रिझर्व्ह बँकेकडून रेपो रेटमध्ये वाढ; होम, ऑटो लोनसह सर्वच कर्ज महागणार


मुंबई, 4 मे : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) महागाईच्या (Inflation) दबावाखाली तब्बल दोन वर्षांनी रेपो दरात (Repo Rate) वाढ केली आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास (RBI Governor Shaktikanta Das) यांनी बुधवारी दुपारी अचानक पत्रकार परिषद घेऊन रेपो दरात 0.40 टक्के वाढ करणार असल्याची माहिती दिली. याशिवाय RBI ने कॅश रिझर्व्ह रेशो (CRR) मध्ये 0.50 टक्क्यांनी वाढ केली आहे. CRR आता 4.50 टक्क्यांवर आला आहे.

गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले, जागतिक बाजारपेठेत वस्तूंच्या वाढत्या किमती आणि पेट्रोल आणि डिझेलसह इतर इंधनांच्या वाढत्या दबावामुळे आम्हाला रेपो दरात बदल करावा लागला आहे. आता रेपो दर 4 टक्क्यांऐवजी 4.40 टक्के असेल. RBI ने मे 2020 पासून रेपो दरात कोणताही बदल केलेला नाही. जूनपासून रेपो दरात वाढ होऊ शकते, असे मानले जात होते, मात्र त्याआधीच गव्हर्नरांनी अचानक दर वाढवून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.

सर्वसामन्यांवर काय परिणाम होणार?
रेपो दरात वाढ झाल्याने कर्जाचा EMI वाढत असल्याने बँकांच्या कर्जाचा खर्च वाढणार आहे. रिझर्व्ह बँकेकडून बँका ज्या दराने कर्ज घेतात तो दर म्हणजे रेपो दर. या वाढीमुळे बँकांच्या कर्जाचा खर्च वाढेल आणि त्याचा बोजा ग्राहकांवर पडेल. त्यामुळे तुमचे गृह कर्ज, वाहन कर्ज किंवा वैयक्तिक कर्ज हे सर्व आगामी काळात महाग होणार आहे.

यापूर्वी, एप्रिलच्या आढाव्यात, सलग 10व्यांदा दरांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. 22 मे 2020 रोजी, कोविडच्या प्रभावाचा सामना करण्यासाठी, रिझर्व्ह बँकेने रेपो दर 4 टक्क्यांपर्यंत कमी केले. तेव्हापासून आजतागायत रेपो दर या पातळीवरच राहिले. आज त्यात 40 बेसिक पाँईंट्सने वाढ झाली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!