यशस्वी व्यवसायासाठी आवश्यक पाच गोष्टी


‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

======================

लेखक : श्रीकांत आव्हाड
======================

योग्य प्रोडक्ट / सर्व्हिस – मार्केटची गरज पाहून तुम्हाला योग्य प्रोडक्ट निवडता आले पाहिजे. तुमच्या अपेक्षित ग्राहकांना काय हवं आहे याचा शोध घेता येणे आवश्यक आहे. मार्केटला गरज नसलेले प्रोडक्ट मार्केटमध्ये उतरवून फायदा नसतो. मार्केटची गरज ओळखा. आधी मार्केट पाहून त्यानुसार प्रोडक्ट निवडणे आवश्यक असते. तुम्ही ज्या ग्राहकांना लक्ष्य करणार आहात त्यांना आवडणारे प्रोडक्ट बनवा.

जर तुमच्याकडे प्रोडक्ट असेल आणि त्यासाठी योग्य मार्केट शोधायचे असेल तर?

योग्य मार्केट – तुम्ही योग्य मार्केटमध्ये असणे आवश्यक असते. तुमचे प्रोडक्ट कोणत्या मार्केटमधे योग्य आहे याचा अंदाज घ्या. तुमचे प्रोडक्ट कोणत्या प्रकारच्या ग्राहकांसाठी आहे याचा अंदाज घेऊन तेच ग्राहक टार्गेट करा. चुकीच्या ठिकाणी जाऊन फायदा नाही. योग्य मार्केटमधे उतरणे आवश्यक असते. बऱ्याच व्यवसायांमधे निर्माण होणाऱ्या समस्या या चुकीचे मार्केट निवडल्यामुळेच झालेल्या असतात.

योग्य किंमत – प्रॉडक्टची किंमत तुमच्या अपेक्षित ग्राहकांच्या दृष्टीने योग्य असावी. त्यांना ती किंमत प्रॉडक्टच्या प्रमाणात योग्य वाटायला हवी. तुमचा ग्राहकवर्ग कोण आहे ते पाहून तुमच्या प्रॉडक्टची किंमत ठरवा. महागड्या कॅफे शॉप मधे मिळणारी कॉफी एखाद्याला स्वस्त वाटते तर एखाद्याला महाग वाटते.

योग्य प्रमोशन – तुमच्या व्यवसायाला योग्य प्रमोशनची नितांत गरज असते. प्रमोशन, जाहिरात, मार्केटिंग शिवाय व्यवसाय करणे व्यर्थ आहे,. योग्य प्रमोशन स्ट्रॅटेजी आवश्यक आहे. आपले मार्केट काय आहे, ग्राहकांची मानसिकता कशी आहे, मार्केटची अपेक्षा आणि गरज काय आहे अशा विविध गोष्टी पाहून प्रमोशन स्ट्रॅटेजी ठरवणे आवश्यक आहे.

योग्य नियोजन – व्यवसायाला योग्य नियोजनाची जोड असेल तर तो हमखास यशस्वी होतो. नियोजन आवश्यक आहे. कामांचे नियोजन, कामांच्या वाटपाचे नियोजन, प्रमोशनचे नियोजन, आर्थिक नियोजन, विस्ताराचे नियोजन, भविष्याचे नियोजन अशा विविध मार्गांनी आपण व्यवसायाला यशाकडे नेत असतो.

या पाच गोष्टी एका उदाहरणात पाहूया…
कॅफे शॉप. वर एका ठिकाणी कॅफे शॉपचा उल्लेख आलेला आहे म्हणून तेच घेऊया…

आपल्याला एखाद्याठिकाणी कॅफे शॉप सुरु करायचे आहे. आता तो कॅफे सुरु करण्याचे ठिकाण जर आपण निवडले असेल तर त्या परिसरातील ग्राहकांचा अंदाज घेऊन आपल्याला सेटअप उभारावा लागेल. किती मोठा सेटअप हवा, भव्य हवा कि साधा सेटअप सुद्धा चालेल, कॉफीचे प्रकार किती हवेत ,कसे हवेत हे सगळं काही आपल्याला स्थानिक ग्राहकांच्या गरजेनुसार ठरवावे लागेल. म्हणजे आपल्याला मार्केटचा अंदाज घेऊन आपले प्रोडक्ट तयार करावे लागेल.

जर आपल्याला एखादे ब्रँडेड आणि भव्य कॅफे शॉप सुरु करायचे असेल तर ते अशाच ठिकाणी सुरु करावे लागेल जिथे त्यासाठी योग्य ग्राहक उपलब्ध आहे. म्हणजे जर आपल्या कॉफीची किमतन १५०-२०० रुपये आसणार असेल तर ती रक्कम सहज खर्च करू शकणारा ग्राहकवर्ग जिथे उपलब्ध आहे तिथेच आपल्याला कॅफे सुरु करावा लागेल… म्हणजे आपल्याला योग्य मार्केट निवडावे लागेल.

कॉफीची किंमत किती असावी हे आपल्याला आपले अपेक्षित ग्राहक कोणते असतील याचा अंदाज घेऊन ठरवावे लागेल. जर परिसरातील ग्राहक वर्गाला कॉफीसाठी २०-३० रुपये सुद्धा जास्त वाटणार असतील तर आपल्याला तिथे १००-२०० रुपयांची कॉफी विकून जमणार नाही. ग्राहक मिळणारच नाहीत. जर परिसरातील ग्राहकांना दोनपाचशे रुपये रक्कम विशेष वाटणारी नसेल, त्यांच्यासाठी ती रक्कम सहज खर्च करण्याजोगी असेल तर तिथे महागडी कॉफी विकण्यात काहीच प्रॉब्लेम येणार नाही. म्हणजेच आपल्याला मार्केटनुसार योग्य किंमत ठरवावी लागते.

कॅफे सुरु केल्यानंतर त्याला योग्य प्रमोशनची जोड द्यावी लागेल. जाहिरात कॅम्पेन राबवावे लागेल, काही इव्हेंट्स करावे लागतील, ग्राहकांच्या सतत नजरेसमोर राहता येईल अशा प्रकारे प्रमोशन करावे लागेल. प्रमोशनची साथ मिळाली कि व्यवसाय हळूहळू पुढे सरकायला मदत होते.

हे सगळं करत असताना व्यवसायाचे योग्य नियोजन करणे आवश्यक असते. कर्मचाऱ्यांवर योग्य लक्ष ठेवणे, जबाबदार लोक महत्वाच्या ठिकाणी नियुक्त करणे, आर्थिक व्यवहार योग्य रीतीने सांभाळणे, प्रमोशनकडे लक्ष देणे, कॉफीची गुणवत्ता नेहमी तपासणे, ब्रँड इमेज कडे लक्ष देणे, भविष्यातील नियोजन करणे तसेच त्यावर योग्य अंमलबजावणी करणे, ठरवलेले लक्ष्य वेळच्यावेळी पूर्ण होतील यावर लक्ष देणे अशा विविध कामांनी आपला व्यवसाय मोठा होत जातो. या नियोजनात कमी पडलात तर सगळं चांगलं चालू असूनही व्यवसाय अपयशाकडे जाण्याची शक्यता वाढते.

या पाच गोष्टींव्यतिरिक आणखीही बऱ्याच गोष्टी आहे ज्या आपल्या व्यवसायासाठी आवश्यक असतात. पण हे पाच फॅक्टर्स आपल्या व्यवसायावर मोठा परिणाम करतात. त्यामुळे याकडे लक्ष देणे आवश्यक ठरते.

व्यवसाय साक्षर व्हा…
उद्योजक व्हा…
समृद्ध व्हा…

_

© श्रीकांत आव्हाड
७७४४०३४४९० (WhatsApp Only)

Business Consultant

www.ShrikantAvhad.com

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील


Shrikant Avhad

संस्थापक - उद्योजक मित्र Entrepreneur, Consultant, Writer, Speaker...

View all posts by Shrikant Avhad →

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!