मुंबई : बँक आॅफ बडोदा आणि भारतीय स्टेट बँकेने व्याजदर वाढवल्यानंतर आता खासगी क्षेत्रातील कोटक महिंद्रा बँक आणि अॅक्सिस बँक या दोन बँकांनी कर्जदरात वाढ केली आहे. या दरवाढीमुळे एमसीएलआर दराने कर्ज घेतलेल्या कर्जदारांच्या मासिक हप्त्याची रक्कम मात्र वाढणार आहे.
कोटक महिंद्रा बँकेने एमसीएलआर दरात ०.०५ टक्क्यांनी वाढवला आहे. एक महिन्यासाठी एमसीएलआर दर ६.९० टक्के इतका झाला आहे. ३ महिन्यांसाठी तो ६.९५ टक्के, सहा महिन्यांसाठी ७.२५ टक्के, एक वर्षासाठी ७.४० टक्के इतका असेल असे बँकेनं म्हटलं आहे.
अॅक्सिस बँकेने देखील ०.०५ टक्के वाढ केली आहे. या दरवाढीनंतर बँकेचा एक महिन्यासाठीचा एमसीएलआर ७.२० टक्के झाला आहे. ३ महिन्यांसाठी तो ७.३० टक्के, ६ महिन्यांसाठी ७.३५ टक्के आणि एक वर्षासाठी तो ७.४० टक्के इतका झाला आहे. १८ एप्रिलपासून हे व्याजदर लागू झाले आहेत.
नुकताच भारतीय स्टेट बँकेने सर्व कालावधीच्या कर्जांवरील व्याजदरांमध्ये ०.१० टक्क्यांची वाढ केली होती. स्टेट बँकेच्या वेबसाइटनुसार ग्राहकांना एका रात्रीपासून ते तीन महिने कालावधीसाठी कर्जदर (एमसीएलआर) पूर्वीच्या ६.६५ टक्क्यांऐवजी ६.७५ टक्के राहणार आहे. त्याच वेळी सहा महिने कालावधीच्या कर्जांचा व्याजदर ६.९५ टक्क्यांवरून ७.०५ टक्क्यांवर गेला.
‘बँक ऑफ बडोदा’नेही नुकतीच कर्जांच्या व्याजदरांत वाढ केली. त्यामुळे आता ग्राहकांना गृह, वाहन आणि वैयक्तिक कर्जे घेणे महाग होणार आहे. स्टेट बँकेपाठोपाठ अन्य बँकाही व्याजदरांमध्ये वाढ करण्याची शक्यता आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार ‘मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड बेस्ड लेंडिंग रेट’वर आधारित (एमसीएलआर) कर्जाच्या व्याजदरात झालेल्या वाढीमुळे ग्राहकांसाठी आता गृह, वाहन आणि वैयक्तिक कर्जांचा ‘ईएमआय’ वाढला होता.