यशात सातत्य ठेवायचे असेल तर ग्राहकाच्या भूमिकेतून आपल्या व्यवसायाचे आकलन करत रहा


लेखक : श्रीकांत आव्हाड
======================

प्रत्येक वेळेस तुमचे आणि तुमच्या ग्राहकांचे विचार सारखेच असतील असे नाही. कदाचित तुम्ही जो विचार करताय त्याच्या एकदम विरुद्ध विचार तुमचे ग्राहक करत असतील. अशावेळी तुमचा व्यवसाय चांगल्या प्रकारे चालणे कठीणच असते. आपले आपल्या विचारांवर प्रेम असल्यामुळे कित्येकदा आपण इतरांच्या नजरेतून आपल्या व्यवसायाकडे पाहू शकत नाही, आपल्या व्यवसायाचे, सेवेचे, उत्पादनाचे, आकलन करू शकत नाही. यामुळे आपल्या व्यवसायात सुधारणा होण्याची शक्यता कमी होत जाते. पण ग्राहक सतत आपले निरीक्षण करत असतो, तो सतत आपल्याला जोखत असतो, आपली इतर व्यावसायिकांशी तुलना करत असतो, आपल्या उत्पादनाची, प्रेझेन्टेशन ची सतत दखल घेत असतो.

म्हणूनच व्यवसायात यशस्वी व्हायचे असेल तर ग्राहकाच्या भूमिकेत शिरा. स्वतःला ग्राहकाच्या मानसिकतेमधे न्या. ग्राहक म्हणून तुम्हाला तुमच्याच व्यवसायाकडून काय अपेक्षित आहे याचा अभ्यास करा. ग्राहकाला काय हवय, त्याची अपेक्षा काय आहे, त्याची मानसिकता कशी आहे अशा विविध अंगांनी अभ्यास करून आपल्या व्यवसायात योग्य ते फेरबदल केले तर तुम्ही तुमच्या ग्राहकांच्या मनावर राज्य गाजवू शकता.

सोपे उदाहरण पाहू…
तुमचे किराणा शॉप आहे. मागच्या पंधरा वर्षांपासून शॉप सुरु आहे. सुरुवातीला पाच सात वर्षे शॉप चांगले चालू होते, पण मागच्या पाच सहा वर्षांपासून धंदा सतत कमी होत आहे. याचे कारण तुम्हाला सापडत नाहीये. माल गुणवत्तेचा आहे, दरही योग्य आहेत, सेवासुद्धा चांगली आहे, इतक्या वर्षाच्या ओळखी आहेत, तरीही व्यवसाय का कमी होतोय असा प्रश्न तुम्हाला पडेल. आणि आता किराणा शॉप मध्ये विशेष धंदा राहिला नाही अशा मानसिकतेमध्ये तुम्ही जाल…
पण आता त्या किराणा दुकानातून मधून बाहेर येऊन आपल्याच दुकानाचे तटस्थपणे निरीक्षण करा… तुमच्या लक्षात कित्येक बाबी येतील.

दुकानात पंधरा वर्षात थोड्याफार लहानशा सुधारणा केल्या असतील इतकेच त्याव्यतिरिक्त जास्त काही बदल केलेले नाहीत. याचवेळी मार्केटमधे कित्येक नवीन किराणा दुकान सुरु झाले आहेत. त्यांची रचना तुमच्या दुकानापेक्षा जास्त आकर्षक आहे हे तुम्हाला जाणवेल. तुम्ही सतत तुमच्या दुकानात असल्यामुळे तुम्हाला त्यातील प्रत्येक वास्तूचे प्रेझेन्टेशन योग्यच असल्याचे जाणवत असेल, पण आता आपल्या दुकानापेक्षा इतर नवीन किराणा दुकानांनी खूप चांगल्या कलात्मक पद्धतीने आपली दुकाने सजविली आहेत हे तुम्हाला जाणवेल… आणि तुमच्या व्यवसायात कमी आल्याचे कारण तुम्हाला सापडेल.

जे तुमच्याकडे मिळतंय तेच इतरांकडेही त्याच रेट मधे मिळतंय… मग अशावेळी ग्राहक तुमच्या जुन्या पुराण्या, तोच-तोचपणा आलेल्या दुकानात जाण्याऐवजी नव्या प्रसन्न दुकानात जाण्याला प्राधान्य देत आहेत हे तुमच्या लक्षात येईल. ग्राहक नेहमी नव्याकडे आकर्षित होत असतो. त्याला सतत काहीतरी नवीन हवे असते. तो नेहमीच प्रसन्न जागेच्या शोधात असतो. थोडक्यात तुम्हाला स्पर्धेत टिकून राहायचे असेल तर आपल्या दुकानाच्या प्रेझेन्टेशन मधे मोठ्या प्रमाणावर बदल करावे लागतील हे लक्षात येईल, सोबतच इतरांपेक्षा पुढे राहायचे असेल तर जे इतर दुकानदार देत नाहीत असे काहीतरी वेगळे द्यावे लागेल हेसुद्धा लक्षात येईल…. पण हे कधी लक्षात येईल? ज्यावेळी तुम्ही तटस्थपणे, ग्राहकाच्या भूमिकेत शिरून आपल्याच व्यवसायाचे निरीक्षण करता त्यावेळी….

म्हणून व्यवसायात यशस्वी व्हायचे असेल तर सतत ग्राहकाच्या भूमिकेत जाऊन, ग्राहकाच्या मानसिकतेचा अभ्यास करून, त्याला काय हवंय याचा अंदाज घेऊन आपल्या व्यवसायात त्याप्रमाणे बदल करत राहा. ग्राहक कधीही तुमच्यापासून दुरावणार नाही.

आपल्यासाठी आपला व्यवसाय दररोजचा डोळ्यासमोर असतो, त्यामुळे त्यात काही बदलांची आवश्यकता आहे, सुधारणांची आवश्यकता आहे हे आपल्या लक्षात येत नाही. पण जेव्हा आपण ग्राहकाच्या नजरेतून आपल्या व्यवसायाचे आकलन करायला सुरुवात करतो तेव्हा बऱ्याचश्या गोष्टी राहून गेल्याचे जाणवायला लागते. आपणच आपल्या चुका शोधणे फायद्याचे ठरते.

व्यवसाय साक्षर व्हा…
उद्योजक व्हा…
समृद्ध व्हा…

_

© श्रीकांत आव्हाड
७७४४०३४४९० (WhatsApp Only)

Business Consultant

www.ShrikantAvhad.com

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील


Shrikant Avhad

संस्थापक - उद्योजक मित्र Entrepreneur, Consultant, Writer, Speaker...

View all posts by Shrikant Avhad →

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!