कर्मचाऱ्यांचा, नोकरदारांचा इगो संभाळा


लेखक : श्रीकांत आव्हाड
======================

आपले कर्मचारी आहेत म्हणून आपल्याला सतत त्यांच्यावर चिडचिड करण्याचा अधिकार असतो असा बहुतेक व्यावसायिकांचा गैरसमज असतो. बरेच जण सतत आपल्या कर्मचाऱ्यांचा अपमान करण्यात मग्न असतात. यामुळे कर्मचाऱ्यांवर मालकाचे दडपण राहते आणि ते पूर्ण क्षमतेने काम करतात असा बहुतेकांचा गैरसमज असतो, पण हे पूर्णतः चुकीचे आहे. कर्मचाऱ्यांकडून चांगले काम करून घ्यायचे असेल तर त्यांचा इगो सांभाळावा लागतो. यात जर अनुभवी कर्मचारी असतील तर फारच काळजीपूर्वक वागावे लागते.

कित्येकवेळा मालकापेक्षा कर्मचाऱ्याचा अनुभव जास्त असतो, आणि त्याचा त्यांना अभिमानच असतो. अशावेळी त्यांना सतत टॉर्चर करणे अंगलट येऊ शकते. प्रत्येकात आत्मसन्मान असतो. स्वतःविषयी सन्मानाची भावना असते, नोकरदार लोकांना तर आपल्या अनुभवाचा अभिमानच असतो. कित्येकवेळा जास्त पगार असूनही वागणूक चांगली नाही म्हणून चांगले नोकरदार नोकरी सोडून दुसऱ्या कंपनीकडे कमी पगारावर सुद्धा काम करायला तयार होत असतात. जरी एखाद्याने नोकरी सोडली नाही तरी त्यांचे कामात मन लागत नाही, पर्यायाने त्यांची कार्यक्षमता कमी होत जाते, ज्याचा व्यवसायावर नकारत्मक परिणाम होतो.

कर्मचाऱ्यांशी चांगले बोलणे, संयत भाषेत संवाद साधणे, अति आवश्यक असेल तेव्हाच राग व्यक्त करणे, अपमानजनक भाषा न वापरता योग्य शब्दांत चुका दाखवून देणे किंवा आपल्याला अपेक्षित असलेले रिझल्ट मागणे अशा गोष्टी व्यवसायात आवश्यक आहेत.

एक काल परवाचेच उदाहरण… माझे एक क्लायंट आहेत. कंपनी आहे त्यांची. तीन पार्टनर आहेत. एक मुख्य पार्टनर सर्व कंपनी प्रामुख्याने पाहतात. बाकीचे दोघे डॉक्युमेंटेशन, मिटिंग, आर्थिक व्यवहार अशी कामे पाहतात. मुख्य पार्टनर सेल्स टीम हॅन्डल करणे, पर्चेस पाहणे, मार्केटवर लक्ष ठेवणे अशी कामे पाहतात. त्यांचा एक सेल्स मॅनेजर आहे, २० वर्षांचा अनुभव आहे मार्केटचा. आधी ज्या कंपनीत काम करत होते त्या कंपनीने एका नवख्याला आणून त्यांना त्या नवख्या व्यक्तीच्या हाताखाली काम करायला सांगितले म्हणून त्यांनी ती कंपनी सोडून यांची कंपनी जॉईन केली होती. ६०-७० हजाराची नोकरी सोडून इकडे ५० हजार पगारावर जॉईन झाले. यांनीही त्यांच्या अनुभवाचा चांगला फायदा घेतला. दोन वर्षांपासून या कंपनीमध्ये ते काम करत आहेत आणि चांगले मार्केट सेट केलेले आहे.

दोन दिवसांपूर्वी या मुख्य पार्टनरने त्यांचेसोबत सेल्स संबंधी कॉल वर चर्चा केली. मार्केटमधून अपेक्षित रिकव्हरी होत नाहीये, सेल्स अजून वाढवणे आवश्यक आहे अशा काही गोष्टींवर त्यांची बरीच चर्चा झाली. कॉल संपवताना त्या मुख्य पार्टनरने त्यांना दुसऱ्या एका पार्टनरला कॉल करून अपडेट द्यायला सांगितले. त्यांनी कॉल केला, पण त्या दुसऱ्या पार्टनरने या व्यक्तीला खूपच रागीट आणि उद्धट भाषा वापरली. तुम्हाला पगार काय फुकटचा देतो का, रिकव्हरी असेल तर पगार मिळेल, आज मला काहीही करून मार्केटमधून ५० हजाराची रिकव्हरी पाहिजे नाहीतर काम करण्याची गरज नाही, असं बरंच काय काय बोलले. एखाद्या नवख्या सेल्स एक्झिक्युटिव्ह ला बोलत आहोत अशा अविर्भावात ते बोलले.

त्यांनतर त्या कर्मचाऱ्याने फोन बंद केला, पण दुसऱ्या दिवशी कुणाचे कॉलच घेतले नाही. आणि आपल्या हाताखालच्या कर्मचाऱ्याला आता मला रिपोर्टींग करू नका असे मेसेज पाठवले. इकडे कुणालाच कळेना काय झालंय ते. कॉल सुद्धा लागत नव्हते. संध्याकाळी बरेच मिस्ड कॉल पाहून त्यांचाच या मुख्य पार्टनरला कॉल आला आणि त्या दुसऱ्या पार्टनरशी काय बोलणं झालं ते त्यांनी सांगितले. त्यांचं म्हणणं होतं कि त्यांचा राग मी समजू शकतो, मार्केट काही काळ थंड होतं, आत्ता कुठे नॉर्मल होत आहे. पण ते ज्या भाषेत माझ्याशी बोलले ते पाहता मला मी काल परवा जॉईन झालेलो एखादा सेल्समन आहे असे वाटत होते. अशा परिस्थितीत मी मुक्तपणे काम करू शकणार नाही.

आता आपण अशावेळी ‘गेला तर गेला आणखी मिळतील’ असे म्हणू शकतो, पण प्रत्यक्षात असे होत नाही. अनुभवी कर्मचारी लवकर मिळत नाहीत. पाच दहा कर्मचाऱ्यांमागे एखादा चांगला माणूस सापडतो. याहीपेक्षा त्यांनी सेट केलेले मार्केट इतरांकडे लागेच वळवणे सोपे नसते. अशावेळी मार्केटमधील रिकव्हरी तर पूर्णपणे ठप्प होईलच, पण नवीन ऑर्डर सुद्धा थंडावून जातील. त्यामुळे अशावेळी शांत डोक्याने निर्णय घ्यावे लागतात. भूमिका लवचिक ठेवावी लागते. सांभाळून घ्यावे लागते.
या मुख्य पार्टनरला त्यांना समजावयाला तासभर लागला. कसबसं समजावून सांगितलं. ते तयार झाले पण शेवटी म्हणाले कि मी फक्त तुम्हालाच रिपोर्टींग करेल, इतरांना शक्य नाही.

म्हणजे काही कडवट शब्दांनी त्यांचा इगो दुखावला गेला होता, आणि त्यांचा प्रतिसाद चुकीचा बिलकुल नव्हता. त्यांच्या अनुभवाचा मान आपल्याला ठेवावाच लागतो. त्यांचाही आत्मसन्मान असतो हे लक्षात ठेऊनच आपल्याला त्यांच्याशी बोलणे आवश्यक असते. चांगली माणसे लवकर भेटत नाहीत. चांगले कर्मचारी संभाळावे लागतात.

पण, कर्मचाऱ्यांचा इगो सांभाळायचा म्हणजे त्यांच्या मनाप्रमाणे वागायचे असे नव्हे हेही लक्षात. त्यांच्यावर तुम्ही रागावू शकता, चिडू शकता, पण शब्दांच्या मर्यादा पळून. आपल्याला सुवर्णमध्य साधायचा असतो. तुमच्या शब्दांमुळे त्यांचे मन दुखावणार नाही याची काळजी घ्यायची असते. इतरांसमोर ज्यावेळी तुम्ही एखाद्या कर्मचाऱ्याला काही बोलत असता त्यावेळी त्यांचा अपमान होणार नाही याची काळजी घ्यायची असते. त्यांचा इगो न दुखावता त्यांना आपल्याला काय हवे आहे हे सांगण्याचे कौशल्य आपल्याला आत्मसात करावेच लागते. संभाषण कौशल्य फक्त ग्राहकांशी बोलतानाच महत्वाचे नसते तर आपल्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना सुद्धा महत्वाचे असते.

शब्दांवर प्रभुत्व महत्वाचे आहे.

व्यवसाय साक्षर व्हा…
उद्योजक व्हा…
समृद्ध व्हा…

_

© श्रीकांत आव्हाड
७७४४०३४४९० (WhatsApp Only)

Business Consultant
www.ShrikantAvhad.com

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील

Total Page Visits: 3175 - Today Page Visits: 1

Shrikant Avhad

संस्थापक - उद्योजक मित्र Entrepreneur, Consultant, Writer, Speaker...

View all posts by Shrikant Avhad →

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!