२००८ मध्ये टाटा मोटर्सने प्रवासी वाहनांमध्ये जगातील सर्वोत्तम लग्झरी ब्रँड असलेली ब्रिटनस्थित जग्वार लँड रोव्हर कंपनी विकत घेतली. पूर्णपणे कर्जात बुडालेली आणि बंद पडण्याच्या मार्गावर असलेली हि कंपनी टाटा मोटर्स ने ९२०० कोटी रुपयांना विकत घेतली. JLR हि फोर्ड ग्रुप ची कंपनी होती. हा व्यवहार भारतीय वाहन उद्योगासाठी एक मैलाचा दगड ठरणार होता. फक्त वाहन उद्योगच नाही तर भारतीय उद्योग जगतासाठी हा व्यवहार एक मार्गदर्शक म्हणून काम करणार होता.
या व्यवहाराविषयी त्यावेळी मार्केटमध्ये बराच गोंधळ चालू होता. ब्रिटन सरकारला आपली (आणि जगातील एक) सर्वोत्तम कंपनी भारतातील एखाद्या कंपनीने खरेदी कारण्यापेक्षा आपल्याच भागातील (युरोप किंवा अमेरिका) दुसऱ्या एखाद्या कंपनीने खरेदी करावी असं वाटत होतं. यासाठी सरकारने इतर कंपन्यांना ऑफर सुद्धा दिली होती, या नादात व्यवहार सुद्धा थोडा लांबला, पण टाटाने देऊ केलेली रक्कम देण्याची इतर कोणत्याही कंपणीची तयारी नव्हती. त्यावेळी सोशल मीडिया किंवा इंटरनेट माध्यम अत्ताएवढं प्रभावी नव्हतं त्यामुळे बातम्यांमधून मिळतील तेवढ्याच बातम्या कानावर पडायच्या. पण एकूणच, ज्या देशावर आपण दीडशे वर्षे राज्य केलं त्या देशातल्या कंपनीने आपली कंपनी विकत घ्यावी हे मान्य करणे ब्रिटनला त्रासदायक जात होतं हे लक्षात येत होतं.
ब्रिटन सरकार ज्या प्रकारे या व्यवहाराला प्रतिसाद देत होतं ते पाहता सरकार नक्कीच काहीतरी वेगळा मार्ग शोधत होतं असं म्हणायला जागा आहे. सरकारने सुरुवातीला JLR ला तोट्यातून सावरण्यासाठी कोणतीही मदत न देण्याची घोषणासुद्धा केली. आम्ही फक्त देशातील कंपन्यांना मदत देऊ बाहेर देशातल्या कंपन्यांना आमच्या करदात्यांच्या पैशातून मदत करणार नाही असे जाहीर केले. अप्रत्यक्षपणे हा व्यवहार लांबणीवर पडावा किंवा होऊच नये यासाठी सर्व प्रयत्न चालू होते. पण असे झाले असते तर कंपनीच बंद पडली असती, म्हणून तिथल्या लेबर युनियन डील च्या बाजूने होत्या. हळूहळू सरकारवर दबाव वाढायला लागला आणि सरकारने काही प्रमाणात पॅकेज देण्याची घोषणा केली.
पण रतन टाटा आपल्या निर्णयावर ठाम होते. कितीही टीका झाली, कुणी कितीही विरोध केला तरी हा व्यवहार करायचाच असा त्यांचा निश्चय होता. याचं कारण होतं टाटांना JLR पेक्षा टाटा मोटर्स च भविष्य अंधारात दिसत होतं. मारुती, ह्युंदाई, टोयोटा यांच्या लाटेत टाटा कंपनी इंडिका मुळे कशीबशी तग धरून होती. पण परिस्थिती जास्त काळ चांगली राहील अशी शक्यता बिलकुल नव्हती. इतर गाड्यांच्या अपयशामुळे अपयशामुळे कंपनी आधीच अडचणीत होती, आणि ब्रँड इमेज सुद्धा खराब झाली होती.
त्यावेळच्या टाटाच्या गाड्या म्हणजे व्हायब्रेशन्स,अमाप मेंटेनन्स खर्च, सततचा मेंटेनन्स, नवीन टेक्नॉलिजीचा अभाव, स्पर्धेत मागे पडलेला परफॉर्मन्स यामुळे बदनाम व्हायला लागल्या होत्या. जगभरातील वाहन कंपन्या भारतात येण्यासाठी पावले टाकत होत्या. या कंपन्या तंत्रज्ञानाने समृद्ध होत्या. मारुतीला सुझुकीची साथ असल्यामुळे तीसुद्धा या स्पर्धेत बरीच पुढे होती. टाटा मोटर्स ला हा तंत्रज्ञानाचा आधार हवा होता. पण हे तंत्रज्ञान कुणाकडे मागून मिळणे शक्य नव्हते, अशावेळी वाहनांमध्ये जगातील सर्वोत्तम तंत्रज्ञान असणारी कंपनीच विकत घेण्याची संधी दवडणे ताटाला परवडणारे नाचते. हा सौदा रतन टाटांनी पैशाच्या रूपात न तोलता त्यातून मिळणाऱ्या फायद्याच्या स्वरूपात तोलला, आणि तो सार्थकी सुद्धा लागला…
JLR मुळे सुरुवातीला कंपनीला बराच त्रास सहन करावा लागला, बराचसा पैसा JLR कडे वळवल्या गेल्यामुळे कंपनीला आर्थिक अडचणींचा सुद्धा सामना करावा लागला. पण कंपनीने वेगवेगळा प्रयोग सुरु केल्यामुळे हळूहळू कंपनी रुळावर यायला लागली. नवनवीन वाहने बाजारात यायला लागले. JLR चे तंत्रज्ञान हळूहळू ताटाच्या गाड्यांमध्ये दिसायला लागले. तरीसुद्धा JLR ला सांभाळणे सोपे काम नव्हतेच. २०१९ मध्ये तर कंपनीला JLR मुळे २५ हजार कोटींचा तोटा झल्याची बातमी आली, आणि एकाच दिवसात कंपनीचे शेअर्स २०% आपटले. पण यातूनही कंपनी चांगल्या प्रकारे सावरली.
मागच्या पाच वर्षात टाटा च्या वाहनांमध्ये फार बदल झाल्याचे दिसून येत आहे. सर्वच गाड्या डिझाईन आणि तंत्रज्ञानात फार आधुनिक झाल्याचे दिसून येत आहे. हा बदल JLR डील चा आहे. JLR मुळे कंपनीला अत्याधुनिक तंत्रज्ञान फार सहज उपलब्ध झाले. यासोबतच JLR डील झाली नसती कंपनीला याच तंत्रज्ञासाठी तसाही खूप खर्च करावा लागणार होता हे बहुतेकांनी दुर्लक्षित केले. तो खर्च वाचला आणि एक कंपनी टाटाच्या ताफ्यात जमा झाली. या डील ला आपण फक्त नफ्यातोट्याच्या दृष्टिकोनातून बघू शकत नाही, काही गोष्टींचे अप्रत्यक्ष फायदे प्रत्यक्ष फायद्यांपेक्षा जास्त असतात तसेच काहीसे या डील बाबत सुद्धा आहे.
(क्रमशः…)
© श्रीकांत आव्हाड
७७४४०३४४९० (WhatsApp Only)
Business Consultant
www.ShrikantAvhad.com
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम
All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील