चांदीमधील गुंतवणूक


‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

====================

लेखक : उदय पिंगळे

====================

चांदीमध्ये गुंतवणूक ही संकल्पना अनेकांसाठी अपरिचित असेल. दागिन्यांच्या बाजारात सोन्याखालोखाल चांदीचे स्थान आजही कायम आहे. चांदीची गणना मौल्यवान धातूंत होते. सोने चांदी आणि प्लॅटिनमचे दागिने बनवले जातात तरीही गुंतवणूकदार आणि विशेषतः स्त्रियांची पहिली पसंती सोन्यास आहे. त्याचप्रमाणे जगभरातील बँका पर्यायी गुंतवणूक म्हणून सोन्याचा साठा करण्यास प्राधान्य देतात. त्यामुळेच सोन्यात प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे गुंतवणूक करण्याचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. सोन्याच्या तुलनेत चांदीचा दर खूपच कमी आहे त्यामुळे जगभरातील संस्कृतीत सोन्याच्या खालोखाल चांदीच्या दागिन्यांना स्थान मिळाले त्याचप्रमाणे नाणी वापरातील अनेक वस्तू म्हणजे दैनंदिन उपयोगाच्या वस्तू शोभेच्या वस्तूमध्ये चांदीचा मोठ्या प्रमाणात वापर केला गेला. याशिवाय चांदी सर्वाधिक विद्युतवाहक असल्याने अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तूत त्याचप्रमाणे औद्योगिक वापर केला जातो, फोटोग्राफी मध्येही त्याचा वापर होतो. याच्या भावात बरेच चढउतार होत असल्याने त्यातून गुंतवणुकीच्या संधी उपलब्ध होतात.

चांदीमध्ये वेगवेगळ्या प्रकारे गुंतवणूक करता येऊ शकते

नाणी, बार किंवा विटेच्या स्वरूपात
आपण सोनाराकडून प्रत्यक्ष नाणी, बार किंवा वीट खरेदी करून चांदीमध्ये गुंतवणूक करता येईल याची शुद्धता उत्तम असल्यास 2% प्रक्रिया शुल्क वजा करून पैसे परत मिळू शकतात. ज्या वित्तसंस्था चांदीची विक्री करतात त्या पुनर्खरेदी करीत नाहीत,मात्र अशी चांदी आपल्याकडे असल्यास सोनार ती खरेदी करतात. कमी प्रमाणात गुंतवणूक करायची असल्यास नाणी, मोठी गुंतवणूक करायची असल्यास बार किंवा वीट खरेदी करता येईल.

कमोडिटी बाजारात सौदे करून
आपल्याला चांदीच्या भावात पडणाऱ्या फरकाचा लाभ घ्यायचा असेल तर त्यातील भविष्यातील सौदे करता येतील. हे सौदे प्रत्यक्ष चांदी घेऊन अथवा त्यातील भावातील फरकाचा लाभ घेऊन अशा दोन्ही प्रकारे करता येतात. कमोडिटी मधील सर्वाधिक सौदे MCX या एक्सचेंज वरती होतात त्यातील98% सौदे हे भावातील फरकाचा लाभ घेण्याच्या हेतूने केले जातात. सौंदापूर्तीच्या कालावधीपर्यंत खुले असलेले सौदे प्रत्यक्ष पैशांची देवाण घेवाण करून बंद केले जातात. अनेक दलाल प्रत्यक्ष चांदी ताब्यात द्यायचे व्यवहार करीत नाहीत.

इ सिल्व्हर
नॅशनल स्पॉट एक्सचेंज अस्तीत्वात असेपर्यंत स्टॉक एक्सचेंजच्या माध्यमातून 1 ग्रॅम चांदी इलेक्ट्रॉनिक स्वरूपात घेण्याचा पर्याय उपलब्ध होता. सध्या कोणाचीही चांदीच्या इटीएफ ची योजना भारतीय बाजारात उपलब्ध नाही परंतू येथील ब्रोकरेज फर्मनी परदेशी गुंतवणूक संस्थाशी करार करून तर काही परकिय फर्मच्या भारतीय शाखांनी या योजना आपल्या खातेदारांना उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यांचे नियम अटी किमान दलाली मालमत्ता व्यवस्थापन खर्च याची खात्री करूनच तिथे गुंतवणूक करावी. अनेक स्वदेशी आणि विदेशी कंपन्यांनी डिजिटल माध्यमातून चांदी खरेदी करण्याचा त्याचप्रमाणे पाहीजे असेल तर भावातील फरक किंवा धातुरुपात चांदीची खरेदी पर्याय दिला आहे.

MMTC या सरकारी कंपनीने स्विझरलँड मधील कंपनीच्या सहकार्याने सोनेचांदीची नाणी आणि दागिने खरेदी करण्याचा पर्याय दिला असून ही खरेदी ऑनलाईन ऑफलाईन करता येईल. माईलस्टोन या कंपनीने स्थावर मालमत्ता आणि मौल्यवान धातूंत गुंतवणूक करण्याच्या विविध योजना आणल्या आहेत, परंतू त्यात मोठी किमान गुंतवणूक करावी लागत असल्याने सर्वसामान्य गुंतवणूकदारांच्या उपयोगाच्या नाहीत.

चांदीची फक्त खरेदी आणि खरेदी / विक्री करण्यासाठी मोजकेच मार्ग असले तरी असे व्यवहार करणे अत्यंत सोपे आहे. खरेदी करताना जगभरात आणि भारतात विविध ठिकाणी चालू असलेला बाजारभाव त्यातील चढ उतार तपासून खरेदी विक्री करण्याचा विचार करावा. उद्योग क्षेत्रात चांदीची मागणी वाढल्याने नजीकच्या भविष्यकाळात चांदीच्या दरात मोठी वाढ होण्याची जास्त शक्यता असल्याचा अंदाज असून याबाबत आपल्या गुंतवणूक सल्लागाराशी चर्चा करून निर्णय घ्यावा.

_

उदय पिंगळे
8390944222

लेखक गुंतवणूक अभ्यासक, मार्गदर्शक व सल्लागार आहेत.

====================

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!