लेखक : श्रीकांत आव्हाड
======================
व्यवसायासाठी लागणरा कच्चा माल, इतर साहित्य यासाठी सप्लायर, व्हेंडर, पुरवठादार नियुक्त केले जातात. प्रत्येक व्यवसायाला असे व्हेंडर असतातच. आपल्याला लागणारा सर्व माल यांचेकडून घेतला जातो. तसेच कंपनीला अनेक प्रकारचे साहित्य लागतात त्याचेही पुरवठादार असतात. हे सप्लायर्स निवडताना मात्र काळजी घेणे आवश्यक असते.
चुकीचे व्हेंडर्स व्यवसायासाठी घातक ठरू शकतात. व्हेंडर या शब्दाचा शब्दशः अर्थ कोणत्याही प्रकारचा ‘विक्रेता’ असा होतो, पण सामान्यपणे इंडस्ट्रिअल सेक्टरमध्ये पुरवठादाराला व्हेंडर असेच म्हटले जाते, आणि सामान्यपणे इतर मार्केटमधील विक्रेत्यांना सेलर्स असेच म्हटले जाते.
आपले सप्लायर्स किंवा व्हेंडर्स निवडताना काय काळजी घेतली पाहिजे यासंबंधी थोडक्यात माहिती पाहुयात…
१. विश्वासार्हता
सप्लायरशी व्यवहार करण्याआधी त्याची विश्वासार्हता तपासणे आवश्यक असते. विश्वासार्हता फक्त पैशासंबंधी नसते. पेमेंट आपण नंतरही करू शकतो. विश्वासार्हतेसंबंधी अनेक बाबी येतात. संबंधित सप्लायर व्यवहारात ठीक आहे का, सगळ्या बाबी ठरल्याप्रमाणे करतो का, दिलेला शब्द पळतो का, माल योग्य देतो का, त्याचे मार्केटमध्ये नाव कसे आहे यासारख्या गोष्टी आधी माहिती करून घ्याव्यात. योग्य वाटल्यासच पुढे जावे.
२. गुणवत्ता
सप्लायरने दिलेल्या मालाची गुणवत्ता वेळोवेळी तपासावी. सप्लायरचे मार्केटमध्ये गुणवत्तेसाठी नाव कसे आहे हे माहिती करून घेण्याचा प्रयत्न करावा. सॅम्पल प्रोडक्ट ची गुणवत्ता तपासून घ्यावी. गुणवत्तेमध्ये कोणतीही तडजोड करू नये. सप्लायर गुणवत्तेकडे फक्त फॉरमॅलिटी म्हणून पाहतो कि जबाबदरी म्हणून पाहतो याकडे लक्ष द्यावे. तुम्हाला अपेक्षित असलेल्या गुणवत्तेचाच माल तो देत असेल तरच व्यवहार करावा. कोणताही व्यवहार करण्याआधी सॅम्पल प्रोडक्ट मागवून घ्या. ते योग्य वाटले तरच व्यवहार करा.
३. सेवा आणि वेळेचे पालन
कच्च्या मालाशी संबंधित, किंवा इतर साहित्याशी संबंधित काही समस्या उत्पन्न झाल्यास व्हेंडर किती वेळात हजर होऊन समस्या दूर करू शकतो याची माहिती घ्या. जर त्याला पोहोचण्यासाठी खूप वेळ जात असेल तर आपले नुकसान होते. वेळ पाळण्यात संबंधित सप्लायर कसा आहे याचा अंदाज घ्यावा. जर वेळ पाळण्यात तो कमी पडत असेल तर व्यवहार न करणे उत्तम.
४. माल पुरवठयासाठी लागणार वेळ
ऑर्डर दिल्यांनतर माल आपल्या कंपनीपर्यंत पोहोचण्यासाठी किती वेळ लागू शकतो याचा अंदाज घ्या. सप्लायरचे गोडाऊन किंवा युनिट आपल्या कंपनीच्या जवळ असावे. खूप लांब (दुसऱ्या गावात, किंवा ५०-१०० किमी अंतर) असल्यास मालाच्या पुरवठ्यासाठी उशीर होऊ शकतो व आपला वेळ नाहक वाया जाऊ शकतो.
५. दिलेल्या शब्दाचे भान
सप्लायर दिलेला शब्द पाळतो का हे पहा. काबुल केलेल्या गोष्टी पूर्ण करतो का पहा. सप्लायर शब्द पाळण्यात कमी पडत असेल तर व्यवहारात त्रासदायक ठरेल.
६. सप्लायरचा अनुभव
सप्लायरचा अनुभव महत्वाचा असतो. तो किती दिवसांपासून या क्षेत्रात काम करत आहे, सध्या ग्राहक किती आहेत, कोणकोणते आहेत, प्रोडक्शन हॅण्डल करण्याची क्षमता कशी आहे याची माहिती घ्या. शक्यतो अनुभवी सप्लायर निवडावा. अनुभव नसलेला सप्लायर इतर गोष्टींची पूर्तता आकारात असेल तर जोडू शकता, पण पूर्ण परीक्षा घेऊन मगच निर्णय घ्यावा.
७. आर्थिक क्षमता
सप्लायरची आर्थिक क्षमता चांगली असणे महत्वाची असते. पैशावाचून त्याचे काम सारखे थांबत असेल तर आपल्याला माल देताना अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात. सप्लायरची आर्थिक क्षमता उत्तम असावी. पैसे नाहीत म्हणून त्याचे काम थांबता कामा नये. किंवा प्रोडक्शन क्षमता वाढवण्याची वेळ आल्यास पैशाच्या कारणाखाली त्याने नकार देण्याचा विचार करू नये.
८. प्रोडक्शन क्षमता व संसाधने
सप्लायरची पुरवठा क्षमता किंवा प्रोडक्शन क्षमता तपासून घ्यावी. आपल्याला लागणार माल विना झंजट बनवून तो वेळेवर पाठवू शकतो का पहा. बरेच सप्लायर क्षमतेपेक्षा जास्त कस्टमर जोडून ठेवतात आणि प्रोडक्शनचे गणित बिघडले कि मग कुणालाच पुरेसा माल पाठवणे त्यांना शक्य होत नाही. प्रोडक्शन क्षमता तपासा, वाढीव ऑर्डर कशा प्रकारे पूर्ण करू शकतो याचा अंदाज घ्या. तसेच व्यवसाय सूरळीत चालण्यासाठी सर्व संसाधने त्याच्याकडे उपलब्ध आहेत का याची माहिती घ्या. उदा. लेबर पुरेसे आहेत का, मशिनरी पुरेश्या आहेत का ई. सप्लायर ट्रेडिंग करत असेल तर त्याची आर्थिक क्षमता चांगली आहे का याची माहिती घ्या.
९. पर्याय तयार ठेवा
एकाच पुरवठादाराच्या भरवश्यावर राहू नका. पर्याय तयार ठेवा. किमान दोन सप्लायर आपल्याकडे असले पाहिजेत. कधीही कुणावाचून आपले काम अडता कामा नये.
१०. रेट
सप्लायर योग्य भावात माल देतोय का हे पहा. आपल्याला परवडेल अशा भावात योग्य गुणवत्तेचा माल मिळणे महत्वाचे असते. बार्गेनिंग मध्ये त्याला थोडी तडजोड करावी लागली म्हणून तो गुणवत्ता कमी करत असेल तर असा सप्लायर लगेच बंद करा.
११. बिजनेस रिलेशनशिप
सर्वात महत्वाचे, सप्लायर व्यावसायिक संबंध संभाळण्यात किती चांगला आहे यावर बऱ्याच गोष्टी ठरतात. कस्टमर टिकवून ठेण्यासठी सप्लायर प्रयत्न करतो का, सध्याच्या ग्राहकांशी त्याची बिजनेस रिलेशनशिप किमान २-३ वर्षांपेक्षा जास्त आहे का, कि कोणत्याही ठिकाणी तो १-२ वर्षांपेक्षा जास्त काळ टिकत नाही, अशा बाबी पाहून निर्णय घ्यायचा असतो. सप्लायर long term चा विचार करून निवडायचा असतो. तात्पुरता विचार करून सप्लायर निवडणे व्यवसायासाठी योग्य नाही.
एकदा सप्लायर निश्चित झाल्यावर
१. आधी त्याचा व्हेंडर फॉर्म भरून घ्या, आपल्या डेटाबेस साठी व्हेंडर कोड तयार करा
२. त्याची सर्व माहिती कागदपत्रांच्या स्वरूपात जमा करून घ्या. कंपनीची माहिती, कंपनी मालकाची माहिती ई.
३. त्याला सुरुवातीच्या पायलट लॉट साठी अधिकृत PO द्या.
४. माल आल्यावर सर्व खातरजमा करून मग तो मंजूर करायचा कि नाही ते ठरवा
५. माल योग्य असल्यास मग पुढचा व्यवहार सुरु करा.
आपल्या व्यवसायासाठी पुरवठादार, व्हेंडर निवडताना काय काळजी घ्यावी यासंबंधी या काही टिप्स आहेत. व्यवसाय करताना प्रॅक्टिकली काही गोष्टी नव्याने माहिती होतात. पण शक्यतो याबाहेर विशेष काही माहिती नसते. आपला व्हेंडर कसा असावा यासंबंधीची हि माहिती पुरेशी ठरेल अशी अपेक्षा करतो…
व्यवसाय साक्षर व्हा…
उद्योजक व्हा…
समृद्ध व्हा…
_
© श्रीकांत आव्हाड
७७४४०३४४९० (WhatsApp Only)
Business Consultant
www.ShrikantAvhad.com
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम
All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील
Kawade Somnath