी आणि त्रास देणारी तर कधीच नसावी. लोकांना तुमची जाहिरात पाहून चांगले वाटले पाहिजे, किमान त्यांनी नजर तरी फिरवली नाही पाहिजे एवढी तरी आपल्याला काळजी घेणे आवश्यक आहे. जाहिरात लोकांना आपल्यापर्यंत आणण्यासाठी असते, दूर पळवणारी नव्हे. जाहिरात करताना घाईगडबड न करता, विचारपूर्वक, नियोजनपूर्वक आणि शक्यतो कलात्मक दृष्टिकोन ठेऊन करावी. यातूनच चांगला रिझल्ट मिळेल.

व्यवसाय साक्षर व्हा…
उद्योजक व्हा…
समृद्ध व्हा…

_

© श्रीकांत आव्हाड
७७४४०३४४९० (WhatsApp Only)

Business Consultant

www.ShrikantAvhad.com

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील


Shrikant Avhad

संस्थापक - उद्योजक मित्र Entrepreneur, Consultant, Writer, Speaker...

View all posts by Shrikant Avhad →

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!