गरिबीला निवड म्हणायचं कि परिस्थिती?


लेखक : श्रीकांत आव्हाड
======================

आर्थिक परिस्थिती बेताची असणाऱ्या पण एकसारखेच काम करत असणाऱ्या दोन कुटुंबाची उदाहरणे

कामवाली बाई आहे. धुनी, भांडी, फारशी पुसणे इत्यादी कामे करते. १०-१५ घरात काम करते. घरातील एकच कमावती सदस्य. नवरा दारू पिण्यात व्यस्त असतो असतो. सासू सासरे घरीच असतात, पण पोराला सोडून हिच्यावरच हुकूम गाजवतात.

मागच्या वर्षी मायक्रो फायनान्स कंपनीकडून ३०,००० रुपयांचं कर्ज घेतलंय. दोन वर्ष हफ्ते फेडायचे. प्रत्येक आठवड्याला “फक्त” ५००/- रुपये हफ्ता. हफ्ता फारच थोडा वाटतोय ना? पण प्रत्येक आठवड्याला ५०० म्हणजे वर्षाला होतात २४ हजार रुपये आणि दोन वर्षाचे होतात ४८ हजार रुपये. म्हणजे कर्जावर व्याजदर झाला ३०%. हा हिशोब तिला माहितगारांनी पोटतिडकीने समजावून सांगितला, या भानगडीत असू नको म्हणूनही सांगितलं… पण तरीही कर्ज घेतलंच. आपल्याला ज्ञान नाही इथपर्यंत ठीक आहे, पण त्यातले माहितगार सांगत असतानाही असे चुकीचे निर्णय घेण्यात काय समाधान आहे?

कर्ज घेऊन तरी काय केलं, तर मुलांना ६-७ हजाराचे कपडे घेतले, घरात काही हौसमौजेच्या वस्तू घेतल्या, कुटुंबातल्याइतर सदस्यांना कपडे लत्ते केले. पैसे संपले. आता हफ्ते फेडत आहे फक्त. आणखी एक वर्ष शिल्लक आहे. ३० हजाराचे दोनच वर्षात ४८ हजार फेडायचे आहे. आता प्रत्येक आठवड्याला हफ्ते फेडायचं टेन्शन असतंच. हे हफ्ते चालू असताना आता दिवाळीला पुन्हा नवीन कर्ज घेण्यासाठी हालचाली सुरु होतील. पाचशेचाच हफ्ता वाढतोय, जास्त थोडी आहे? याआधी असंच एका पतसंस्थेकडून ३० हजाराच कर्ज घेतलं होतं. तेही थकलं होतं. पतसंस्थनेने सेटलमेंट ची तयारी दाखवली, त्यालाही प्रतिसाद दिला नाही, शेवटी पतसंस्थेने कायदेशीर कारवाई सुरु केल्यावर सगळं मिटवायला ६० हजार खर्च आला. सगळी परिस्थिती पाहता पुढची दहा वर्षे तरी यांच्या आयुष्यात काही फरक पडेल असं वाटत नाही.

अशीच घरकाम करणारी आणखी एक महिला. चांगलं काम करायची. नवरा MIDC मध्ये कामगार होता. काही वर्ष भाड्याच्या घरात राहिल्यावर स्वतःचे घर असावे म्हणून एका ठिकाणी १ गुंठा प्लॉट घेतला. घर बांधलं. त्यासाठी साठवलेले काही पैसे होते. नोकरीच्या बळावर थोडे कर्ज मिळाले. तिने आता आपल्याला थोडे जास्त पैसे कमवावे लागणार आहे हे लक्षात घेऊन घरकाम बंद करून MIDC मध्ये काम शोधलं. सोबत दररोज संध्याकाळी भाजीपाला विक्री सुरु केली. ओळखीच्यांना घरपोच भाजीपाला द्यायला सुरुवात केली. कालांतराने भाजीपाला विक्रीत एवढा जम बसला कि MIDC मधलं काम सोडलं, आणि पूर्णवेळ भाजीपाला विक्री सुरु केली. आता एकदम चांगला व्यवसाय सुरु आहे.

कपडे लत्ते दागिने घेण्यासाठी तिने कधी कर्ज काढलं नाही. कर्ज घेतलं फक्त घरासाठीच आणि त्याची परतफेड सुद्धा योग्य प्रकारे चालू आहे. आता तर गुंतवणुकीची सुद्धा चर्चा करते. भविष्याच्या प्लॅनिंग बद्दल बोलते. आर्थिक परिस्थितीच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर तिचे कुटुंब आता मागील २-३ वर्षात गरिबीच्या परिस्थितीमधून कनिष्ठ मध्यम वर्गात आले आहे. पुढच्या दहा पंधरा वर्षात अतिशय उत्तम परिस्थिती झालेली असेल. घरात सगळ्या आवश्यक सुखसोयी आहेत. सगळं काही आनंदाने चालू आहे. टेन्शन नाहीये, कुटुंबाला वेळ देता येतोय, स्वतःला वेळ देता येतोय, समाधानी आयुष्य चालू आहे.

हिच्या वागण्यात सुद्धा आपण चार चुका शोधू शकतो, पण हिला आर्थिक विषयावर कुणीही मार्गदर्शन केलेलं नाही. जे काही चाललंय ते स्वतःच्या बुद्धीने, कुणाचाही आधार नसताना, कुणाचेही मार्गदर्शन नसताना, हे लक्षात घेणे महत्वाचे…

काही विषयांवर उदाहरणेच इतकी बोलकी असतात कि जास्त स्पष्टीकरण देण्याची गरजच पडत नाही. हि दोन उदाहरणे सुद्धा अशीच आहेत. एका घरी अर्थसाक्षरता ओशाळली तर दुसऱ्या घरी अर्थसाक्षरता आनंदली…
या दोन उदाहरांसोबत आपली तुलना करता आपण कोणत्या प्रकारात मोडतोय याचे आपण स्वतः विवेचन केले तर आपले भवितव्य काय असू शकेल याचा अंदाज येईल. खूप जणांकडून आर्थिक चुका होतात. कित्येकदा या चुका ठरवून केल्या जातात. लोकांना दाखवण्यासाठी, मोठेपणा मिरविण्यासाठी या चुका जास्त करून केल्या जातात आणि ककलांतराने त्याचे दुष्परिणाम समोर आले कि मग डोळे उघडतात, पण तोपर्यंत बऱ्याचदा उशीर झालेला असतो. सगळं काही हातून निसटून गेलेलं असतं.

काही वर्षांपूर्वी एकसारखीच परिस्थिती असणाऱ्या दोन कुटुंबांनी आर्थिक विषयावर घेतलेल्या निर्णयांनी त्यांचे भवितव्य ठरवले आहे. एकाने गरीब राहण्याचेच ठरवले आहे तर दुसऱ्याने परिस्थिती सुधारण्याचे ठरवले आहे. मग गरिबीला निवड म्हणायचं कि परिस्थिती?

अर्थसाक्षर व्हा…

_

© श्रीकांत आव्हाड
७७४४०३४४९० (WhatsApp Only)

Business Consultant
www.ShrikantAvhad.com

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील


Shrikant Avhad

संस्थापक - उद्योजक मित्र Entrepreneur, Consultant, Writer, Speaker...

View all posts by Shrikant Avhad →

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!