सध्याच्या अडचणीच्या काळात व्यावसायिकांसाठी उपयुक्त ठरतील अशा काही टिप्स


सध्या व्यवसायिकांना अनंत अडचणींतून जावे लागत आहे. व्यवसायांवर मर्यादा आल्या आहेत. यामुळे आर्थिक अडचणी जाणवायला लागल्या आहेत. ठराविक काळाने मंदीचा असा एखादा सिझन येतंच असतो. पण सध्याची परिस्थिती जास्तच त्रासदायक आहे. अशावेळी आर्थिक आघाडीवर काही गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक आहे, ज्यामुळे हे संकट थोडे कमी होऊ शकते. तसेच मानसिक स्तरावर सुद्धा आपण स्थिर असणे आवश्यक आहे.

या काही उपयुक्त टिप्स आपल्या उद्योजक मित्रांसाठी उपयुक्त ठरतील अशी अपेक्षा आहे…

१. आपल्या खर्चावर नियंत्रण मिळवा.
आपल्या खर्चाची यादी बनवा. कुठेकुठे किती खर्च होतोय याचा अंदाज घ्या. प्रत्येक ठिकाणी दहा वीस टक्के बचत कशी करता येईल ते पहा. हे आपल्या व्यवसायातल्या कॉस्ट कटिंगप्रमाणेच आहे. सगळी मिळून महिण्याकाठी ५-१०% बचत जरी करता आली तरी खूप मोठी गोष्ट आहे.

२. व्यवसायात उधारी शक्यतो टाळा.
मंदीच्या काळात उधाऱ्या थकत जातात. अशावेळी आपल्या ग्राहकांनी थकवली तर नाहक आर्थिक दडपण वाढते. शक्यतो उधारीचे व्यवहार टाळा. उधारीशिवाय पर्याय नसेल तर मागचे पेमेंट क्लिअर झाल्याशिवाय नवीन उधारी करू नका.

३. कुटुंबाशी चर्चा करा.
आर्थिक संकट समजावून सांगा. घरात आर्थिक विषयांवरून वाद होणार नाहीत याची काळजी घ्या. कुटुंबीयांचा अनावश्यक किंवा कमी महत्वाचा खर्च कमी करण्याचा प्रयत्न करा. पुढचे काही महिने याच परिस्थितीतून जायचे आहे याची जाणीव कुटुंबियांना करून द्या.

४. उधारी वसुली चालू ठेवा.
उधारीच्या ग्राहकांकडे सतत पाठपुरवठा करत रहा. ते अडचण सांगत आहेत म्हणून तुम्ही शांत बसू नका. प्रत्येकाकडून थोडे थोडे पेमेंट क्लिअर करण्याचा प्रयत्न करत रहा.

५. पैशांची उभारणी करणे आवश्यक असेल आणि त्यासाठी आपली एखादी गुंतवणूक विक्री करण्याचे विचारात असेल तर असे न करता त्यावर कर्ज घेण्याचा प्रयत्न करावा. सोने, शेअर्स, स्थावर मालमत्ता यावर कर्ज मिळू शकते.

६. सध्याच्या परिस्थितीकडे पाहता आपले हेल्थ इंश्युरन्स काढून घ्या. किमान २-२ लाख कव्हर असणारे कोरोना इंश्युरन्स काढून घ्या. कुटुंबासाठी ५-६ हजारपेक्षा जास्त खर्च येणार नाही.

७. संशयी व्यवहार असणाऱ्या बँकात, पतसंस्थांत किंवा इतर फायनान्शिअल संस्थांकडे आपले जास्त पैसे ठेऊ नका. विश्वासार्ह बँकेतच पैसे ठेवा. सध्याच्या परिस्थितीत येत्या काळात अंतर्गत भ्रष्टाचार बोकाळलेल्या फायनान्शिअल संस्था अडचणीत येऊ शकतात.

८. घरगुती स्तरावरून आपला व्यवसाय चालू ठेवता येतोय का पहा. ते शक्य असल्यास चालू ठेवा. थोडासा पैसा फिरता राहिला तरी बरे वाटेल. निराशा येणार नाही. आणि कामात गुंतून रहाल.

९. अनावश्यक निराशात्मक चर्चा करणाऱ्यांच्या संगतीत राहू नका.
सध्याच्या परिस्थिकडे पाहता अशा संगतीचा जरा जास्तच वाईट परिणाम होऊ शकतो. टीव्हीवर सतत कोरोनाच्या बातम्या सुद्धा पाहू नका. सोशल मीडियावर सतत निराशात्मक, आणि राजकीय पोस्ट करणारे मित्र ३० दिवसांसाठी म्यूट करा. सोशल मीडियावरील भांडण तंट्यापासून दूर रहा. वादविवादात सरळ माघार घेऊन विषय संपवून टाका. चांगल्या चर्चांकडे लक्ष्य द्या. स्वतःला चांगल्या कामात गुंतवून घ्या. चांगले माहितीपर नेटवर्क जोडा. ज्ञानवर्धक माहितीवर भर द्या.

१०. पुस्तक वाचनात स्वतःला गुंतवून घ्या.
शिवाजी महाराजांचे चरित्र वाचा. शिवाजी महाराज अडचणीतून मार्ग कसे काढायचे ते शिकवतात. मराठ्यांचे स्वातंत्र्ययुद्ध हे पुस्तक आवर्जून वाचा. कितीही संकटे आली तरी प्रवास मध्यावर न सोडता यशस्वी कसं व्हायचं हे या पुस्तकातून अनुभवायला मिळेल.
विस्टन चर्चिल, फ्रँकलिन रुझवेल्ट, इंदिरा गांधी, नेताजी सुभाषचंद्र बोस, बाबासाहेब आंबेडकर अशा महापुरुषांचा इतिहास वाचा. यांनी प्रचंड अडचणींमधून स्वतःला घडवले आहे. आपल्यासाठी नक्कीच प्रेरणादायी असेल.
कृष्णावरील पुस्तके वाचा. कृष्ण आपल्याला कोणत्याही परिस्थितीत शांत राहण्यासाठी मार्गदर्शन करतो.
वाचन शक्य नसल्यास व्हिडीओ बघा. पण हे व्हिडीओ मोटिव्हेशनल लेक्चरच्या पॅटर्न मधे नसावेत. हे व्हिडीओ पुस्तकांचे व्हिडीओ रूपांतर वाटेल अशा प्रकारचे असावेत. शांत आवाजात, स्पष्ट शब्दांत आपल्याला माहिती देणारे.

११. मन शांत ठेवा. तणावात राहू नका.
मनावर कसलाही ताण येत असेल तर लगेच स्वतःला कशातरी गुंतावून घ्या. घरात चिडचिड करू नका. कुटुंबियांवर रागावू नका.घरात वादविवाद होणार नाहीत याची काळजी घ्या. कुटुंबात वादविवाद झाले तरी माघार घेऊन विषय संपवा. कुटुंबात मानापमान नसतो. सगळे आपलेच असतात. लहान मुलांवर चिडू नका. अतिशय शांत रहा. कोणत्याही परिस्थितीत राग येणार नाही याची काळजी घ्या. रागावर चिडचिडेपणावर नियंत्रण मिळवा.कामाच्या ओझ्याखाली मागे पडलेले छंद पुन्हा जोपासता येतील का पहा. आवडीची कामे करा. कॉमेडी शो पहा. चित्रपट पहा. कोणत्याही परिस्थितीमधे स्वतःला तणावापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करा.

व्यक्त व्हा आणि तणावातून मुक्त व्हा…
माणसाला आपले मन मोकळे करण्याची जागा हवी असते. ती जागा शोधा आणि तिथे मन मोकळे करत चला. कुटुंबातील मित्रपरिवारातील काहींजवळ आपले मन मोकळे करता येऊ शकते. बिनधास्त व्यक्त व्हा. मला पेजवर अनेक मेसेज येतात. सध्याच्या काळात डिप्रेशनमधे जाण्याची शक्यता असलेले अनेक जण आहेत. पण थोडीफार चर्चा झाली कि पुन्हा काही दिवसांसाठी तयार होतात. साध्याची परिस्थिती कधी ना कधी संपणार आहेच. पण यामुळे आपले व्यावसायिक आयुष्य धोक्यात येणार नाही याची काळजी घ्या.

१२. व्यवसायातून बाहेर येण्याचा विचार करू नका.
बाहेरही कुठे काहीही कामे मिळणार नाहीत. व्यवसायात नवीन काही कमी गुंतवणुकीत सुरु करता येईल का याचा विचार करा. पण हे नवीन असे असावे ज्याच्यातून लगेच उत्पन्न यायला सुरुवात होऊ शकते. मोठी गुंतवणूक आणि वर्षभराने परतावा असे काही सध्या नको.

१३. पैशाची कमतरता असेल तर सध्या व्यवसायात मोठ्या गुंतवणुकी टाळा.
मार्केट काही काळ असेच चालले तर अडचणीत याला .पुरेशी गुंतवणूक हाती असेल तर एखादे स्टार्टअप सुरु करायला हरकत नाही. सध्याच्या परिस्थितीनुसार पुढे कशाला मार्केट असू शकते याचा विचार करून एखाद्या व्यवसायाची सुरुवात करू शकता. आत्ता मार्केटिंग होऊन जाईल व काही महीन्यात मार्केट सुरळीत झाल्यावर प्रतिसाद चांगला मिळेल.

१४. आर्थिक अडचण आहे म्हणून सावकारी कर्ज घेऊ नका.
अवाजवी व्याजाने पैसे उचलू नका. एक अडचण कमी करण्याच्या नादात मोठी अडचण अंगावर घेऊन बसाल.

१५. आपल्या सर्वानाच या संकटातून पुढे सुरक्षितरित्या बाहेर पडायचे आहे. त्यामुळे शांत डोक्याने सगळी कामे करा. गडबडून जाऊ नका. गोंधळून काही चुकीचे निर्णय घेऊ नका. योग्य अयोग्यतेचा सर्व बाजूंनी विचार करून निर्णय घ्या. कुणाच्या अवाजवी आश्वासनांवर भुलून पैसा कमावण्यासाठी चुकीच्या मार्गांवर जाऊ नका. आपल्या एकूण आयुष्यातील एखादे वर्ष म्हणजे खूप लहानसा हिस्सा आहे. या लहानश्या कालावधीसाठी संपूर्ण आयुष्य पणाला लावू नका.

या काही प्राथमिक टिप्स आहेत सध्याच्या अडचणीच्या काळात टिकून राहण्यासाठी.या टिप्स ताशा सामान्यच आहेत, मी काही मानसोपचार तज्ञ नाही, त्यामुळे जे सामान्य मनाला वाटेल ते सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आपापल्या परीने सध्याच्या परिस्थितीवर नियंत्रण निळविण्याचा प्रयत्न करा. प्रत्येकालाच अडचणी आहेत, सर्वच लहान मोठे व्यावसायिक सध्या सारख्याच संकटातूनच जात आहेत. त्यामुळे एकमेकांची उणीदुणी काढत बसण्यापेक्षा पुढचा प्रवास सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करत राहणे सर्वांच्याच हिताचे आहे.

स्थिर रहा, खंबीर रहा, शांत रहा आणि निश्चयी रहा…

व्यवसाय साक्षर व्हा…

_

© श्रीकांत आव्हाड
७७४४०३४४९० (WhatsApp Only)

Business Consultant

www.ShrikantAvhad.com

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील


Shrikant Avhad

संस्थापक - उद्योजक मित्र Entrepreneur, Consultant, Writer, Speaker...

View all posts by Shrikant Avhad →

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!