संसाधनांची कमतरता आहे म्हणून काम थांबवू नका, छोटी छोटी कामे करून मोठा परिणाम साधा…


लेखक : श्रीकांत आव्हाड
======================

ऑफिस किंवा शॉप चे रिन्युएशन करायचे आहे, २-३ लाख खर्च आहे, पण सध्या तेवढा खर्च शक्य नाही. पण यामुळे संपूर्ण काम थांबवून जमणार नाही. अशावेळी रिन्युएशन मध्ये करावयाच्या सर्व कामांची यादी करा आणि प्रत्येक महिन्याला त्यातील थोडीथोडी कामे उरकण्याचा प्रयत्न करा. एखाद्या महिन्यात खिडकीला पडदे बसवून घ्या, कार्पेट टाकून घ्या, पुढच्या महिन्यात एका केबिन मधील फर्निचर विकत घ्या, त्यापुढच्या महिन्यात रंगरंगोटी उरकून घ्या, असे करत करत प्रत्येक महिन्यात थोडेथोडे करून काम पूर्ण करत चला. एकाच वेळी २-३ लाख शक्य नसले तरी प्रत्येक महिन्याला १०-१५ हजार खर्च करून रिन्युएशन सुरु करा. वर्ष-दीड वर्षात रिन्युएशनचं काम पूर्ण होईल. कामाच्या व्यापात वर्ष कसं निघून जातं कळतही नाही.

संपूर्ण शहरभर मार्केट डेव्हलप करायचं आहे पण त्यासाठी लागणारा खर्च करणे सध्या शक्य नाही. पण या कारणामुळे मार्केटिंग कॅम्पेन थांबवून जमेल का? बिलकुल नाही. सुरुवातीला शहरातील एखादा एरिया टार्गेट करा, तिथे परिपूर्ण मार्केटिंग करा, पुढच्या महिन्यात त्या एरिया शेजारचा परिसर पकडा, तिथे मार्केटिंग सुरु करा, असे करत करत हळूहळू संपूर्ण शहर काबीज करा.

भरपूर पैसा जमवायचा आहे, पण एकाच वेळी हवा आहे. पण ते शक्य नाही. मग? थांबून घेणार का? त्यापेक्षा थोडा थोडा पैसा जोडत चला. हळूहळू गंगाजळी वाढत जाईल.

एखाद्या मोठ्या कामाची अपेक्षा आहे, पण तसे काम मिळत नाहीये. पण या निराशेत कामच शोधणे थांबवून जमेल का? उलट लहान लहान कामांच्या माध्यमातून पोर्टफोलिओ वाढवत चला, हळूहळू त्या ग्राहकांच्या संपर्कातील इतरांकडून सुद्धा कामे मिळत जातील, उलाढाल वाढत जाईल. एका मोठ्या कामातून जी उलाढाल अपेक्षित आहे ती १० लहान लहान कामातून मिळायला लागेल, आणि या अनुभवाच्या जोरावर मोठी कामे सुद्धा मिळायला सुरुवात होईल.

मोठा व्यवसाय उभारायचा आहे, मोठी कंपनी उभी करायची आहे. पण त्यासाठी पैसा नाही. मग व्यवसाय सुरु करण्याचेच रहित करणार का? त्यापेक्षा हाती असलेल्या गुंतवणुकीत लहानसा व्यवसाय सुरु करा. त्या व्यवसायात झोकून देऊन काम करा. हळूहळू व्यवसाय मोठा व्हायला लागेल. लवकरच तुम्हाला जेवढा मोठा व्यवसाय याअपेक्षित होता तेवढा झालेला दिसून येईल.

पुरेशी संसाधने नाहीत, स्रोत नाहीत हे काम न करण्याचे कारण असू शकत नाही, किंवा आपले प्लॅन रहित करण्याचे कारण असू शकत नाही. प्रत्येक गोष्टीला मार्ग आहे. आपल्याकडे उपलब्ध असलेल्या संसाधनांतून जे शक्य आहे त्यापासून सुरुवात करता येते. लहान लहान गोष्टींतून मोठा परिणाम साधता येतो. होईल थोडा उशीर उद्दिष्टपूर्तीसाठी, पण उद्दिष्ट सोडूनच देण्यापेक्षा थोडासा उशीर झालेला कधीही चांगलेच आहे ना? मोठमोठ्या गोष्टी साध्य करण्यासाठी मोठमोठीच कामे करावी लागतात असे काहीच नाही, लहान लहान गोष्टींच्या संकलनातूनही ते साध्य करता येऊ शकते.

तुम्हाला महिनाभरात अपेक्षित असलेले काम संसाधनांच्या कमतरतेमुळे पूर्णपणे ठप्प करण्यापेक्षा वर्षभरात थोडं थोडं करत पूर्ण केलं तर त्यात काहीच प्रॉब्लेम नाहीये. संसाधनांच्या कमतरतेमुळे पुढे जाण्याचेच रहित केले तर प्रगती कायमची खुंटून जाईल, आणि हळू हळू करत का असेना पण पुढे जात राहू असे ठरवून प्रवास चालू ठेवला तर दररोज थोडी थोडी प्रगती होत जाईल आणि एक दिवस आपल्याला अपेक्षित असलेला टप्पा पार करता येईल.

संसाधनांची कमतरता आहे म्हणून काम थांबवू नका, छोटी छोटी कामे करूनही मोठा परिणाम साधता येतो हे लक्षत ठेवा…

_

व्यवसाय साक्षर व्हा…
उद्योजक व्हा…
समृद्ध व्हा…

_

© श्रीकांत आव्हाड
७७४४०३४४९० (WhatsApp Only)

Business Consultant
www.ShrikantAvhad.com

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील


Shrikant Avhad

संस्थापक - उद्योजक मित्र Entrepreneur, Consultant, Writer, Speaker...

View all posts by Shrikant Avhad →

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!