लेखक : श्रीकांत आव्हाड
======================
आपल्या ओळखीच्या कित्येक लोकांकडून, व्यावसायिकांकडून आपल्याला अनेक व्यवसाय संधी सापडू शकतात. आणि याच लोकांच्या साहाय्याने आपला व्यवसाय उभा सुद्धा राहू शकतो. आवश्यकता असते ती आपल्या जनसंपर्काचा खुबीने वापर करून घेण्याची.
उदाहरण म्हणून आपण आपल्या जवळच्या आसपासच्या दुकानदारांचा, लहान व्यावसायिकांचा विचार करू…
तुमच्या ओळखीच्या दुकानदारांना, लहान लहान व्यावसायिकांना व्यावसायिक दृष्टिकोनातून एकदा भेटा. आपल्या ओळखीचे अनेक व्यावसायिक असतात. सलून, किराणा दुकान, आईस्किर्म पार्लर, मेडिकल, कापड दुकान, स्टेशनरी दुकान, गाडी संर्व्हिसिंग सेंटर, हॉटेल अशा विविध व्यवसायांशी आपला नेहमीच संबंध असतो. नेहमीच्या संबंधामुळे या व्यवसायांचे चालक आपले चांगले मित्रही होत असतात. तसेच आपल्या काही मित्रपरिवारातील लोकही या व्यवसायात असतातच.
अशा ओळखीच्या व्यावसायिकांना एकदा भेटा. या प्रत्येकाकडे अशा काही वस्तू विक्रीसाठी असतात किंवा यांना अशा काही वस्तू लागतात ज्यांचा ब्रँड शी संबंध नसतो. ग्राहक प्रत्येकवेळी ब्रँड बघतोच असे नाही. काही प्रोडक्ट असेही असतात ज्यात ब्रँड चा संबंध येत नाही. फक्त प्रोडक्ट चांगले असले पाहिजे. असे प्रोडक्ट संबंधित व्यावसायिक स्थानिक उत्पादकांकडूनच खरेदी करत असतात. किंवा असे प्रोडक्ट ज्याची या व्यावसायिकांना गरज आहे पण मार्केट पूर्ण करू शकत नाहीये, असे काही.
या ओळखीच्या व्यावसायिकांना भेटून त्यांच्याकडून अशा प्रोडक्ट ची माहिती घ्या, त्यांची यादी तयार करा. असे प्रोडक्ट शोधा ज्यांना कायम मागणी असते, ज्यात ब्रँड चा विशेष संबंध येत नाही, ज्यात खूप काही किचकट प्रक्रिया नसते. अशा प्रोडक्ट ची यादी बनवा. यात किमान पन्नास एक प्रोडक्ट सापडतील. त्यातून तुमच्या आवाक्यात कोणकोणते प्रोडक्ट आहेत याचा अभ्यास करा. गुंतवणूक क्षमता, बनवण्याची प्रक्रिया यानुसार आपली क्षमता तपासा, त्यानुसार प्रोडक्ट निवडा.
निवडीची प्रक्रिया पार पाडत पाडत, चार पाच प्रोडक्ट निवडून झाल्यांनतर संबंधित व्यावसायिकांना भेटा. हे प्रोडक्ट जर मी बनवायला सुरुवात केली तर तुमच्यापासून विक्रीला सुरुवात होईल का ? संधी आहे का? मार्केट जमेल का? अशा काही प्रश्नांची उत्तरे त्यांच्याकडून मिळावा. यातून ज्या ज्या प्रोडक्ट ला आपल्या ओळखीच्या व्यावसायिकांकडून मागणी मिळू शकेल असे प्रोडक्ट निवडा. आणि त्यातून एक प्रोडक्ट फायनल करा…
उत्पादन सुरु झाल्यांनतर तुमचा पहिला ग्राहक तुमचा तो ओळखीचा व्यवसायीक असेल. त्याला प्रोडक्ट दिल्यानंतर त्यांच्याकडून आणखी पाच व्यावसायिकांचे रेफरन्स मिळावा. आपल्या व्यावसायिक मित्राला त्यांना कॉल करून कल्पना देऊन ठेवायला सांगा. मग त्या पाच रेफरन्स ला भेटा, त्यांच्या हात पाय पडून त्यांच्या आवश्यकतेच्या २-५ टक्केच प्रोडक्ट घ्याल भाग पाडा. ते नाही म्हणणार नाहीत, कारण त्यांच्या एका व्यावसायिक मित्राने त्यांना तशी कल्पना देऊन ठेवलेली असेल. फक्त सुरुवातील खूप काही खरेदी करणार नाहीत. महिनाभर एवढ्यांनाच हॅण्डल करा. क्वचित एखाद दोन काउंटर वाढले तर चांगलंच.
एक महिना सप्लाय चांगला चालू ठेवा, आणि या सर्वांशी चांगले संबंध डेव्हलप करा. महिनाभराने या पाच जणांकडून आणखी प्रत्येकी किमान तीन व्यावसायिकांचे रेफरन्स मिळवा. आणि त्यांना सुद्धा तीच प्रक्रिया वापरा जी सुरुवातीच्या पाच जणांसाठी वापरली होती.
हे चक्र असेच चालू ठेवा. नवनवीन काउंटर जोडत रहा. सहा महिने ते एक वर्ष तुमचा बराचसा वेळ नवीन काउंटर मिळविण्यातच जाईल. प्रत्येक महिन्याचा हिशोब ठेवा. किती ग्राहक वाढले, उलाढाल किती वाढली यांचा अंदाज घेत रहा. नफ्या तोट्याचा हिशोब करण्याच्या भानगडीत पडू नका. फक्त आर्थिक जुळवाजुळव योग्य प्रकारे बसत आहे का याचा अंदाज घ्या. वर्षभरानंतर तुमच्या लक्षात येईल कि कासवाच्या गतीने जातानाही आपण खुप मोठी मजल मारलेली आहे. आणि आपला व्यवसाय चांगला सेट झालेला आहे. आता तुम्हाला नफाही मिळायला लागेल, मार्केट सुद्धा सेट झालेले असेल, आणि तुमची वाटचालही सुरु झालेली असेल.
याच्या पुढचा प्रवास सांगायची गरज नाही. वर्षभरात तुम्हाला चांगला अनुभव आलेला असेल, आणि तुम्ही पुढच्या प्रवासासाठी सज्ज झालेला असाल…
आपल्या जवळच्या, महतीतल्या लोकांशी झालेल्या चर्चेतून अशा बऱ्याच व्यवसाय संधी समोर येत असतात. याच ओळखीचा वापर करून या संधींचे व्यवसायात रूपांतर करता येते, व्यवसाय उभा करता येतो. वर दिलेले उदाहरण एका क्षेत्राशी निगडित आहे. अशा अनेक क्षेत्रात संधी असतात. पण प्रत्येक क्षेत्रासाठी प्रोसेस जवळजवळ वर सांगितली तशीच असते.
माझे स्वतःचे दोन व्यवसाय अशाच काही ओळखीतल्या लोकांच्या सहकार्यामुळे सुरु झाले होते.
बऱ्याचदा आपल्या जवळचा एखादा व्यावसायिक किंवा एखाद्या कंपनीत काम करणारा एखादा कर्मचारी नकळतपणे आपल्याला त्यांना कशाची गरज भासते हे सांगून जातात. काहीजण थेट आपल्याला एखादे प्रोडक्ट विकायला सुरू करण्याची ऑफर देतात. काही जण त्यांना जाणवलेल्या पण त्यांना शक्य नसलेल्या अनेक व्यवसाय संधी आपल्याला सांगत असतात. गरज असते, ती या लोकांशी चर्चा करण्याची. संवादातून उत्तरे मिळत जातात. चर्चेतून नवनव्या गोष्टी माहित होत जातात. यातूनच पुढे आपला व्यवसाय उभा राहू शकतो आणि यातूनच आपला व्यवसाय सेट होऊ शकतो…
व्यवसाय साक्षर व्हा…
उद्योजक व्हा…
समृद्ध व्हा…
_
© श्रीकांत आव्हाड
७७४४०३४४९० (WhatsApp Only)
Business Consultant
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम
All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील