असे घडवा आकर्षक व्यक्तिमत्व


लेखक : श्रीकांत आव्हाड
======================

व्यवसायात असताना आपले स्वतःचे प्रेझेंटेशन सुद्धा महत्वाचे असते. लोकांशी बोलताना, समाजात वागताना आपली देहबोली महत्वाची ठरते. नुसत्या देहबोलीच्या जोरावर आपले कितीतरी व्यवहार पूर्णत्वास जाऊ शकतात. त्यामुळे आपले व्यतिमत्व आकर्षक ठेवणे नेहमी आवश्यक असते. सुरुवातीचे प्रेझेंटेशन आपल्या वागण्या बोलण्यावर, देहबोलीवर ठरते आणि त्यानंतरचे आपल्या वैचारिक ठेवणीवर… इथे आपण आपल्या देहबोलीसंबंधी टिप्स पाहणार आहोत…

आपले व्यक्तिमत्व आकर्षक ठेवण्यासाठी काही महत्वाच्या टिप्स…

१. वेशभूषा
आपली वेशभूषा नेहमी चांगली असावी. मळके, चुरगळलेले कपडे अंगावर नसावेत. आसपासच्या वातावरणाशी, परिसराशी सुसंगत आपली वेशभूषा असावी. आपला ड्रेसकोड निश्चित करून घ्या. दरवेळी आपण सुटाबुटातच असायला हवे असे नाही. ड्रेसकोड म्हणजे आपला ड्रेसिंग चा पॅटर्न ठरवून घ्या. अगदी टीशर्ट जीन्स हाही ड्रेसकोड आहे. आपल्या ड्रेसकोड मधे जास्त बदल करू नका. लोकांना आपल्याला एका ठराविक पॅटर्न च्या वेषभूषेमध्ये बघण्याची सवय झालेली असते. त्याचा व्यवसायात चांगला फायदा होत असतो. कधीतरी वेगळा वेष परिधान करणे चालून जाते.

२. सकारात्मक विचारधारा
आपले विचार नेहमी सकारत्मक ठेवा. स्वभाव नेहमी आनंदी ठेवा. सकारात्मकतेने आणि आनंदी स्वभावाने चेहऱ्यावर नेहमी प्रसन्नता झळकत असते. प्रसन्न चेहरा नेहमी आकर्षक असतो. समोरच्याला आकर्षित करण्यासाठी प्रसन्न चेहरा फायद्याचा असतो. चेहऱ्यावरचे तेज हे नेहमीच साकारात्म विचारधारेने आणि आनंदी व समाधानी वृत्तीने येत असते.

३. हसतमुख चेहरा. संभाषण प्रतिसाद.
लोकांशी बोलताना चेहऱ्यावर हलकेसे स्मित असावे. संभाषण करताना समोरच्याला योग्य तो प्रतिसाद द्यावा. चर्चा करताना मोठ्या आवाजात न बोलता सौम्य आवाजात व सौम्य शब्दात संवाद साधावा…

४. संभाषणात सहजता ठेवा.
संभाषणात सहजता ठेवा. अवघड विषय जास्त लांबवू नका. समोरच्याला अवघड प्रश्न विचारू नका. वैयक्तिक विषय टाळा. तसेच समोरचा एखाद्या विषयावर अवघडत आहे असे वाटल्यास लगेच विषय बदला. अनावश्यक चर्चा करून कुणाला दुखवू नका. लोकांना तुमच्याशी चर्चा करताना आनंदच वाटेल अशा प्रकारे तुमचे व्यक्तिमत्व असले पाहिजे.

५. खांदे पडलेले नसावे, कुबड नसावे
आपले खांदे कधीही पडलेले नसावेत तसेच पाठीवर कुबड आल्यासारखे दिसू नये. उंच आणि हडकुळे लोकांच्या पाठीवर नेहमीच असे कुबड दिसते. यामुळे माणूस नेहमीच झुकल्यासारखा दिसतो. चालताना नेहमी ताठ, सरळ, समोर पाहून चालावे. यावर उपाय म्हणून दररोज थोडा तरी व्यायाम करावा. व्यायामाने शरीराचा बांधा आकर्षक होतो.

६. बोलताना नजर चुकवू नका
लोकांशी बोलताना नेहमी समोरच्याच्या डोळ्यात डोळे घालून बोलावे. नजर चुकवून बोलण्याने तुमच्या आत्मविश्वासाची कमतरता असल्याचा आभास होतो. डोळ्यात नेहमी आत्मविश्वास झळकला पाहिजे. पण आत्मविश्वासाच्या नादात मग्रुरी दिसणार नाही याची काळजी घ्या.

७. वाचन, सामान्य ज्ञान
वाचन सतत करत रहा. यामुळे ज्ञान वाढते, शब्दसंग्रह वाढतो, वाक्यरचना सुद्धा आकर्षक होते. तसेच सामान्य ज्ञान वाढवण्याचा नेहमी प्रयत्न करावा. अवांतर विषयावर किमान १० मिनिटे बोलता येईल एवढी तरी आपल्याकडे माहिती असली पाहिजे. पण ज्या विषयाची माहिती नाही त्यावर उगाच वायफळ बडबड करू नका. माहिती नसेल तर शांत बसून घेणे कधीही फायद्याचे असते.

८. आपली वाहने नेहमी स्वच्छ ठेवा
आपले वाहन नेहमी स्वच्छ असावे. वाहनांवरून सुद्धा आपल्या विषयीचा अंदाज बांधला जातो. वाहन किती भारी आहे यापेक्षा ते किती चांगल्या प्रकारे मेंटेन केलेले आहे हे महत्वाचे असते.

९. दररोज व्यायाम करावा
व्यायाम आवश्यक आहे. व्यायामाने शरीराचा बांधा सुडौल होतो. फिटनेस चांगला असलेला व्यक्ती नेहमीच समोरच्यावर मानसिकरीत्या दबाव निर्माण करत असतो. बॉडीबिल्डिंग ची गरज नाही, फक्त फिटनेस च्या हिशोबाने विचार करावा. थोडेसे सडपातळ पण फिट असलेले लोक नेहमीच लक्ष वेधून घेतात. बॉडीबिल्डिंग च्या नादात खूप अवाढव्य वाढवलेले शरीर, त्यात बॉडी दाखवण्यासाठी हाफ बाहीचा टीशर्ट अशा गोष्टी लोकांना असुरक्षिततेची जाणीव करून देत असतं. आणि लोक तुमच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे असे काहीकारण्याची गरज नाही. शरीराची नैसर्गिक रचनाच तशी असेल तर पर्याय नाही.

१०. वागण्यात अदब असावी, समोरच्याला आदर द्यावा
समोरच्या व्यक्तीला आदर देण्यात काहीच कमीपणा नसतो. तसेच वागण्या बोलण्यातून समोरच्यावर उगाच वर्चस्व गाजवण्याचाही प्रयत्न करू नये.
>> शेकहॅण्ड करताना हात जोराद दाबू नये. शेकहॅण्ड करताना जोरात हात दाबाने याचा अर्थ तुम्ही समोरच्यावर वर्चस्व गाजवू इच्छीता असा होतो. अर्थातच हे चुकीचे आहे.
>> शेकहॅण्ड करताना थोडेसे पुढे झुकून शेकहॅण्ड करावे. याने समोरच्याला आपण आदर देत आहोत असा अर्थ निघतो.
>> समोरच्याने त्याचे व्हिजिटिंग कार्ड आपल्याला दिल्यावर ते अदबीने, आदराने घ्यावे, त्यावरील माहिती वाचून घ्यावी, व त्यांनतर अलगद खिशात ठेवावे. व्हिजिटिंग कार्डला दाखवलेला आदर समोरच्या व्यक्तीला आणि त्याच्या व्यवसायाला दाखवलेला आदर असतो.
>> लोकांशी बोलताना उगाच खूप मोठ्या आवाजात आणि आक्रमक शब्दांत बोलू नये. याचा अर्थ तुम्ही समोरच्यावर दडपण टाकू पाहताय असा होतो. जे आपले इम्प्रेशन खराब करते.
>> बोलताना खूप हातवारे कारण्याची गरज नसते. आवश्यकता असेल तिथेच हातवारे करावेत. सामान्यपणे समोरच्या व्यक्तीला बोलण्यात खिळवून ठेवणे चांगले, हातवारे त्या इम्प्रेशनला आणखी वजन मिळवून देण्यासाठी फक्त वापरायचे असतात.
>> लोकांना शुभेच्छा देण्यात, एखाद्या कामासाठी अभिनंदन करण्यात, त्यांच्या मदतीसाठी आभार मानण्यात कोणतीही कमी ठेऊ नका. लोकांचे तोंडभरून कौतुक करा. याने समोरचा मनातून सुखावतो. पण यात कुठेही कृत्रिमपणा असता काम नये हे लक्षात ठेवा.
>> समोरासमोर खुर्चीवर बसलेले असताना खुर्चीवर मागे रेलून बसू नये. समोर झुकून बसावे. तुम्ही मागे रेलून रिलॅक्स होताय म्हणजे तुमचा चर्चेतला इंटरेस्ट संपला आहे असा अर्थ घेतला जाऊ शकतो. तसेच यातून समोरच्या व्यक्तीविषयी असलेला अनादर प्रतीत होतो.

११. तिऱ्हाइताबद्दल चुकीचे बोलू नका
कोणत्याही त्रयस्थ व्यक्तीबद्दल कधीच काहीही चुकीचे बोलू नका. समोरच्याने एखाद्या त्रयस्थाची निंदा नालस्ती केली तरी त्याला जास्त प्रतिसाद न देता विषय बदलण्याला प्राधान्य द्या. किंवा त्याच्या हो ला हो न करता फक्त हसण्यावारी विषय न्या. एखाद्या नावडत्या व्यक्तीचाही विषय समोर आला तरी चांगला माणूस आहे अस म्हणून विषय पुढे सरकवा…

१२. वादाच्या विषयात माघार घ्या, हजरजबाबीपणा मर्यादित असावा
वादविवाद निर्माण करतील असे विषय शक्यतो टाळा, असे विषय समोर आले तरी लगेच माघार घ्या. वादवितावाद टाळल्याने संबंध चांगले राहतात, आणि तुमच्याविषयी कोणतीही नकारत्मक प्रतिमा निर्माण होत नाही. हजरजबाबीपणा सुद्धा मर्यादित असावा. कधीही कुठेही उद्धटपणे बोलणे म्हणजे हजरजबाबी पण नसतो. प्रत्येकवेळी काहीतरी बोलणेच महत्वाचे नसते तर कधी कधी शांत राहणे सुद्धा महत्वाचे असते हे लक्षात ठेवा.

१३. कृत्रिमपणा नसावा
आपल्या वागण्या बोलण्यात कृत्रिमपणा नसावा. देहबोलीत सहजपणा असावा. कुणीतरी आपल्याला सतत बघत आहे, आपली समीक्षा करत आहे अशा माणिकतेने आपली देहबोली कृत्रिम बनते. असा कोणताही विचार न करता सहज वावरा

या काही उपयुक्त टिप्स आहेत आपले व्यक्तिमत्व आकर्षक करण्यासाठी. आणखीही अनेक गोष्टी आहेत, पण या काही महत्वाच्या बाबी आहेत. यांचा आपल्या आयुष्यात वापर केल्यास नक्कीच फायदा होईल…यात वैचारिक जडणघडण विषयी मुद्दे अंतर्भूत नाहीत. सामान्य प्रेझेंटेशन संबंधी टिप्स आहेत.

व्यवसाय साक्षर व्हा…

_

© श्रीकांत आव्हाड
७७४४०३४४९० (WhatsApp Only)

Business Consultant
www.ShrikantAvhad.com

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील


Shrikant Avhad

संस्थापक - उद्योजक मित्र Entrepreneur, Consultant, Writer, Speaker...

View all posts by Shrikant Avhad →

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!