गुणोत्तरे म्हटली ज्यांना आपल्या शालेय जीवनात गणित विषय आवडत नसे त्यांच्यासाठी काहीतरी किचकट अनाकलनीय कल्पना आहे असा समज आहे याचा जीवनाशी काय संबंध? हे सारे शिकलंच पाहिजे का? असे प्रश्न मनात येतील. हा भाग तेव्हा कदाचित तुम्ही दुर्लक्षित केला असेल परंतू जर तुम्ही गुंतवणूक करणारे असाल आणि जाणकार असाल कुशल गुंतवणूकदार म्हणून योग्य निर्णय घेण्यास या सर्वांची नक्की मदत होईल.
कंपनीचे मूलभूत संशोधन करण्यासाठी त्याच्या अहवालातून जी आर्थिक माहिती मिळते तिचा वापर करून ही गुणोत्तरे काढली जातात. याचा वापर करून, बाजार भावाच्या तुलनेत कंपनीचे वास्तविक मूल्य काढले जाते. यासाठी अनेक गुणोत्तरांचा वापर केला जातो त्यातील सहा महत्वाची गुणोत्तरे-
खेळते भांडवल प्रमाण (working capital ratio), the quick ratio, earnings per share (EPS), price-earnings (P/E), debt-to-equity, and return on equity (ROE) ही सर्व गुणोत्तरे एकेकटी नसून एक दुसऱ्यावर अवलंबून आहेत त्यामुळे कंपनीची नाडीपरिक्षा करताना त्याचा एकत्रित विचार केला जावा.
1.खेळते भांडवल प्रमाण – (Working Capital Ratio)
कंपनीचे आर्थिक आरोग्य यावरून समजते कंपनीकडे जमा होणारे पैसे आणि अल्पकालीन देयके यांचे एकमेकांशी असलेले प्रमाण पाहून कंपनीचा रोखता प्रवाह समजतो. यासाठी खेळते भांडवल म्हणजे चालू मालमत्ता आणि चालू देणी यामधील फरक या वरून कंपनीची देणे फेडू शकण्याची पात्रता लक्षात येते यासाठी अल्पकाळात म्हणजे एखाद्या कंपनीच्या दृष्टीने साधारणपणे एक वर्षात जमा होत असलेली आणि द्यावी लागणार असलेली रक्कम याच गोष्टींचा विचार केला जातो. याप्रकारे चालू मालमत्तेस चालू देण्याने भागले असता हे गुणोत्तर मिळते. हे गुणोत्तर जर एक असेल तर कंपनीस अल्पकाळात देणी देण्यास ताण येत आहे असे समजले जाते जर हे गुणोत्तर दोन असेल तर अशी देणी देण्यावर ताण येत नाही. जर हे गुणोत्तर खूपच अधिक असल्यास कंपनीकडे अतिरिक्त पैसा असून त्याचे नियोजन करण्यात व्यवस्थापनाची काहीतरी कमतरता आहे असे म्हणता येईल.
2. तात्काळ गुणोत्तर – (Quick Ratio)
कंपनीकडे असलेल्या मालमत्तेचे रुपांतर रोखतेत करता येईल त्यास तात्काळ गुणोत्तर असे म्हणतात. ज्याप्रमाणे एखादे आम्ल झटकन परिणाम दाखवते त्याप्रमाणे या मालमत्तेचे पैशात रूपांतर होऊ शकत असल्याने यास कंपनीची ऍसिड टेस्ट असेही म्हणतात. तात्काळ गुणोत्तर मोजताना मालमत्तेतून शिल्लख माल आणि आगाऊ खर्च वजा करण्यात येतात बाकी गुणोत्तर खेळत्या भांडवलाच्या प्रमाणेच आहे यातून कंपनीची आर्थिक स्थिती अधिक स्पष्ट होते. जर हे गुणोत्तर एक असेल तर ती कंपनीस आपली अल्पकालीन देणी भागवू शकणार नाही. ही परिस्थिती तात्कालिकही असू शकते. भाग भांडवल वाढवून किंवा कर्ज घेऊन यात बदल घडवून आणता येईल.
3.प्रतिशेअर कमाई- (Earnings per Share- EPS)
जेव्हा एखादया कंपनीत गुंतवणूक केली जाते तेव्हा गुंतवणूकदार हा कंपनीच्या भविष्यकाळात गुंतवणूक करत असतो. कंपनी पुढे उत्तम नफा मिळवेल अगर तोट्यातही जाईल याची जोखीम स्वीकारत असतो. प्रतिशेअर कमाई कंपनी किती नफा मिळवू शकते याची जाणीव करून देते ज्या योगे गुंतवणूकदार कंपनीचा भविष्यकालीन भाव काय असू शकेल त्यामुळे आपला किती फायदा होईल याचा अंदाज बांधू शकतात. कंपनीच्या निव्वळ उत्पन्नास वितरित करण्यात आलेल्या समभागाच्या संख्येने भागून प्रतिशेअर कमाई काढता येते. हे गुणोत्तर कंपनी तोट्यात असल्यास वजा येते तर जसा फायदा वाढत जाईल त्याप्रमाणे अधिकाधिक होत जाते.
4. किंमत प्रतिशेअर गुणोत्तर – (Price Earnings Ratio, P/E)
या गुणोत्तराने गुंतवणूकदार भावात किती वाढ होऊ शकण्याची ताकद आहे याचा अंदाज बांधू शकतात.
हे गुणोत्तर कंपनीच्या बाजारभावास प्रतिशेअर कमाईने भागल्यास मिळते. शून्य किंवा उणे किंमत प्रतिशेअर गुणोत्तर ती गुंतवणूक योग्य कंपनी नाही असे दर्शवते फक्त यात काही सुधारणा होत आहे का हे वेगवेगळ्या काळातील गुणोत्तरांची तुलना करून पहाता येते. नामवंत कंपन्या सतत फायद्यात असल्यास आणि त्याच्या नफ्यात वाढ होत असल्यास त्यासाठी अधिक किंमत मोजण्यास लोक तयार असतात साहजिकच त्याचे किंमत प्रतिशेअर गुणोत्तर वीस किंवा त्याहूनही खूप जास्त असते
5.कर्ज आणि भांडवल प्रमाण – (Debt-to-Equity Ratio)
एखादया कंपनीचे कर्ज वाढत चालले असता त्यावर द्यावे लागणारे व्याज यामुळे कंपनीच्या नफाक्षमतेवर परिणाम होतो यामुळे स्थिर खर्च वाढत जातात त्यामुळे नफा कमी होत जातो. या गुणोत्तराने कंपनी घेतलेल्या कर्जाचा नफा मिळवण्यासाठी कसा वापर करीत आहे ते समजते. भविष्यात विपरीत परिस्थिती उद्भवल्यास भांडवलातून कर्जाची भरपाई होईल का? हे समजते. एकाच प्रकारच्या व्यवसायाच्या कंपन्यांचे सरासरी कर्ज भांडवल काय आहे याच्याशी तुलना करता येईल आणि गुंतवणूक करण्यातील जोखीम समजून घेता येईल. काही उद्योगांचे फायदे मिळण्यात दीर्घकाळ जावा लागतो अशा उद्योगांना मोठ्या प्रमाणात कर्ज घ्यावे लागते.
6. भांडवल परतफेड प्रमाण – (Return on Equity ,ROE)
या गुणोत्तरातून एखादी कंपनी अधिकाधिक नफा मिळवून समभाग धारकांचा कसा फायदा करून देत आहे ते समजते. हे टक्केवारीत दाखवले जाते निव्वळ नफ्यास भांडवलाने भागून मिळते. चांगल्या कंपन्या समभागाचा वापर करून अधिक उत्पन्न मिळवतात. अधिकाधिक नफा मिळवून त्या समभागधारकांच्या मूल्यात भर घालत असतात.
प्रत्येक उद्योगासाठी लागणारी भांडवलाची गरज, आवश्यक कर्ज, त्यातून मिळू शकणारा नफा त्यास लागणारा कालावधी भिन्न असतो
त्यामुळे तुलना एकाच प्रकारच्या उद्योगांची एकमेकांशी करावी, तरच अचूक अंदाज बांधता येईल.
निश्चित केलेल्या कंपनीचे खरेखुरे मूल्य ठरवता येईल आणि ते बाजारभावाहून अधिक आहे की कमी आहे ते समजून घेऊन असे समभाग खरेदी करायचे की आपल्याकडे असतील तर त्यांची विक्री करायची हे ठरवता येईल. यास काही तांत्रिक ज्ञानाची जसे- आलेख रचना आणि उलाढाल भाव यात विशिष्ट कालावधीत पडणारा फरक यांची जोड दिल्यास आपल्याला अधिक अचूक अंदाज बांधता येतील.
_
© उदय पिंगळे
8390944222
लेखक गुंतवणूक अभ्यासक, मार्गदर्शक व सल्लागार आहेत.
====================
‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम
All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील