एटीएममधून होणारे गैरव्यवहार रोखण्यासाठी विनाकार्ड रक्कम काढण्याची सुविधा सर्वच बँका आणि एटीएमवर येथे उपलब्ध होणार आहे. याची घोषणा रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी शुक्रवारी मुंबईत केली. चालू आर्थिक वर्षाच्या पतधोरणाचा पहिला द्वैमासिक आढावा सादर करताना ते बोलत होते. विनाकार्ड रोकड काढण्याची सुविधा देण्याची परवानगी सर्व बँकांना देण्यात येणार आहे. त्यासाठी बँकिंग कायद्यात यथावकाश आवश्यक ती सुधारणाही करण्यात येणार आहे.
एटीएममध्ये कार्ड टाकणे, एटीएममधील स्किमरच्या मदतीने कार्डाची माहिती चोरीला जाणे, क्लोन किंवा बनावट कार्ड तयार करून त्याआधारे खातेदाराच्या खात्यातून पैसे काढणे यांसारखे गैरव्यवहार यामुळे टाळता येतील. ‘ही सुविधा देशातील सर्व बँका देतील. विनाकार्ड रोकड काढण्याची सुविधा यूपीआय प्रणालीच्या मदतीने राबवली जाईल. विनाकार्ड रोकड काढण्याच्या व्यवहाराची पूर्तता यूपीआय प्रणालीच्या मदतीने केली जाणार आहे. एनपीसीआय, एटीएम नेटवर्क्स व बँका यांना याबाबत लवकरच कळवले जाईल,’ असे शक्तिकांत दास यांनी नमूद केले.
सध्या पाच बँकांमध्ये सुविधा उपलब्ध
विनाकार्ड रोकड काढण्याची सुविधा सुरक्षित आणि अहोरात्र उपलब्ध आहे. या सुविधेचा वापर करून देशात कुठेही रोकड काढणे शक्य होते. स्टेट बँक, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, कोटक महिंद्र बँक, बँक ऑफ बडोदा आणि आरबीएल बँक अशा निवडक बँका सध्या ही सुविधा पुरवत आहेत. या बँकांच्या निवडक एटीएममधून ओटीपीच्या मदतीने किंवा पिन क्रमांकाद्वारे डेबिट आणि एटीएम कार्डाविना रोकड काढता येते.