व्यवसायाच्या संधी भरपूर आहेत, पण स्टेटस आडवं येतंय


लेखक : श्रीकांत आव्हाड
======================

घराबाहेर पडून शहरातल्या कोणत्याही चौकात उभे राहून जागेवर गोल फेरी मारून निरीक्षण करा, पन्नासएक व्यवसाय तर सहज सापडतील. लहान लहान व्यवसाय तर कितीतरी भेटतील. पण आपला स्टेटस आडवं येत आणि सगळा घोळ होतो.

तीन वर्षांपूर्वी आमच्या नगर शहारत जिल्हा न्यायालयाची नवीन इमारत झाली. या इमारतीच्या जवळपास कुठेही शॉप सेटअप करायला जागा नाही, त्यामुळे सध्या झेरॉक्स साठी इमारतीमधल्या भरपूर गर्दी असलेल्या एकमात्र शॉप बाहेर रांग लावून उभे राहावे लागते, किंवा तीनचारशे मीटरवर जाऊन झेरॉक्स मारावी लागते. टाईपिंगसाठी तर वकिलांना आजही जुन्या न्यायालयाकडे जावे लागते. नवीन इमारतीजवळ जागाच नसल्यामुळे सगळे जुने व्यावसायिक जुन्या इमारतीजवळच आपले व्यवसाय चालवत आहेत. दोन्ही इमारतीमध्ये ३ किलोमीटरचे अंतर आहे. म्हणजे एक साधा ड्राफ्ट टाईप करायचा असेल तरी वकिलांना ३ किलोमीटर गावात जावे लागते. हि एक अतिशय मोठी व्यवसायाची पोकळी आहे.

तीन वर्षांपूर्वी माझ्याकडे ‘काय व्यवसाय करू’ विचारणाऱ्यांना मी हि व्यवसाय संधी सांगत होतो, काही कामंधंदे नसलेल्या जवळच्या कितीतरी मुलांना पोटतिडकीने सांगत होतो. एक लहानशी रिक्षा टेम्पो किंवा मारुती ओमनी घ्या, त्यामध्ये झेरॉक्सचे मशीन, इन्व्हर्टर, टाईपिंगसाठी कॉम्प्युटर सेटअप करा आणि दररोज न्यायालयाजवळ कुठेतरी आपली गाडी उभी करून ठेवा. ढिगाने कस्टमर भेटतील. बदललेल्या परिस्थितीमुळे टायपिंगची थेट ऑफिसमध्ये सर्व्हिस देण्याचा व्यवसाय सुद्धा खूप चालू शकतो. वकिलांकडून ड्राफ्ट मागवून घेणे, टाईप करून प्रिंट करून त्यांच्यापर्यंत पोहोच करणे, इतका सरळ साधा व्यवसाय, आणि याला वकिलांकडून प्रतिसाद मिळू शकेल. दिवसभरात हजार दोन हजार कुठे नाही गेले.

एक पेपर टाईप करून प्रिंट करण्यासाठी ३० रुपये मिळतात, एक साधा नोटीसचा ड्राफ्ट सुद्धा ३ पानांचा असतो. पण या संधीला कुणीच मनावर घेतलं नाही. सांगून दमलो सगळ्यांना.. पण प्रत्येकाचं स्टेटस आडवं येत होतं. प्रत्येकाचा प्रश्न असायचा, आम्ही असले काम करायचे का? असले म्हणजे कसले रे? चोऱ्यामाऱ्या करायला सांगतोय का?
एकूण घराची परिस्थिती पाहता या लोकांना त्यांच्या कॉलनीतले चार जण सोडले तर बाहेर कुणी ओळखत नाही, जे ओळखतात त्यांनाही यांचं काही कौतुक नाही, तरी यांना स्टेटस बिघडण्याची भीती वाटते

महिनाभरापूर्वी आमच्या जिल्हाधिकारी कार्यालयची इमारत दुसरीकडे शिफ्ट झाली आहे. तिथेही अशीच परिस्थिती आहे. आसपास शॉप साठी जागाच नाही. दोन दिवसांपूर्वी तिथून येताना एक मुलगा रिक्षा टेम्पो उभा करून झेरॉक्स काढून देण्याचे काम करत असताना दिसला. त्याच्या रिक्षाच्या बाहेर दहाबारा जण रांगेत उभे होते झेरॉक्ससाठी. त्याला पाहिल्यावर मला तीन वर्षांपूर्वी ज्यांना ज्यांना पोटतिडकीने मी या संधीविषयी सांगत होतो त्यांचे चेहरे आठवले. ते आजही दिवसभरात दीड जीबी बॅलन्स संपवण्याचंच काम करत आहेत फक्त. सोशल मीडियावर प्रोफाइल पीक ला २०० लाईक्स आले कि यांना स्टेटस वाढल्याचा फील येतो, यात फील च्या नादात घराबाहेर आपल्याला १० जण सुद्धा ओळखत नाहीत हे यांच्या लक्षात येतंच नाही.

स्टेटस कमवावं लागतं, ते जन्मजात मिळत नसतं. तुम्हाला तुमच्या जवळचे लोक सोडले तर कुणीच ओळखत नसतं, आणि जेव्हा तुम्हाला सगळे ओळखतात तेव्हा तुम्ही काहीही काम केलं तरी ते लोकांना कौतुकास्पदच वाटत असतं. म्हणजे कोणत्याही परिस्थितीत तुम्ही कोणताही काम केलं तरी लोकांना त्याच्याशी काहीही देणं घेणं नसतं. माणूस यशस्वी होताना दिसायला लागला कि स्टेटस आपोआप मिळायला लागतं. पण या स्टेटच्या नादाला लागून घरीच बसून राहिलं तर लोकं, किंमत देणं सोडा, तुमच्याकडे बघतही नाहीत…

लहान लहान व्यवसाय आहेत, पण भल्या भल्यांना भारी आहेत. ज्यांनी स्टेटसचा विचार न करता हे व्यवसाय सुरु केलेत त्यांनी मोठमोठ्या व्यवसायिकांना लाजवतील अशा प्रॉपर्ट्या उभ्या केल्या आहेत.

सरकारी कार्यालयाबाहेर ५ बाय ५ च्या टपरीमध्ये झेरॉक्सचं, टाईपिंगचं काम करणारा दिवसाला हजार दोन-तीन हजार रुपये सहज कमवतोय. कित्येकजण तर ४-५ हजार रुपये दिवसभरात कमावतात. सकाळी सकाळी चौकात उभे राहून चार-सहा तास चहा पोहे विकणारे हजारभर कसेही काढतात. लहानश्या शहरातला वडापावच्या हातगाडीवाला सुद्धा दिवसाला दीड दोन हजार रुपये सहज कमवतोय, मोठ्या शहरांची तर गणतीच नाही. गाड्या, बंगले, प्रॉपर्ट्या झाल्यात लोकांच्या या ‘स्टेटस नसलेल्या’ व्यवसायावर, आणि इकडे स्टेटसच्या नावाखाली गळे काढणारे जिकडे तिकडे ‘कोणता व्यवसाय करू’ म्हणून विचारत आहेत, नाहीतर फेसबुक ग्रुप वर ‘घरबसल्या पैसे कमवा’ च्या जाहिरातींवर interested म्हणून कमेंट करत आहेत, आणि फेसबुकवरच्या २०० लाईक्स ला स्टेटस समजत आहेत…

राकट देशा… कणखर देशा… स्टेटसला जीवापाड जपणाऱ्यांच्या देशा…

_______________________

© श्रीकांत आव्हाड
७७४४०३४४९० (WhatsApp Only)

Business Consultant
www.ShrikantAvhad.com

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील


Shrikant Avhad

संस्थापक - उद्योजक मित्र Entrepreneur, Consultant, Writer, Speaker...

View all posts by Shrikant Avhad →

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!