व्यवसायाची सुरुवात कशा प्रकारे करावी याबद्दल थोडक्यात माहिती


लेखक : श्रीकांत आव्हाड
======================

व्यवसाय सुरु करायचा विचार केल्यानंतर कित्येक प्रश्न आपल्यासमोर आ वासून उभे असतात. यातील सर्वात महत्वाचा प्रश्न असतो तो म्हणजे सुरुवात कशी करावी आणि यांनतर पडणारा प्रश्न म्हणजे व्यवसाय सुरु करायचा म्हणजे काय काय करावे लागते ?

बऱ्याचदा काही स्टेप मागे पुढे झाल्यामुळे किंवा विसरल्यामुळे व्यवसाय सुरु करण्यात उशीर होतो, आणि अर्थातच यामुळे आपलेच नुकसान होते.
व्यवसायाची पार्श्वभूमी नसल्यामुळे हा गोंधळ उडणे स्वाभाविक आहे. पण जर व्यवसायाचे टप्पे काळजीपूर्वक अभ्यासले आणि त्यावर योग्य काम केले तर तुम्हाला व्यवसाय करताना काहीच अडचण येणार नाही. 

म्हणूनच मी तुम्हाला व्यवसाय सुरु करतानाचे टप्पे इथे थोडक्यात सांगत आहे. यात टप्प्यांत कुठेही टेक्निकल ज्ञान नाही, तर फक्त प्रत्यक्ष काम करताना कशा प्रकारे पायऱ्या पार कराव्यात याची माहिती आहे. 

१. व्यवसाय निवड व सर्व्हे 
योग्य व्यवसाय निवड हि व्यवसायाची पहिली पायरी असते. तुमची गुंतवणूक, अनुभव, शिक्षण, क्षमता इ. बाबी पाहून योग्य व्यवसाय निवडावा. तुम्हाला मार्केटमधे काय विकणे शक्य आहे याच अभ्यास करून व्यवसाय निवडावा. इतरांच्या सांगण्यावरून व्यवसाय निवडू नका.

यांनतर लगेच स्थानिक परिसरात निवडलेल्या व्यवसायासंदर्भात सर्व्हे करावा. या सर्व्हेमध्ये आपल्या परिसरात अपेक्षित ग्राहक किती आणि कोणकोणते आहेत, प्रोडक्ट ला मागणी कशी आहे, मार्केट ला यात नवीन काय हवंय अशी माहिती गोळा करावी

२. व्यवसाय नोंदणी 
व्यवसायाच्या रचनेनुसार व्यवसायाची योग्य नोंदणी करणे आवश्यक असते. मॅन्युफॅक्चरिंग व सर्व्हिस व्यवसायासाठी उद्यम नोंदणी करावी. रिटेल शॉप असेल तर शॉप अॅक्ट नोंदणी, पार्टनरशिप फार्म, LLP, Pvt. Ltd. असे विविध प्रकार यात येतात. आपल्या व्यवसायासाठी कोणती नोंदणी आवश्यक आहे याची माहिती घेऊन नोंदणी करावी

३. लायसन्स व सर्टिफिकेट्स 
तुम्ही निवडलेल्या व्यवसायासाठी कोणकोणते लायसन्स लागतात याची माहिती घेऊन त्यासाठी योग्य ते अर्ज करावेत. प्रदूषण नियंत्रण मंडळ, अन्न व औषधे प्रशासन, वजन माप निरीक्षक अशा विविध खात्यांच्या परवानग्या लागू शकतात, व ते प्रोडक्ट वर ठरते.

आवश्यकता असेल तर सर्टिफिकेट्स मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत (लॅब सर्टिफिकेट्स, ISO ई.).

४. कायदेशीर पूर्तता 
व्यवसायासाठी आवश्यक त्या सर्व कायदेशीर बाबींची माहिती घेऊन त्याची पूर्तता करावी. यासाठी एखाद्या कायदेशीर सल्लागाराची / वकिलाची मदत घ्यावी. 
दोन चार हजार वाचवण्यासाठी वकिलाला टाळल्याने तुम्ही मोठ्या कायदेशीर अडचणीत सापडू शकता. व्यवसायात एखादा वकील कायम सोबत असावा.
तुम्ही कोणते क्षेत्र निवडले आहे यावर पुढचे टप्पे ठरतात..

तुम्ही रिटेल शॉप सुरु करण्याचे ठरवले असेल तर एखाद्या चांगल्या लोकेशनला शॉप शोधा, शॉप चांगल्या प्रकारे डिझाईन करा, मालाचे व्होलसेलर्स शोधा, चांगले ओपनिंग करा… तुमचा रिटेल व्यवसाय सुरु होईल

तुम्ही एखादी सर्व्हिस इंडस्ट्री निवडली असेल तर त्यासाठी एखादे चांगल्या लोकेशन ला शॉप अथवा ऑफिस शोधा. ऑफिस चांगले सेटअप करून चांगल्या प्रकारे ओपनिंग करा. अपेक्षित ग्राहकांपर्यंत जाणे गरजेचे असेल तर लगेच जाहिरात आणि मार्केटिंग ला सुरुवात करा.

जर तुम्ही उत्पादन क्षेत्र म्हणजेच (Manufacturing Industry) निवडले असेल तर पुढील स्लाईड्स, व्यवसाय सुरु करताना कशा प्रकारे स्टेप्स घ्याव्यात यासंबंधी आहेत.

(येथून पुढचे टप्पे हे मुख्यत्वे उत्पादन अथवा सर्व्हिस इंडस्ट्रीसाठी आहेत. जर तुम्ही एखादे शॉप सुरु करणार असाल तर सेटअप करणार असाल तर सर्व कपूर्तता झाल्यानंतर चांगले शॉप सेटअप करून मालाची उपलब्धता करून विक्री सुरु करावी. ट्रेडिंग किंवा रिसेलिंग करणार असाल तर याच प्रकरे मालाची उपलब्धता करून ग्राहकांपर्यंत पोहोचायला सुरुवात करावी.)

५. सबसिडी 
जर तुमचा प्रोजेक्ट PMEGP किंवा CMEGP अंतर्गत येत असेल तर संबंधित विभागाच्या वेबसाईट वर जाऊन सबसिडी साठी ऑनलाईन अर्ज करावा. हा अर्ज व्यवसाय सुरु करण्याआधी करणे आवश्यक असते. यानंतर बँक कर्ज मंजूर होऊन कालांतराने सबसिडी मिळते.
तसेच या सोबतच आणखीही सबसिडी स्कीम असतात, परंतु त्या व्यवसाय उभा राहिल्यानंतर क्लेम कराव्या लागतात. यासाठी योग्य सल्लागाराची मदत घेतल्यास उत्तम

सबसिडी फक्त उत्पादन व सर्व्हिस क्षेत्रातील व्यवसायांना मिळते. रिटेल शॉप ला सबसिडी नसते. सर्व्हिस क्षेत्रासाठी सुद्धा खूप कमी प्रमाणात सबसिडी आहे. सबसिडीचा मुख्य फायदा उत्पादन क्षेत्रासाठीच होतो

सबसिडी, कर्ज घेतले असेल तरच मिळते हे. सबसिडी हा फायदा नसून सरकार कर्जाचे व्याज आपल्याला अप्रत्यक्षपणे परत देते आणि आपला आर्थिक भर थोडा हलका करतं इतकाच हिशोब आहे. त्यामुळे सबसिडीसाठी व्यवसाय करू नका.

६. मशिनरी स्रोत 
उत्पादन क्षेत्र म्हटले कि मशीनच्या आल्याच. बऱ्याचदा मशिनगी शोधण्यात गडबड होते. यात काळजीपूर्वक काम करावे. विचारपूर्वक मशिनरी सप्लायर्स शोधावेत. मशिनरी सप्प्लायर्स ची माहिती घेऊन त्यांना भेट द्यावी. मशिनरींची माहिती घ्यावी व कोटेशन्स घ्यावेत. सप्प्लायरने आधी कुठे कुठे मशिनरी विकलेल्या आहेत याची माहिती घ्यावी, तिथे जाऊन विक्री पश्चात सेवा कशी आहे याची माहिती घ्यावी. मशीन दरात चांगली बार्गेनिंग करा. तीन चार विक्रेत्यांना भेटी देऊन चांगले मशीन निवडावे.

मशिनरी पुरवठादारांची चांगली माहिती घेऊनच व्यवहार करावा. यात फसवणुकीचे प्रमाण खूप आहे. चांगले रेकॉर्ड असलेले विक्रेते शोधावेत.

७. कच्चा माल स्रोत 
कच्च्या मालाचा पुरवठा कसा होणार याचा अभ्यास करावा. पुरवठादारांची माहिती घेऊन ठेवावी. कोटेशन घेऊन ठेवावेत.
कच्च्या मालाचे गुणवत्तेचे भरपूर प्रकार असू शकतात. त्यानुसार याची खोलवर माहिती घ्यावी. कोणत्या मालाचा दर किती आहे याची माहिती घ्यावी  

पुरवठादार सुरुवातीला मोठा माल घ्यायला सांगतात, परंतु सुरुवातीला जास्त खरेदी करू नका. कंपनीला नेहमीच माल लागणार आहे, सध्या पायलट लॉट द्या असे सांगून सुरुवातील, डिस्काउंट रेट मधेच, थोडाच माल उचलावा, पैसा खेळता ठेवावा.

८. प्रोजेक्ट रिपोर्ट 
कर्ज घ्यायचे असेल तर प्रोजेक्ट रिपोर्ट आवश्यक असतो. प्रोजेक्ट रिपोर्ट साठी मशिनरी, कच्चा माल कोटेशन्स आवश्यक असतात.

प्रोजेक्ट रिपोर्ट बनविण्यासाठी CA ची मदत घेऊ शकता. शक्यतो CA अप्रुव्हड रिपोर्टच मान्य केला जातो. प्रत्येक प्रोजेक्ट चा प्रोजेक्ट रिपोर्ट वेगवेगळा असतो. तयार प्रोजेक्ट रिपोर्ट मिळण्याचे प्रमाण खूप कमी आहे. काही लघुद्योगांसाठी फक्त तयार प्रोजेक्ट रिपोर्ट मिळू शकतात

९) कर्ज
प्रोजेक्ट रिपोर्ट बनवून झाल्यानंतर (PMEGP किंवा CMEGP अंतर्गत अर्ज केला असेल तर सब्सिडिचे चे अप्रूव्हल आल्यानंतर) बँकेकडे कर्जासाठी अर्ज करावा. 

एका भेटीत कोणतीही बँक कर्ज मंजूर करत नाही. कर्जासाठी तुम्हाला भरपूर पाठपुरवठा करावा लागतो. नेहमी बँक मॅनेजर ला भेटण्याचा प्रयत्न करावा.
कर्ज हा आपला हक्क नसून गरज आहे, त्यामुळे कर्ज द्यायचे कि नाही हा सर्वस्वी बँकेचा निर्णय असतो. बँक सरसकट कर्ज वाटायला बांधील नाही. तुमची चिकाटी पाहून बँकेला तुम्हाला खरंच कर्जाची आवश्यकता आहे असे वाटले तर बँक कर्ज देते.

कर्जासंबंधी थोडे विषयांतर…
शक्यतो व्यवसायाची सुरुवात कोणतेही कर्ज न घेता करण्याचा प्रयत्न करावा. यासाठी सुरुवातीला ट्रेडिंग करून मार्केट तयार करण्याचा प्रयत्न करावा. कर्ज म्हणजे व्यवसाय नाही हे लक्षात ठेवा.

सुरुवात कर्जानेच करावी असा काही नियम नाही. उलट कर्जाच्या हफ्त्यांच्या ओझ्यामुळे तुमचे व्यवसायाकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता असते. माझा सल्ला असेल कि तुम्ही सुरुवात कोणतेही कर्ज न घेता करावी. स्वतःचे मार्केट तयार करावे. किमान तीन वर्षे व्यवसाय चांगला करावा आणि ज्यावेळी आर्थिक अडचणीतही तुम्ही हफ्ते फेडू शकता याची खात्री पटेल त्यावेळी व्यवसाय वाढीसाठी कर्ज घेण्याचा प्रयत्न करावा.

१०. बांधकाम 
बँकेकडून कर्ज मंजूर झाल्यानंतर कारखान्याचे बांधकाम सुरु करावे. बांधकामावर स्वतः लक्ष द्यावे.

११. मशिनरी इन्स्टॉलेशन 
बांधकाम सुरु करतानाच मशिनरींची ऑर्डर द्यावी. बांधकाम होईपर्यंत मशिनरी बनवून तयार होतात. मशिनरी इन्स्टॉलेशन करून घ्यावे 

१२. पॅकिंग मटेरियल 
पॅकिंग मटेरिअलची उपलब्धता करावी. काही सप्लायर्स कडून कोटेशन घेऊन त्यातून चांगला सप्लायर निवडावा. 

१3. कामगार व स्टाफ भरती 
कंपनी सेटअप होताना कामगार व स्टाफ भरती करून घ्यावी व त्यांना योग्य ते आवश्यक ट्रेनिंग द्यायला सुरुवात करावी.

१४. प्रोसेसिंग व पॅकिंग 
प्रोसेसिंग ची योग्य माहिती झाल्यानंतर प्रत्यक्ष उत्पादन घ्यायला सुरुवात करावी, पहिले पॅकिंग करताना योग्य काळजी घ्यावी, व त्यात काही बदल आवश्यक आहेत का याचाही अंदाज घ्यावा. 

सुरुवातीला काही ट्रायल घ्याव्या लागतात. त्यात बऱ्याच चुका होतात. त्या चुका सुधारून दोषमुक्त प्रोडक्ट मार्केट मध्ये आणावे लागते.
पण जोपर्यंत प्रोडक्ट परफेक्ट बनत नाही तोपर्यंत बाजारात आणू नये.

१5. मार्केटिंग व ब्रॅण्डिंग 
कारखान्याचे बांधकाम सुरु करतानाच मार्केटिंग व ब्रॅण्डिंग बद्दल तयारी सुरु करावी. अपेक्षित ग्राहक कोण कोणते असतील याची माहिती गोळा करावी.

लोगो डिझाईन, ट्रेड मार्क रजिस्ट्रेशन, मार्केटिंग मटेरियल, प्रोडक्ट डिझाईन याची पूर्तता करून घ्यावी. लोगो डिझाईन, प्रोडक्ट डिझाईन साठी तज्ज्ञांची मदत घ्यावी. योग्य प्रकारे जाहिराती सुरु करून मार्केटिंग सुरु करावी. प्रत्यक्ष विक्री सुरु होईपर्यंत तुमच्या ब्रँड ची माहिती लोकांपर्यंत पोहोचेल याची काळजी घ्यावी. 

१6. सबसिडी पूर्तता 
कंपनी पूर्णपणे उभी राहिल्यानंतर व काम सुरु झाल्यानंतर सबसिडी ची पूर्तता करून घ्यावी. यासाठी भरपूर कागदपत्रे आवश्यक असतात. शक्य झाल्यास कन्सल्टन्ट ची मदत घ्यावी. (PMEGP, CMEGP सबसिडी करिता कन्सलटंट ची गरज नाही, बँक पूर्ण कार्यवाही करते)

१7. टॅक्सेशन पूर्तता 
आवश्यक ते टॅक्स रजिस्ट्रेशन करून घ्यावे. उदा. GST ई. 

१8. विक्री सुरुवात 
आता प्रत्यक्ष विक्रीची सुरुवात होते. मार्केट चा पूर्ण सर्व्हे करून विक्रीची सुरुवात करावी. सेल्स प्रतिनिधींना योग्य मार्गदर्शन करावे. किमान एक सेल्स मॅनेजर नेमावा जो अनुभवी असेल. विक्री ची सुरुवात हि व्यवसायाची सर्वात महत्वाची पायरी असते. कारण आता फक्त यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक असते.
आयते ग्राहक मिळतील या आशेवर राहू नका. मार्केटमध्ये फिरा, अपेक्षित ग्राहकांशी संपर्क करा, आपला माल विकण्यासाठी प्रयत्न करा. शंभर जणांना भेटल्यावर जास्तीत जास्त १० जण (म्हणजे १०%) तुमचे प्रोडक्ट घ्यायला तयार होतील.. हा सेल्स चा स्टँडर्ड रेशो आहे.

  • विक्री सुरु झाल्यानंतर सहा महिने फक्त ग्राहक वाढवण्यावर भर द्यावा. नफ्या तोट्याचा हिशोब दूर ठेवावा. 
  • सहा महिन्यांनी प्रत्यक्ष व्यवसाय करताना येणाऱ्या अडी-अडचणींवर अभ्यास करून मार्ग शोधावा. योग्य आर्थिक ताळेबंद मांडावा. 
  • किमान दोन वर्षे आर्थिक फायद्याचा विचार न करता कंपनी कोणत्याही परिस्थित चालू राहील याची काळजी घ्यावी. 
  • कोणत्याही प्रकारे उधारीच्या चक्रात अडकू नका. मार्केट मध्ये उधारी आवश्यक असली तरी तुमच्या टर्नओव्हर च्या ४०% पेक्षा जास्त उधारी होणार नाही याची काळजी घेत राहा. 

हे तुमच्या व्यवसायासाठी काही महत्वाचे टप्पे आहेत. यावर योग्य अंमल केल्यास व्यवसाय सुरु करताना कोणतीही अडचण येत नाही. पण याचबरोबर
व्यवसाय कसा करावा याचेही ज्ञान घेणे आवश्यक असते. परंतु त्याबद्दल ठोकताळे पद्धतीने माहिती देणे शक्य नसते, कारण प्रत्येकासाठी व्यवसायाच्या स्ट्रॅटेजी वेगवेगळ्या असतात. याकरिता सल्लागाराची किंवा अनुभवी व्यक्तींची मदत घेतल्यास उत्तम. 

व्यवसाय साक्षर व्हा…
उद्योजक व्हा…
समृद्ध व्हा…

_

© श्रीकांत आव्हाड
७७४४०३४४९० (WhatsApp Only)

Business Consultant

www.ShrikantAvhad.com

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील


Shrikant Avhad

संस्थापक - उद्योजक मित्र Entrepreneur, Consultant, Writer, Speaker...

View all posts by Shrikant Avhad →

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!