लेखक : श्रीकांत आव्हाड
======================
व्यवसाय सुरु करण्यासाठी कोणतीही वेळ योग्यच असते. नवीन व्यवसायाला मंदी तेजीचा विशेष फरक पडत नाही. सुरुवातच शून्यातून असल्यामुळे जे काही हाती येणार असते ते फायद्याचेच असते. आणि मंदीमधे जर तुमचा धंदा सेट झाला तर तेजीच्या काळात तुम्हाला उसंत सुद्धा भेटणार नाही इतका धंदा वाढू शकतो. व्यवसाय सुरु करताना मंदीला घाबरण्याची गरज नाही. फक्त मंदीच्या काळात मोठ्या गुंतवणुकीचा विचार करू नये.
व्यवसाय सुरु करण्याला कोणतेही वेळेचे बंधन असू शकत नाही आणि वयाचेही बंधन असू शकत नाही. तुम्ही वयाच्या कोणत्याही टप्प्यावर व्यवसाय सुरु करू शकता. कमी वय हा प्लस पॉईंट असला तरी जास्त वय हा निगेटिव्ह पॉईंट बिलकुल नाही. कितीतरी मोठ्या उद्योजकांनी आपले व्यवसायाचे करिअर वयाच्या ४०-५० नंतर सुरु केलेले आहे.
पण व्यवसायात अनुभव नसताना मोठी गुंतवणूक कधीही करू नका. थोडक्यात सुरुवात करून दोन तीन वर्षे व्यवसायच पूर्ण अनुभव घेऊन मग मोठ्या गुंतवणुकीकडे वळावे. कर्जाच्या जाळ्यात सुरुवातीच्या काळात अडकू नका. कर्ज फेडायचं कि व्यवसायाकडे लक्ष द्यायचं अशा परिस्थिती स्वतःला आणू नका.
मोठा सेटअप म्हणजे मोठा व्यवसाय अशी संकल्पना चुकीची आहे. व्यवसाय उलाढालीने मोठा होतो मोठ्या गुंतवणुकीने नाही. गुंतवणुकीच्या प्रमाणात उलाढाल किती आहे यावर व्यवसाय मोठा आहे कि लहान हे आपण ठरवू शकतो. त्यामुळे कुणालातरी दाखवण्यासाठी व्यवसाय सुरु करू नका. व्यवसायात नवीन असताना शिकण्याला प्राधान्य द्या. दोन तीन वर्षानंतर तुमच्या लक्षात येईल कि थोडक्यात सुरु केलेला व्यवसाय सुद्धा काही काळाने खूप मोठी उलाढाल करू शकतो. आणि कमी गुंतवणुकीमुळे तुमची गुंतवणूक वसूल होऊन तुम्ही फायद्यात येण्याचा कालावधी सुद्धा कमी होतो, जे अर्थातच व्यवसायासाठी महत्वाचे असते. मी स्वतः, फक्त अडीच लाख रुपयाची गुंतवणूक असलेला व्यवसाय दोन वर्षांनी महिन्याला १७ लाखांची उलाढाल करू शकतो हे अनुभवलेलं आहे, आणि तो व्यवसाय मंदीच्या काळात सुरु केला होता हेही महत्वाचे, त्यामुळे या विषयावर मी ऐकीव माहितीवर बोलत नाही, मी प्रत्यक्ष जे पाहिलंय तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय.
व्यवसाय सुरु करण्यासाठी योग्य वेळ पाहत बसू नका. तेजी-मंदीचा जास्त विचार करू नका. बिनधास्त सुरु करा. काही होत नाही. शून्य असताना फक्त कमवायची संधी असते गमवायची नाही. पण कधीही कुणालातरी दाखवण्यासाठी काही करू नका. सुरुवात मोठ्या गुंतवणुकीपासून न करता थोडक्यात करा आणि अनुभव नसताना कर्जाच्या, व्याजाच्या जाळ्यात अडकू नका, त्यासाठी योग्य वेळ व्यवसाय सुरु केल्यानंतर तीन वर्षांनी येते.
व्यवसाय साक्षर व्हा…
उद्योजक व्हा…
समृद्ध व्हा…
_
© श्रीकांत आव्हाड
७७४४०३४४९० (WhatsApp Only)
Business Consultant
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम
All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील