नवीन वर्षात उद्योजकांसाठी १० संकल्प


लेखक : श्रीकांत आव्हाड
======================

नवीन वर्षासाठी प्रत्येकजण काही ना काही संकल्प करतोच. पण ते व्यायाम करणे, तब्येत मेंटेन करणे, सकाळी फिरायला जाणे यापलीकडे जात नाहीत. उद्योगासाठी तर काहीच संकल्प केले जात नाहीत. यावेळी मात्र आपण आपल्या उद्योगासाठी सुद्धा काही संकल्प करूयात. आणि ते संकल्प पूर्ण कारण्यासठी सर्वतोपरी प्रयत्न करूयात.

उद्योग संकल्प २०२२

१. मार्केटमध्ये (ग्राहकसंख्या तसेच कार्यक्षेत्र) वाढ करण्याचे उद्दिष्ट ठेवा
आपले कार्यक्षेत्र तसेच आपले ग्राहक वाढविण्यासाठी प्रयत्न करा. योग्य आराखडा तयार करा, त्यानुसार काम करा.

२. प्रोडक्ट मध्ये वाढ करा.
आपल्या व्यवसायाशी सुसंगत असे नवीन प्रोडक्ट मार्केटमध्ये आणण्याचा प्रयत्न करा. नवीन प्रोडक्ट उलाढाल वाढविण्यासाठी अत्यंत उपयुक्त मार्ग आहे.

३. दर महिन्याला उलाढाल किमान ५ ते १० टक्क्यांनी वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवा.
प्रत्येक महिन्याला उलाढालीमध्ये किमान ५% वाढीचे उद्दिष्ट ठेवा. यासाठी प्रयत्न करा. जाहिरात, प्रमोशन, मार्केटिंग कॅम्पेन, रेफरन्स अशा विविध मार्गानी उलाढाल वाढविण्यासाठी प्रयत्न करा.

४. संगत चांगली निवडा, चुकीचे लोक दूर करा.
यशस्वी व्यवसायासाठी संगत फार महत्वाची आहे. चांगली माणसे शोधा, चुकीचे लोक दूर करा. उद्योगी विचारांची, चांगल्या स्वभावाची, सकारात्मक विचारांची माणसे जोडण्याचा प्रयत्न करा.

५. गुंतवणुकीचा आराखडा तयार करा.
अजूनही गुंतवणुकीकडे वाळलेला नसाल तर या वर्षात कोणत्याही परिस्थिती गुंतवणुकीला सुरुवात झालीच पाहिजे. गुंतवणुकीचा आराखडा तयार करा. रक्कम लहान, मोठी याकडे दुर्लक्ष करा, गुंतवणूक सुरु करण्याला प्राधान्य द्या.

६. व्यसने बंद करा, किंवा बंद करणे शक्य नसेल तर किमान कमी करा.
व्यसनांच्या आहारी जाऊ नका. व्यसनांच्या आहारी गेलेले व्यावसायिक मार्केटमध्ये टिकत नाहीत. व्यसने बंद करा. किमान कमी तरी करा. व्यसनांचा आधार घेऊन चुकीचे लोक आपल्या सानिध्यात येण्याचा प्रयत्न करत असतात. आपल्या स्वतःवर सुटणाऱ्या नियंत्रणाचा गैरफायदा घेण्यासाठी विघ्नसंतोषी लोक टपलेले असतात. त्यामुळे स्वतःवर नियंत्रण मिळणे महत्वाचे आहे.

७. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले ठेवण्यासाठी प्रयत्न करा
शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले ठेण्यासाठी व्यायाम, योगासने, प्राणायाम करा. आहार चांगला ठेवा. आहाराची वेळ पाळा. शरीराला त्रास देऊ नका, शरीर चांगले असेल तरच व्यवसायाकडे लक्ष देता येईल. मानसिक स्वास्थ्य सुद्धा आवश्यक आहे. ताणतणाव दूर करण्यासाठी विशेष प्रयत्न करा.

८. कुटुंबासाठी ‘निश्चित वेळ’ शिल्लक ठेवायला सुरुवात करा
कुटुंबासाठी निश्चित वेळ बाजूला काढून ठेवायला सुरुवात करा. कामाच्या व्यापात कित्येकवेळा आपण कुटुंबाला वेळ द्यायचे विसरून जातो. यावेळी असे करू नका. कामाची वेळ निश्चित करून घ्या. शक्य तेवढे या वेळेतच काम उरकण्याचा प्रयत्न करा. कुटुंबासाठी जास्तीत जास्त वेळ देण्याचा प्रयत्न करा. महिन्यातून एखादे बाहेरगावचे पर्यटन, आठवड्यातून एकदा शहरात फिरायला जाणे या गोष्टी करत चला.

९. नवीन व्यवसाय संकल्पनांवर काम सुरु करा
नवनवीन व्यवसाय संकल्पनांवर काम करत रहा. एखाद्या नव्या प्रोजेक्टवर काम सुरु करा. मी स्वतः दरवर्षी एक तरी प्रोजेक्ट सुरु करतोच. चांगला व्यवसाय दृष्टीपथात असेल तर तो सुरु करण्यासाठी नियोजन करा. जर जुन्या व्यवसायाला ३ वर्षांपेक्षा जास्त कालावधी झालेला असेल तर यावर्षी एक तरी नवा व्यवसाय सुरु करण्याचे उद्दिष्ट ठेवा. पूर्णपणे स्वतःचा व्यवसाय सुरु करा किंवा वेळ मॅनेज होणे शक्य नसेल तर भागीदारीमध्ये काही सुरु करता येते का पहा.

१०. हे वर्ष संपण्याआधी कोणत्याही परिस्थितीत उलाढाल दुपटीने वाढवण्याचे लक्ष ठेवा
वर्षाअखेरपर्यंत कोणत्याही परिस्थितीत उलाढाल दुपटीने वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवा. उलाढाल वाढविण्यासाठी मार्केटमध्ये वाढ करणे, प्रोडक्ट वाढवणे, ग्राहक वाढवणे, मार्केटिंग कॅम्पेन करणे, प्रोडक्ट किमतीवर काम करणे असे बरेच मार्ग आहेत. यासोबतच नफ्यात सुद्धा किमान दीड पट वाढ करण्याचे उद्दिष्ट असावे.

प्रत्येकाचे नवीन वर्षाचे संकल्प असतात. व्यवसायासंबंधीचे सुद्धा प्रत्येकाने आपल्या पद्धतीने काही संकल्प केलेले असतीलच. आपले संकल्प इतरांनाही सांगा. इतर व्यावसायिकांचा दृष्टिकोन विकसित होण्यासाठी याची मदतच होईल.

मागची दिन वर्षे सर्वांनाच फार त्रासदायक गेली आहेत. कोरोनामुळे झालेले लॉकडाउन, मार्केटमधील मंदी यामुळे सर्वच व्यावसायिक त्रस्त आहेत, पण यावर्षी असे काही होणार नाही अशी अपेक्षा करूयात. यावर्षी सगळे स्थिरस्थावर होईल आणि सर्व काही पूर्वीसारखे सुरळीत होईल अशी प्रार्थना करूयात. नवीन वर्ष संपन्न सुख समृद्धीचे जावो अशाच सदिच्छा

व्यवसाय साक्षर व्हा…
उद्योजक व्हा…
समृद्ध व्हा…

_

© श्रीकांत आव्हाड
७७४४०३४४९० (WhatsApp Only)

Business Consultant
www.ShrikantAvhad.com

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील


Shrikant Avhad

संस्थापक - उद्योजक मित्र Entrepreneur, Consultant, Writer, Speaker...

View all posts by Shrikant Avhad →

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!