भारतीय ऑटोमोबाईल इंडस्ट्रीची कहाणी… (भाग २) मारुती सुझुकीला टक्कर देणारी ह्युंदाई


लेखक : श्रीकांत आव्हाड
======================

१९९६ मध्ये ह्युंदाई ने भारतामध्ये पाय ठेवले. तेव्हा देशात मारुती, टाटा, महिंद्रा, हिंदुस्थान आणि प्रीमिअर याच कंपन्या होत्या. मारुती ८०० वर देशवासीयांचं अपार प्रेम असण्याचा तो काळ होता.. टाटा, महिंद्रा कमर्शिअल प्रवासी वाहनांच्या पुढे जात नव्हत्या, प्रीमिअर पद्मिनी आणि हिंदुस्तानी अँबेसेडर यांचा काळ ओसरत चालला होता. नव्या जमान्याला साजेशी फक्त मारुती ८०० होती आणि मार्केटमध्ये तिचाच बोलबाला होता. पण एखाद्याचा कितीही बोलबाला असला तरी त्याला पर्याय असावाच लागतो, इथे तो पर्याय उपलब्ध नव्हता. फॅमिली कार्स च्या मार्केटमध्ये मोठी पोकळी होती. अशा काळात ह्युंदाई ने भारतीय मार्केटमध्ये सँट्रो च्या माध्यमातून प्रवेश केला. ती पोकळी भरण्याचे काम ह्युंदाई ने केले.

सुरुवातीला सॅन्ट्रो चा आकार पाहून बऱ्याच जणांना गाडी आवडली नाही. पण ती मारुती ८०० ला उत्तम पर्याय होती. पण मारुतीला पर्याय देणे हे वाटते तेवढे सोपे काम नव्हते. देशाच्या कानाकोपऱ्यात पोचलेली आणि डोंगरदऱ्यातही मेकॅनिक सहजरित्या मिळून जाईल इतके मोठे सर्व्हिस नेटवर्क असलेली मारुती एकमात्र कंपनी होती. मारुतीला टक्कर द्यायची तर हे सर्व्हिस नेटवर्क तयार करावे लागणार हे ह्युंदाईला माहित होते. सुरुवातीला ह्युंदाई ने फॅमिली कार म्हणून सॅन्ट्रो चे प्रमोशन सुरु केले. जाहिरातींचा अक्षरशः भडीमार केला होता ह्युंदाईने. हळूहळू गाड्यांची विक्री व्हायला लागली, विक्री वाढायला लागली. ९८-९९ पर्यंत कंपनीने चांगला जम बसवला. मारुती सोडून पर्याय शोधणाऱ्यांना सॅन्ट्रो च्या रूपात चांगला पर्याय मिळाला.

कंपनीने ब्रँड अँबेसेडर म्हणून त्या काळचा सुपरस्टार शाहरुख ला घेतले आणि तिथून पुढे ह्युंदाई मारुतीला तोडीस तोड म्हणून उभी राहायला लागली. तोडीस तोड म्हणजे एकदमच मारुतीच्या बरोबरीची कंपनी झाली असे नव्हे. ते आजही शक्य नाहीये. आजही मारुती मार्केटमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे, आणि तिच्या खालोखाल असणारी ह्युंदाईची विक्री मारुतीच्या ३५% आहे. पण तरीही ह्युंदाई नेहमीच मारुतीच्या खालोखाल दुसरा क्रमांक टिकवून ठेवणारी कंपनी राहिली आहे हे महत्वाचे. २००१-०२ च्या काळात जिथे मारुती ८०० महिन्याला ६०-७० हजार विकल्या जायच्या तिथे सॅन्ट्रोचा खप २०-२२ हजार गाड्यांपर्यंत जात होता. त्याखालोखाल मग ४-५ हजाराच्या घरात इतर कंपन्या होत्या. मारुतीचा बोलबाला असला तरी तरुणाईला सॅन्ट्रोची भुरळ पडली हे मात्र खरे होते. सॅन्ट्रोने मारुती ८०० नंतर आपलाच दबदबा कायम ठेवला. कौटुंबिक गाडी म्हणून मारुती ८०० आणि सँट्रो तरुणांची अशी विभागणीच झाली होती.

भारतीय मार्केटमध्ये पाय रोवायचे असतील तर किंमत आणि सर्व्हिस वर भर द्यावा लागेल हे कंपनीने जाणले होते. त्यामुळे कंपनीने गाव खेड्यापर्यंत ह्युंदाईचे मेकॅनिक सापडतील अशा प्रकारे सर्व्हिस चे नियोजन केले. सर्व्हिस सेंटर्स मोठ्या प्रमाणात वाढवले. ग्रामीण भागातील सर्व्हिस सेंटर्स आणि शोरुम्स सुरु केले. याचा परिणाम ग्रामीण भागातही वाहनांची विक्री वाढण्यात झाला. आणि हळूहळू टाटा, मारुती, महिंद्रासारखे सारखे ह्युंदाईचे सुद्धा मेकॅनिक शहरांसोबत ग्रामीण भागात दिसायला लागले. देशांतर्गत प्रोडक्शन असल्यामुळे गाड्यांच्या किमती सुद्धा नियंत्रणात होत्या. या दोन्हींचा परिणाम ह्युंदाईची विक्री वेगाने वाढण्यात झाला. अल्पावधीतच कंपनी खाजगी प्रवाशी वाहनांच्या विक्रीच्या बाबतीत देशातील दुसरी मोठी कंपनी बनली.

ह्युंदाई येण्याआधी भारतीय मार्केटमध्ये मारुतीच्या ८०० सोबत झेन आणि एस्टीम चा बोलबाला होता. या दोन गाड्यांचे सुपरस्टारसारखे चाहते होते मार्केटमधे. ह्युंदाईने सँट्रो यशस्वी झाल्यावर मग अॅक्सेंट च्या रूपात पुढची खेळी खेळली. अॅक्सेंटचं रंगरूप नव्या पिढीला प्रचंड आवडलं. गाडी चांगली लोकप्रिय झाली. इथेही एस्टीम खालोखाल अक्सेंटचीच विक्री होत होती. अॅक्सेंट च्या डिझेल CRDI मॉडेल ने भारतीय मार्केटमध्ये डिझेल इंजिनचे सुद्धा चाहते तयार केले. मायलेज आणि परफॉर्मन्स दोन्हीतही सुपर असणारी अॅक्सेंट CRDI चांगलीच चालली. हळूहळू अॅक्सेंट ने एस्टीम ला मागे टाकले आणि मार्केट लीडर बनली. मात्र २०१३ ला अॅक्सेंट अचानक बंद केली गेली.

या काळात ह्युंदाई ने बरेच प्रयोग केले. सोनाटा लाँच केली. सोनाटा ला आम्ही श्रीमंतातल्या गरिबांची मर्सिडीज म्हणायचो. मर्सिडीज C क्लास सारखे हेडलाईट असलेली सोनाटा बऱ्यापैकी पैसा असणारे पण मर्सिडीज सारखी खर्चिक गाडी नको असणाऱ्यांना चांगला पर्याय होता. सोनाटाने काही काळ मार्केट मिळवले. चांगलं स्टेटस सुद्धा तयार केलं. पण लवकरच मार्केटबाहेर गेली.

यासोबत कंपनीने एलेन्ट्रा, टक्सन, टेरेकॅन, गेट्झ, सॅन्टा फे अशा काही गाड्या मार्केटमध्ये उतरवल्या पण त्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. एकविसाव्या शतकाचे पहिले दशक संपता संपता सॅन्ट्रोची विक्री कमी व्हायला लागली. सॅन्ट्रो आणि अॅक्सेंट व्यतिरिक्त ह्युंडाईकडे दुसरी कोणतीही दमदार गाडी राहिली नव्हती. भारतीय मार्केटमध्ये बाहेर देशातील मोठमोठ्या कंपन्यांचा प्रवेश व्हायला लागला आणि अॅक्सेंट ची सुद्धा विक्री हळूहळू कमी व्हायला लागली.

ह्युंदाई ने २००६-०७ च्या आसपास वर्ना लाँच केली. या गाडीला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही पण तरी गाडीने बऱ्यापैकी विक्री करून दिली. स्मॉल कार्स च्या मार्केटमध्ये I10 बऱ्यापैकी चालत होती, I20 मात्र चांगली हिट झाली होती. पण तरीही २०१०-११ च्या आसपास येताना सगळे काही थंडावल्यासारखे झाले होते. काहीतरी चुकल्यासारखे जाणवत होते. अशात २०११ मध्ये कंपनीने वर्ना फ्लूडिक लाँच केली आणि ह्युंदाईला पुन्हा नवसंजिवनी मिळाल्यासारखे झाले.

फ्लूडिक ने मार्केटचा चेहरामोहराच बदलून टाकला. मार्केटमध्ये एकदम स्पर्धा वाढल्यासारखे जाणवायला लागले. लोकांना नव्या जमान्याच्या सेडान मधून जे अपेक्षित होते ते सर्वकाही फ्लूडिक ने दिले. हा पत्ता अगदी योग्य वेळेला उघडला गेला आणि फ्लूडिक सेडान कार्स मध्ये मार्केट लीडर बनली.

२०१३ मध्ये कंपनीने अचानक अॅक्सेंट बंद करत असल्याची घोषणा केली. अॅक्सेंट च्या चाहत्यांसाठी प्रेमभंग झाल्यासारखी भावना होती त्यावेळी. कंपनीने अॅक्सेंट चे नवीन कोणतेही मॉडेल आणले नाही. कदाचित आपल्याच व्हर्ना फ्लूडिक ला स्पर्धा नको म्हणून आणि नव्या ब्रँड ची गरज आहे हे ओळखून कंपनीने अॅक्सेंट ला हद्दपार केले असावे. पण कंपनीने आपला सगळ्यात लोकप्रिय ब्रँड बंद करण्याची हिम्मत दाखवली हे विशेष

फ्लूडिक सुपरहिट होत असताना क्रेटा मार्केटमध्ये आली आणि आणि क्रेटा ने SUV वाहनांची परिभाषाच बदलली. ह्युंदाई मुळे वाहनांमध्ये मोठे स्थित्यंतर घडले हे आपल्याला निःसंशय मान्य करावे लागेल इतका बदल व्हर्ना आणि क्रेटा घडवून आणला आहे. क्रेटाचे नव्याने बदललेले रंगरून अनेकांना आवडले नाही, तिचा कॉर्पोरेट लूक बदलल्याची भावना अनेकांची झाली आहे, आणि याचा परिणाम विक्रीवरही झाला आहे, यावर कंपनी यावर विचार असेलच. i20 चंही असंच झालं आहे. कंपनी भारतीय मानसिकतेपासून लांब जात आहे का असे वाटावे अशा काही नव्या डिझाइन्स बघायला मिळत आहेत.

मधल्या काळात कंपनीने आपले फ्लॉप गेलेले एलेन्ट्रा, सोनाटा मॉडेल पुन्हा नव्या रूपात लाँच केले, पण ते पुन्हा फ्लॉप ठरले. कंपनी फ्लॉप गेलेल्या गाड्या पुन्हा लाँच करत असताना एव्हरग्रीन अॅक्सेंट का लाँच करत नाहीये हे मात्र अॅक्सेंट च्या चाहत्यांना कळत नव्हते. एखाद्या सुपरहिट ब्रँड एवढा काय रोष असावा हे काही लोकांना कळत नव्हते. काही वर्षांपूर्वी कंपनीने I10 मध्ये थोडे बदल करून अॅक्सेंट लाँच केली, पण तिने अॅक्सेंट चा ब्रॅण्डच संपवला. हि अॅक्सेंट लाँच केली नसती तरी चाललं असतं अशीच अॅक्सेंटच्या चाहत्यांची भावना झाली, किमान गाडीची इमेज तरी टिकून राहिली असती.

या सगळ्यात एक मात्र आहे कि कंपनी आजही मारुतीनंतर आपला दुसरा क्रमांक टिकवून आहे. नवनवीन टेक्नॉलॉजीमुळे कंपनी चा चाहता वर्ग टिकून आहे. आजही मारुतीच्या खालोखाल ह्युंदाईच्याच गाड्या विकल्या जातात. आणि भारतीय मध्यमवर्गीय नागरिकांमध्ये मारुतीनंतर विश्वासार्ह कंपनी ह्युंदाईच आहे. कंपनीने भरपूर काळ भारतीय मार्केटमध्ये व्यतीत केला आहे. कंपनी इतकी भारतीय झाली आहे कि हि कंपनी परदेशी आहे हेही कुणाला जाणवत नाही, नव्या पिढीला तर ह्युंदाई मूळची भारतीय नाही असं म्हटलं तर पटणारही नाही इतकी हि कंपनी या मार्केटमध्ये रुळली आहे.

ह्युंदाई च्या या सगळ्या यशात काही लक्षात घेण्यासारख्या गोष्टी आहेत…
१. कंपनीने सर्वात आधी मार्केटमधली पोकळी हेरली आणि त्यावर काम सुरु केले.
२. देशाच्या कानाकोपऱ्यात जायचे असेल तर सर्व्हिस सेंटर्स वर भर द्यावा लागेल हे कंपनीने जाणले आणि त्यावर वेगाने काम केले.
३. कंपनीने मारुतीसारखेच सतत नवनवीन प्रयोग केले. यातून काही फ्लॉप तर काही हिट ठरले.
४. कंपनीने काळाची पावले आधीच ओळखून आपल्या वाहनांमध्ये अनेक बदल केले जे त्या त्या काळात क्रांतिकारी ठरले.
५. कंपनीने प्रमोशनवर नेहमीच भर दिला, आणि ते प्रमोशन मध्यमवर्गीय ग्राहकांना आवडेल असेच ठेवले.
६. अॅक्सेंट सारखा ब्रँड कंपनीने का संपवला हे गुपित कधी कळेल कि नाही माहित नाही, पण त्याने कंपनीवर फरक पडला नाही, तरी या ब्रँड ने कंपनीला एका नव्या उंचीवर नेले असते हे मात्र खरे आहे. पण कंपनीने अॅक्सेंट सारखा ब्रँड बंद करण्याची धमक दाखवली हेही विशेष आहे.
७. कंपनीने गुणवत्तेमध्ये कधीच आतडजोड केली नाही. याचा फायदा कंपनीचा ग्राहकवर्ग टिकून राहण्यात झाला.
८. कंपनी वेगवेगळे प्रयोग करून, अनेकविध मार्ग वापरून आपला दुसरा क्रमांक आजही मार्केटमध्ये टिकवून आहे हे महत्वाचे
९. टाटाकडून कंपनीला चांगली टक्कर मिळत आहे. येत्या काळात देशातली खाजगी प्रवासी वाहनांच्या विक्री बाबतीत दुसरी मोठी कंपनी कोणती ठरते याची स्पर्धा पाहण्यासारकाखी असेल. पण सध्यातरी ह्युंदाई आपले स्थान टिकवून आहे
१०. ह्युंदाईने आपला ब्रँड जनमानसात रुजवला हि कंपनीची जमेची बाजू आहे. ज्या प्रकारे मारुती, टाटा, महिंद्रा हे ब्रँड लोकांना आपल्या जवळचे वाटतात त्याच प्रकारे ह्युंदाईची सुद्धा प्रतिमा जनमानसात आहे ज्याचा फायदा कंपनीला मोठ्या प्रमाणात मिळतो.

__________

तर अशी आहे ह्युंदाई ची कहाणी… या मालिकेतील पुढील भाग लवकरच…

(क्रमशः…)

_______________________

© श्रीकांत आव्हाड
७७४४०३४४९० (WhatsApp Only)

Business Consultant
www.ShrikantAvhad.com

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील


Shrikant Avhad

संस्थापक - उद्योजक मित्र Entrepreneur, Consultant, Writer, Speaker...

View all posts by Shrikant Avhad →

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!