या सात गोष्टींमुळे आपला ब्रँड तयार होत असतो…


लेखक : श्रीकांत आव्हाड
======================

आपला स्वतःचा ब्रँड असावा असं प्रत्येक व्यावसायिकाला वाटत असतं. पण ब्रँड म्हणजे फक्त एखादे नाव आणि लोगो नव्हे, किंवा ट्रेडमार्क नोंदणी केली म्हणून लगेच आपला ब्रँड तयार होत नाही. ब्रँड तयार होण्याची प्रक्रिया असते. हि प्रक्रिया पूर्णत्वास जाण्यासाठी वेळ लागतो. त्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागते.

आणि मुख्य म्हणजे ब्रँड कशाचाही असू शकतो… फक्त लोगो आणि ब्रॅंडनेम म्हणजे ब्रँड नाही… किंवा फक्त मोठा सेटअप म्हणजे ब्रँड नाही… किंवा आपण खूप काही भव्य प्रेझेंटेशन केले म्हणून ब्रँड होत नाही… ब्रँड कशाचाही असू शकतो… एखाद्याच्या वैयक्तिक नावाचाही ब्रँड असू शकतो. एखाद्या गल्लीतल्या कोपऱ्यात, कुठेतरी आडमार्गाला, एखाद्या जुन्या घरात असणारा व्यवसायसुद्धा मोठा ब्रँड असू शकतो. एखाद्या लोकेशनचाही ब्रँड असू शकतो.

एखादा मोठा वकील असेल, लोक कोणतीही शंका न घेता डोळे झाकून त्याच्याकडे काम देत असतील, तर त्याला आपला लोगो ट्रेडमार्क करण्याची गरज नाही, त्याचे नाव हाच ब्रँड असतो…
एखाद्या गल्लीबोळात कुठेतरी एखादा जुना कारागीर असेल, कपड्यांवर हाताने काही कारागिरी करत असेल. लांबून लांबून लोक त्यांच्याकडे काम करण्यासाठी येत असतील तर तोही एक ब्रॅण्डच असतो…
आपण जेव्हा एखाद्या ब्रँड चे काही प्रोडक्ट घेतो तेव्हा त्याचा सेटअप बघत नाही. तो ब्रँड पाहतो. बाकीच्या गोष्टी त्या ब्रँड च्या सेटपच भाग असतात…

ब्रँड म्हणजे लोक ते प्रोडक्ट घेण्यासाठी धडपडतात असे नाही. ब्रँड म्हणजे विश्वासार्हता. एकाच क्षेत्रात कितीतरी चांगले ब्रँड असतात. प्रत्येकाचा आपापला ग्राहक असतोच. तरीही सर्व ब्रँड मोठेच असतात. म्हणजेच फक्त ब्रँड म्हणजे विक्रीच्या बाबतीत निश्चिन्त व्हा असे नाही. विक्री आणि ब्रँड या दोन वेगवेगळ्या बाबी आहेत. विक्री प्रत्येकजण करतो, ब्रँड काही जणांचेच असतात.

ब्रॅड अनेक गोष्टींनी तयार होतो. लोकांच्या मनात एखाद्या ब्रँड ची प्रतिमा अनेक गोष्टींमुळे तयार होत असते. ब्रँडबद्दलची विश्वासार्हता अनेक गोष्टींनी तयार होत असते. यातीलच काही महत्वाच्या गोष्टी पाहूयात

१. ब्रँड बद्दलचा विश्वास
आपल्या व्यवसायाबद्दल लोकांच्या मनात असलेला विश्वास हि आपल्या ब्रँड च्या जडणघडणीतील सर्वात महत्वाची बाब आहे. आपण जे प्रोडक्ट देतोय, जी सेवा देतोय त्याच्या गुणवत्तेबद्दल शंका घेण्याची ग्राहकांना गरज वाटणार नाही असा विश्वास महत्वाचा असतो. आपल्या व्यवसायाबद्दल ग्राहकांना विश्वास वाटणे हि ब्रँड बनण्याच्या मार्गातील एक मोठा टप्पा आहे. ब्रँड बनण्याची सुरुवातच विश्वासार्हतेपासून होत असते. त्यामुळे विश्वासार्हतेला तडा जाऊ न देणे महत्वाचे असते.

आपण मार्केटमध्ये खरेदी करताना कित्येक गोष्टी फक्त ब्रँड पाहूनच खरेदी करत असतो. कारण त्यांची विश्वासार्हता त्यांनी आधीच सिद्ध केलेली असते. त्यांनी त्यांच्या प्रोडक्ट विषयी जे जे सांगितले आहे ते त्यांनी आधीच सिद्ध केलेले असते. त्यांना दरवेळी त्यासाठी नव्याने परीक्षा द्यायची गरज नसते. या विश्वासार्हतेमुळे एखादी चूक खपून पण जाते. पण सारख्या सारख्या चुका घडल्या तर मात्र हि विश्वासार्हता संपुष्टात येण्यास वेळ लागत नाही.

आपल्या क्रिकेटमध्ये बघा, सचिन आउट झाला कि टीव्ही बंद करण्याची कृती सचिनबद्दलची विश्वासार्हता होती, किंवा ९ विकेट पडलेल्या असताना सुद्धा राहुल द्रविड बॅटिंग करत असेल तर आपण किमान तास-दोन तास तरी ऑलआउट होणार नाही याचा विश्वास असायचा हि विश्वासार्हता असते.
गाडी घेताना, मारुती, होंडा, टोयोटा, मर्सिडीज, बीएमडब्ल्यू घेताना आपण गाड्यांची विश्वसार्हता तपासत नाही कारण ती त्यांनी आधीच सिद्ध केलेली असते. फक्त ब्रँड च्या व्यक्तिमत्वानुसार आपण कोणता ब्रँड निवडायचा हे ठरवतो. (अर्थातच ब्रँड चे व्यक्तिमत्व हा पुढचा मुद्दा आहे…)
अगदी, एखादे डेली नीड्स प्रोडक्ट घेताना ठराविक ब्रँड चे प्रोडक्ट घेताना आपण दुकानदारांना हे चांगले आहे ना?असे विचारात नाही. कारण ते चांगलेच आहे हे आपल्याला विश्वास आहे. एखादे नवीन प्रोडक्ट असेल तर आपण दुकानदाराकडून त्या प्रोडक्ट ची खरेदी करून मगच खरेदी करतो.

विश्वसार्हता हा ब्रँड चा पाया असतो. हा पाया डळमळीत झाला तर संपूर्ण इमारत कोसळणार हे निश्चित असते. हि विश्वासार्हता टिकून राहण्यासाठी गुणवत्ता आणि विक्रीपश्चात सेवा या दोनीही गोष्टी महत्वाच्या असतात.

२. ब्रँड चे व्यक्तिमत्व
ब्रँड चे व्यक्तिमत्व विक्रीमध्ये महत्वाचे ठरते. प्रत्येक ब्रँड चे एखाद्या माणसासारखे काहीतरी व्यक्तिमत्व असते. त्या व्यक्तिमत्त्वातून ग्राहकाला तो ब्रँड कशासाठी वापरायचा आहे हे कळत असते. हे व्यक्तिमत्व आपल्याला घडवावे लागते.

हे व्यक्तिमत्व कसे काम करते?
वरचं गाड्यांचं उदाहरण पहा. गाडी घेताना सगळ्याच कंपन्या चांगल्या आहेत हे माहित असूनही आपण जी महत्वाची गोष्ट पाहतो ती म्हणजे ती गाडी मला कशा प्रकारे प्रेझेंट करेल. किंमत हा खरेदीचा क्रायटेरिया आहे. पण त्या किमतीमधे कुणाला प्राधान्य द्यायचं हे ठरवताना, माझे व्यक्तिमत्व कसे दिसले पाहिजे हे पाहून त्यानुसार व्यक्तिमत्व असणारी गाडी निवडण्याला आपले प्राधान्य असते.

टायटन चे घड्याळ आणि फास्टट्रॅक चे घड्याळ, मुख्य कंपनी एकच असली तरी दोन्ही ब्रँड चे व्यक्तिमत्व वेगळे आहे. कॉलेजमधला विद्यार्थी आणि व्यावसायिक किंवा प्रोफेशनल आपल्यासाठी घड्याळ निवडताना कोणत्या कंपनीचे निवडतील ? कॉलेजकुमार फास्टट्रॅक आणि प्रोफेशनल टायटन निवडेल असे तुमचे उत्तर असेल तर तुम्हाला ब्रँड चे व्यक्तिमत्व म्हणजे काय ते लक्षात आले असेल.

गारमेंट सेक्टरमधे सुद्धा असेच ब्रँड आहेत. कुणासाठी, कोणत्या कामासाठी, कोणत्या कारणासाठी वापरायचे यानुसार ब्रँड ची विभागणी होते.

आपल्या ब्रँड चे व्यक्तिमत्व आपल्याला विचारपूर्वक घडवावे लागते. वाहनांच्या कंपन्या असो, घड्याळाच्या कंपन्या असो, गारमेंट कंपनी असो, किंवा इतर काही आपल्या ब्रँड चे व्यक्तिमत्व या कंपन्या नियोजनपूर्वक तयार करत असतात.

रेमंड ची जाहिरात पहा, फक्त श्रीमंत, प्रोफेशनल, मोठे उद्योजक यांच्यासाठीच आमचा ब्रँड आहे हे रेमंड कंपनी आपल्या जाहिरातीतून सांगत असते.

काही कंपन्या आपले व्यक्तिमत्व किमतीच्या माध्यमातून निर्माण करतात. रोल्स रॉयस किंवा रोलेक्स… किमतीच एवढ्या आहेत, कि त्यातून आपोआपच एक व्यक्तिमत्व परावर्तित होते. पण, किंमत जास्त आहे म्हणून रोल्स रॉयस जी प्रतिमा निर्माण करते तीच प्रतिमा त्याच किमतीची लम्बोर्घिनी कार निर्माण करणार नाही. तिचे व्यक्तिमत्व वेगळे आहे.

म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे आपल्या ब्रँड चे व्यक्तिमत्व तयार केले जाते. या अनावधानाने घडलेल्या गोष्टी नाहीत. विचारपूर्वक अमलात आणलेल्या स्ट्रॅटेजी आहेत. यातून या कंपन्यांनी आपल्या ब्रँड चे व्यक्तिमत्व तयार केलेले आहे.

३. ब्रँड कडून मिळणारा प्रतिसाद
ग्राहक प्रोडक्ट खरेदीसोबतच त्या ब्रँड कडून आपल्याला कसा प्रतिसाद मिळतोय हेही पाहत असतो. कस्टमर हँडलिंगमध्ये मध्ये हि बाब महत्वाची ठरते. तुम्ही एखाद्या सामान्य दुकानात हाताचे घड्याळ खरेदी करण्यासाठी गेलात तर तो तुमच्यासमोर डेस्कवर ८-१० घड्याळ ठेऊन देईल. तुम्ही निवडा कोणते निवडायचे ते. तुम्ही ठरवा. तुम्ही सगळे घड्याळ हातात घालून पाहता, पसंत पडले नाही तर आणखी घड्याळ दाखवायला सांगता. १०-२० घड्याळ पाहताच… पण याच वेळी जर एखाद्या नामांकित ब्रँड च्या शॉप मध्ये गेलात तर ते तुम्हाला घड्याळ दाखवण्याआधी तुमचे हसून स्वागत करतात. तुम्ही डेस्कसामोर बसलात कि आधी डेस्कवर एक स्वच्छ आकर्षक वेल्वेटचे कापड अंथरतात. एक एक घड्याळ डिस्प्ले मधून काढून त्या कापडावर अलगत ठेवतात. ते त्या प्रोडक्टला आणि आपल्याला इतक्या उच्च दर्जाचा रिस्पेक्ट देतात कि आपल्याला आपोआपच त्यांच्या उच्च दर्जाचा फील यायला लागतो. आपण स्वतः त्या घड्याळांकडे इतके आकर्षित होतो कि दहा वीस घड्याळ बघण्याची गरजच पडत नाही. पहिल्या चार पाच मधेच एखादे फायनल होऊन जाते. हा जो ब्रँड कडून मिळणारा प्रतिसाद आहे तो या ब्रँड ला आणखी मोठा बनवण्याचं काम करतो.

काही कंपन्या ग्राहकांना इतकी उच्च दर्जाची वागणूक देतात कि ग्राहक त्यातच दबून जातो. यातूनही ब्रँडचे वर्चस्व निर्माण होते. आपल्या प्रोडक्टला, ग्राहकांना दिला जाणारा आदर, दिला जाणारा प्रतिसाद गाहकांच्या नजरेत ब्रँड ची उच्च प्रतिमा निर्माण करण्याचे काम करत असतो.

तुम्ही एखाद्या दुकानात जाता, तासभर वेगवेगळे प्रोडक्टस पाहता, पण खरेदी च करत नाही अशावेळी विक्रेत्याची चिडचिड सुरु होते. हेच तुम्ही जर एखाद्या नामांकित ब्रँड च्या शॉप मधे गेलात, आणि तासभर काय चार तास जरी टाईमपास केला तरी तिथल्या विक्री प्रतिनिधीच्या चेहऱ्यावर कंटाळल्याची जराशीही जाणीव दिसत नाही. तो त्याच प्रसन्नतेने तुम्हाला उत्तरे देतो ज्या प्रसन्नेतेने चार तासांपूर्वी सुरुवात केलेली असते. हा प्रतिसाद असतो. पहिला प्रतिसाद ग्राहकाच्या नजरेत दुकानाला सामान्यांच्या रांगेत बसवतो तर दुसरा प्रतिसाद वरच्या रांगेत स्थनापन्न करायला भाग पडतो.

४. विक्रीपश्चात सेवेचा अनुभव आणि विश्वास
तुमची विक्रीपश्चात सेवा कशी आहे यावरही तुमच्या ब्रँड चे मूल्य ठरत असते. विक्रीपश्चात सेवा ब्रँड च्या जडणघडणीमध्ये महत्वाची भूमिका निभावत असते. आपण ग्राहकांना दिलेले आश्वासन पूर्ण करणे आवश्यक असते. ग्राहकांना प्रोडक्ट खरेदी केल्यानंतर त्यासंबंधीच्या सेवा सुद्धा सुरळीतपणे मिळायला हव्यात. यातून ग्राहकांचा प्रोडक्टवरील विश्वास वाढत जातो. विक्रीपश्चात सेवा चांगली असेल तर ग्राहक प्रोडक्ट गुणवत्तेमधील एखादी चूक सुद्धा सोडून देत असतो.

ग्राहकाला प्रोडक्ट घेताना फक्त समाधान नको असतं तर ते वापरताना सुद्धा त्रास होणार नाही याची खात्री हवी असते. ज्यावेळी ग्राहक विक्रीपश्चात सेवेच्या बळावर आपल्या प्रोडक्टला प्राधान्य देत असतो तेव्हा आपला व्यवसाय पूर्णपणे यशस्वी झाला आहे असे समजायला हरकत नसते. ग्राहकांना विक्रीपश्चात सेवेचा आलेला चांगला अनुभव आणि त्यातून आपल्या ब्रँड संबंधी त्यांच्या मनात निर्माण झालेला दृढ विश्वास आपल्या व्यवसायाला मोठे करत असतो. चांगली गुणवत्ता पण खराब विक्री पश्चात सेवा ब्रँड ला संपवू शकते, पण सामान्य गुणवत्ता आणि चांगली विक्री पश्चात सेवा व्यवसायाला टिकवून ठेवू शकते आणि यशस्वी सुद्धा करू शकते.

५. मूल्य आणि किंमत. ब्रँड चा वापर करताना जाणवणारी भावना
एखाद्या प्रोडक्ट ची मार्केटमधे सामान्य किंमत १००० रुपये असते पण त्याच प्रोडक्टसाठी एखाद्या कंपनीचा रेट २००० किंवा ५००० रुपये असतो. ती किंमत नक्कीच जास्त आहे, पण तरीही त्या कंपनीचे सुद्धा अनेक ग्राहक असतातच. ते ग्राहक त्या किमतीला त्या प्रोडक्ट चे मूल्य समजत असतात. ते प्रोडक्ट वापरताना त्यांना एक उच्च दर्जाचा ब्रँड त्यांच्या आयुष्याचा भाग असल्याची जाणीव होत असते. हि भावना त्यांना त्या प्रोडक्टची पाच पट किंमत सुद्धा योग्य आहे याची जाणीव करून देत असते. जेव्हा ग्राहक एखाद्या प्रोडक्ट ची किंमत न करता तिचे मूल्य मान्य करत असतो तेव्हा तो व्यावसाय एक ब्रँड असतो.

या मूल्य आणि किमतीच्या युद्धात जी कंपनी आपल्या प्रॉडक्टच्या बदल्यात मूल्य घ्यायला सुरुवात करते ती कंपनी ब्रँड बनण्याच्या मार्गावर सुसाट निघालेली असते. आपल्या प्रोडक्ट चे मूल्य घेण्यासाठी मात्र आधी खूप प्रयत्न करावे लागतात. ग्राहकाला प्रॉडक्टच्या किमतीपेक्षा ते प्रोडक्ट स्वतःजवळ असणे जास्त महत्वाचे वाटावे यासाठी कंपनीला अगणित प्रयत्न करावे लागतात. प्रोडक्ट ची प्रतिमा, ब्रँड ची प्रतिमा, ब्रँडचे मार्केटमधले वजन, त्या ब्रँड च्या वापरातून मिळणारी जाणीव, जाणवणारा विश्वास अशा अनेक गोष्टींतून असा ब्रँड आकाराला येत असतो. साहजिकच असा ब्रँड वापरताना ग्राहकाला आपणही स्पेशल असल्याची जाणीव होत असते. याच जाणिवेतून त्याचे ब्रँड कडे आकर्षण आणखी वाढत जाते.

६. ब्रँड कडून परावर्तित होणारी भावना, प्रतिमा निर्मिती
अनेक कंपन्या लोकांना आपला संदेश आपल्या लोगोमधून, थीम मधून, जाहिरातीमधून देत असतात. जाहिरातीमधून लोकांना एखादा चांगला संदेश देणे, नवीन विचार परावर्तित करणे, आपली भूमिका मांडणे, आपली वैचारिक ठेवण दाखवणे, एखाद्या वर्गाला भावणारे कॅम्पेन करणे, आपला स्वभाव दाखवणे, आपल्या ब्रँड चा स्वभाव दाखवणे अशा विविध प्रकरे लोकांशी संवाद साधला जातो. अशा माध्यमातून लोकांकडे परावर्तित होणारी ब्रँड ची प्रतिमा ब्रॅण्डविषयी औत्सुक्य निर्माण करण्यात साहाय्यभूत ठरत असते. ग्राहकांसाठी निर्माण केले जाणारे ब्रँड चे व्यक्तिमत्व अशा माध्यमातून निर्माण केले जात असते. ब्रँड कडून परावर्तित होणारी भावना ब्रँड ची एक प्रतिमा निर्माण करत असते. या प्रतिमेकडे आकर्षित होणारे ग्राहक ब्रँड ला आपसूकच स्वीकारत असतात. कधीकधी ते या ब्रँड चे समर्थक सुद्धा बनत असतात. अशा समर्थकांकडून ब्रँड च्या लहानसहान चुका सहज दुर्लक्षित केल्या जातात इतके हे समर्थन कधीकधी कडवट असू शकते.

ब्रँड कडून ग्राहकांकडे परावर्तित होणारी भावना, त्यातून निर्माण होणारी ब्रँड ची प्रतिमा, बंद चे व्यक्तिमत्व ब्रँड ला एका नव्या उंचीवर नेऊन ठेवण्याचे काम करत असतात. हि प्रतिमानिर्मिती बऱ्यापैकी वेळखाऊ प्रक्रिया आहे. खरं तर ब्रँड निर्मिती हि प्रक्रियाच वेळखाऊ आहे.

७. सातत्य
कंपनीकडून ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या आश्वासनात, सेवेत, गुणवत्तेत सातत्य असणे महत्वाचे असते. ज्या कंपनीत सातत्य नाही ती कंपनी अल्पावधीतच मार्केटच्या बाहेर फेकली जाते. आपल्या प्रमोशनमधे, कामांमध्ये, सर्व्हिसमधे थोडासा जरी खंड पडला तरी ते कंपनीच्या ब्रँड साठी धोकादायक ठरत असते. सातत्य हे वाहत्या पाण्याप्रमाणे असते, ते सतत प्रसन्नतेची जाणीव करून देते. आपल्या कामात सातत्य असलेली कंपनी कधीच अपयशी ठरू शकत नाही.

ब्रँड बनण्यासाठी अनेक घटक सहाय्य्यभुत ठरत असतात. वरील सात मुद्दे हे ब्रँड निर्मिती प्रक्रियेतील महत्वाचे घटक आहेत, पण याव्यरतिरिक्त अनेक लहान मोठे घटक आहेत जे ब्रँड निर्मिती साठी काम करत असतात. पण हे एका दिवसात किंवा एका वर्षातही होणारे काम नाही. यासाठी वेळ द्यावाच लागतो.
ब्रॅण्डिंग, गुणवत्ता, सेवा, विश्वासार्हता, सातत्य, प्रतिमा निर्मिती, व्यक्तिमत्व, वेळेचे भान, वितरण प्रक्रिया अशा विविध गोष्टींच्या एकत्रितपणाचा परिणाम म्हणजे एक यशस्वी ब्रँड असतो…

व्यवसाय साक्षर व्हा…
उद्योजक व्हा…
समृद्ध व्हा…

_

© श्रीकांत आव्हाड
७७४४०३४४९० (WhatsApp Only)

Business Consultant
www.ShrikantAvhad.com

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील


Shrikant Avhad

संस्थापक - उद्योजक मित्र Entrepreneur, Consultant, Writer, Speaker...

View all posts by Shrikant Avhad →

2 thoughts on “या सात गोष्टींमुळे आपला ब्रँड तयार होत असतो…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!