लेखक : श्रीकांत आव्हाड
======================
मागील वर्षभरात शेअर मार्केटमधे काम करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पण यासोबतच अर्धवट अभ्यासाच्या भरोश्यावर ट्रेडिंग करण्याचे प्रमाणही वाढले आहे. यामुळे ट्रेडिंग करताना तोटा होण्याचीच शक्यता जास्त असते. शेअर मार्केटमधे हमखास पैसा मिळतो या विचाराने ट्रेडिंग सुरु करणारे काही काळातच माघार घेतात. कारण इथे फायदा होतो तर नुकसानही होत असते. फायद्या नुकसानाचे गणित जुळवता आले तरच इथे निभाव लागतो, नाहीतर चार ट्रेडमधला फायदा एकाच ट्रेड मध्ये तोट्यात रूपांतरित व्हायला वेळ लागत नाही. शेअर मार्केट मध्ये ट्रेडिंग करायची म्हणजे तुम्ही फक्त ट्रेडिंग शिकायची, खरेदी विक्री शिकायची आणि कुणाकडून तरी दररोज टीप्स घेऊन ट्रेड करायचे असे नाही. अशाने तुम्ही कधीच शेअर मार्केटमधे जम बसवू शकणार नाही. शेअर मार्केटमधे आपला स्वतःचाच अभ्यास महत्वाचा असतो. म्हणूनच या क्षेत्रात सुरुवात करताना काही महत्वाच्या गोष्टी ध्यानात घेणे महत्वाचे आहे
ट्रेडिंगसंबंधी काही महत्वाच्या बाबी पाहुयात
१. प्राथमिक प्रशिक्षण घ्या
सर्वात आधी शेअर मार्केट शिकून घ्या. शेअर मार्केट काय असते, ट्रेडिंग कशी चालते, यात व्यवहार कसे होतात, ट्रेंड कसा अभ्यासावा, अभ्यास कसा करावा, शेअर चा अंदाज कसा लावावा अशा गोष्टी शिकून घ्या. ५ हजार गुंतवून दिवसाला ५-१० हजार कमवा असल्या भानगडीत पडू नका. शेअर मार्केट एवढा सोपा विषय नाही. असं असतं तर देशातलीत प्रत्येकानेच ट्रेडिंग मधे करोडो रुपये कमवले असते. शेअर मार्केट प्रचंड खोलवर अभ्यासाचा विषय आहे. यात परिपूर्ण व्हायला भरपूर वेळ लागतो. त्यामुळे आधी शेअर मार्केटचे बेसिक्स शिकून घ्या. शेअर मार्केट आपल्या इतर व्यवसायाप्रमाणेच आहे. शिकण्यासाठीथोडा वेळ लागतोच. लगेच घाईगडबड करू नका.
२. सुरुवातीला मोठी रक्कम गुंतवू नका
शेअर मार्केटमध्ये सुरुवातीलाच खूप मोठी रक्कम गुंतवू नका. तुम्ही कितीही पैसे गुंतवले तरी ते अल्पावधीतच शून्य होणार असतात हे निश्चित आहे. कारण आपण सुरुवातीच्या काळात बरेच ट्रेड करत असतो. प्रत्येक ट्रेड आपल्याला योग्यच वाटत असतो, पण ९०% ट्रेड फेल जातात. यात विशेष काहीच नाहीये. हे होतंच. म्हणून आधी फक्त ५००० रुपयांपासून सुरुवात करावी. जी काही ट्रेडिंग करायची आहे ती याच पैशात कारवी. पैसे कमवण्याची घाईकरू नका,. शिकण्याला प्राधान्य द्या. या ५ हजार चे शुन्य होतील तेव्हा आपल्याला बराचसा अनुभव आलेला असेल.
३. सुरुवातीला इन्ट्राडे ट्रेड्स टाळा
इन्ट्राडे ट्रेडिंग म्हणजे एकाच दिवसात शेअर खरेदी आणि विक्री करणे. बऱ्याचदा शेअर मार्केटमध्ये पैसे कमावण्याच्या नावाखाली इन्ट्राडे ट्रेडिंग चे अमिश दाखवले जाते. १०-२० हजार गुंतवून दिवसाला १५-२० हजार कमवा वगैरे अशी आमिषे दाखवली जातात. बहुतेकजण या अमिषाला बळी पडूनच शेअर मार्केटमधे प्रवेश करतात. पण सुरुवातीच्या काळात या इन्ट्राडे ट्रेंडींच्या मायाजालात अडकू नका. इन्ट्राडे ट्रेडिंग कसलेल्या ट्रेडरनेच करावी. अनुभव नसलेल्या व्यक्तीने इन्ट्राडे मध्ये पडू नये.
४. शॉर्ट टर्म लॉन्ग टर्म ट्रेडिंग वर भर द्या.
सुरुवातीच्या काळात शॉर्ट टर्म, लॉन्ग टर्म ट्रेड्स वर भर द्या. चांगल्या कंपन्यांचा चार्ट चा अभ्यास करून शेअर्स खरेदी करा. काही दिवस, काही आठवडे, किंवा काही महिने वर्षभर त्याकडे पाहू नका. हळूहळू पैसे वाढतच जात असतात. यात चार्ट प्रेडिक्शन वर भर देऊन खरेदी विक्री करू शकता. शॉर्ट किंवा लॉन्ग टर्म ट्रेडिंग करताना नफ्यात नुकसान होत असते, प्रत्यक्ष नुकसान होण्याची शक्यता खूप कमी असते, कारण निर्णय घ्यायला पुरेसा वेळ आपल्याकडे असतो.
५. पेपर ट्रेड्स करा
सुरूतीला काही काळ पेपर ट्रेड करा. पेपर ट्रेडिंग म्हणजे प्रत्यक्ष ट्रेडिंग न करता वेगवेगळ्या शेअर्स चा अंदाज लावणे, त्यांचे भविष्यातील दर काय असतील हे कागदावर लिहून ठेवणे, आणि आपले अंदाज बरोबर येत आहेत कि नाही हे पाहणे. यात आपल्याला बऱ्यापैकी यश मिळायायला लागल्यावर मग मोठ्या प्रमाणात प्रत्यक्ष ट्रेडिंग सुरु करावी
६. एखाद्या घटनेला घाबरून निर्णय घेऊ नका.
ट्रेडिंग करताना संयम आवश्यक असतो. कोणताही निर्णय घेताना गडबडू नका, किंवा एखाद्या पडझडीमधे घाबरून आपले ट्रेड्स क्लोज करू नका. मार्केट खाली वर होतंच असतं, हा मार्केटचा नियमच आहे. अगदी मागच्यावर्षी मार्केट ५०% आपटल्यानंतर आज मागाच्यावर्षीपेक्षा दीडपट मार्केट वर आहे, आणि मागच्या वर्षीच्या लो च्या दुपटीपेक्षा जास्त मार्केट वर आहे. चढ उतार हा मार्केटचा नियम आहे. मार्केट का चढतंय किंवा का पडत आहे याचा अंदाज घेऊन मगच निर्णय घ्या. कित्येक वेळा एखादा शेअर घेतलेला असतो, काही काळाने तो त्याच्या ट्रेडिंग पॅटर्न नुसार पडायला लागतो, आपण घाईगडबडीत त्याला विकून मोकळे होतो, आणि पुन्हा तो शेअर वर जायला लागतो. असं का होतं? तर आपण त्याची पडझड हि ट्रेडिंग मधली रेग्युलर बाब आहे कि ब्रेकडाऊन सिग्नल आहे हे न पाहता फक्त थोड्याश्या पडझडीने घाबरून जातो.
७. बळजबरी ट्रेड करू नका.
तुम्हाला एखाद्या ठिकाणी ट्रेड ला संधी वाटत असेल तरच ट्रेड करावा. बळजबरी ट्रेड कधीच करू नका. शेअर वर जाण्याचे किंवा खाली येण्याचे किमान ७०% इंडिकेशन सकारात्मक असतील तरच ट्रेड करा. बळजबरी ट्रेड्स करणे किंवा एखाद्या शेअर मधे नुकसान झाले म्हणून पुन्हा पुन्हा त्यातच ट्रेड करणे अशा गोष्टी टाळा. आपलं कोणत्याही शेअर ओबत शत्रुत्व नसतं. आज एखाद्या शेअर मध्ये तोटा झाला तर उद्या त्यातच नफा सुद्धा होऊ शकतो. जिथे पॉजिटीव्ह सिग्नल असेल तिथेच ट्रेड करावा.
८. सिग्नल ओळखण्याचा आपला पॅटर्न विकसित करा
शेअर खाली किंवा वर जाण्याचे सिग्नल ओळखण्यासाठी आपला एखादा पॅटर्न विकसित करा. यासाठी वेळ लागू शकतो. काही महिने किंवा काही वर्षे लागतील, पण आपला स्वतःचा पटर्न असणे कधीही चांगले. मी माझ्या ट्रेडिंगसाठी काही सिग्नल निश्चित केलेले आहेत. ते किमान ७०% पॉजिटीव्ह असले तरच मी ट्रेड करतो. माझ्या वैयक्तिक पॅटर्नमुळे मी आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये निर्णय घेण्यासाठी इतर कुणावर अवलंबून नसतो. माझ्या सिग्ननल नुसार मी निर्णय घ्यायला तयार असतो. यामुळे माझे किमान ७०% ट्रेड्स यशस्वी ठरतात. तसेच नुसत्या चार्ट वर अवलंबून न राहता मार्केटमधील परिस्थिती विचारात घेऊन सुद्धा अंदाज लावावा लागतो. पण तरीही हे सर्व काही आपल्या वैयक्तिक अभ्यासावर ठरते. जेवढा जास्त वेळ यात व्यतीत कराल तेवढे यात जास्त हुशार व्हाल हाच मार्केटचा नियम आहे.
९. अति नफ्याची अपेक्षा करू नका.
ट्रेडींग करताना खूप जास्त नफ्याची अपेक्षा करू नका. हावरटपणा नुकसानच करत असतो. ट्रेड करताना आपल्याला कुठे थांबायचे आहे हे निश्चित करून घ्या. आणि तो सिग्नल मिळाल्यावर ट्रेड क्लोज करून घ्या. दररोज १०-२० टक्के नफा मिळत नसतो. हि कधीतरी होणारी बाब आहे.
१०. स्टॉप लॉस चा वापर करा
स्टॉप लॉस चा वापर न करता केली जाणारी ट्रेडींग म्हणजे उंच पर्वतावरून विना पॅराशूट उडी घेण्यासारखेच आहे. स्टॉप लॉस या शब्दातच त्याचे महत्व दडलेले आहे. नुकसान होत असतानाही कुठे थांबायचे हेही आधी निश्चित करणे कधीही फायद्याचेच असते. एखादा शेअर १०० रुपयांवर घेतला आहे, त्याचा सपोर्ट ९५ वर आहे आणि टार्गेट ११० आहे. ९५ वर सपोर्ट म्हणजे त्याखाली जर शेअर आला तर ब्रेडकडाऊन सिग्नल आहे. ९५ वर येऊन वर गेला तर हरकत नाही, त्याने पुन्हा सपोर्ट घेतला आहे. आता जर शेअर ९५ च्या खाली आला तर तुम्ही तो विकणे आवश्यक आहे. उद्या वाढेल, परवा वाढेल, मला विश्वास आहे, मला वाटतंय शेअर वाढणार आहे, अशा विचाराने जर तुम्ही तो शेअर तसाच ठेवला तर तुम्हाला नुकसान होणार हे निश्चित असते. शेअर मार्केट तुमच्या विचारावर किंवा तुम्हाला काय वाटतं यावर चालत नाही. स्टॉप लॉस हिट झाल्यावर ट्रेड क्लोज करून पैसे मोकळे करून घेणे कधीही उत्तम असते. आपल्याला पुढच्या ट्रेड साठी पैसा उपलब्ध होतो, आणि त्या ट्रेडमधून आपोआपच मागचे नुकसान भरून निघते.
११. नुकसान भरून काढण्यासाठी ट्रेड करू नका.
मागच्या ट्रेडमध्ये नुकसान झाले आहे म्हणून लगेच घाईगडबडीत ते नुकसान भरून काढण्यासाठी नवीन ट्रेड करू नका. यामुळे आपल्या मनावर नाहक नुकसान भरून काढण्याचे दडपण येते आणि ट्रेड चुकण्याची शक्यता वाढते, किंवा चुकीचे निर्णय घेण्याचे प्रमाण वाढते.
१२. नफा नुकसान मार्केटचा भाग आहे
नफा नुकसान मार्केटचा भागच आहे, यापासून आपण लांब जाऊ शकत नाही. दोन चार सेशन नफा दोन चार सेशन नुकसान हे नियमच आहे. आपल्याला एकूण ट्रेडींग सेशनमधे नफा कसा मिळेल हे पाहायचे असते. नफ्याचे प्रमाण जास्त आणि नुकसानीचे प्रमाण कमी राहील एवढेच आपल्याला पाहायचे असते. यासाठीच स्टॉप लॉस आवश्यक आहे. नुकसान नियंत्रणात ठेवलं कि नफा आपोआपच वाढत जातो.
१३. ऐकीव माहितीवर ट्रेड करू नका
ऐकीव माहितीवर, कुणीतरी सांगितलं आहे म्हणून ट्रेड करू नका. तुम्हाला जर एखाद्या ठिकाणी खरंच ट्रेड साठी संधी दिसत असेल तरच ट्रेड करा. कुणीतरी सांगतंय म्हणून ट्रेंड करणार असाल तर हमखास लॉस मधे जाल.
१४. मार्केटचा विरुद्ध ट्रेड करू नका. ओव्हर कॉन्फिडन्स घातक असतो.
शेअर मार्केट हे साहस दाखवण्याचे व्यासपीठ नाही. इथे तुम्ही कसे साहस करताय हे पाहण्यासाठी कुणीही येणार नाहीये. त्यामुळे उगाच मार्केटच्या विरूद्ध जाऊन ट्रेड करण्याचे साहस करू नका. इथे ओव्हर कॉन्फिडन्स काही कामाचा नसतो, तुमच्या समोर करोडो ट्रेडर्स असतात, त्यांना तुम्ही नियंत्रित करू शकत नाही. त्यामुळे नसत्या उठाठेवी टाळा.
१५. पडझडीमधे खरेदी आणि वाढीमध्ये विक्री हा नियम लक्षात ठेवा.
आपल्या लोकांची एक ठरलेली स्ट्रॅटेजी आहे, मार्केट वर जाईपर्यंत वाट पाहायची, शेअर टॉप ला असताना खरेदी करायचा, आणि तो पडायला लागल्यावर नुकसान दिसायला लागलं कि विकायचा. शेअर घ्यायचा कधी आणि विकायचा कधी हे आपण कधीच लक्षात घेत नाही. शेअर घेण्याची उत्तम वेळ असते ती म्हणजे ज्यावेळी तो त्याच्या वाटचालीमधे लोअर प्राईज ला असतो. आणि विकण्याची योग्य वेळ असते जेव्हा तो त्याच्या हायर प्राईज ला असतो. आपण नेमके उलटे करतो आणि फसतो. शेअर काही काळासाठी खाली आले तरी ते पुन्हा वर जात असतात. त्यामुळे चांगल्या विश्वासार्ह कंपन्यांचे शेअर्स पडत असताना खरेदी करायचे असतात, हा साधा नियम लक्षात ठेवा… लहान कंपन्यांचे, पुरेशी माहिती नसलेल्या कंपन्यांचे शेअर पडत असतील तर ते का पडत आहेत, त्यांचा ब्रेकआऊट सिग्नल आहे का याची माहिती घेऊन मग त्यातून बाहेर पडायचे कि नाही ते ठरवा. लॉन्ग टर्म गुंतवणुकीत नुकसान शक्यतो होत नसते, थोडीशी पडझड झाल्याने आपला नफा कमी होतो, मुद्दल नाही. त्यामुळे गडबडून जाऊ नये.
१६. अॅव्हरेज करण्याची स्ट्रॅटेजी
शेअर अॅव्हरेज करणे हे नेहमीच घडते. आपण एखादा शेअर वरच्या रकमेने घेतला आहे, तो खाली आला म्हणून पुन्हा खालच्या रकमेवर घेऊन अॅव्हरेज केला असे नेहमीच केले जाते. यात वावगे नाही. पण अॅव्हरेज करताना शेअर पुन्हा वर जाण्याची शक्यता किती प्रमाणात आहे, किती कालावधीमध्ये शेअर वर जाऊ शकतो, वरचे टार्गेट किती असू शकते याचा अंदाज घेऊन अॅव्हरेज करावे. इन्ट्राडे, ऑप्शन्स ट्रेडिंग करताना अॅव्हरेज करताना दक्षता घ्यावी. अॅव्हरेज करूनही जर शेअरने अपेक्षित भाव दिला नाही तर नुकसान वाढत असते. पहिली मुद्दल गेली असती तरी चालले असते असा विचार करण्याची वेळ येते. त्यामुळे अॅव्हरेज करताना पूर्ण विचार करून ट्रेड करा.
१७. सततचा अभ्यास आवश्यक.
शेअर मार्केट टाईमपास म्हणून काम करण्याचे क्षेत्र नाही. दिवसभर आपली इतर कामे करून फक्त सकाळी ९ ते दुपारी साडे तीन पर्यंत ट्रेडिंग करणे म्हणजे शेअर मार्केटमध्ये काम करणे नव्हे. इथे सुद्धा खूप अभ्यास लागतो. इंट्राडे मध्ये तर खूपअभ्यास आवश्यक आहे. ९ ते साडे तीन हा ट्रेडिंग चा टाइम जरी असला तरी त्यानंतर चा उरलेला वेळ शेअरचा अभ्यास करण्यासाठी खर्च करावा लागतो. शॉर्टटर्म किंवा लॉन्ग टर्म ट्रेडिंग करताना सुद्धा अभ्यास आवश्यक असतो. वाटलं म्हणून एखादा शेअर घेतला असे करता येत नाही. सततचा अभ्यास आवश्यक आहे. अभ्यास म्हणजे काय? तर कंपन्यांचे चार्ट अभ्यासणे, फंडामेंटल्स तपासणे, कंपन्यांचा अभ्यास करणे, कंपन्यांचे प्लॅन्स पाहून त्यांच्या पुढील वाटचालीचा अंदाज लावणे, मार्केट ट्रेंड चा अंदाज घेणे अशा विविध बाबींचा अभ्यास आवश्यक असतो.
१८. भावनांवर नियंत्रण ठेवा, ट्रेडिंग थांबवू नका.
एखाद्या नफ्याने हुरळून जाऊ नका किंवा एखाद्या तोट्याने निराश होऊ नका. नफ्या तोट्याची तयारी ठेऊनच ट्रेडिंग करा. नफा तोटा हा ट्रेडिंग चा भाग आहे. आपल्या इतर व्यवसायाप्रमाणेच इथेही नफा तोटा होणार हे गृहीत धरूनच ट्रेड करावा. तसेच सुरुवातीला नुकसान झाल्यामुळे ट्रेडिंग थांबवू नका. ते नुकसान गुंतवणूक समजा. शिकण्यासाठी केलेला खर्च. सुरुवातीला खूप थोडी रक्कम गुंतवा आणि ती शून्य होणार आहे हे आधीच स्वतःला सांगून ठेवा. पण ती शून्य होईपर्यंत शेअर मार्केटचा चांगला अभ्यास होईल याची काळजी घ्या. बरेच जण सुरुवातीला मोठी रक्कम गुंतवतात, आणि त्यात तोटा झाला कि नैराश्याने किंवा पैसे संपल्याने ट्रेडिंग बंद करतात. त्यापेक्षा त्या मोठ्या रकमेपैकी थोडीच रक्कम गुंतवावी. आणि हळूहळू ती वाढवत न्यावी. व्यवसायात एखादा महिना नुकसान झाले म्हणून आपण व्यवसायाचे शटर कायमचे बंद करत नाही, तसेच इथेही ट्रेडिंग थांबवायची नसते.
१९. पोर्टफोलिओवर भर द्या, पैसा एकाच ठिकाणी लावू नका
आपला सगळा पैसा एकाच कंपनीवर लावू नका. वेगवेगळ्या चांगल्या कंपन्या शोधून त्यावर पैसा लावावा. शंभर रुपये हाती असतील तर किमान पाच कंपन्यात २०-२० रुपये गुंतवा. पोर्टफोलिओ तयार करण्यावर भर द्या. नुसते शेअर घ्यायचे विकायचे असले खेळ न करता दीर्घ गुंतवणुकीसाठी काही शेअर्स सतत घेत चला. वेगवेगळ्या क्षेत्रातील कंपन्याचे शेअर्स घेत चला. यातून दीर्घ कालावधीसाठी आपला एक चांगला पोर्टफोलिओ तयार होतो.
२०. ट्रेड यशस्वी होणे महत्वाचे असते.
शेवटचा महत्वाचा मुद्दा. नफा किती होती हे महत्वाचे नसते तर तुमचा ट्रेड यशस्वी होतोय का हे महत्वाचे असते. अर्धा टक्का नफा होईल, एक टक्का होईल, दहा टक्के नफा होईल किंवा पैसे दुप्पट होतील, ते कितीही होऊ द्या, तुम्ही ट्रेड यशस्वी केला आहे हे महत्वाचे असते. आपला प्रयत्न हा नेहमीच ट्रेड लॉस मध्ये जाणार नाही यासाठी असला पाहिजे. अमुक ट्रेड मधे मला एवढे पैसे कामवायचेच आहेत तोपर्यंत मी ट्रेड क्लोज करणार नाही असा अट्टाहास कामाचा नसतो. एका ट्रेडमधून खुप पैसे कमावण्याच्या इच्छेपेक्षा अनेक ट्रेडमधून थोडे थोडे पैसे कमवणे नेहमीच फायद्याचे ठरते. सतत ट्रेड जेव्हा तुम्ही करता तेव्हा पाच-पंचवीस सामान्य ट्रेड नंतर एखादा मोठा ट्रेड होतोच. पान त्या मोठ्या ट्रेड च्या नादात लहान लहान ट्रेड जर सोडले तर त्या एका मोठ्या ट्रेड चाही काही फायदा होत नसतो…
या काही ट्रेडिंग सुरु करताना लक्षात घ्याव्यात अशा प्राथमिक टिप्स आहेत. या गोष्टी लक्षात घेऊन ट्रेडिंग केली तर नक्कीच शेअर मार्केटमधे फायदाच होईल. शेअर मर्कट हि खूप मोठी इंडस्ट्री आहे. यात सतत शिकण्याह वृत्ती हवी. मार्केटमध्ये शिकण्यासारख्या गोष्टींची यादी करायला गेलो तर या २० टिप्स खूपच थोड्या आहेत हे लक्षात येईल. इतके हे क्षेत्र मोठे आहे. पण सुरुवात करण्यासाठी या बेसिक गोष्टी आहेत. यावर आवर्जून ध्यान द्यावे.
टीप – मी स्वतः ट्रेडिंग आणि गुंतवणूक करतो. मी २००५ साली शेअर मार्केट शिकलो होतो. तेव्हापासून ट्रेडिंग करत आहे. सुरुवातीला मीसुद्धा बऱ्याचशा चुका केलेल्या आहेत, आणि नुकसानही सोसलेले आहे. मी वर दिलेल्या टिप्स कोणत्याही ऐकीव माहितीवरून दिलेल्या नाहीत, मी स्वतः या नियमांची अंमलबजावणी करतो.
अर्थसाक्षर व्हा…
व्यवसाय साक्षर व्हा…
_
© श्रीकांत आव्हाड
७७४४०३४४९० (WhatsApp Only)
Business Consultant
www.ShrikantAvhad.com
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम
All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील
Best
धन्यवाद खूप महत्त्वाचा सल्ला दिलात आपण