लेखक : श्रीकांत आव्हाड
======================
आपल्याला एखादं काम जमणार नाही याचा आपल्याला सगळ्यात जास्त कॉन्फिडन्स असतो.
‘प्रयत्न करून पाहू’ असा विचार करण्यापेक्षा ‘शक्य नाही’ असाच विचार केला जातो. हे आपल्याला मिळालेलं बाळकडू आहे. कोणत्याही कामाला घरच्यांकडून आपल्याला लहानपणापासूनच विरोधच होत आलेला असतो. आपण स्वतःच्या बुद्धीने काहीही करायला गेलो तरी तुला जमणार नाही, तुला शक्य नाही असंच नेहमी म्हटलं जातं. इतरांसमोर आपल्याविषयी चर्चा करताना तुमचा मुलगा/मुलगी हुशार आहे, आमचंच जरा बावळट आहे असं सहजतेने म्हटलं जातं, आणि मुद्दामून ते आपल्या समोर म्हटलं जात. पालकांना यातून काय समाधान मिळत माहित नाही, पण बहुतेकदा आपल्या मुलांवर अशीच टिपणी केली जाते. याचा आपल्यावर खोलवर परिणाम होत असतो.
लहानपणापासून आपल्याला ‘तुला जमणार नाही’ असं म्हटल्यामुळे मोठेपणीसुद्धा आपल्यात एखादं काम करताना आत्मविश्वास निर्माण होत नाही. मला हे शक्य होणार नाही असाच विचार आपल्याकडून केला जातो. अपयशाची भीती वाटते. काम टाळण्याकडे कल वाढतो. काम टाळण्यामधे सुरक्षिततात असते. चुकण्याची भीतीच नसते. पण यामुळे आपल्यासमोर असलेल्या कितीतरी संधी आपल्या हातून निसटून जातात. खूप जण कशीबशी सुरुवात करण्याचा प्रयत्न करतात, पण लहानपणापासून मनात दडलेला ‘आपल्याला काही जमणार नाही’ या विचारापुढे हतबल होतात… या नकारात्मक विचारावर आपल्याला विजय मिळवणे महत्वाचे असते. आपल्यासाठी ‘मला जमणार नाही’ या विचारावर विजय मिळवणे हेच एक मोठं टास्क आहे.
मला व्यवसाय सुरु करण्यासंबंधी माहिती घेण्यासाठी जे काही कॉल येतात, किंवा प्रत्यक्ष भेटतात त्यातल्या बहुतेक जणांची बोलण्याची ढब अशी असते कि त्यातून त्यांची व्यवसायाविषयी भीती जाणवत असते. सुरवात तर करायची आहे, पण माझ्याच्याने हे शक्य नाहीये, तुम्ही काहीतरी खात्रीशीर सांगा असा अर्जव त्यातून प्रतीत होत असतो. हे घडत ते ‘मला जमू शकत नाही’ या मानसिकतेतून… अशा लोकांना हॅण्डल करताना माझ्यासाठी पाहिलं टास्क त्यांना व्यवसायाचे मार्गदर्शन करणे हे नसते, तर तुम्हाला व्यवसाय जमू शकतो, तुमच्याच्याने व्यवसाय शक्य आहे हे त्यांच्या डोक्यात भरण्याचं माझं पाहिलं टास्क असतं…
व्यवसाय सुरु करण्याची पहिली पायरी व्यवसायाची निवड हि नाहीये… व्यवसाय सुरु करण्याची पहिली पायरी ‘मला जमू शकतं’ हा विचार करण्याची आहे… प्रयत्न करून पाहू, इतरांना जमतंय मग मला का नाही जमणार, अवघड असेल पण अशक्य नाही अशा विचारांनी आपल्याला आपल्या नकारात्मक मानसिकतेवर विजय मिळवावा लागतो. यातूनच आपल्या मनात आत्मविश्वास निर्माण होतो.
व्यवसाय साक्षर व्हा…
उद्योजक व्हा…
समृद्ध व्हा…
_
© श्रीकांत आव्हाड
७७४४०३४४९० (WhatsApp Only)
Business Consultant
www.ShrikantAvhad.com
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम
All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील