व्यवसायात बार्गेनिंग चालतेच, आपण स्वतःला त्यानुसार तयार करणे आवश्यक असते.


लेखक : श्रीकांत आव्हाड
======================

इंडस्ट्रिअल सेक्टर वगळता सामान्य ग्राहकाशी व्यवहार करताना बहुतेक व्यवसायीकांना बार्गेनिंग करावीच लागते. घेणाऱ्याला कमीत कमी किमतीत घ्यायचे असते आणि विकणाऱ्याला जास्तीत जास्त किमतीत विकायचे असते. (इंडस्ट्रिअल क्षेत्रातील, किंवा मोठ्या व्यवहारातील बार्गेनिंग पूर्णपणे वेगळ्या स्तरावर चालते. इथे तो विषय नाही)

बार्गेनिंग करणाऱ्या ग्राहकांमधे कोणता ग्राहक कशा विचाराने बार्गेनिंग करत आहे याचा आपण अंदाज बांधणे आणि त्यानुसार त्यांच्याशी संवाद साधने महत्वाचे असते.

काही उदाहरणे पाहुयात

एक वर्ग असतो ज्याला प्रत्येक पैशाची बचत करणे महत्वाचे वाटत असते. अशा वर्गाची आर्थिक परिस्थिती बेताची असते, किंवा तो निम्न किंवा मध्यम मध्यमवर्गीय कुटुंबातील असतो.
हा वर्ग फुकट्या नसतो. पण यांच्यासाठी रुपयाची बचत सुद्धा खूप मोठी असते. त्यामुळे ते खूप टोकाची बार्गेनिंग करतात. आणि गुणवत्तेपेक्षा किमतीकडे जास्त लक्ष देतात.

एक वर्ग असतो ज्याला त्या प्रोडक्ट चा मूळ रेट माहित असतो, किंवा विक्रेत्याला नक्की कुठपर्यंत परवडतंय याचा त्याला अंदाज असतो. मार्केटमधे ते मुरलेले असतात. यांना तुम्ही ‘परवडत नाही’ सारखे डायलॉग मारून फायदा नसतो, इथे सरळ सरळ कोणत्या किमतीवर अडून रहायचं यालाच महत्व असतं.

एक वर्ग असतो ज्याला मी कसं दुकानदाशी भांडून डिस्काउंट मिळवला आहे हे लोकांना सांगायचं असतो. बार्गेनिंगमधे दुकानदाराला हरवण्यात त्याचा इगो सुखावत असतो. या वर्गाचा इगो दुखावू नका. यांना हाताळताना अशा पद्धतीने हाताळा कि आपण ठरवलेल्या कमतीखाली उतरण्याची गरज पडणार नाही पण त्याला तो जिंकल्याचं समाधानही मिळेल.

एक वर्ग असतो ज्यांच्या दृष्टीने बार्गेनिंग करायलाच पाहिजे असते. तो सवयीचा भाग असतो किंवा दुकानदाराकरून त्याच्या नफ्यातून थोडातरी डिस्काउंट मिळायलाच हवा अशा विचाराचा असतो. थोडाफार डिस्काउंट मिळाला तर हा वर्ग खुश होतो.

एक मोठा वर्ग असतो महिलांचा, गृहिणींचा. मध्यमवर्गीय कुटुंबातील घर सांभाळणाऱ्या महिलेला बचतीची सवय लागलेली असते. घरावर कधीही आर्थिक संकट आलं तर आपल्याकडूनही काही मदत झाली पाहिजे, किंवा अडीअडचणीला कामी येतील एवढी रक्कम हाती असली पाहिजे या उद्देशाने ती रुपयाचासुद्धा हिशोब करत असते. गृहिणींचा हा वर्ग चिवट असतो. सवयीनुसार बार्गेनिंग हा यांचा स्वभावच झालेला असतो. यांची आर्थिक परिस्थिती बेताचीच आहे म्हणून, किंवा त्यांना मूळ रेट माहित आहे म्हणून किंवा त्यांना त्यांचा इगो कुरवाळायचा असतो म्हणून ते बार्गेनिंग करत नाहीत, तर ते कुटुंबाचा विचार करत असतात. भले मी कमवत नसेल पण माझ्याकडे जे पैसे येतात त्यातून बचत करून करून मी मोठी रक्कम जमा करून अडचणीला कमी येईल अशा प्रकारे सांभाळून ठेऊ शकते असा‌ त्यांचा विचार असतो.

यातला कोणताच ग्राहक त्रासदायक नसतो. आपल्याला फक्त समोरचा कोणत्या मानसिकतेचा आहे याचा अंदाज घेऊन त्यांच्याशी कशा प्रकारे संवाद साधायचा आहे हे ठरवावे लागते. बार्गेनिंग करताना यातल्या कोणत्याही वर्गाशी उद्धट कधीही वागू नका. खरं तर ग्राहकाशी उद्धट कधी वागायचेच नसते, किंवा बचतीचा विचार करत आहेत म्हणून त्यांचा अपमानही करायचा नसतो. फक्त समोरच्याची मानसिकता लक्षात घेऊन त्यांना समाधानकारक वाटतील अशा प्रकारे संवाद साधून एक सुवर्णमध्य काढायचा असतो. त्यांचा इगो दुखावणार नाही, त्यांचा अपमान होणार नाही, त्यांना बार्गेनिंगमधे त्यांचाच विजय झाल्याचे जाणवेल आणि आपल्यालाही नुकसान होणार नाही अशा टप्प्यावर आपल्याला व्यवहार आणून तो पूर्ण करायचा असतो.

ग्राहकाला बार्गेनिंग करण्याची संधीच द्यायची नाही अशा प्रकारे आपण आपल्या व्यवसायाचे नियोजन करू शकतो. आपणही कित्येक ठिकाणी बार्गेनिंग न करता खरेदी करतोच. सामान्यपणे ग्राहक तिथेच बार्गेनिंग करतो जिथे त्याला विक्रेत्याला चांगला नफा मिळत आहे हे माहित असतं. जिथे व्यवसायाच्या मालकाचा आणि ग्राहकाचा थेट संबंधी येत नाही तिथे शक्यतो बार्गेनिंग होत नाही. बार्गेनिंग सामान्यपणे विक्रेता आणि ग्राहक हे दोघेही समोरासमोर असल्यावरच होत असते. पण काही विक्रेते स्वतःचे नाव अशा प्रकारे डेव्हलप करतात किंवा ग्राहकांना अशा प्रकारे सवय लावतात कि ग्राहकाला तिथे बार्गेनिंग करण्याची संधीच मिळत नाही.

बहुतेक व्यवसायात बार्गेनिंग चालतेच. लहान लहान रिटेल व्यवसायात तर याला पर्यायच नाही. आपण स्वतःला त्यानुसार तयार करणे आवश्यक असते. मार्केट बार्गेनिंगचंच असेल तर आपल्यालाही त्याशिवाय पर्याय नसतो. त्यामुळे बार्गेनिंग शिकून घेणे महत्वाचे असते. नवीन नवीन थोडं जड जातं, पण कालांतराने आपणही यात तज्ञ होऊन जातो.

व्यवसाय साक्षर व्हा…
उद्योजक व्हा…
समृद्ध व्हा…

_

© श्रीकांत आव्हाड
७७४४०३४४९० (WhatsApp Only)

Business Consultant

www.ShrikantAvhad.com

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील


Shrikant Avhad

संस्थापक - उद्योजक मित्र Entrepreneur, Consultant, Writer, Speaker...

View all posts by Shrikant Avhad →

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!