व्यवसायाला तीन वर्षे किंवा हजार दिवस द्यायचे म्हणजे नक्की काय करायचं?


लेखक : श्रीकांत आव्हाड
======================

आपण नेहमी ऐकतो कि व्यवसायाला हजार दिवस वेळ द्या, किंवा किमान तीन वर्षे वेळ द्या. मी स्वतः हजार दिवसांऐवजी तीन वर्षे वेळ द्या असंच म्हणतो. हे हजार दिवस किंवा ३ वर्षे आले कुठून? हा काही एखादा नियम आहे का? कि याशिवाय व्यवसाय चालूच शकत नाही असं आहे? व्यवसायाला हजार दिवस द्यायचे म्हणजे नक्की काय करायचं? आणि या दिलेल्या दिवसात नक्की काय करायचं?

कॉलेजमधे असताना आमच्या एका मारवाडी मित्राला त्यांचे सगळेच व्यवसाय यशस्वी का ठरतात असं विचारलं होतं. त्याने तेव्हा मला १००० दिवसांचा आकडा सांगितला होता. त्याने सांगितलं होतं कि आम्ही व्यवसाय सुरु केल्यानंतर पुढचे हजार दिवस त्याच्या नफ्या तोट्याचा हिशोब करतच नाही, फक्त सगळी आकडेवारी मांडून ठेवतो, आणि हजार दिवसानंतर ती जुनी हिशोबाची वही ठेऊन देतो आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात करतो, पण पुढे तोटा होणारच नाही याची काळजी घेतो. हजार दिवसांची थेअरी मी पहिल्यांदा त्याच्याकडून ऐकली होती.
त्यांनतर माझा स्वतःचा व्यवसाय सुरु केल्यानंतर मला हजार दिवसांपेक्षा तीन वर्षांचा हिशोब जास्त चांगल्या पद्धतीने कळाला. मी माझी आकडेवारी हजार दिवसांनुसार न मांडता तीन वर्षांच्या हिशोबाने मांडतो. कारण या तीन वर्षांमधे मला टप्पे ठरवता येतात.

मी नेहमी व्यवसायाला किमान ३ वर्षे द्या असंच सांगतो म्हणून आपण इथून पुढे तीन वर्षांच्या हिशोबानेच बोलूयात.

हे झालं प्राथमिक. तीन वर्षे द्या. पण तीन वर्षे द्यायचे म्हणजे नक्की काय करायचं? म्हणजे सेटअप उभारला आणि ऑफिसमधे निवांत बसून राहिलं आणि तीन वर्षे व्यवसाय कसाबसा अगदी खिशातून पैसा ओतून चालवला म्हणजे पुढे तो आपोआपच सेट होतो का? बिलकुल नाही.

व्यवसाय सुरु केल्यानंतर तीन वर्षे का महत्वाचे असतात ते बघा… या तीन वर्षांचे सहा-सहा महिन्यांचे सहा टप्पे करा.

पहिला सहा महिन्याचा टप्पा प्रचंड वाईट असतो. या काळात आपल्याला काहीच सुधरत नसतं. व्यवसाय कसा करायचा, यात कशा प्रकारे व्यवहार चालतात, व्यवसाय करायचा म्हणजे काय करायचं अशा सगळ्या महत्वाच्या बेसिक प्रशांवर या सहा महिन्यात हळूहळू उत्तरे मिळायला सुरुवात होत असते. आणि हा कालावधी खिशातून खर्च भागवण्याचा असतो. या काळात अवांतर खर्च कधीच करायचा नसतो. आणि व्यवसायातून तर बाहेर पैसा चुकूनही काढू नये.

दुसरा सहा महिन्यांचा टप्पा हा व्यवसाय हळूहळू समजायला सुरुवात होण्याचा असतो. या काळात आपण हळूहळू ग्राहकांपर्यंत पोहोचायला लागलेलो असतो, आणि यातूनच ग्राहक जोडला जायला सुरुवात होत असते. पण या काळातही आपल्याला नफा काहीच मिळत नसतो. रिटेल क्षेत्रात असल्यास थोडाफार नफा सुरु झालेला असतो, उत्पादन क्षेत्रात नफ्याची काहीच शक्यता नसते.

म्हणजे पहिले वर्ष हे पूर्णपणे तोट्याचे असते. पण हा तोटा म्हणजे व्यवसायातली गुंतवणूक असते. व्यवसाय कसा असतो हेच माहित नसताना त्यातून पैसा मिळण्याची शक्यता काहीच नसते. पण हा कालावधी व्यवसाय शिकून घेण्याचा असतो.

या एक वर्षानंतर हळूहळू व्यवसाय समजायला लागतो, आणि आपण मार्केटमधे स्थिरावयाला लागतो.

तिसरा सहा महिन्यांचा टप्पा हा ग्राहक हळूहळू वाढण्यात सुरुवात होत असते. आपण जे प्रमोशन जाहिरात करत असतो, त्यातून आपल्या ग्राहकांना आपले नाव माहित व्हायला सुरुवात झालेली असते, व्यवसाय ओळखीचा व्हायायला लागलेला असतो, आणि ग्राहक संख्या हळूहळू वाढायला लागलेली असते. या टप्प्यामधे थोडंफार उत्पन्न मिळायला लागत असतं. इथं आपल्यातला जाणवतं कि बऱ्यापैकी काम चालू आहे, पण व्यवसायाच्या प्रमाणात अपेक्षित उत्पन्न या टप्प्यावर कधीच नसतं. तरीसुद्धा इथे आपण एकदमच तोट्यात नसतो. झालंच तर ना नफा ना तोटा या अवस्थेवर आपण असतो.

चौथा सहा महिन्यांचा टप्पा महत्वाचा असतो. मागच्या दीड वर्षात आपल्या संयमाची परीक्षा असते. मागचे १८ महिने जर आपण तगलेलो असू तर इथून पुढचा प्रवास सुरळीत चालू होतो. या चौथ्या टप्प्यात आपल्याला ग्राहक चांगल्या प्रकारे मिळायला लागलेले असतात, नफ्यातोट्याचे हिशोब चांगल्या प्रकारे लागायला लागलेले असतात, उत्पन्न चांगल्या प्रकारे मिळायला लागलेलं असतं. मागच्या सहा महिन्याच्या काळात ग्राहक आणि आताच ग्राहक यांचा मिळून चांगला ग्राहकसंग्रह झालेला असतो.

म्हणजे हे दुसरे वर्ष व्यवसाय सेट होण्याचे असते. या काळात आपल्याला ग्राहक बऱ्यापैकी मिळायला लागलेले असतात, उत्पन्न बऱ्यापैकी मिळायला लागलेले असतात, तणाव बराचसा हलका झालेला असतो, आणि आपण जरा स्थिरस्थावर झालेलो असतो.

पाचवा सहा महिन्यांचा टप्पा हा व्यवसाय वाढीचा असतो. हा काळ म्हणजे मागच्या वर्षभराचा ग्राहक, नवीन ग्राहक आणि जुने ग्राहक पुन्हा येण्याचा असतो, म्हणजे इथे व्यवसायाची वाढ अगदी दुप्पट तिप्पट झालेली बघायला मिळत असते. मागची दोन वर्षे जर संयमाने काढलेली असतील तर हे वर्ष त्याचा परतावा द्यायला सुरुवात करत असतं. इथे आपल्याला जाणवत कि आपला व्यवसाय आता चांगला सेट झालेला आहे. आता आपण मोठी उडी घ्यायला तयार आहोत.

सहावा टप्पा, म्हणजे तिसऱ्या वर्षाचे शेवटचे सहा महिने हे महत्वाचे ठरतात. या कालावधीपर्यंत तुम्हाला व्यवसायातल्या सर्व बाबी कळायला लागलेल्या असतात. ग्राहक संख्या आणि उलाढाल वेगाने वाढायला लागलेली असते. आपल्या डोक्यात बऱ्याच नवनवीन संकल्पना तयार व्हायला लागलेल्या असतात. लोकांचाही आपल्या ब्रँड वर विश्वास बसायला लागलेला असतो. बहुतेक प्रॉडक्टची क्वालिटी आणि विक्रीपश्चात सेवा कळायला एक दोन वर्षे जात असतात. तो कालावधी संपलेला असतो. मागच्या दोन वर्षात जे ग्राहक जोडलेले असतात त्यांना चांगला रिझल्ट मिळालेला असेल तर ते त्यांच्यासोबत आणखी ग्राहकांना आपल्याकडे घेऊन यायला लागलेले असतात. हा टप्पा व्यवसायाच्या सर्वांगीण विकासाला सुरुवात होण्याचा असतो. या कालावधीमधे आता पुढे काय करायचे याचे नियोजन तयार करणे आवश्यक असते.

व्यवसायाचे तीन वर्षांचे विकासाचे असे सहा टप्पे असतात. हि झाली व्यवसायाच्या वाढीची गोष्ट. यात आणखी काही महत्वाच्या बाबी आहेत. यात महत्वाची आहे ती आर्थिक, व्यावहारिक बाब.

प्रत्येक वर्षी किमान दोन महिने मंदीचे असतात, दर तीन वर्षांतून एकदा मध्यम स्वरूपाची मंदी येते, दर दहा वर्षातून एकदा मोठी मंदी येत असते. म्हणजे जेव्हा तुम्ही तीन वर्षे व्यवसाय टिकवून ठेवलेला असतो तेव्हा तुम्ही सामान्य स्वरूपाच्या मंदीचे सहा-आठ महिने अनुभवलेले असतात, आणि एका माध्यम मंदीचे किमान सहा महिने अनुभवलेले असतात. आणि त्या दहा वर्षातून येणाऱ्या मोठ्या मंदीमध्ये तुम्ही अडकलेला असाल आणि त्यातून बाहेर पडलेला असाल तर तुम्ही सगळे अनुभव घेऊन त्यातून तावून सुलाखून बाहेर पडलेले आहात असा अर्थ होतो, आणि आर्थिक बाबतीत याच्यापेक्षा वाईट काहीच होऊ शकत नसतं, म्हणजे तुम्ही आता या वातावरण पूर्णपणे सरावलेले असतात आणि कोणत्याही आर्थिक संकटाला समोर जायला तयार झालेले असता.

या काळात कर्मचाऱ्यांचे स्वभाव कळतात, मार्केटची प्रॅक्टिस कळते, आपल्या क्षमतेचा अंदाज आलेला असतो, नियोजनाचा अनुभव आलेला असतो, मार्केटमधे आपली पत तयार व्हायला लागलेली असते, आपल्या ओळखी वाढायला लागलेल्या असतात, चांगले वाईट अनुभव आलेले असतात, कधी प्रचंड तोटा, कधी प्रचंड नफा, कधी मोठी फसवणूक, कधी मोठी अडवणूक, कधी एकदम चांगले मार्केट तर कधी थंडावले मार्केट, अगदी काहीवेळा नैराश्य येत असते, कधी एकदम आनंदाची परिस्थिती बघायला मिळालेली असते, थोडक्यात हा तीन वर्षांचा कालावधी असा असतो कि या काळात व्यावसायिकाला सगळ्या प्रकारची परिस्थिती बघावी लागते. हा काळ म्हणजे व्यवसायासाठी आणि व्यावसायिकांसाठी सर्वांगीण विकासाचा काळ असतो. यामध्ये व्यावसायिक तयार होत असतो. म्हणून आपण हा तीन वर्षांचा कालावधी महत्वाचा मानत असतो.

या तीन वर्षांमधे आपण जेवढ्या गोष्टी पाहतो, अनुभवतो आणि त्यातून जर आपण सुखरूप बाहेर आलो असू तर पुढे आपली वाटचाल कुणीच आणि कोणतीच परिस्थिती रोखू शकत नाही….

हा तीन वर्षांचा कालावधी नुसतं बसून राहण्याचा नाही. हा कालावधी पैशाच्या मागे धावण्याचाही नाही. हा कालावधी व्यवसाय शिकून घेण्याचा आहे. या कालावधीमध्ये आपल्याला स्वतःला खंबीर बनवायचे असते. निर्णयक्षम बनवायचे असते. स्वतःला घडवायचे असते. म्हणून या तीन वर्षांच्या कालावधीमधे आपण व्यवसायाच्या पीच वर कोणत्याही परिस्थितीमधे टिकून राहणे आवश्यक असते. हि वेळ जर आपण यशस्वीपणे पार केली तर पुढे व्यवसायात अडचणी येण्याची शक्यता अगदीच नगण्य होऊन जाते,आणि अडचणी आल्या तरी त्यांना सामोरे जाण्यासाठी आपण तयार झालेलो असतो…

व्यवसायाची पहिली तीन वर्षे यामुळेच महत्वाची आहेत…

व्यवसाय साक्षर व्हा…
उद्योजक व्हा…
समृद्ध व्हा…

_

© श्रीकांत आव्हाड
७७४४०३४४९० (WhatsApp Only)

Business Consultant
www.ShrikantAvhad.com

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील


Shrikant Avhad

संस्थापक - उद्योजक मित्र Entrepreneur, Consultant, Writer, Speaker...

View all posts by Shrikant Avhad →

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!