लेखक : उदय पिंगळे
====================
शेअर बाजारात अनेक पद्धतीचे व्यवहार होत असतात. सध्या 20 हून अधिक पद्धतीचे व्यवहार बाजारात केले जातात. यातील कोणताही व्यवहार मग तो खरेदीचा असो वा विक्रीचा त्यास ट्रेड असे संबोधले जाते आणि असा व्यवहार करणारी व्यक्ती म्हणजे साहजिकच ट्रेडर. यातील कॅश, एफ एन ओ, करन्सी, कमोडिटी, इंडेक्स यात त्या दिवशी खरेदी करून विक्री किंवा त्याच दिवशी विक्री (short selling) करून दिवसभरात पुन्हा खरेदी किंवा कॅश मार्केट मध्ये त्याच दिवशी तर इतर सर्व व्यवहारात त्याच्या सौंदपूर्तीपूर्वी भावातील फरकाचा लाभ घेण्याच्या हेतूने व्यवहार पूर्ण करणाऱ्या व्यक्तीना विक्रेते असे म्हटले जाते.
मोठ्या रकमांचे हे व्यवहार नियमानुसार किमान ठेव रक्कम ठेवून करता येत असल्याने अधिक लोकप्रिय आहेत. बाजारात होणारे बहुतेक सौदे अशा पद्धतीने पूर्ण केले जातात. यात भरपूर नफा होऊ शकतो त्याचप्रमाणे नुकसानही होऊ शकते. असे व्यवहार करावेत की नाही हा वादग्रस्त मुद्दा होऊ शकतो परंतू असे लोक आहेत त्यामुळे बाजारात मागणी पुरवठा तत्वानुसार चढ उतार होऊन एक योग्य किंमत ठरण्यास मदत होते. त्यामुळे ट्रेडर असा उल्लेख केला गेल्यास त्यात असे व्यवहार करणाऱ्या व्यक्ती आणि संस्था येतात. इतरांच्या तुलनेत ते अधिक जोखीम घेतात, ब्रोकरकडून मिळणारे मार्जिन वापरतात, मालमत्ता विकतात, प्रसंगी कर्जही घेतात. त्याच्यामुळेच जे पोझिशनल आणि लॉंग ट्रेड करतात त्यांना अपेक्षित भावाने खरेदी विक्री करण्याची संधी प्राप्त होते.
अशा प्रकारचे ट्रेंडिंग करणारे लोक वेगवेगळ्या गोष्टींचा अभ्यास करत असतात. जसे की काही मिनिटं, काही दिवस, काही वर्षे यातील सर्वाधिक व सर्वात कमी भाव, शेअर्सची उलाढाल, विशिष्ट दिवसांचा सरासरी भाव, बाजाराचा अंतप्रवाह, विविध प्रकारचे चार्टस आणि त्यांच्या रचना, कंपनीची कामगिरी, भावावर परिणाम करणारे बाह्य घटक इ. तरीही त्यांचा प्रमुख भर हा विविध चार्ट व त्यांच्या रचना याकडे असतो. या रचना सर्वाना एकसारख्या दिसत असतील तरी त्यातून सर्वांचा एकसमान निष्कर्ष निघत नाही त्यामुळे एकच शेअर अनेकांना खरेदी करावा वाटत असताना तो विक्रीयोग्य आहे असे अनेकांना वाटते. यासाठी ज्ञान अनुभव लागतोच पण वेगळ्या प्रकारचे कौशल्य लागते याशिवाय एक महत्वाची गोष्ट लागते ती म्हणजे विशिष्ठ प्रकारची मानसिकता.
मानसिकता हा व्यक्तीचे मन आणि वर्तन याचा अभ्यास आहे. जीवनात घडणाऱ्या असंख्य गोष्टींचा मनावर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परिणाम होत असतो. ही एक गुंतागुंतीची प्रक्रिया असून तिचा थांग लागणे कठीण आहे. गुंतवणूक गुरू ‘रॉबर्ट कियासोकी’ यांच्यामते ‘Your greatest asset is your MIND’ आपली सर्वांत मोठी संपत्ती म्हणजे आपले मन. आपले मन आपल्याला आव्हाने संधीमध्ये बदलण्यास सक्षम करते. आपले आंतरिक जग व बाह्यजग तयार करते सर्जनशील बनवते परंतू त्यावर अनेक विकारांचा प्रभाव पडल्याने स्वतःचा निश्चय डळमळीतही करते.
आपल्यापैकी बहुतेकांना आपण विक्री केलेल्या स्टॉकची किंमत वाढणे व खरेदी केलेल्याची किंमत कमी होण्याचा अनुभव आहेच. असा भाव कमी होत असताना त्यातून बाहेर पडायला हवे असले (Stop Loss) तरी आपली त्या कंपनीशी भावनिक गुंतवणूक वाढलेली असते आपण त्याची उत्पादने वापरत असतो त्यामुळे ही कंपनी चांगलीच असे मनात कुठेतरी कायमचे ठसलेले असते त्यामुळेच भाव खाली आला असता अधिक जोखीम घेण्यास ट्रेडर तयार होतो. ट्रेडरला मन आणि भावना यावर नियंत्रण ठेवून समतोल निर्णय घेता येण्याची आवश्यकता आहे.
यातील काही महत्वाच्या भावना अशा-
भीती
ही एक स्वाभाविक भावना असून आपण ज्या हेतूने ट्रेड घेतला असेल त्याच्या विरुद्ध बाजार जायला लागला की त्यात वाढ होऊन खरेदी केलेल्या शेअरचे भाव खाली येऊ लागल्यास पॉझिशन स्क्वेअर अप केली जाते किंवा विक्री केली असेल तर घाबरून पटकन थोड्याश्या वरील भावाने खरेदी करून मिळणारा फायदा मर्यादित ठेवला जातो. असा व्यवहार पूर्ण झाला की बाजार नेमका आपणास अपेक्षित दिशा घेतो पण तोपर्यंत लढण्याऐवजी शरणागती पत्करल्याने वेळ निघून गेलेली असते.
लोभ
लाभ होत असताना नेमके समाधान कशात मानायचे याची तयारी झाली नसल्याने आणि अधिक लाभाची अपेक्षा म्हणजेच लोभ, फक्त एका मात्रेचा फरक ठेवल्याने कधीकधी अपेक्षित फायद्यास मुकावे लागते.
आशा
ही सकारात्मक भावना आहे पण तर्कशुद्ध विचार न केल्याने नुकसान पत्करावे लागते. याशिवाय झालेला तोटा आपण सहज भरून काढू असे समजून अधिक धाडसी निर्णय घेतले जातात व ते चुकतात.
दुःख
आपण पूर्ण केलेल्या व्यवहारातून तोटा किंवा थोडा फायदा होऊन जर भाव अचानक वाढले तर आपण एवढा वेळ पकडून ठेवलेला ट्रेड पूर्ण करायची घाई का केली याचे दुःख होते. यामुळे ट्रेंडिंग करताना आपण काय चूक केली याचा नीट विचार करा आपली स्वताची पद्धत शोधून काढा ती तपासून पहा व त्यावर विश्वास ठेवून ठाम रहा, आवश्यकता असल्यास लवचिक व्हा.
चिंता
आपण गमावलेल्या संधीने इतरांचा फायदा होत आहे यासारख्या चिंता करू नका. यातून मनस्ताप होण्याखेरीज काहीही साध्य होणार नाही.
अहंकार
आपल्याला यश मिळालं म्हणजे सर्व काही आलं अस समजू नका ज्या गतीने फायदा झाला त्याच किंवा त्याहून अधिक गतीने तोटा होण्याची प्रसंगी सर्व मूद्दल जाऊन अधिक हानी होण्याची शक्यता असते. कोणतेही यश (कधीच) अंतिम नसतं! अशा आशयाचे चर्चिल यांचे एक वाक्य आहे ते विसरू नये.
शेअर बाजार ही अस्थिर जागा असून शेअरची किंमत कशी राहील याचा तंतोतंत अंदाज बांधणे कठीण असले तरी अगदीच अशक्य नाही. याचे अनेक संकेत आपल्याला मिळत असले तरी कोणताही एखादा घटक अनेकांचा अंदाज खोटा ठरवू शकतो. तेव्हा योग्य जोखीम व्यवस्थापन करून आणि ते करण्यासाठी मानसिकतेच्या वरील षःड्रिपुंना दूर ठेवून अधिक तटस्थ नजरेने त्याकडे पाहता आले पाहिजे. अधिकाधिक ट्रेडमधून भांडवल न गमावता थोडा थोडा अपेक्षित पण सातत्याने फायदा होत राहील असे धोरण आखून ते कटाक्षाने पाळणे अधिक हितकर आहे.
_
उदय पिंगळे
8390944222
लेखक गुंतवणूक अभ्यासक, मार्गदर्शक व सल्लागार आहेत.
====================
‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम
All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील