आपण चहा पिताना प्रत्येक वेळी एकाच भावनेने पितो का?
सकाळचा पेपर वाचत चहा पिताना,
दुपारी काम करून थकल्यावर चहा पिताना,
कधी एखाद्या कॅफेमध्ये निवांत बसून चहा पिताना,
संध्याकाळी मित्रांसोबत कुठेतरी कट्ट्यावर बसून चहा पिताना,
कधी मुसळधार पावसात एखाद्या टपरीवर काचेच्या ग्लासातुन कडक चहा पिताना,
कधी कडक उन्हात चहा घेताना,
कधी महाबळेश्वरच्या उंच कड्यावर दाट धुक्यात उभा राहून चहा पिताना,
कधी माळशेज घाटात थांबून मुसळधार पावसात चहा पिताना,
कधी आमच्या भंडारदऱ्याला गुडघाभर पाण्यात आणि तुफान वाऱ्यासमोर उभे राहून गरमागरम कांदाभज्यांसोबत चहा घेताना,
कधी खान्देशच्या कडाक्याच्या उन्हात चहा पिताना,
कधी विदर्भातल्या घनदाट जंगलात रस्त्याच्या कडेला उभे राहून चहा पिताना,
तर कधी मराठवाड्यातल्या विरान जमिनीच्या कडेला असलेल्या हिरव्यागार कपड्याखाली थाटलेल्या एखाद्या टपरीवर चहा पिताना…
प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक वेळी चहा पिताना वेगळी भावना असतो, वेगळी जाणीव असते… असते ना? असायलाच पाहिजे, तरच त्या चहाची खरी चव चाखायला मिळते.
एकंच प्रोडक्ट आहे, पण ते चाखताना प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक वेळी वेगळीच भावना असते.. आपल्याला त्या त्या ठिकाणी, त्या त्या वेळी त्या चहातून वेगळा रिझल्ट अपेक्षित असतो. कधी थंडावा हवा असतो, कधी उष्णता हवी असत, कशी शांतता हवी असते, कधी एकाग्रता हवी असते तर कधी आणखी काही. आपल्याला त्या चहामधून प्रत्येक वेळी वेगळं काहीतरी अपेक्षित असतं, आणि ते वेगळेपण मिळालं तरच तो चहा आपल्याला चांगला वाटतो, नाहीतर तो दररोजच्या एखाद्या साध्या चहाप्रमाणेच वाटतो..
(उदाहरण चहाचं घेतलं कारण मला चहा पितानाच लेख सुचलाय)
किराणा दुकान परिसरात १० असतील, पण ग्राहकाला तुमच्याकडूनच किराणा खरेदी करण्यासाठी काय अपेक्षित आहे हे आपल्या लक्षात यायला हवे तरच धंदा चालेल. ग्राहकाला डिस्काउंट हवा आहे का, त्याला स्वच्छता हवी आहे का, त्याला मोठे प्रसन्न शॉप अपेक्षित आहे का, त्याला सुपरमार्केटसारखा सेटअप आवडतोय का, त्याला AC चा थंडावा हवा आहे का, त्याला सहज होणारी खरेदी हवी आहे का, त्याला एका कॉल वर घरपोच माल हवा आहे का… त्याला काय हवं आहे हे आपल्याला कळालं तरच आपला व्यवसाय वाढू शकतो.
आपले एखादे हॉटेल असेल तर त्या हॉटेलमध्ये ग्राहक फक्त नेहमीप्रमाणे सामान्यपणे जेवण्यासाठी येतो का, कि त्याला तिथला सेटअप आवडतो, कि त्याला तिथली शांतता आवडते, कि त्याला तिथली सर्व्हिस आवडते, कि त्या हॉटेलची समाजातील प्रतिमा आवडते, कि त्याला तिथला परिसर आवडतो, कि त्याला कर्मचाऱ्यांचं वागणं आवडतं… तो आपल्या हॉटेलमध्ये कशासाठी येतोय हे कळालं पाहिजे…
महागड्या ब्रँड चे कपडे, शूज, घड्याळ घेताना ग्राहकाला त्यातून प्रतिमा संवर्धन अपेक्षित असू शकते, किंवा त्या प्रोडक्टमुळे मिळणारे समाधान हवे असते, किंवा त्यामुळे येणार आत्मविश्वास हवा असतो… आणि ते ब्रँड्स त्या ग्राहकाला हवे ते देण्याचा पुरेपूर प्रयत्न करतात.
कोणत्याही व्यवसायिकासोबत व्यवहार करताना ग्राहकाला काहीतरी अपेक्षित असते. प्रत्येकवेळी ते प्रोडक्ट खरेदी पुरतेच मर्यादित असेल असे नाही, किंबहुना जास्त वेळा ते प्रोडक्ट खरेदीपेक्षा वेगळे काहीतरी असते. ते वेगळं काय आहे हे ज्याला कळतं त्याचा व्यवसाय सुसाट निघतो…
व्यवसाय साक्षर व्हा…
_______________________
© श्रीकांत आव्हाड
७७४४०३४४९० (WhatsApp Only)
Business Consultant
www.ShrikantAvhad.com
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम
All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील