व्यवसायाच्या आकारमानानुसार मार्केट सेटअप करण्याच्या पद्धती बदलत असतात.


लेखक : श्रीकांत आव्हाड
======================

व्यवसायाच्या आकारमानानुसार मार्केट सेटअप करण्याच्या पद्धती बदलत असतात. जर आपण एखादा उत्पादनाशी निगडित लघुद्योग सुरु केला असेल तर आपल्याला खूपच प्राथमिक पातळीपासून विक्रीला सुरुवात करावी लागते. जर ते प्रोडक्ट रिटेल काउंटर वर प्लेस करणे आवश्यक असेल तर एक एक काउंटर शोधा, प्रत्येकाला प्रत्यक्ष भेटा, प्रोडक्ट काउंटरवर ठेवण्यासाठी कन्व्हिन्स करा, त्यातून दहापैकी एखाददोन होकार देतात, असं करत करत आपले मार्केट वाढत जाते. यात सुरुवातीला आपल्याला बऱ्यापैकी स्वतःला गुंतवणून घ्यावे लागते. हळूहळू मार्केट वाढत गेले कि मग सेल्स कर्मचारी नियुक्ती सुरु करावी लागते. कर्मचाऱ्यांची संख्या वाढली कि त्यांच्यावर एक सुपरव्हिजनसाठी एरिया मॅनेजर लागतो. कालांतराने त्या सर्व सेल्स मॅनेजर ला ऑपरेट करण्यासाठी सर्कल हेड येतात, असे करत करत आपली सेल्स टीम डेव्हलप होत जाते.

लघुद्योगांना चांगले डिस्ट्रिब्युटर लगेच मिळत नाहीत. नवीन असताना कुणी एंटरटेन करत नाही. वर्ष दोन वर्षे काम केल्यानंतर आपले स्वतःचे मार्केट सेटअप झाल्यानंतर मग चांगले डिस्ट्रिब्युटर भेटायला लागतात. हळूहळू हे डिस्ट्रिब्युशन नेटवर्क वाढत जाते. या लहान व्यवसायांकडे सुरुवातीला खूप मोठी फंडिंग नसल्यामुळे अशा प्रकारे व्यवसाय पुढे न्यावा लागतो.

लहान व्यवसायांना आधी पाय पक्का करावा लागतो. पाय भक्कम झाला कि मग हळूहळू आपल्या इमारतीची एक एक वीट रचत जावी लागते. एकएक करत आपली इमारत उभी राहते.

मध्यम आकाराच्या उद्योगांची परिस्थिती थोडी वेगळी असते. हे उद्योग सुरु झाल्यानंतर लगेच काही सेल्स कर्मचारी नियुक्त करतात आणि त्यांच्या साहाय्याने आपले मार्केट सेटअप करायला सुरुवात करतात. उद्योजकाला इथे गुंतून राहावे लागतेच, सेल्स साठी वेळ द्यावा लागतो. पण एकदम बेसिक पासून सुरुवात करायची गरज पडत नाही. सेल्स टीम कडून बरीच कामे लवकर सुरळीत होऊन जातात. मार्केटमध्ये मोठी कंपनी म्हणून चांगला प्रतिसाद आपोआपच मिळतो. याचा फायदा मार्केट सेटअप करण्यासाठी होतो.

या मध्यम आकाराच्या व्यवसायांकडे फंडिंग पुरेशी असते, पण खूप जास्त नसते, त्यामुळे सेल्स टीम ची योग्य सांगड घालावी लागते.

मोठ्या उद्योगांची मार्केट सेटअप करायची प्रक्रिया वेगळी असते. हे मोठे उद्योग एकदमच कळसापासून सुरुवात करतात. म्हणजे, प्रोजेक्ट सुरु होण्याआधीच एक मार्केटिंग विक्री क्षेत्रातील अनुभवी व्यक्ती सेल्स हेड म्हणून नियुक्त करतात, त्यालाच खालची सेल्स टीम नियुक्त करायला सांगतात, जी सेल्स मॅनेजर्सची किंवा सर्कल हेडची टीम असते. ती सेल्स टीम त्याखालची सेल्स प्रतिनिधी नियुक्त करतात. असे करत करत काही काळातच संपूर्ण टीम तयार होऊन जाते. आणि सगळे कर्मचारी अनुभवी असल्यामुळे अल्पावधीतच मार्केट सेट होऊन जाते. आणि याला जोडीला जाहिरातीचा मोठा सपोर्ट दिला जातो.

या मोठ्या उद्योगांकडे फंडींगची कमतरता नसते. पैसा भरपूर उपलब्ध असतो, त्यामुळे सुरुवातीलाच मोठी गुंतवणूक करून सेल्स टीम तयार करण्यात काही प्रॉब्लेम नसतो.

व्यवसायाच्या आकारमानानुसार मार्केट सेटअपची पद्धत बदलत जाते. आपल्या व्यवसायाचे आकारमान लक्षात घेऊन आपल्याला हि रचना करावी लागते. आपण मार्केट कसे सेटअप करू शकतो, सेल्स टीम मध्ये किती गुंतवणूक करू शकतो, अनुभवी कर्मचारी नियुक्त करण्यासाठी कशा प्रकारे नियोजन करावे लागेल, टीम तयार करण्यासाठी कसे नियोजन आवश्यक आहे, मार्केट सेटअप करताना त्याला कशा प्रकारचा बॅकअप (स्टॉक, डिस्ट्रिब्युशन, जाहिरात ई.) देणे आवश्यक आहे, अशा विविध बाबींचा विचार करून आपल्याला आपले मार्केटिंग & सेल्स कॅम्पेन आखावे लागते. एकच स्ट्रॅटेजी सगळीकडे लागू होऊ शकत नाही, अगदी एकाच प्रकारच्या व्यवसायाला सुद्धा त्याच्या आकारमानानुसार वेगवेगळ्या प्रकारची स्ट्रॅटेजी तयार करावी लागू शकते.

त्यामुळे आपल्याला व्यवसायाला आधी समजून घ्या. त्याचे स्वरूप, त्याचे आकारमान लक्षात घ्या. त्यांनतर आपण त्याचे मार्केट सेट करण्यासाठी कशा प्रकारे स्ट्रॅटेजी आखणे आवश्यक आहे यावर अभ्यास करा. आणि मुख्य म्हणजे घाई गडबड करू नका. लहान व्यवसाय सुद्धा चांगल्या प्रकारे मार्केटिंग केली तर अल्पावधीतच मोठा होऊ शकतो. व्यवसायातला पैसा फिरायला लागला कि तो मोठा व्हायला लागतो. हा पैसा कसा फिरत राहील याकडे आपल्याला लक्ष द्यायचे असते.

व्यवसाय साक्षर व्हा…
उद्योजक व्हा…
समृद्ध व्हा…

_

© श्रीकांत आव्हाड
७७४४०३४४९० (WhatsApp Only)

Business Consultant
www.ShrikantAvhad.com

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील


Shrikant Avhad

संस्थापक - उद्योजक मित्र Entrepreneur, Consultant, Writer, Speaker...

View all posts by Shrikant Avhad →

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!