ग्रामीण भागात करता येण्यासारखे २५ व्यवसाय


लेखक : श्रीकांत आव्हाड
======================

मला सर्वात जास्त वेळा विचारला जाणारा प्रश्न… ग्रामीण भागात कोणता व्यवसाय करावा ?

जर तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंग करायचे असेल तर भाग ग्रामीण असो किंवा शहरी तुम्हाला तुमचे उत्पादन विकण्यासाठी शहरात वा परिसरात जावेच लागेल. त्यामुळे ग्रामीण भागासाठी कोणताही स्पेशल असा मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रातील व्यवसाय नसतो. तुमच्या ५०-१०० किमी परिसरात जे जे विकलं जाऊ शकत ते ते तुम्ही बनवू शकता. यातही फूड प्रोसेसिंग शी निगडित असेल तर स्थानिक पातळीवर कोणत्या पिकांचं जास्त उत्पादन होत एवढं फक्त तुम्ही बघू शकता.

बर… आता राहिला प्रश्न गुंतवणुकीचा, मार्केटिंग स्किल नसण्याचा, अनुभव नसण्याचा… तर तुमच्या गावात किंवा तुमच्या परिसरातिल एखाद्या मोठ्या गावात सुरु करता येतील असे भरपूर रिटेल किंवा सर्व्हिस व्यवसाय आहेत. रिटेल सर्व्हिस व्यवसायांना जास्त अनुभव नसला तरी चालून जाते. व्यवसाय करायचा म्हणजे मॅन्युफॅक्चरिंगच केलं पाहिजे असा काही नियम नाही.

तुमचं गाव बाजारपेठेच ठिकाण असेल किंवा परिसरातील एक महत्वाचं ठिकाण असेल किंवा तुमच्या परिसरात असं एखादं मोठं गाव असेल तर अशा ठिकाणी तुम्ही बरेच स्थानिक स्तरावर चालणारे रिटेल किंवा सर्व्हिस व्यवसाय सुरु करू शकता.

ग्रामीण भागात कमी बजेटमधे सुरु करता येतील अशा काही व्यवसायांची माहिती पाहूया

 • एखादे हॉटेल सुरु करा… चहा, भेळ, मिसळ, भजे, वडा पाव, तर्री वडा, सामोसे यासारख्या भरपूर खपणाऱ्या खाद्यपदार्थांचे हॉटेल सुरु करा. यामधून चांगले उत्पन्न मिळते. खाणारी तोंडे कधी कमी होत नसतात. त्यामुळे हॉटेल व्यवसायाला कधीच मरण नाही. आणि यासाठी गुंतवणुक २५-५० हजार पेक्षा जास्त लागत नाही. माझ्या माहितीतल्या एका तरुणाने ५ हजारात वडा पाव ची गाडी सुरु केली होती. आज त्याच स्टॅण्डवर सगळ्यात जास्त चालणार हॉटेल आहे. स्वतःची गाडी, चांगलं घर, शेती सर्वकाही झालंय..
 • कपड्याच दुकान सुरु करा. ग्रामीण भागात कपड्यांचे दुकान सुद्धा चांगले चालते. बाजारपेठेच्या ठिकाणी या व्यवसायाला चांगले मार्केट मिळते. सुरत, मुंबई, अहमदाबाद, बडोदा सारख्या शहरांतून किंवा जवळच्या मोठ्या शहरातून होलसेल मध्ये कपडे आणावेत. चांगले दुकान थाटावे. ग्राहकांची कमतरता नाहीये. आजही ग्रामीण भागातील कपड्यांचं मार्केट काही ठराविक लोकांच्याच हातात आहे. ते मार्केट तुमच्याकडे वळवण्याची संधी आहे.
 • फॅशन अॅक्सेसरीज चे शॉप सुरु करा. होलसेलमधे अॅक्सेसरीज आणून विक्री करा. मार्जिन भरपूर आहे, आणि धंदाही कायम असतो.
 • किराणा दुकान सुरु करा. छोटंसं किराणा दुकान सुरु केलं तरी त्यातून चांगले उत्पन्न मिळू शकते. किराणा व्यवसाय मोठा व्हायला वेळ लागत नाही.
 • प्लास्टिक, स्टील च्या वस्तू, घरगुती वापराच्या वस्तू चे दुकान सुरु करा.
 • शेतीसाठी आवश्यक साहित्याचे दुकान सुरु करा. विक्री व दुरुस्ती दोन्ही कामांना चांगले मार्केट मिळेल. ग्रामीण भागात यासारखे मोठे मार्केट नाही. यात औजारे, मशिनरी, इरिगेशन साहित्य सारखे भरपूर प्रोडक्ट येतात. औषधांची विक्रीसुद्धा खूप मोठा व्यवसाय आहे पण त्यासाठी शेतीचा अभ्यास असणे आवश्यक आहे.
 • फुटवेअर, खेळणी, सौंदर्यप्रसाधने, स्वस्त कपडे (शर्ट्स वगैरे) इत्यादी वास्तूंना प्रत्येक बाजारात मागणी असते. याचे एखादे चांगले शॉप सुरु होऊ शकते. किंवा एखादी छोटी टेम्पोवजा (उदा. रिक्षा टेम्पो किंवा टाटा एस) गाडी घ्या. गाडी चांगल्या पद्धतीने सजवा. मागे चांगल्या प्रकारे दुकानवजा रॅक बसावा, आणि परिसरातील प्रत्येक बाजार फिरा. यातही चांगला व्यवसाय मिळेल. काही बाजारात फिरून याची माहिती घ्या. याप्रकारच्या कोणकोणत्या वस्तूंना तुमच्या परिसरात मागणी आहे याचा शोध घ्या.
 • भाजीपाला, फळे विक्री करू शकता. परिसरातील मुख्य गावात एखादा स्टॉल सुरु करून चांगला व्यवसायहोऊ शकतो. किंवा फिरत्या वाहनावर सुद्धा व्यवसाय करणे जास्त फायद्याचे ठरेल. सात गावांमध्ये सात बाजार करायचे, हे बाजार शक्यतो तालुक्यातील मोठे बाजार असतील याची काळजी घ्यायची, आणि तालुक्याच्या ठिकाणी सुद्धा महिन्यातून ५-१० दिवस विक्री करायची. बाजार दुपारपर्यंत संपतात. दुपारनंतर पुढच्या दिवसाची तयारी करायची. दररोज चांगले उपन्न देणारा व्यवसाय आहे हा. विक्रीकरिता भाजीपाला फळे स्थानिक परिसरातच उपलब्ध होत असतात, किंवा जवळच्या मार्केट मधून उपलब्ध करावेत.
 • शेतमाल क्षेत्रातच ट्रेडिंगचा व्यवसाय करता येईल. आपल्या भागातील शेतकऱ्यांकडून शेतमाल ठोक बाबत विकत घेऊन शहरातील मार्केटमधे विक्री करणे किंवा वेगवेगळ्या भाजीपाला विक्रेत्यांना, हॉटेल्सना थेट विक्री करणे. शेतकऱ्यांना जागेवर विक्री झाल्यामुळे फायदा होईल आणि तुम्हाला मधला नफा मिळून जाईल.
 • याच प्रकारे बेकरी प्रोडक्ट बनवून विका, किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी ज्या काही मोठ्या बेकारी असतील त्यांच्याकडून होलसेल मध्ये विकत घेऊन स्थानिक बाजारात विका. यालासुद्धा मोठे मार्केट आहे. केक, पाव, ब्रेड, खरी, टोस्ट, बिस्कीट आणखी बरेच काही याअंतर्गत विकले जाऊ शकते.
 • दुग्धजन्य पदार्थांना सुद्धा चांगली मागणी असते. बेकारीसोबत डेअरीसुद्धा चांगली चालेल.
 • इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रिकल वस्तूंची विक्री व दुरुस्ती सुरु करा. इलेक्ट्रॉनिक वस्तूंना मागणी चांगली असते. तसेच टीव्ही, मोबाईल, पंखे, फ्रिज सारख्या वस्तूंच्या रिपेअरिंग साठी चांगले ग्राहक मिळतात.
 • लग्नाचे मंडप व इतर साहित्य भाड्याने देण्याचा व्यवसाय सुद्धा ग्रामीण भागात चांगले उत्पन्न मिळवून देतो.
 • तुमचं गाव बाजारपेठेचे ठिकाण असेल तर जेवणाचे डबे पुरविण्याचा व्यवसाय सुद्धा चांगला चालतो. शिक्षक, नोकरदार, दुकानदार असे बरेच जण बाहेरगावचे असतात. ते तुमचे कायमचे ग्राहक होतील.
 • क्लासेसचे प्रमाण आता ग्रामीण भागातही चांगले वाढले आहे. शिक्षकी पेशा आवडत असेल तर क्लासेस सुरु करू शकता.
 • वाहने दुरुस्तीचे कामही ग्रामीण भागात मोठ्या प्रमाण व्यवसाय देऊ शकतो. वाहने दुरुस्तीच्या कामाचा अनुभव घेण्यासाठी शहरातील एखाद्या गॅरेजमधे वर्षभर काम करा चांगला अब्यास होईल, आणि मग गावाकडे सुरुवात करा. ट्रॅक्टर. कमर्शिअल वाहनांच्या दुरुस्तीचे काम मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होईल. तसेच दुचाकी, चारचाकी वाहनांची सर्व्हिसिंग सुद्धा चांगला व्यवसाय देईल.
 • परिसरात काही निसर्गरम्य ठिकाणे असतील, किंवा शेती चांगल्या प्रमाणात असेल तर काही शेतकऱ्यांशी टायअप करून कृषी पर्यटन सुरु करू शकता. प्रोजेक्ट डेव्हलपमेंटला जरा खर्च येईल. जवळच्या शहरात मार्केटिंग केली तरी चांगला व्यवसाय होईल.
 • शहर जवळ असेल तर ग्रामीण खाद्यसंस्कृतीला समोर ठेऊन एखाद्या ठराविक पदार्थाला टार्गेट करून हॉटेल सुरु करू शकता. शहरी भागातील नागरिक खाद्यपदार्थांच्या बाबतीत ग्रामीण चवीचे चाहते असतात. जिभेचे चोचले पुरविण्यासाठी लोक २०-३० किमी ट्रॅव्हल करत सहज येऊ शकतात.
 • शेतीकामासाठी लेबर पुरविण्याचा व्यवसाय आता ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर रुळतो आहे. शेतकरी लेबर ठेकेदाराला प्राधान्य द्यायला लागले आहेत. याचाही विचार करू शकता.
 • ग्रामीण भागात सिझनल व्यवसाय सुद्धा चांगला चालू शकतो. सीझननुसार प्रोडक्ट विक्री करण्याला चांगले मार्केट मिळू शकते. जवळच्या शहरातून किंवा थेट मुंबई पुण्यातून सीझननुसार व्होलसेल मध्ये माल खरेदी करून स्थानिक मार्केटमधे विक्री करणे. आणि यासोबत एखादे डेली नीड्स च्या प्रोडक्ट चे शॉप, जनरल स्टोअर सुरु करा. डेली नीड्स दररोजचा धंदा देईल आणि त्याच शॉप मधे सिझनल प्रोडक्ट वर्षातून किमान ७०-१०० दिवसांचा चांगला व्यवसाय करून देईल.
 • ८-१० हजार लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये सुपर शॉपी सारखा सेटअप सुद्धा चांगला चालतो. पण यासाठी गुंतवणूक जरा जास्त लागेल.
 • मोठ्या गावात कार वॉशिंग चा धंदा सुद्धा खूप चालेल. काही बागायत भागात कार्स चे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते. अशा ठिकाणी कार वॉश ला चांगले मार्केट मिळेल.
 • पिठाच्या गिरणीचा व्यवसाय चांगला चालेल. गाव लहान मोठं कसंही असलं तरी पीठ गिरणीला पर्याय नाही. गुंतवणूकही जास्त लागणार नाही.
 • सेकंडहँड वस्तूंची विक्री सुद्धा ग्रामीण भागात चांगली होऊ शकते. चांगल्या स्थितीत असलेल्या कित्येक वस्तू मोठ्या शहरात उपलब्ध होतात. त्या ग्रामीण भागात विकल्या जाऊ शकतात. जर लोक वाहने सेकन्ट हँड घेऊ शकतात तर इतरही वस्तू सेकंड घ्यायला त्यांना काहीच प्रॉब्लेम नसेल.

हे लिहिताना मला १५-२० व्यवसाय सुचलेत. याच प्रकारे तुम्ही परिसरातील गावात फेरफटका मारला तर तुम्हाला आणखी काही चांगले पर्याय सापडू शकतील. ग्रामीण भागाला समोर ठेऊन करता येणारे व्यवसाय मर्यादित आहेत, तरीही चांगल्या प्रमाणात संधी उपलब्ध आहेत.

व्यवसाय म्हणजे विक्री हा नियम लक्षात ठेवा. काय विकायचं ठरवा, आणि कामाला लागा.

ग्रामीण भागात व्यवसाय करताना काही गोष्टी लक्षात ठेवा
१. ग्रामीण भागातील बहुतेक लोकांची क्रयशक्ती मर्यादित असते. त्यामुळे त्याच्या खर्च करण्याच्या क्षमतेला लक्षात घेऊनच व्यवसाय निवडा. उदा. कपड्यांचे दुकान ग्रामीण भागात चांगले चालते, पण तिथे सगळेच कपडे मोठमोठ्या ब्रँड्स चे आणि दीड दोन हजाराच्या पुढेच असतील तर धंदा चालणारच नाही. कारण कपड्यांसाठी तेवढा खर्च करणारा वर्ग तिथे मर्यादित असेल. त्या वर्गाच्या भरवश्यावर व्यवसाय चालू शकत नाही.
२. बागायत पट्ट्यात आर्थिक क्षमता असणारा वर्ग चांगला असतो अशा ठिकाणी क्रयशक्ती चांगली असते. त्यानुसार प्लॅनिंग करू शकता.
३. खूप जास्त गुंतवणूक न करता सुरुवात करा. गाव बऱ्यापैकी मोठे असेल, किमान ७-८ हजारपेक्षा जास्त लोकसंख्या असेल आणि आसपासच्या गावांसाठी महत्वाचे ठिकाण असेल तर मोठी गुंतवणूक करायला हरकत नाही
४. ग्रामीण भागात गुणवत्ता आणि किंमत यात नेहमी किमतीचाच विजय होतो. त्यादृष्टीने सर्व प्रकारचे प्रोडक्ट असणे महत्वाचे ठरते.
५. व्यवसाय ग्रामीण भागात असला तरी बँकेत करंट अकाउंट असायलाच हवे. योग्य नोंदणी आणि करंट अकाउंट महत्वाचे आहे.
६. मोठे शहर जवळ असेल तर कपडे, फॅशन प्रोडक्ट यापासून दूर रहा. ग्राहक शक्यतो यासाठी शहरालाच प्राधान्य देईल.
७. सर्व्हिस व्यवसाय निवडला असेल किंवा एखादे शॉप असेल तर जाहिरात करत राहणे आवश्यक आहे. आपल्या गावासोबतच परिसरातील इतर लहान गावातही मार्केटिंग चालू ठेवावी.

या काही गोष्टी लक्षात ठेवा आणि सुरुवात करा…

व्यवसाय बिलकुल अवघड नाही, आपली नकारात्मक भूमिका अवघड आहे. व्यवसाय कमीपणाचा असतो हि मानसिकता ग्रामीण भागातील तरुणांना स्वतःच्या पायावर उभे राहू देत नाहीये. या मानसिकतेला बाजूला सारा आणि स्वतःचा व्यवसाय सुरु करा. लोक काय म्हणतील याचा विचार करू नका. लोकं एक वर्ष नावं ठेवतील, टीका करतील, ते सहन करा, वर्षभरानंतर तुमची प्रगती दिसली कि तेच लोक चांगला निर्णय घेतलास, नोकरीत काय ठेवलय असे म्हणतील. सुरुवात करा, घाबरू नका, व्यवसाय बिलकुल अवघड नाही…

व्यवसाय साक्षर व्हा…
उद्योजक व्हा…
समृद्ध व्हा…

_

© श्रीकांत आव्हाड
७७४४०३४४९० (WhatsApp Only)

Business Consultant

www.ShrikantAvhad.com

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील

Total Page Visits: 9577 - Today Page Visits: 41

Shrikant Avhad

संस्थापक - उद्योजक मित्र Entrepreneur, Consultant, Writer, Speaker...

View all posts by Shrikant Avhad →

4 thoughts on “ग्रामीण भागात करता येण्यासारखे २५ व्यवसाय

 1. आपण लिहिलेल्या गोष्टी उत्तम आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची मानसिकता व्यवसायात दिसत.शिकून व्यवसाय केल्यास लोक काय म्हणतील ह्या विचाराने मागे पडतात. ग्रामीण भागात अनेक व्यवसाय शेतीला पूरक म्हणून करायला पाहिजे..

 2. … आत्ता नोकरी मिळणे कठीण आहे, ते पण राहत्या ठिकाणी, म्हूणन बेरोजगार ची संख्या खुप आहे.
  काही तरी, पैसे मिळाले पाहिजे. असं उद्धेश असतो… तुमच्या मुळे ते साध्य होईल.

  1. सर आजकाल च्या तरूणांनी केलेले व्यवसाय ठराविक बंद केले कारण म्हणजे संयम तर माझं असं मत आहे की व्यवसाय करणाऱ्या तरुणांनी जरा संयम राखायला हवा व्यवसाय सेट व्हायला जरा वेळ लागतो आणि नंतर व्यवसाय चालेना कि लोक टोमणे मारतात ह्या गोष्टींचा आपल्या वैचारिकतेवर परीणाम होतो यासाठी व्यवसाय करताना योग्य गायडन्स घेवुन करायला हवा

 3. सर मला सी एन सी राऊटर व्यवसायाबद्दल माहिती हवी आहे. तरी कृपया माहिती देणे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!