भारतीय ऑटोमोबाईल इंडस्ट्रीची कहाणी… (भाग १) टाटा, महिंद्रा, टोयोटा


भारतातील ऑटोमोबाईल इंडस्ट्री मध्ये आजही मारुती सुझुकीचा शेअर ४५% च्या आसपास आहे. कित्येक वर्षांपासून या कंपनीचं देशातील ऑटोमोबाईल इंडस्ट्रीवर वर्चस्व आहे. पण यासोबतच महिंद्रा, टाटा, ह्युंदाई, टोयोटा, होंडा या कंपन्या सुद्धा आपला दबदबा राखून आहेत. फियाट ने काही काळासाठी चांगली छाप पडली होती, पण माघार घेतली. फोर्ड चा जम बसला होता, पण ते वर्चस्व टिकवणे त्यांना जमले नाही. रिनॉल्ट, निसान, सारख्या कंपन्या प्रयत्न करत आहेत. नवनवीन कंपन्या मार्केटमध्ये येत आहेत. १५० कोटी लोकसंख्येचं मार्केट कुणाला नकोय?

मारुतीला वाईट दिवस कधी बघावे लागले नाहीत. त्यांचा कस्टमर इतका निष्ठावान आहे कि तो दुसरीकडे जातच नाही. मारुतीने आपला कस्टमर विचारपूर्वक टार्गेट केलेला आहे. हा कस्टमर बेस आपल्याकडे वळवणे थोड्याफार प्रमाण ह्युंदाई ला जमले. पण टाटा महिंद्रा मात्र यात पिछाडीवर होत्या. या कंपन्यांना मात्र एक काळ फारच अडचणींचा आला होता. फक्त SUV मध्ये असल्यामुळे आणि त्यात नवनवीन स्पर्धा निर्माण होत असल्यामुळे, आणि त्यातही नवीन टेक्नॉलॉजीच्या अभावामुळे या कंपन्या पॅसेंजर वाहनांच्या मार्केटमधून बाहेर जातील कि काय असे वाटत होते.

२००० मध्ये आलेल्या टोयोटा क्वालीसने टाटांच्या कमर्शिअल प्रवासी वाहनांची विक्री एकदमच कमी केली. सफारी ब्रँड आपली प्रतिमा राखून होता, पण तो अपेक्षित विक्री करून देत नव्हता. टाटाला नवीन प्रयोग करणे आवश्यक होते. यात टाटाने इंडिका लाँच करून या मार्केटमध्ये उडी घेतली. हा एक धाडसी प्रयोग होता. फेल गेला असता तर कंपनीला सगळं आवरून घरी जावं लागलं असतं. पण इंडिकाने टाटाचे नशीबच पालटले. डिझेल इंजिनवर वर २० किमी प्रति लिटर मायलेज देणारी इंडिका तुफान हिट झाली. लोकांनी ८-१० तास रांगेत उभे राहून गाडीच्या बुकिंग केल्या होत्या. टाटांना हा व्याप सांभाळणे अवघड वाटायला लागल्यामुळे त्यांनी फोर्ड ला इंडिका प्लांट खरेदी करण्याची ऑफर दिली होती. फोर्ड ने ती नाकारली आणि टाटांनी आपल्या बळावर प्रोजेक्ट पुढे न्यायाचे ठरवले.

या गाडीने टाटा ला नवसंजीवनी दिली. सुमो, स्पॅशिओ मधेच अडकून पडलेल्या टाटाने भारतीय वाहन उद्योगामध्ये नव्याने प्रवास सुरु केला. इंडिका, सफारी च्या प्रवासात पुढे इंडिगो आली. तिनेही कंपनीला साथ दिली. हळूहळू टाटाने आपले विश्व विस्तारण्यास सुरुवात केली. JLR वर ताबा मिळवला, आणि टाटामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा शिरकाव झाला. मागच्या ५ वर्षात टाटामध्ये प्रचंड बदल झाला आहे. आता हि कंपनी जागतिक स्तरावरील तंत्रज्ञाचा वापर आपल्या वाहनांमध्ये करत आहे. नवनवीन वाहनांवर प्रयोग करत आहे.

महिंद्राची अवस्थाही अशीच होती. कमांडर, आरमडा सारख्या गाड्यांच्या पुढे कंपनीला जाताच येत नव्हते. क्वालिसमुळे महिंद्राची विक्री एकदमच खालावली होती. काहीतरी करणं आवश्यक होतं. यात कंपनीने स्कॉर्पिओ वर डाव खेळला. आणि हा डाव प्रचंड यशस्वी झाला. जिकडे तिकडे स्कॉर्पिओच दिसायला लागल्या. स्कॉर्पिओ ने बुडायला लागलेल्या महिन्द्राला अक्षरशः तारलं. टाटाप्रमाणे महिंद्रानेही मोठी रिस्क घेतली होती. हा प्रयोग फसला असता तर महिंद्रा मार्केटमधून बाहेर फेकली गेली असती. पण स्कॉर्पिओ चा प्रयोग यशस्वी ठरला.

यामध्ये कंपनीने रिनोल्ट सोबत भागीदारी करून लोगन सेडान मार्केटमध्ये उतरवली, पण लोकांना महिन्द्राचा लोगो SUV वरच बघायला आवडतो हे कंपनीला लवकरच लक्षात आलं, आणि कंपनीने नसते प्रयोग बंद करून पूर्णपणे SUV मार्केटवर लक्ष केंद्रित केलं. कोणत्याही गोष्टीचा एक काळ असतो. इथेही टोयोटा फॉर्च्युनर सारख्या गाड्यांमुळे स्कॉर्पिओ ची विक्री कमी व्हायला लागली. अशावेळी पुन्हा नवनवे प्रयोग करणे आवश्यक होते. कंपनीने नवा डाव टाकला, XUV700 च्या रूपात. आणि हा पत्तासुद्धा कंपनीला तुफान यश देऊन गेला. आज SUV मार्केटमध्ये महिन्द्राचा दबदबा आहे. XUV व्हा नवीन व्हर्जन मुळे कंपनीने पुन्हा या मार्केटमध्ये आघाडी घेतली आहे.

टोयोटा ने कोरोला आणि क्वालीस च्या रूपात भारतात प्रवेश केला. जगातली सगळ्यात जास्त विकली गेलेली कोरोला भारतात मात्र अजून आपले स्थान शोधण्याचा प्रयत्न करत आहे, पण क्वालीस चांगलीच यशस्वी ठरली. कंपनीला चांगले यश मिळाले. क्वालिसमुळे टाटा, महिंद्रा च्या विक्रीवर परिणाम झाला. कमर्शिअल प्रवासी वाहन म्हटलं कि क्वालिसचंच नाव समोर यायचं इतका क्वालीस चा एके काळी दबदबा होता. पण स्पर्धक कंपन्यांनी नवनवीन प्रयोग यशस्वी करायला सुरुवात केली आणि टोयोटाने एक दिवस अचानक क्वालीस बंद करून इनोव्हा मार्केटमध्ये ऊतरवली. सुरुवातीला लोकांना वाटलं कि एवढा यशस्वी ब्रँड बंद करून टोयोटा आपल्या पायावर धोंडा पडून घेणार आहे, पण झालं उलटंच. इनोव्हाने तर सगळ्याच गाड्यांच्या विक्रीचे रेकॉर्ड तोडायला सुरुवात केली.

टोयोटाने भारतीय प्रवासी वाहनांच्या मार्केटमध्ये लग्झरी प्रवासाचा अनुभव द्यायला सुरुवात केली. इनोव्हा यशस्वी ठरत असताना बराच ग्राहक पुन्हा पारंपरिक SUV गाड्यांकडे वळायला लागला होता. स्कॉर्पिओ बरंच मार्केट खात होती. खास करून तरुणांमध्ये स्कॉर्पिओ फेवरीट होती. हे मार्केट टोयोटाला खुणावत होतं. आणि टोयोटाने भारताच्या SUV मार्केटमधला टाटा सफारीनंतरचा सगळ्यात मोठा पत्ता उघडला. फॉर्च्युनर लॉन्च झाली. या गाडीने भारतीय ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये जो घिंगाना घातला तो खूप कमी कंपन्यांना जमलाय. स्थानिक कंपन्यांनी तरी अशा प्रकारचे यशस्वी प्रयोग राबवलेत पण परदेशी कंपन्यांना तर आजपर्यंत अशा प्रकारचा यशस्वी प्रयोग राबवता आलेला नाही. फॉर्च्युनर ने भारतातील नागरिकांना SUV कशी असायला पाहिजे हेच दाखवून दिलं. यानंतर भारतातल्या SUV गाड्यांचं रंगरूपात बदलून गेलं…

या कंपन्यांनी सतत प्रयोग गेले, नवनवीन प्रयोग केले, रिस्क घेतली, अगदी मार्केटमधून बाहेर जाण्याची सुद्धा रिस्क होती, तरीसुद्धा विविध प्रयोग केले, आणि तेच प्रयोग सर्वात जास्त यशस्वी झाले.

भारतातील ऑटोमोबाईल इंडस्ट्री स्वतंत्रपणे अभ्यासावी अशी आहे. यातीलच पुढचा भाग लवकरच तुमच्यासमोर येईल…

(क्रमशः…)

_______________________

© श्रीकांत आव्हाड
७७४४०३४४९० (WhatsApp Only)

Business Consultant
www.ShrikantAvhad.com

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील


Shrikant Avhad

संस्थापक - उद्योजक मित्र Entrepreneur, Consultant, Writer, Speaker...

View all posts by Shrikant Avhad →

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!