लेखक : श्रीकांत आव्हाड
======================
चेहऱ्यावर स्मित असेल आणि बोलण्यात नम्रता असेल तर तुमची एखादी चुकही खपून जाते. ग्राहक गुणवत्तेमधे थोडीशी तडजोडी करतो.
पण उग्रट किंवा तिरसट बोलणे, चेहऱ्यावर त्रासदायक भाव असतील तर तुम्ही कितीही काही केलं तरी ग्राहक तुमच्यापासून लांब जातो.
प्रत्येक गोष्ट पैशात मोजली जात नाही. ग्राहक फक्त पैसाच पाहतो, त्याला बाकी कशाचे देणेघेणे नसते असे बिलकुल नाही.
ग्राहक ज्याच्याशी मानाने जोडला जातो, कनेक्ट होतो त्याच्याकडेच जातो.
आपलेच कित्येक ओळखीचे दुकानदार असतात, आपली नेहमीची शॉपिंग त्यांच्याकडेच होते. कित्येकवेळा आपण गुणवत्ता किंवा किमतीमधील लहानसा फरक सोडून देतो, कारण आपले त्यांच्याशी संबंध चांगले असतात. आपण त्यांच्याशी मानाने जोडले गेलेलो असतो.
बऱ्याचदा ग्राहक फक्त व्यवसायाशी किंवा व्यवसायाच्या नावाशी जोडले न जाता व्यावसायिकाशी सुद्धा जोडले जातात. ग्राहकांना तो व्यावसायिक समोर हवा असतो. इतरांच्या हातून त्यांना व्यवहार करण्यात स्वारस्य नसतं.
माझ्या ओळखीचा एक व्यावसायिक होता. शॉप होतं त्याच एक. चांगलं चालत होत. दिवसभर स्वतः दुकानात बसलेला असायचा. वागण्या बोलण्यात एकदम गोड स्वभाव. समोरच्याला भुरळच पाडायचा. ग्राहकांशी त्याची चांगली दोस्ती जमायची. ग्राहक त्याच्याशी चांगले जोडले गेलेले होते. हळूहळू धंदा वाढत गेला, आणि त्याच लक्ष इतर ठिकाणी वळायला लागलं. दुकानात कामगार ठेवले. आणि स्वतः बाहेर फिरायला लागला. कित्येक वेळा तर उगाचच कुठेतरी भटकत राहायचा. मित्रांकडे जाऊन तासनतास बसून रहायचा. सकाळी तासभर आणि संध्याकाळी तासभर दुकानावर बसायचा फक्त. दुकानावर सगळा कारभार कामगारांच्या हाती सोपवला असावा अशी परिस्थिती निर्माण झाली. ग्राहक यायचे तो आहे का विचारायचे, कामगाराने सर बाहेर गेलेत म्हटलं कि ग्राहक पुन्हा माघारी जायचा. काय हवंय विचारलं तरी ग्राहक म्हणायचा काही नाही, पुन्हा येईल मी. आणि निघून जायचा. एक वेळ अशी आली कि तो दुकानावर दिसणंच बंद झालं. ग्राहकांना तो हवा असायचा आणि त्याला मात्र ते ग्राहक नकोशे झाले होते, किंवा त्या दुकानात बसून एक एक प्रोडक्ट विकणं त्याला आता खालच्या दर्जाचं काम वाटायला लागलं होतं. शेवटी ग्राहक येणंच कमी झालं. कारण एखाद्या कर्मचाऱ्यालाच काही काम सांगायचं आहे तर इथे शेकडो दुकाने आहेत, याच्याकडे जाण्याची गरजच नाही… हळू हळू व्यवसाय कमी होत गेला, तो कर्जात अडकत गेला. अणि शेवटी व्यवसाय बंद झाला…
ग्राहक आपल्या व्यवसायाशी कोणत्या विचारधनेने जोडला गेला आहे हे नेहमी लक्षात घ्यायचं असत. तो ज्या गोष्टीसाठी आपल्याशी जोडला गेला आहे ती गोष्ट कधीच बदलायची नाही. बदलायची झाली तरी ती प्रक्रिया अशा पद्धतीने राबवावी कि त्याचा ग्राहकावर काही परिणाम होणार नाही, किंवा त्यांची त्या बदलाची मानसिकता तयार होईल. त्यांना जे हवंय ते त्यांना मिळालंच पाहिजे. त्या व्यावसायिकाच्या बाबतीत पाहता ग्राहकाला फक्त प्रोडक्ट नको असायचं, ग्राहकाला ते प्रोडक्ट त्या विक्रत्याच्या हातूनच घेण्यात स्वारस्य असायचं. ज्यादिवशी तो विक्रेता ग्राहकांना भेटेनासा झाला त्यादिवसापासून ग्राहकांच त्या व्यवसायातलं स्वारस्य संपायला लागलं. आणि त्यांच्या स्वारस्यासोबत व्यवसायही संपायला लागला… हा प्रकार खास करून रिटेल व्यवसायात होतो. पण इतर व्यवसायातही जर व्यावसायिकाचा, उद्योजकाचा ग्राहकांशी संबंध येत असेल आणि ग्राहकांना त्यांची सवय झालेली असे तर तिथेही याबाबतीत दक्ष राहणे आवश्यक असते.
ग्राहक आपल्या व्यवसायाशी मनाने जोडला जायला हवा. तुमच्याशी व्यवहार करताना त्याला आपलेपणाची जाणीव व्हायला हवी. हे बॉण्डिंग जेवढं जास्त टिकेल आणि वाढेल व्यावसाय तेवढाच वाढत जाईल.
व्यवसाय साक्षर व्हा…
उद्योजक व्हा…
समृद्ध व्हा…
_
© श्रीकांत आव्हाड
७७४४०३४४९० (WhatsApp Only)
Business Consultant
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम
All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील