लेखक : श्रीकांत आव्हाड
======================
तुम्ही एखादे प्रोडक्ट बनवताय. तासाला १२ प्रोडक्ट बनवून होतात. म्हणजे ८ तासांच्या शिफ्ट ला ९६ प्रोडक्ट बनतात. एका प्रोडक्टसाठी तुमची प्रोडक्शन कॉस्ट ५०० रुपये आहे. त्यातले १५० रुपये पकडूया लेबर कॉस्ट आहे. म्हणजे दिवसभराच्या ९६ प्रोडक्टसाठी तुम्हाला १४४०० रुपये लेबर कॉस्ट लागते.
समजा तुम्ही तुमच्या प्रोडक्शन लाईनमधे थोडे काम करून कुठे कुठे वेळ वाचवता येईल किंवा प्रोडक्शनचा वेग कसा वाढवता येईल याचा अभ्यास केला आणित्यानुसार प्रोडक्शन लाईन मध्ये बदल केले आणि त्यामुळे तुमचा प्रोडक्शन वेग एका प्रोडक्ट साठी ५ मिनिटांवरून साडे चार मिनिटावर आला, तर तासाला तुमचे २७० सेकंद वाचतात. ८ तासांच्या शिफ्ट मधे २१६० सेकंद वाचतात.
या वाचलेल्या कालावधीमध्ये ८ प्रोडक्ट अतिरिक्त बनतात. म्हणजे दिवसभराच्या १४४०० रुपये लेबर कॉस्ट मधे आता तुम्ही १०४ प्रोडक्ट बनवता. आता तुमची एका प्रोडक्टसाठी लेबर कॉस्ट होते रुपये १३८.५० पैसे. अशा प्रकारे प्रत्येक प्रोडक्ट मागे तुमची लेबर कॉस्ट वाचली ७.६६%. तुमच्या प्रोडक्ट ची प्रोडक्शन कॉस्ट झाली रुपये ४८८.५ पैसे. तुमच्या पूर्वीच्या प्रोडक्शन कॉस्ट पेक्षा हि कॉस्ट आहे २.३% कमी आहे.
आता या कमी झालेल्या प्रोडक्शनकॉस्ट चे आणि वाढलेल्या प्रोडक्शनचे फायदे कसे होतात पाहुया…
तुम्ही आधी दिवसाला ९६ प्रोडक्टस बनवायचे ५०० रुपये प्रति प्रॉक्टप्रमाणे आणि त्यासाठी एकूण खर्च असायचा रु. ४८०००/-. याच ९६ प्रोडक्टसाठी आता तुम्हाला खर्च येतोय रु. ४६८९६/-. दिवसाला वाचताहेत रु. ११०४/- महिन्याला २६ दिवसांच्या वर्किंग डेज च्या हिशोबाने महिन्याची सेव्हिंग होते रु. २८७००/- आणि वर्षाचे वाचतात रु. ३,४४,०००/-
दुसरा भाग आहे मार्केटमधील स्पर्धेचा. मार्केटमधे एक अर्धा टक्क्यांवर डिस्काउंटसाठी दिवसेदिवस चर्चा करणारे व्यावसायिक असतात. अशा मार्केटमधे तुम्ही तुमच्या कमी झालेल्या प्रोडक्शन कॉस्ट मुळे जागेवर २% डिस्काउंट ऑफर करू शकता. अशावेळी तुम्ही गुणवत्तेसोबतच किमतीच्या बाबतीत सुद्धा सरस ठरता आणि मार्केटमधे जास्तीत जास्त ग्राहक आकर्षित करता.
तिसरा फायदा आहे उलाढालीचा. पूर्वी तुम्ही दिवसाला ९६ प्रोडक्ट बनवायचे. ज्याची एकूण किंमत ४८०००/- होती. आणि त्यावर समजा २०% नफ्याच्या हिशोबाने ६०० रुपयांना ते प्रोडक्ट विकत असाल तर तुमची दिवसाची एकूण उलाढाल व्हायची रु. ५७६००/- तीच आता प्रोडक्शन वाढल्यामुळे दिवसाची उलाढाल नव्या डिस्काउंट किमतीवर २०% नफ्याच्या हिशोबानेच होते जवळ जवळ ६१+ हजार रुपये. म्हणजे उलाढालीत तुमची वाढ झाली जवळजवळ ६%.
प्रोडक्शन लाईन मधे सुधारणा करून त्याचा वेग वाढवल्याने आपली उलाढाल वाढू शकते, आपला नफा वाढू शकतो, आपल्याला स्पर्धकांच्या पुढे जायला मदत होऊ शकते.
आमच्या एका युनिट मधे आम्ही अशाच प्रकारे एक लेबरची कॉस्ट कमी केली. आमच्याकडे एक काम होत, १०mm ID-OD असणाऱ्या प्लास्टिक ट्यूब कट करायच्या आणि त्यांना दोन्ही बाजूंनी खाचा पाड्याच्या. सुरुवातीला एक मशीन ट्यूब कट करण्यासाठी होतं आणि दुसरं त्यांना खाचा पाडण्यासाठी. दोन्ही कामासाठी एक-एक लेबर लागायचे. आम्ही मशीनमधे सुधारणा करून कटिंग आणि खाचा पाडण्याचे काम एकाच वेळी होईल अशा प्रकारे मशीन बनवून घेतले. ज्या कामासाठी आम्हाला दोन लेबर लागायचे ते काम एकाच लेबर कडून व्हायला लागले, आणि आमचं प्रोडक्शन स्पीड दुपटीने वाढलं. एका छोट्याश्या बदलामुळे आमचा नफा जवळजवळ ३०% नि वाढला होता आणि प्रोडक्शन स्पीड वाढल्यामुळे उलाढालीत दुपटीने वाढ झाली होती.
लेबरचा वेग वाढवणे, मशिनरी वाढवणे, ऑटोमेशन करणे, लेबरचे स्किल डेव्हलप करणे, मटेरियल सप्लाय चेन वर काम करणे अशा विविध मार्गानी प्रोडक्शन चा वेग वाढवता येतो व कॉस्टिंग कमी करता येते. व्यवसायागणिक हि पद्धत वेगवेगळी असू शकते.
प्रोडक्शन लाईनचं आपल्या एकूण व्यवसाय किती महत्व असतं हे लक्षात आलं असेलच. इतर ठिकाणाची प्रोडक्शन कॉस्ट कमी केली तर नफा आणखीनच वाढतो. पण त्याविषयी स्वतंत्र लेख लिहिलेला आहे, त्यामुळे इथे पुन्हा तोच विषय घेतलेला नाही.
मी मुद्दामूनच टेक्निकल गोष्टी न सांगता आकडेवारीच्या दृष्टिकोनातून प्रोडक्शन लाईनवर काम केल्याने आपल्या व्यवसायात कशी वाढ होऊ शकते हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. बिजनेस कन्सल्टंटला अशा प्रकारे प्रोडक्शन आणि प्रोसेसिंग लाईनवर काम करून कंपनीच्या नफ्यात वाढ करण्यासाठी कित्येक कंपन्या लाखो रुपये फी देतात. कारण त्यातून एखाद टक्का जरी बचत झाली तरी कंपनीचे करोडो रुपये वाचणार असतात. आपल्याकडे या गोष्टीला काही किंमतच दिली जात नाही.
प्रोडक्शन आणि प्रोसेसिंग ला गांभीर्याने घ्या. इथे तुमचे प्रोडक्ट जसे गुणवत्तेचे बनणार असते तसेच त्याची किंमतसुद्धा इथेच ठरणार असते.
व्यवसाय साक्षर व्हा…
उद्योजक व्हा…
समृद्ध व्हा…
_
© श्रीकांत आव्हाड
७७४४०३४४९० (WhatsApp Only)
Business Consultant
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम
All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील